Posts

आता बाह्य कारणांचा आणि त्यातून उद्भवणाऱ्या गुंतागुंतीचा विचार करू. …अडचणी जशा आतमध्ये असतात तशाच त्या बाहेरदेखील असतात. तुम्ही एका मर्यादेपर्यंत स्वतःमध्ये आंतरिक संतुलन प्रस्थापित करू शकता, पण तुम्ही असमतोलाने भरलेल्या वातावरणात जीवन जगत असता. जोवर तुम्ही स्वतःला एखाद्या हस्तिदंती मनोऱ्यामध्ये बंदिस्त करून घेत नाही (अर्थात हे केवळ अवघडच आहे असे नव्हे, तर ते तसे करणे नेहमीच ग्राह्य असते असे नाही.) तोवर जे काही बाहेरून येत असते, त्याचा स्वीकार करणे तुम्हाला भागच पडते. तुम्ही देता आणि तुम्ही घेता. तुम्ही श्वासोच्छ्वासाबरोबरच काहीतरी आत घेत असता. तेव्हा तिथे सगळी सरमिसळ असते आणि म्हणूनच तुम्ही असे म्हणू शकता की, सारे काही संसर्गजन्य असते, कारण तुम्ही सतत स्पंदनाच्या स्थितीतच वावरत असता. तुम्ही तुमची स्पंदने देत असता आणि दुसऱ्यांची स्पंदनेसुद्धा स्वीकारत असता आणि ती स्पंदने खूप जटिल स्वरूपाची असतात.

सोप्या भाषेत सांगावयाचे तर, मानसिक, प्राणिक, शारीरिक आणि इतरही पुष्कळ स्पंदने असतात. तुम्ही देता, तुम्ही घेता. देणे-घेणे हा सतत चालणारा खेळ असतो. अगदी असे गृहीत धरू की, तिथे दुरिच्छा नाहीये, तरीदेखील संसर्ग हा अपरिहार्यपणे असतोच असतो. आणि मी तुम्हाला आत्ता तेच सांगत होते की, सारे काही संसर्गजन्य असते.

समजा, तुम्ही एखाद्या अपघाताचा परिणाम काय झाला ते पाहत आहात; अशा वेळी तुम्ही ते विशिष्ट स्पंदन ओढून घेता. आणि जर का तुम्ही जास्तच संवेदनाशील असाल आणि त्यात भरीस भर म्हणून तुम्हाला त्याची भीती वाटली किंवा घृणा वाटली (अर्थात ह्या दोन्ही गोष्टी एकसारख्याच आहेत; घृणा हे शारीरिक भीतीचे फक्त नैतिक रूप आहे.) तर तो अपघात तुमच्या शरीरामध्ये अगदी शारीरिकदृष्ट्या प्रतिबिंबित होतो. तेव्हा साहजिकपणे तुम्हाला असे सांगण्यात येते की, ज्यांच्याबाबत अशा प्रतिक्रिया आढळून आल्या त्या व्यक्ती नाडीगत असमतोलाच्या स्थितीमध्ये होत्या. पण यात काही तथ्य नाही. त्या व्यक्ती प्राणिक दृष्ट्या आत्यंतिक संवेदनाशील होत्या, इतकेच. आणि हे काही न्यूनतेचे द्योतक नाही.

कारण जसजसे तुम्ही आध्यात्मिक दृष्ट्या प्रगत होऊ लागता, तसतशी नसांमध्ये एकप्रकारची विशिष्ट अशी अतिसंवेदनशीलता आढळून येते. आणि जर का तुमच्या संवेदनशीलतेच्या प्रमाणात तुमचे आत्म-नियंत्रण वाढले नाही तर, तुमच्या बाबतीत सर्व तऱ्हेच्या अनुचित घटना घडण्याची शक्यता असते. पण ही तर केवळ एक बाब झाली.
(क्रमश:)

– श्रीमाताजी

(CWM 05 : 171-181)