Posts

व्यक्तीला जर ‘प्रकृती’शी संवाद साधता आला, तर व्यक्ती जीवनातील थोडीफार रहस्ये शिकू शकते, ती रहस्ये तिला खूप उपयोगी ठरू शकतात. व्यक्तीला त्यामुळे केवळ आजारपणाची पूर्वसूचनाच मिळते असे नाही तर, व्यक्ती त्यावर नियंत्रणसुद्धा मिळवू शकते, किंवा येणारी आपत्ती टाळू शकते आणि ‘प्रकृती’चा विनाश टाळू शकते. अशा प्रकारे, त्याचे अनेक फायदे आहेत. संवाद साधायचा म्हणजे काय? तर सर्व अस्तित्वाला व्यापून असणाऱ्या ‘सुसंवादाच्या आनंदा’तील ज्ञान शोधून काढणे आणि त्याच्या चेतनेने स्पंदित होणे. ही गोष्ट खरोखरच शोध घेण्यायोग्य आहे. हे आयुष्यभर करण्याचे कार्य आहे. या चेतनेचा शोध घ्या आणि या सूक्ष्म जगताशी सुसंवाद साधण्याचा आनंद प्राप्त करून घ्या. व्यक्ती शांततेमध्येच सुसंवाद साधू शकते आणि एक प्रकारच्या सूक्ष्म देवाणघेवाणीने स्वतःला अभिव्यक्त करते. ती अगदी पूर्णतया स्वतंत्र अशी भाषा आहे की जी शब्दांमध्ये व्यक्त करता येणे शक्य नाही, कारण आपण जेव्हा बोलतो तेव्हा आपण शब्दांचा वापर करत असतो. तर ती स्वतंत्र भाषा म्हणजे एक लघु आणि अचूक अभिव्यक्ती असते आणि आपल्या भाषेपेक्षा ती कितीतरी अधिक प्रमाणात आकलन होण्यायोग्य असते.

– श्रीमाताजी
(Throb of Nature : 04)

मानसिक संकुचितपणा हा मनुष्यमात्रांमध्ये सर्वात जास्त फैलावलेला आजार आहे. स्वतःच्या जाणिवेमध्ये जे आहे तेवढेच मनुष्याला समजू शकते आणि त्याखेरीज अन्य काहीही त्याला सहन होत नाही.

– श्रीमाताजी
(CWM 14 : 267)

तर अशी अशी कारणे असतात – असंख्य कारणे, अगणित कारणे असतात. आणि या सगळ्या गोष्टी अतिशय असामान्य पद्धतीने एकमेकांमध्ये मिसळून जातात आणि आजारपण काय आहे हे जाणून घ्यायचे असेल, तो बरा करावयाचा असेल तर, व्यक्तीला त्या आजाराचे कारण समजले पाहिजे, त्याचे रोगजंतु नव्हे. कारण असे घडते की, जेव्हा रोगजंतु असतात, तेव्हा डॉक्टर्स त्यांना मारण्यासाठी काहीतरी रामबाण उपाय शोधून काढतात, पण त्याने हा आजार बरा होतो आणि दुसराच कोणतातरी अधिक मोठा आजार उद्भवतो! कोणालाच समजत नाही की असे का? …पण कदाचित मला माहीत आहे.

कारण त्या आजाराचे कारण हे निव्वळ शारीरिक नसते, तर दुसरेच काही असते. जे पहिले लक्षण होते, ते कोणत्यातरी दुसऱ्याच अव्यवस्थेचे केवळ बाह्य लक्षण होते. आणि जोवर तुम्ही त्यात हात घालत नाही, ती अव्यवस्था शोधून काढत नाही, तोवर त्या येणाऱ्या आजाराला तुम्ही रोखू शकत नाही. ती अव्यवस्था शोधून काढण्यासाठी तुमच्याकडे गहनगाढ असे गूढशास्त्राचे ज्ञान हवे आणि प्रत्येकाच्या आंतरिक कार्याविषयीचे सखोल ज्ञान हवे. तर आपण आत्ता इथे थोडक्यात, आंतरिक कारणांचा धावता आढावा घेतला.
(क्रमश:)

– श्रीमाताजी
(CWM 05 : 171-181)