Posts

कर्म आराधना – २९

वाचन आणि अभ्यास यांचा मनाच्या तयारीसाठी उपयोग होत असला तरीदेखील, ‘योगमार्गा’त प्रवेश करण्यासाठीची ती स्वयंसिद्ध उत्तम अशी माध्यमे नव्हेत. अंतरंगातून होणारे आत्मार्पण (self-dedication) हे उत्तम माध्यम असते. तुम्ही ‘श्रीमाताजी’च्या चेतनेशी एकरूप झाले पाहिजे; मन, हृदय आणि ‘संकल्प’शक्ती यांमधील प्रामाणिक आत्मनिवेदन (self consecration) ही त्यासाठीची माध्यमे आहेत. श्रीमाताजींनी दिलेले कर्म हे त्या आत्म-निवेदनासाठी नेहमीच उत्तम क्षेत्र असल्याचे मानले जाते, त्यांनी दिलेले कर्म हे त्यांनाच अर्पण करण्याच्या भावनेतून केले गेले पाहिजे, म्हणजे मग त्या आत्मार्पणाच्या माध्यमातून व्यक्तीला श्रीमाताजींच्या कार्यकारी शक्तीची आणि त्यांच्या उपस्थितीची जाणीव होऊ शकेल.

– श्रीअरविंद
[CWSA 29 : 246]

समर्पण – ०१

आपल्या जीवनाची सारी जबाबदारी ईश्वराच्या हाती सोपविण्याचा निर्णय म्हणजे समर्पण (Surrender). या निर्णयाव्यतिरिक्त कोणतीच गोष्ट शक्य नाही. जर तुम्ही समर्पण केले नाहीत तर योगाचा प्रश्नच उद्भवत नाही. समर्पणानंतर सारे काही स्वाभाविकपणेच येते कारण योगाची प्रक्रियाच मुळी समर्पणाबरोबर सुरू होते. तुम्ही ज्ञानाच्या माध्यमातून किंवा भक्तीच्या माध्यमातून समर्पित होऊ शकता. केवळ ईश्वरच सत्य आहे ही एक दृढ अंतःप्रेरणा तुमच्यामध्ये असू शकते आणि ईश्वराखेरीज माझे काहीच चालणार नाही, अशी एक प्रकाशमय धारणा तुमच्यामध्ये असू शकते. किंवा मग आनंदी होण्याचा केवळ हाच एक मार्ग आहे, हीच एक दिशा आहे अशी उत्स्फूर्त भावना असू शकते; किंवा मग आपण केवळ ईश्वराचेच असावे अशी दृढ आंतरात्मिक इच्छा असू शकते. ”मी माझा नाही,” असे तुम्ही म्हणता आणि आपल्या अस्तित्वाची जबाबदारी तुम्ही ‘सत्या’वर सोपविता.

मग येते आत्मार्पण (Self-offering) : तुम्ही म्हणता की, “मी एक चांगल्या आणि वाईट साऱ्या गुणांनी बनलेला, अंधाऱ्या आणि प्रकाशपूर्ण गुणांनी बनलेला असा प्राणी आहे; मी जसा आहे तसा मी स्वतःला समर्पित करत आहे; माझ्या चढउतारांसहित, माझ्या परस्परविरोधी प्रेरणा आणि प्रवृत्तींनिशी माझा स्वीकार कर आणि तुला जे करावेसे वाटते ते माझ्याबाबतीत कर.” आणि मग जो पहिल्या प्रथम निर्णय घेतला होता त्या केंद्रवर्ती आंतरात्मिक इच्छेभोवती तुमच्या साऱ्या अस्तित्वाचे एकीकरण व्हायला सुरुवात होते. तुम्ही तुमच्या प्रकृतीमधील अडथळा निर्माण करणारे सारे घटक एकेक करून हाती घ्यायला हवेत आणि त्यांचे केंद्रवर्ती अस्तित्वाभोवती एकीकरण करावयास हवे. तुम्ही एका उत्स्फूर्त प्रेरणेने स्वतःला ईश्वराप्रत समर्पित करू शकता; पण अशा प्रकारे एकीकरण घडून आल्याखेरीज तुम्ही प्रभावीरित्या समर्पण करू शकत नाही.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 126)