Posts

आध्यात्मिकता ११

मानसिक विचार, नैतिक प्रयास, उत्तम चारित्र्य, जनहित, आत्म-त्याग, आत्म-परित्याग, परोपकार, मानवाची किंवा मनुष्यमात्राची सेवा या गोष्टींना पाश्चात्य लोक आध्यात्मिक अभीप्सेचे किंवा आध्यात्मिक सिद्धीचे शिखर मानतात. यासंबंधी लिहून झाल्यावर श्रीअरविंद या पत्रामध्ये पुढे लिहितात…..

(वर उल्लेख केलेल्या गोष्टी) म्हणजे पृथ्वीवरील उपलब्धींचा जर अखेरचा शब्द असता, तर अन्य कोणत्या गोष्टींची आवश्यकताच भासली नसती. आत्म्याचा किंवा स्वतःचा अगदी जवळून आणि सुस्पष्टपणे घेतलेला शोध, प्राणाच्या पाठीमागे आणि मनाच्या वर असणाऱ्या गोष्टींसाठी झटून केलेले प्रयत्न, ‘चिरंतना’विषयी किंवा ‘अनंता’विषयी असलेली ओढ, बुद्धिच्या, चारित्र्याच्या आणि मानवतेच्या गतकालीन जीवनध्येयांच्या संकुचित साच्यांमुळे मर्यादित न झालेली, चेतनेच्या आणि अस्तित्वाच्या स्वातंत्र्यासाठी आणि विशालतेसाठी असलेली भूक, ‘ईश्वरा’च्या किंवा विशुद्ध आनंदाच्या ऐक्यासाठी असलेली तृष्णा, मानसिक व प्राणिक मूल्यांशी जखडल्या न गेलेल्या आध्यात्मिक अस्तित्वाचे सौंदर्य या साऱ्या गोष्टींना येथे स्थान नसल्यामुळे आणि त्यांची येथे आवश्यकतादेखील नसल्यामुळे, त्या अनावश्यक स्वप्न म्हणून बाद कराव्या लागल्या असत्या. परंतु असे असूनही, या गोष्टींची नुसती स्वप्नंच पाहिली गेली आहेत, अथवा नुसता त्यांचा ध्यासच घेतला गेला आहे असे नाही, तर मर्त्य, मानवी देहामध्ये जन्म घेतलेले जीव तेथवर जाऊन पोहोचले आहेत, त्या गोष्टींचा पडताळा त्यांनी घेतला आहे. तेथे ‘आध्यात्मिकता’ असते.

मानवी मानसिक, नैतिक, सौंदर्यात्मक, प्राणिक साच्यांच्या पलीकडे जाण्यासाठी, ते साचे मोडणे आणि (चिरंतनाविषयीची ओढ इ. गोष्टी, ज्यांचा वर उल्लेख झाला) त्या गोष्टी ज्या चेतनेचे मूलद्रव्य आहेत, हे अनुभव ज्या चेतनेच्या दृष्टीने अगदी सहज-स्वाभाविक आहेत अशा चेतनेमध्ये प्रवेश करणे हा ‘आध्यात्मिकते’चा गाभा आहे. त्यापेक्षा निम्नतर अशी कोणतीही गोष्ट, किंवा उपरोक्त गोष्टींपेक्षा निम्नतर अशा कोणत्याही गोष्टीचा ध्यास किंवा अगदीच काही नाही तरी, त्यांचा झालेला आंशिक साक्षात्कार या गोष्टी म्हणजे ‘आध्यात्मिकता’ नव्हे. यांपैकी कोणत्यातरी एखाद्या गोष्टीचा साक्षात्कार, त्याच्या अनेक पैलूंपैकी, किमान एका पैलूचा तरी अनुभव, ज्याला आला आहे तो मनुष्य ‘आध्यात्मिक’ असतो; या गोष्टींचा ध्यास घेऊन, त्यासाठी जो प्रयत्नशील आहे, तो ‘आध्यात्मिक साधक’ असतो.

