भारताचे पुनरुत्थान – १३
पूर्वार्ध
लेखनकाळ : इ.स.१९१०
खरी अडचण ही आपल्या अवतीभोवती नसते; तर ती नेहमी आपल्या स्वत:मध्येच असते. व्यक्तीला अजेय बनविण्यासाठी संकल्पशक्ती, निरपेक्ष वृत्ती (Disinterestedness) आणि श्रद्धा या तीन गोष्टींची आवश्यकता असते. स्वतःला बंधमुक्त करून घेण्याची आपली इच्छा असू शकते, तसा संकल्पही केलेला असू शकतो पण पुरेशा श्रद्धेचा अभाव असू शकतो. आपल्यामध्ये स्वतःच्या परममोक्षाबद्दल श्रद्धा असू शकते पण त्यासाठी आवश्यक असणारी साधने वापरण्यासाठी जी इच्छा लागते त्या इच्छेचा अभाव आपल्याकडे असू शकतो. आणि जरी इच्छा व श्रद्धा या दोन्ही गोष्टी असल्या तरीसुद्धा, त्यांचा अवलंब आपण आपल्या कार्यफलाच्या आसक्तीला चिकटून राहून करत असण्याची शक्यता असते. किंवा तो अवलंब आपण अनिष्टकारक प्रतिक्रिया निर्माण करणाऱ्या द्वेषमूलक आवेगांनी, अंध उत्तेजनेने किंवा घाईघाईने जबरदस्तीने करत असण्याची शक्यता असते. आणि म्हणूनच, अशा प्रकारच्या भव्य कार्यामध्ये, (स्वतःला बंधमुक्त करण्यासारख्या कार्यामध्ये) न भूतो न भविष्यति अशा अडथळ्यांवर मात करण्यासाठी म्हणून, मनाच्या आणि शरीराच्या शक्तींहूनही अधिक उच्च असणाऱ्या ‘शक्ती’चा आश्रय घेण्याची आवश्यकता असते. ही साधनेची गरज असते.
ईश्वर आपल्या अंतरंगामध्येच आहे; ‘सर्वशक्तिमान’, ‘सर्वव्यापी’, ‘सर्वज्ञ’ शक्ती’ या रूपामध्ये तो आपल्या अंतरंगामध्ये विराजमान आहे. त्या ईश्वराचे आणि आपले स्वरूप मूलतः एकसमानच आहे. आपण त्याच्या संपर्कात आलो आणि स्वतःला जर त्याच्या हाती सोपविले तर, तो आपल्यामध्ये त्याची स्वतःची शक्ती ओतेल आणि मग, आपल्यामध्येसुद्धा देवत्वाचा अंश आहे, आपल्यामध्ये त्या सर्वशक्तिमानतेचा, सर्वव्यापकत्वाचा आणि सर्वज्ञतेचा काही अंश आहे, ही अनुभूती आपल्याला येईल. मार्ग दीर्घ आहे, पण आत्मसमर्पणामुळे तो जवळचा होतो; मार्ग कठीण आहे पण परिपूर्ण विश्वासामुळे तो सुकर होतो.
– श्रीअरविंद (CWSA 01 : 536-537)