Posts

आध्यात्मिकता ४५

(चेतना विशाल कशी करावी, या प्रश्नावर उत्तर देताना श्रीमाताजींनी आधी काही मार्ग सांगितले आणि त्या आता येथे त्याचा बौद्धिक मार्ग सांगत आहेत…)

तुम्हाला जेव्हा एखाद्या गोष्टीचा कंटाळा आलेला असतो, तुम्हाला एखादी गोष्ट वेदनादायी किंवा अगदी असुखद वाटत असते, अशा वेळी जर तुम्ही काळाच्या (time) अनंततेचा आणि अवकाशाच्या (space) असीमतेचा विचार करायला सुरुवात केलीत, आजवर जे काही घडून गेले आहे आणि येथून पुढे जे घडणार आहे, त्याचा तुम्ही विचार केलात आणि आत्ताचा क्षण हा अनंत काळामधील खरोखरच एका उच्छ्वासाइतकाच आहे असा तुम्ही विचार केलात तर, काळाच्या अनंततेमध्ये असणाऱ्या या एका एवढ्याशा क्षणामुळे अस्वस्थ होणे हे तुम्हाला अगदीच हास्यास्पद वाटू लागेल. …खरोखरच, काळाच्या अनंततेमध्ये एका क्षणाचे मोल ते काय? खरोखरच व्यक्तीला हे प्रत्यक्षात उतरवता आले तर….

डोळ्यांसमोर दृश्य उभे करा, ज्या इवल्याशा पृथ्वीवर आपण वावरत असतो, ते आपण म्हणजे एक किती किरकोळ व्यक्ती आहोत, आणि त्यामध्ये चेतनेचा हा एक चिमुकला क्षण, जो आत्ता तुम्हाला त्रासदायक ठरतो आहे किंवा तुम्हाला तो असुखद वाटत आहे तो डोळ्यांसमोर आणा. वास्तविक, हा क्षण तुमच्या अस्तित्वाचा देखील एक अगदी छोटासा क्षण आहे. आणि खुद्द तुम्हीसुद्धा यापूर्वी अनेक जीवयोनींमधून येथवर आलेला असता आणि यापुढेही अनेक गोष्टी घडायच्या असतात. तेव्हा ज्या गोष्टी आत्ता तुमच्यावर एवढा परिणाम करत आहेत त्या अजून दहा वर्षांनी तुम्ही कदाचित पूर्णपणे विसरून गेला असाल किंवा जरी अगदी त्या आठवल्याच तर तुम्ही स्वतःच म्हणाल की, “मी या गोष्टीला इतके महत्त्व का दिले होते बरे?”

तुम्हाला खरोखरच जाणवू लागते… आपल्या जीवनाला, स्वतःला आणि आपल्याबाबतीत जे घडते आहे त्याला इतके महत्त्व देणे, हे किती हास्यास्पद आहे हे तुम्हाला जाणवू लागते. आणि तुम्ही जर ही गोष्ट अगदी सुयोग्य रीतीने केलीत तर, अगदी तीन मिनिटांच्या अवधीमध्ये, सारे दुःख नाहीसे होईल. इतकेच काय पण एखादी अगदी तीव्र वेदनासुद्धा या पद्धतीने नाहीशी होईल. आत्ता सांगितले त्याप्रमाणे एकाग्रता करायची आणि स्वतःला अनंताच्या आणि काळाच्या पटलावर ठेवायचे. सारे काही निघून जाते. आणि व्यक्ती शुद्ध होऊन बाहेर पडते. ही गोष्ट योग्य पद्धतीने कशी करायची हे माहीत असेल तर, व्यक्ती सर्व आसक्तीपासून, आणि अगदी निरतिशय दुःखामधून, सर्व गोष्टींमधून अशा पद्धतीने बाहेर पडू शकते. ही पद्धत तुम्हाला तुमच्या क्षुद्र अहंकारामधूनसुद्धा त्वरित बाहेर काढते.

– श्रीमाताजी [CWM 06 : 345-346]