अन्य गोष्टी बौद्धिक, नैतिक दृष्टीने कितीही उदात्त असल्या, सौंदर्यदृष्ट्या अतिशय सुंदर आणि सुसंवादी असल्या, प्राणिकदृष्ट्या वैभवसंपन्न, महान आणि शक्तिशाली असल्या किंवा शारीरिकदृष्ट्या निर्दोष असल्या तरी या सर्व गोष्टी म्हणजे मार्गावरील एक मौलिक उपलब्धी आहे एवढेच म्हणता येईल, या गोष्टी म्हणजे स्वयमेव ‘आध्यात्मिकता’ नव्हे, कारण येथे अजूनही व्यक्तीने मनाची ‘सीमारेषा’ ओलांडून एका नव्या साम्राज्यात प्रवेश केलेला नसतो. [‘आध्यात्मिकता’ मालिकेमधील ‘मानवी परिपूर्णत्व आणि आध्यात्मिकता’ हा भाग येथे संपला.]

– श्रीअरविंद [CWSA 28 : 424-425]

आध्यात्मिकता १०

धार्मिक माणसं ही आध्यात्मिक असतात असे लोकं मानतात पण एखादी व्यक्ती अगदी खूप धार्मिक असूनही ती आध्यात्मिक नाही, असे असू शकते. आध्यात्मिकतेची जी लोकप्रिय संकल्पना आहे त्याद्वारे, गूढविद्येच्या शक्तीचे अद्भुत विक्रम, तपस्व्यांचे विक्रम, चमत्कार, तुमच्या त्या संन्यासीबाबांची थक्क करणारी सादरीकरणे या गोष्टींना आध्यात्मिक सिद्धीचे कार्य आणि महान ‘योगी’ असण्याची लक्षणे म्हणून संबोधण्यात येते आणि तेथेच गल्लत होते. परंतु एखादी व्यक्ती अगदी शक्तिमान गूढवादी असू शकते, किंवा आपल्या तपस्येच्या आधारावर ती अद्भुत गोष्टी करू शकते आणि तरीही ती अजिबात आध्यात्मिक नाही असे असू शकते. म्हणजे आध्यात्मिकतेच्या खऱ्या अर्थाने, आध्यात्मिक या शब्दाचा जो सुयोग्य आणि मूळचा अर्थ आहे त्या अर्थाने ती व्यक्ती आध्यात्मिक नाही असे असू शकते.

ज्याने आध्यात्मिक चेतना प्राप्त करून घेतली आहे, ज्याला आंतरिक किंवा उच्चतर ‘आत्म्या’चा साक्षात्कार झाला आहे, ज्याचा ‘ईश्वरा’शी संपर्क झाला आहे किंवा ज्याचे ‘ईश्वरा’शी किंवा जे चिरंतन आहे त्याच्याशी ऐक्य झाले आहे किंवा जो त्या दिशेने वाटचाल करत आहे किंवा जो या गोष्टींसाठी प्रयत्नशील आहे, तो आध्यात्मिक आहे, असे म्हणता येईल. ‘आध्यात्मिक’ या शब्दाचा खरा आणि मूळचा अर्थ असा आहे. जे जीवन अशा रीतीने त्या शोधावर आणि त्या उपलब्धीवर आधारित असते अशा जीवनाद्वारेच ‘आध्यात्मिक’ परिपूर्णता प्राप्त होऊ शकते. [क्रमश:]

– श्रीअरविंद [CWSA 28 : 417]

