Tag Archive for: आत्मशोध

 

बरेचदा असे होते की, व्यक्ती आत्मशोधासाठी, आत्म्याशी ऐक्य पावण्यासाठी आवश्यक असणारे सर्व आंतरिक प्रयत्न करते आणि आत्म्याने आपल्या जीवनाचे संचालन करावे यासाठी त्याला वावदेखील देते. प्रत्यक्षात व्यक्तीला जेव्हा त्या आत्म्याचा शोध लागतो तेव्हा त्यामुळे एक प्रकारची अद्भुत मोहिनी निर्माण होते. त्याचा परिणाम म्हणून, व्यक्ती अगदी सहज-स्वाभाविकपणे पहिली गोष्ट स्वतःला सागंते ती अशी की, “मला जे हवे होते ते आता मला मिळाले आहे, मला अपरिमित आनंद गवसला आहे.” आणि त्यानंतर आपला कशाशीच काही संबंध नाही अशा प्रकारची एक वृत्ती तिच्यामध्ये निर्माण होण्याची शक्यता असते.

वास्तविक, आजवर ज्यांना ज्यांना आत्मशोध लागलेला आहे त्या सर्वांच्या बाबतीत बहुतांशी असेच काहीसे झालेले आहे. एवढेच नव्हे तर, काहींनी या अनुभवावर आधारित साक्षात्काराचे जणू एक तत्त्वज्ञानच तयार केले आणि त्यांनी सांगून ठेवले आहे की, “एकदा का तुम्हाला आत्मशोध लागला की मग सारे काही साध्य झाले. मग करण्यासारखे अन्य काही शिल्लक राहत नाही, तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचलेले असता आणि तोच मार्गाचा अंतिम टप्पा असतो.”

खरंतर, आत्म-साक्षात्कारानंतरची, पुढील वाटचाल करण्यासाठी अपार धैर्याची आवश्यकता असते. एकदा का व्यक्तीला आत्मशोध लागला की मग त्याचा आत्मा निर्भय योद्धा झाला पाहिजे. आपल्या स्वतःच्या आंतरिक हर्षाने आत्मतृप्त होऊन, व्यक्तीने विश्राम घेता कामा नये. इतरांचे दुःख पाहिल्यावर – मी जे प्रयत्न केले आहेत तेच प्रयत्न इतरांनीदेखील केले पाहिजेत, त्यांनी तसे प्रयत्न केले तर एक ना एक दिवस ते सुद्धा (मी प्राप्त करून घेतलेल्या) या अवस्थेला जाऊन पोहोचतील, त्यांनासुद्धा माझ्यासारखाच आंतरिक हर्ष लाभेल, अशी समजूत करून घेऊन – त्या व्यक्तीने स्वसंतुष्ट राहता कामा नये. फार फार तर अशी व्यक्ती स्वतःच्या आंतरिक ज्ञानाच्या अवस्थेमध्ये राहून, ‘महान परोपकारी‌’ वृत्तीने आणि ‘प्रगाढ करुणे‌’ने इतरांना तेथपर्यंत पोहोचण्यासाठी साहाय्य करू शकते. आणि मग जेव्हा प्रत्येकालाच आत्मसाक्षात्कार होईल तेव्हा या जगाचा अंत होईल आणि तसे झाले की, ज्यांना दुःखभोग नकोसे वाटतात त्यांचे दुःखभोग संपतील असे म्हणून, ती व्यक्ती स्वतःची समजूत करून घेऊ शकते. मात्र… येथेच खरी मेख आहे. (उत्तरार्ध उद्या…)

– श्रीमाताजी (CWM 09 : 425-426)

 

आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (०१)

