Posts

आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (०७)

(काव्य, ग्रंथ-वाचन, सामाजिक संपर्क इत्यादी प्रत्येक गोष्टींचे निश्चितपणे काही महत्त्व असते पण साधकाचा मुख्य भर साधनेवर असला पाहिजे आणि त्याला पूरक ठरतील अशा इतर सर्व गोष्टी असल्या पाहिजेत… हे श्रीअरविंद एका साधकाला सांगत आहेत. ते सांगत असताना ‘साधना म्हणजे काय’ हे त्यांनी स्पष्ट केले आहे.)

साधना हीच मुख्य गोष्ट असली पाहिजे आणि साधना म्हणजे प्रकृतीचे शुद्धीकरण, आत्म-निवेदन (Consecration), चैत्य पुरुष, अंतर्मन, प्राण यांचे खुले होणे (Opening), आणि ‘ईश्वरा’शी संपर्क आणि त्याच्या उपस्थितीचा अनुभव, सर्व गोष्टींमध्ये ‘ईश्वरा’ची प्रचिती; साधना म्हणजे समर्पण, भक्ती, चेतनेचे विश्वचेतनेमध्ये विस्तृतीकरण, सर्वांभूती एकाच ‘आत्म्या’च्या अस्तित्वाचा अनुभव, प्रकृतीचे आंतरात्मिक आणि आध्यात्मिक रूपांतर.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 78)

साधनेची मुळाक्षरे – ०७

आपण का जगतो हे जाणून घेणे म्हणजे ‘ईश्वरा’चा शोध घेणे आणि ‘त्याच्या’शी जागृत ऐक्य पावणे; केवळ याच साक्षात्कारावर लक्ष एकाग्र करण्याची अभीप्सा बाळगणे; सर्व प्रकारच्या परिस्थितीचे रूपांतरण ध्येयप्राप्तीपर्यंत पोहोचण्याच्या साधनांमध्ये कसे करायचे हे जाणून घेणे.

*

प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण हा एका नवीन आणि पूर्णतर अशा आत्मनिवेदनाचे निमित्त झाला पाहिजे. आणि ते आत्म-निवेदन, कार्याबद्दलच्या भ्रांतकल्पनांनी भरलेले, अतिरिक्त सक्रिय, उथळ, उत्तेजित अशा आत्म-निवेदनांपैकीचे एक असता कामा नये, तर ते सखोल, शांत असे आत्म-निवेदन असले पाहिजे, ते दृश्य स्वरूपात असलेच पाहिजे असे काही आवश्यक नाही परंतु ते आत खोलवर जाऊन पोहोचेल आणि तेथून साऱ्या कृतींचे परिवर्तन घडवून आणेल, असे असले पाहिजे.

– श्रीमाताजी
(CWM 16 : 428), (CWM 01 : 80)