आध्यात्मिकता ०९

आपल्या कुटुंबीयांसाठी पैसे कमावणे आणि कौटुंबिक कर्तव्य पार पाडणे; एक भला आणि नीतिसंपन्न माणूस बनणे; सुयोग्य नागरिक, देशभक्त, देशासाठी कार्यकर्ता बनणे ही गोष्ट, कोणत्यातरी दूरस्थ आणि अदृश्य ‘देवते’च्या शोधार्थ, निष्क्रियपणे ध्यानाला बसण्यापेक्षा अधिक ‘आध्यात्मिक’ आहे, असे आपल्याला अलीकडे वारंवार सांगण्यात येते. परोपकार, जनहित, मानवतेची सेवा या गोष्टींना खऱ्या आध्यात्मिक गोष्टी म्हणून मानण्यात येते. मानसिक आदर्शवाद, नैतिक प्रयत्न, सौंदर्यात्मक विशुद्धता या गोष्टींना आधुनिक मनाद्वारे, आध्यात्मिक गोष्टी म्हणून पुढे केले जाते. आपण उत्तमातील उत्तम आणि सर्वोच्च असे जे काही साध्य करून घेऊ शकत असू तर ते हेच आहे असे दर्शविले जाते. – तथापि त्याचवेळी, एकीकडे वाढता भ्रमनिरास, असमाधान, त्यांच्यातील पोकळपणाची भावना या गोष्टीदेखील वाढीस लागत आहेत.

वरील सर्वच गोष्टींचा निश्चितपणे काही उपयोग आहे, कारण प्रत्येक गोष्टीचे त्याच्या त्याच्या स्थानी त्याचे त्याचे एक मूल्य असते आणि जे लोक या गोष्टींनी समाधानी होतात ते त्याला सर्वाधिक महत्त्व देतात, आणि या गोष्टी म्हणजेच सर्वोत्तम गोष्टी आहेत, त्या ‘कर्तव्यकर्म’ आहेत, असे मानून त्या धारण करतात, हे स्वाभाविकच आहे.

परंतु आध्यात्मिकता ही या गोष्टींवर अवलंबून नसते, तर ती स्वतःच्या स्वतंत्र पायावर आधारलेली असते आणि आध्यात्मिक चेतनेखेरीज अन्य कोणत्याही पायावर या गोष्टी जोपर्यंत आधारलेल्या असतात आणि आंतरिक आध्यात्मिक अधिष्ठानावर त्या जोपर्यंत रूपांतरित होत नाहीत तोपर्यंत आध्यात्मिकता त्या गोष्टींचा समावेशदेखील स्वत:मध्ये करून घेत नाही. [क्रमश:]

– श्रीअरविंद [CWSA 28 : 417]

आध्यात्मिकता ०८

तुम्ही तुमच्या पत्रामध्ये वर्णन केलेल्या परिपूर्णत्वाच्या गोष्टी या कितीही चांगल्या असल्या तरी, त्याचे वर्णन मी ‘आध्यात्मिक’ या शब्दाचा जो खरा अर्थ आहे त्या अर्थाने करणार नाही. कारण त्यामध्ये आध्यात्मिकतेच्या सारभूत आवश्यक अशा गोष्टींचा अभाव आहे. सर्व प्रकारचे पूर्णत्व हे खरोखर चांगलेच असते, कारण या किंवा त्या स्तरावर, या किंवा त्या मर्यादेत पूर्ण आत्माविष्काराच्या दिशेने, चेतनेचा जो प्रेरक-दाब (pressure) जडभौतिक विश्वावर पडतो, त्याची ती खूण असते. एका विशिष्ट अर्थाने ती स्वयमेव ‘ईश्वरा’चीच प्रेरणा असते, जी विविध रूपांमध्ये दडलेली असते. तिच्याद्वारे, चेतनेच्या निम्नतर श्रेणींमध्ये स्वयमेव ‘ईश्वर’च स्वतःच्या चढत्यावाढत्या आत्म-प्रकटीकरणाच्या (self-revelation) दिशेने स्वतःला प्रवृत्त करत असतो.

