Posts

कोणतेही विचारच मनात उमटू नयेत अशा प्रकारे मन शांत करणे ही गोष्ट सोपी नाही, बहुधा त्याला बराच काळ लागतो. सर्वात आवश्यक गोष्ट कोणती असेल तर ती ही आहे की, एक प्रकारची मनाची शांती तुम्हाला जाणवली पाहिजे. विचार जरी मनात आलेच तरी, त्यामुळे तुम्ही विचलित होता कामा नये किंवा त्यांनी तुमच्या मनाचा ताबा घेता कामा नये किंवा तुम्ही त्यामध्ये वाहवत जाता कामा नये; जरी मनात विचार आले तरी, ते नुसतेच निघून जात आहेत, असे व्हावयास हवे.

येणाऱ्या जाणाऱ्या विचारांचे सुरुवाती सुरुवातीला मन ‘साक्षी’ बनते, ते ‘विचारक’ नसते. नंतरनंतर तर ते विचार पाहणारे साक्षीही राहत नाही. त्या विचारांकडे लक्षही जात नाही, विचार केवळ येऊन जात आहेत, असे ते करु शकते. तेव्हा ते स्वत:वरच किंवा त्याने निवडलेल्या एखाद्या वस्तुवर विनासायास लक्ष केंद्रित करू शकते.

साधनेचा पाया म्हणून दोन मुख्य गोष्टी साध्य करून घ्यावयास हव्यात –
• चैत्य पुरुषाचे खुलेपण आणि
• वर असलेल्या आत्म्याचा साक्षात्कार.

चैत्य पुरुषाचे खुलेपण :
श्रीमाताजींवर चित्ताची एकाग्रता आणि त्यांच्याप्रत आत्मार्पण हे चैत्य पुरुष खुले करण्याचे थेट मार्ग आहेत. भक्ती वाढली असल्याचे तुम्हाला जे जाणवते, ती चैत्य विकसनाची पहिली खूण आहे. श्रीमाताजींच्या उपस्थितीची वा त्यांच्या शक्तीची संवेदना किंवा त्या तुम्हाला साहाय्य करत आहेत, समर्थ बनवीत आहेत ह्याचे स्मरण ही पुढची खूण आहे. सरते शेवटी, आतील आत्मा हा अभीप्सेमध्ये सक्रिय व्हावयास सुरुवात होईल. आणि मनाला योग्य विचारांकडे वळण्यासाठी, प्राणाला योग्य गतिविधी व भावभावना यांच्याकडे वळण्यासाठी, चैत्य बोधाकडून (Psychic Perception) मार्गदर्शन मिळू लागेल; ज्या गोष्टी बाजूला सारण्याची आवश्यकता आहे त्या गोष्टी दाखवून दिल्या जातील आणि त्या बाजूलाही सारल्या जातील आणि अशा प्रकारे व्यक्तीच्या सर्व क्रिया त्या एका ईश्वराकडेच वळविल्या जातील.

आत्मसाक्षात्कार :
आत्मसाक्षात्कारासाठी, मनाची शांती आणि मौन ह्या पहिल्या आवश्यक अटी आहेत. नंतर व्यक्तीला एक प्रकारची सुटका, मुक्तता, व्यापकता जाणवायला सुरुवात होते. व्यक्ती एका शांत, अक्षोभित, कोणत्याच गोष्टीने स्पर्शित नसलेल्या, सर्वत्र आणि सर्वांतर्यामी अस्तित्वात असणाऱ्या, ईश्वराशी एकरूप झालेल्या किंवा ईश्वराशी अभिन्न असलेल्या अशा चेतनेमध्ये जीवन जगू लागते. अंतर्दृष्टी खुली होणे, अंतरंगामध्ये शक्तीचे कार्य चालू असल्याची जाणीव होणे किंवा तिच्या कार्याच्या विविध क्रियाप्रक्रिया किंवा त्या कार्याची लक्षणे इ. इ. जाणवणे ह्यासारखे मार्गातील इतर अनुभव येतील किंवा येऊ शकतील. तसेच व्यक्तीला चेतनेचे आरोहण आणि वरून अवतरित होणारी शक्ती, शांती, आनंद वा प्रकाश ह्यांचीसुद्धा जाणीव होऊ शकते.

– श्रीअरविंद
(CWSA 30 : 320)