सामान्य माणसाचे बहुतांशी जीवन हे बाह्यवर्ती जाणिवेमध्येच व्यतीत होत असते. पण कधीतरी जीवनात असेही क्षण येतात की जेव्हा तो अंतर्मुख होतो. तो ज्याला देव, ईश्वर, परमेश्वर इत्यादी नावांनी संबोधतो त्याचा अतीव उत्कटतेने, तळमळीने, आर्ततेने धावा करतो. ज्या प्रसंगाच्या कात्रीत सापडल्यामुळे त्याने त्याचा धावा केलेला असतो, ईश्वराशी संवाद साधण्याचा प्रयत्न केलेला असतो, तो प्रसंग पार पडतो आणि तो माणूस पुन्हा पहिल्याप्रमाणेच संसाराच्या रहाटगाडग्यामध्ये गरागरा फिरत राहतो. त्याच्या जीवनातून ईश्वर पुन्हा दूरस्थ होतो.

असेच वारंवार, कदाचित जन्मानुजन्मे होत राहते. आणि या संसारी जीवनाचा, आजूबाजूच्या मंडळींचा, जीवनव्यवहाराचा अनुभव घेऊन पूर्ण होताहोताच त्याला या जीवनाचे अधिक काही महान, अधिक काही गहन प्रयोजन असले पाहिजे, असे आतून जाणवू लागते. त्याचा शोध घेतला पाहिजे असे त्याला वाटू लागते. माणूस म्हणून जन्माला आलेलो आपण, आपणही किड्यामुंगीसारखे जीवन जगून एक दिवस निघून जायचे का? आपण माणूस म्हणून जन्माला आलो तर आपले काही कर्तव्य आहे का ? लाभलेल्या जीवनाचा आपण कशा प्रकारे विनियोग करायचा आहे, आपल्याकडून माणूस म्हणून नेमके काय अपेक्षित आहे? हे व यासारखे प्रश्न मनात डोकावू लागतात.

आणि मग कधीतरी ‘ईश्वरीकृपे’ने त्या जिवाची ‘आत्मशोधा’ला सुरुवात होते. त्या शोध – प्रवासामध्ये विविध तीर्थस्थाने, मठ, मंदिर, आश्रम इत्यादी ठिकाणांना भेटी दिल्या जातात. संत-सत्पुरुष, बुवा, बाबा, महाराज म्हणून ज्यांना समाजात मान्यता मिळालेली असते, त्यांच्याकडे जाऊन, त्यांच्याशी चर्चा करून, आपले प्रश्न विचारून त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला जातो. पण आपल्या आत्मशोधाची तहान कशानेच भागत नाही.

आणि मग त्या वाटचालीने श्रांतक्लांत झालेला तो जीव थकूनभागून एका झाडाखाली विसाव्याला बसावा आणि जवळून झुळूझुळू वाहणाऱ्या पाण्याचा नाद त्याच्या कानी पडावा तसे काहीसे होते. जवळच असलेल्या पाण्याच्या नादाच्या दिशेने तो जातो, त्या प्रवाहामधून ओंजळभर पाणी घेतो आणि त्या शीतल पाण्याने त्याची तहान भागते. तसेच काहीसे आत्मशोधाच्या या प्रवासात होत असावे.

श्रीअरविंदरूपी महासागर त्या शीतल पाण्याच्या प्रवाहासारखाच पत्ररूपाने अखंडपणे प्रवाहित होत राहिला होता. प्रत्येकाची तहान वेगळी, प्रत्येकाचा प्रश्न वेगळा, प्रत्येकाची परिस्थिती वेगळी, प्रत्येकाची मानसिक ठेवण वेगळी, प्रत्येकाच्या जीवनाची धाटणी वेगळी. पण येणाऱ्या प्रत्येक पांथस्थाची तहान शमविण्याचे सामर्थ्य श्रीअरविंद यांनी लिहिलेल्या पत्रांमध्ये आहे. त्यातील काही निवडक पत्रे उद्यापासून सुरु होणाऱ्या ‘आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर…’ या मालिकेमध्ये आपण विचारात घेणार आहोत.

संपादक,
अभीप्सा मराठी मासिक