अचर निसर्गामध्ये एखाद्या वस्तूचे किंवा दृश्याचे पूर्णत्व; सामर्थ्य, वेग, शारीरिक सौंदर्य, धैर्य किंवा प्राण्यांची एकनिष्ठता, प्रेम, बुद्धिमत्ता यांचे सचेतन पूर्णत्व; कला, संगीत, काव्य, साहित्य यांचे पूर्णत्व; परिपूर्ण राजधुरंधर, योद्धा, कलाकार, कारागिर यांच्या मानसिक कृतीच्या कोणत्याही प्रकारातील बुद्धीचे पूर्णत्व; प्राणिक शक्ती आणि क्षमता यांचे पूर्णत्व; नैतिक गुणांमधील, चारित्र्यामधील, स्वभावधर्मातील पूर्णत्व – या सर्व गोष्टींना त्यांचे त्यांचे उच्च मूल्य आहे; उत्क्रांतीच्या शिडीवरील एक पायरी या दृष्टीने त्यांचे प्रत्येकाचे असे एक स्थान आहे; चैतन्याच्या उदयाच्या क्रमबद्ध पायऱ्या म्हणून त्यांचे मोल आहे. त्या पाठीमागे असलेल्या ‘ईश्वरा’च्या या अदृश्य प्रेरणेमुळे, त्याला आध्यात्मिक असे संबोधावे असे जर कोणाला वाटत असेल तर त्याने तसे खुशाल संबोधावे; फार फार तर, ती गुप्त चैतन्याच्या उदयाची पूर्वतयारी आहे, असे म्हणता येईल. परंतु, आवश्यक भेद केल्यानेच, विचार आणि ज्ञान प्रगत होऊ शकतात. त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे पुष्कळसा गोंधळ निर्माण झाला आहे.

हा मानसिक आदर्शवाद, नैतिक विकास, धार्मिक पावित्र्य आणि उत्साह, गूढशक्ती आणि त्याचे विक्रम या सगळ्या गोष्टींची आजवर ‘आध्यात्मिकता’ म्हणून गणना करण्यात आली होती आणि आध्यात्मिक उत्क्रांती ही चेतनेच्या निम्नतर स्तरांशीच जखडून ठेवण्यात आली होती; वास्तविक त्या गोष्टींनी अनुभवाद्वारे आध्यात्मिक चेतनेसाठी जिवाची तयारी करून दिली होती, पण या गोष्टी म्हणजे स्वयमेव ‘आध्यात्मिकता’ नव्हे.

हे पूर्णत्व तेव्हाच खऱ्या अर्थाने आध्यात्मिक बनते, जेव्हा हे पूर्णत्व जागृत झालेल्या आध्यात्मिक चेतनेवर आधारलेले असते आणि त्याने त्या चेतनेचे विशिष्ट सार ग्रहण केलेले असते. [क्रमश:]

– श्रीअरविंद [CWSA 28 : 416]

दिव्य पूर्णता ही आपल्या नेहमीच ऊर्ध्वस्थित असते. परंतु, मनुष्याची चेतना व त्याच्या कृती दिव्य बनणे आणि अंतरंगातून व बाह्यतः देखील त्याने दिव्य जीवन जगणे हाच ‘आध्यात्मिकते’चा अर्थ आहे.

‘आध्यात्मिकता’ या शब्दाला देण्यात आलेले इतर सर्व दुय्यम अर्थ म्हणजे अर्धवट चाचपडणे आहे किंवा विडंबन आहे.

– श्रीअरविंद [CWSA 25 : 262-263]

मनुष्याच्या खऱ्या, अगदी आंतरतम, उच्चतम आणि विशालतम अशा ‘स्व’च्या आणि ‘आत्म्या’च्या चेतनेवर आधारलेले, एक नूतन आणि महत्तर आंतरिक जीवन हा ‘आध्यात्मिकते’चा अर्थ आहे.

