Posts

आध्यात्मिकता ४२

आपल्याच व्यक्तिमत्त्वामध्ये प्रकाशमय आणि अंधकारमय अशा दोन बाजू असतात. त्यातील अंधकारमय बाजूपासून स्वत:ची सोडवणूक कशी करून घ्यावी हे श्रीमाताजी येथे सांगत आहेत. ‘तिमिर जावो…’ या तीन भागांच्या मालिकेद्वारे आपण तो विचार समजावून घेऊ. (तिमिर जावो… भाग ०१)

साधक : व्यक्तीला जेव्हा अशी जाणीव होते की, आपल्यामधील अमुक एक घटक आपल्याला मूर्खपणाच्या गोष्टी करायला लावतो आहे, तेव्हा, त्या व्यक्तीने ती मूर्खता करण्यापासून स्वतःला इच्छाशक्तीच्या साहाय्याने प्रयत्नपूर्वक दूर राखले, तर त्या व्यक्तीने त्याच्यातील तो घटक बाहेर फेकला आहे, असे म्हणता येईल का?

श्रीमाताजी : त्यासाठी, सर्वप्रथम, तुम्हाला त्या घटकाची जाणीव झाली पाहिजे, तुम्ही तो घटक न्याहाळला पाहिजे, त्याला अगदी तुमच्यासमोर उभे केले पाहिजे आणि तुमच्या चेतनेशी संलग्न असलेले त्याचे सारे धागेदोरे तुम्ही कापून टाकले पाहिजेत. तुम्हाला माहीत आहे का की, हे आंतरिक मनोविज्ञानाचे काम आहे.

व्यक्ती जेव्हा अगदी लक्षपूर्वक स्वतःचा अभ्यास करते तेव्हा व्यक्तीला या गोष्टी दिसायला लागतात…

उदाहरणार्थ, तुम्ही जर स्वतःचे निरीक्षण करू लागलात तर तुम्हाला असे आढळते की, एखाद्या दिवशी तुम्ही अगदी उदार असता. म्हणजे तुमच्या भावना उदार असतात, तुमच्या संवेदना उदार असतात, तुमचे विचार उदार असतात, इतकेच काय पण अगदी भौतिक वस्तुंबाबतसुद्धा तुम्ही उदार असता; म्हणजे त्या वेळी, तुम्ही इतरांचे दोष समजून घेता; त्यांचे हेतू, त्यांच्या मर्यादा, इतकेच काय पण त्यांचे अगदी वाईट वर्तनसुद्धा तुम्ही समजून घेता. तुम्हाला हे सारे दिसते पण तेव्हा तुम्ही सद्भावनापूर्ण असता, तुम्ही उदारचित्त असता. तुम्ही स्वतःशीच म्हणता, “ठीक आहे, प्रत्येक जण त्याला जेवढे सर्वोत्तम करणे शक्य आहे तेवढे करतो.” आणि असेच आणखी काहीसे सांगून स्वतःची समजूत घालता.

आणि अगदी दुसऱ्याच दिवशी किंवा कदाचित अगदी पुढच्या काही मिनिटांनी, तुम्हाला तुमच्यामध्ये एक प्रकारची शुष्कता, कठोरपणा आढळतो, काहीतरी कडवटपणा आढळतो, तो खूप निष्ठुरपणे न्यायनिवाडा करत असतो, कधीकधी तर तो कडवटपणा इतका वाढतो की, त्यामुळे अढी निर्माण होते, विद्वेष निर्माण होतो. तुम्हाला असे वाटते की, दुष्कृत्य करणाऱ्याला शिक्षा झालीच पाहिजे. यामागे एक प्रकारची सुडाची भावना असते, ही भावना अगोदरच्या भावनेच्या अगदी पूर्णपणे विरोधी असते. एके दिवशी कोणीतरी तुम्हाला त्रास देतो आणि तुम्ही म्हणता, “काही हरकत नाही. त्याला ते माहीत नव्हते.” किंवा “नाही रे, त्याला दुसऱ्या प्रकारे वागताच येत नाही.” किंवा मग कधीकधी “नाही, त्याचा स्वभावच तसा आहे,” किंवा “नाही, त्याला काहीच समजणार नाही.” आणि अगदी दुसऱ्या दिवशी, किंबहुना अगदी एक तासभरानंतर – तुम्ही अगदी त्वेषाने म्हणता, “त्याला अद्दल घडलीच पाहिजे, त्याला त्याच्या कर्माचे फळ भोगावेच लागेल. तो चुकीचे वागला आहे याची त्याला जाणीव करून दिलीच पाहिजे.” आणि तुम्ही ती गोष्ट मनाला लावून घेता, तुम्ही ती गोष्ट मनात धरून ठेवता; तुमच्या मनामध्ये मत्सर, हेवा, संकुचितपणा अशा सगळ्या भावना भरलेल्या असतात. आधीच्या सद्भावनेच्या अगदी विरोधी अशा त्या भावना असतात. ही झाली काळोखी बाजू! (क्रमश:…)

– श्रीमाताजी [CWM 06 : 262-263]