हे असे जीवन असते की, ज्यायोगे मनुष्य त्याचे समग्र अस्तित्व एका वेगळ्या भूमिकेतून स्वीकारतो. समग्र अस्तित्व हे त्याच्या आत्म्याचे या विश्वामधील एक प्रगमनशील (progressive) आविष्करण आहे, अशा भूमिकेतून तो ते स्वीकारतो. आणि ज्यामध्ये दिव्य चेतना गवसेल अशा प्रकारच्या संभाव्य रूपांतरणाचे एक क्षेत्र म्हणजे त्याचे स्वतःचे जीवन आहे अशा भूमिकेतून मनुष्य ते जीवन स्वीकारतो.

ज्यामध्ये त्याच्यामधील सर्व क्षमता या अत्युच्च स्तरावर विकसित झालेल्या असतील; आत्ता अपूर्ण स्वरूपात असणाऱ्या रूपांचे दिव्य पूर्णत्वाच्या प्रतिमेमध्ये परिवर्तन झालेले असेल आणि त्याच्या व्यक्तित्वाच्या महत्तर शक्यता दृष्टिपथात येण्यासाठीच नव्हे तर, त्या शक्यता प्रत्यक्षात उतरविण्यासाठी त्याच्याकडून प्रयत्न केला जाईल, अशा भूमिकेतून मनुष्य ते जीवन स्वीकारतो.

– श्रीअरविंद [CWSA 26 : 270]

मन आणि प्राण यांच्यापेक्षा अधिक श्रेष्ठतर अशा कोणत्यातरी गोष्टीचे अभिज्ञान (recognition) होणे; आपल्या सामान्य मानसिक आणि प्राणिक प्रकृतीच्या अतीत असणाऱ्या विशुद्ध, महान, दिव्य चेतनेप्रत अभीप्सा असणे; आपल्या कनिष्ठ घटकांच्या क्षुद्रतेमधून आणि त्यांच्या बंधनातून बाहेर पडून, आपल्या अंतरंगामध्ये गुप्त रूपाने वसत असलेल्या महत्तर गोष्टीच्या दिशेने, मनुष्यामधील अंतरात्म्याचा उदय आणि त्याचे उन्नयन होणे म्हणजे ‘आध्यात्मिकता’!

– श्रीअरविंद [CWSA 20 : 121]

‘आध्यात्मिकता’ म्हणजे उच्च दर्जाची बुद्धिमत्ता नव्हे, आदर्शवादही नव्हे, मनाचा तो नैतिक कलही नव्हे किंवा नैतिक शुद्धता आणि तपस्यादेखील नव्हे; आध्यात्मिकता म्हणजे धार्मिकता नव्हे किंवा एक आवेशयुक्त आणि उदात्त भावनिक उत्कटताही नव्हे, किंवा वरील सर्व उत्तम गोष्टींचा समुच्चयही नव्हे. आध्यात्मिक उपलब्धी आणि अनुभूती म्हणजे एक मानसिक विश्वास, पंथ किंवा श्रद्धा, एक भावनिक आस, धार्मिक किंवा नैतिक सूत्रांना अनुसरून केलेले वर्तनाचे नियमन देखील नव्हे. या सर्व गोष्टींना मनाच्या आणि जीवनाच्या दृष्टीने मोठेच मोल असते. त्यांना आध्यात्मिक विकासाच्या दृष्टीनेही थोडेफार मोल असते. शिस्त लावणाऱ्या, शुद्धीकरण घडविणाऱ्या किंवा प्रकृतीला सुयोग्य आकार देणाऱ्या, पूर्वतयारी घडविणाऱ्या प्रक्रिया म्हणून त्यांचे काही विशिष्ट मोल असते; परंतु तरीसुद्धा त्या प्रक्रियांची गणना ‘मानसिक विकासा’च्या या प्रकारामध्येच होते. तेथे अजूनपर्यंत आध्यात्मिक साक्षात्कार, अनुभूती किंवा परिवर्तन या गोष्टींची सुरूवात झालेली नसते.

साररूपाने सांगायचे तर, आपल्या अस्तित्वाच्या आंतरिक वास्तवाबद्दल जाग येणे; आपल्या मन, प्राण आणि शरीर या सगळ्यांहून भिन्न असणाऱ्या चैतन्याविषयी, ‘स्व’ विषयी, आत्म्याविषयी जाग येणे; ते जाणण्याची, ते अनुभवण्याची आणि तेच बनण्याची एक आंतरिक अभीप्सा निर्माण होणे म्हणजे ‘आध्यात्मिकता’! या विश्वाला व्यापून असणाऱ्या आणि त्याच्याही अतीत असणाऱ्या तसेच, खुद्द आपल्या अंतर्यामी निवास करणाऱ्या एका महत्तर ‘सत्या’च्या (Reality) संपर्कात येणे, ‘त्या’च्याशी भावैक्य होणे, ‘त्या’च्याशी एकात्म पावणे आणि त्या ऐक्याचा, त्या संपर्काचा आणि त्या अभीप्सेचा परिणाम म्हणून आपले समग्र अस्तित्व त्याच्याकडे वळणे, आपल्या अस्तित्वाचे परिर्वतन घडणे आणि रूपांतरण घडणे; एका नवीन संभूतीमध्ये (becoming), एका नवीन अस्तित्वामध्ये, एका नवीन आत्मत्वामध्ये, एका नवीन प्रकृतीमध्ये जागृत होणे किंवा वृद्धिंगत होणे म्हणजे ‘आध्यात्मिकता’!

– श्रीअरविंद [CWSA 21-22 : 889-890]

अहंकाराव्यतिरिक्त आणखी एका चेतनेविषयी जेव्हा तुम्हाला जाणीव होऊ लागते आणि त्या चेतनेमध्ये तुम्ही जीवन जगायला सुरूवात करता किंवा अधिकाधिक रीतीने तुम्ही त्या चेतनेच्या प्रभावात जीवन जगू लागता तेव्हा ती ‘आध्यात्मिकता’ असते.

ही चेतना व्यापक, अनंत, स्वयंभू, अहंकारविरहित अशी असते, या चेतनेला चैतन्य (‘आत्मा, ब्रह्म, ईश्वर’) या नावांनी ओळखले जाते, आणि हाच अनिवार्यपणे ‘आध्यात्मिकते’चा अर्थ असला पाहिजे.

– श्रीअरविंद [SABCL 23 : 877]

‘देव’भूमी असलेल्या भारतामध्ये ऋषीमुनी, योगी, संतसत्पुरूष, महात्मे यांची कधीच वानवा नव्हती. त्यांच्या तपाचरणाचा प्रभाव म्हणा किंवा सत्संगाचा प्रभाव म्हणा, पण भारतामध्ये रहिवास करणाऱ्या आबालवृद्धांना जणू आध्यात्मिकतेचे बाळकडूच मिळालेले असते. परंतु त्याच्या अतिपरिचयामुळे असेल कदाचित पण सामान्य जनांमध्ये ‘आध्यात्मिकता’ या गोष्टीबद्दल विविध समजुती असलेल्या आढळतात. त्यांची सत्यासत्यता पारखून, श्रीअरविंद आपल्याला आध्यात्मिकता म्हणजे काय आणि काय नाही, हे खुलासेवार स्पष्ट करतात.

एकदा आध्यात्मिकता म्हणजे काय हे समजले की, त्याला जोडूनच पुढचा प्रश्न येतो. आणि तो म्हणजे आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये आध्यात्मिकतेचे अनुसरण कसे करायचे. याबद्दलचे मार्गदर्शनही उद्यापासून सुरु होत असलेल्या ‘आध्यात्मिकता’ या मालिकेमध्ये वाचकांना लाभेल, असा विश्वास वाटतो.

संपादक, ‘अभीप्सा’ मराठी मासिक