Posts

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – २९

(अभीप्सा, नकार आणि समर्पण या त्रयीला पूर्णयोगामध्ये योगसूत्राचे स्थान आहे.)

विश्वामध्ये जे जे काही केले जाते, त्या सर्व कृतींमागे ईश्वरच त्याच्या शक्तिद्वारा विद्यमान असतो पण तो त्याच्या योगमायेने झाकला गेलेला असतो आणि कनिष्ठ प्रकृतीमध्ये तो जे कार्य करतो ते ‘जिवा’च्या अहंकाराद्वारा करत असतो.

योगामध्येदेखील ईश्वर हाच ‘साधक’ आणि ‘साधना’ही असतो; त्याचीच ‘शक्ती’ स्वतःच्या प्रकाश, सामर्थ्य, ज्ञान, चेतना आणि ‘आनंद’ यांच्या साहाय्याने ‘आधारा’वर (मन, प्राण, शरीर यांवर) कार्य करते आणि जेव्हा आधार त्या शक्तिप्रत उन्मुख होतो, तेव्हा या सर्व दिव्य शक्ती त्या आधारामध्ये ओतल्या जातात आणि त्यामुळे साधना शक्य होते. परंतु जोपर्यंत कनिष्ठ प्रकृती सक्रिय असते, तोपर्यंत साधकाच्या व्यक्तिगत प्रयत्नांची आवश्यकता असतेच. हा आवश्यक असलेला व्यक्तिगत प्रयत्न म्हणजे अभीप्सा, नकार आणि समर्पण अशी त्रिविध तपस्या होय.

अभीप्सा जागरुक, निरंतर आणि अविरत असली पाहिजे – मनामध्ये तोच संकल्प, अंत:करणात तोच ध्यास, प्राणतत्त्वाची त्यालाच संमती, भौतिक-शारीरिक चेतना व प्रकृती ग्रहणक्षम आणि लवचीक करण्याची तीव्र इच्छा अशा स्वरूपाची अभीप्सा पाहिजे.

कनिष्ठ प्रकृतीच्या सर्व गतिविधींना नकार – मनाच्या कल्पना, मते, आवडीनिवडी, सवयी आणि रचना यांना नकार, की ज्यामुळे निश्चल-नीरव मनामध्ये खऱ्या ज्ञानाला पूर्ण मोकळी जागा मिळेल, – प्राणिक प्रकृतीच्या वासना, मागण्या, लालसा, संवेदना, आवेग, स्वार्थीपणा, गर्व, उद्धटपणा, कामुकता, लोभ, मत्सर, हेवेदावे, ‘सत्या’शी वैर यांना नकार, की ज्यामुळे निश्चल, विशाल, समर्थ आणि समर्पित अशा प्राणमय अस्तित्वामध्ये वरून खरी शक्ती आणि आनंद यांचा वर्षाव होईल – भौतिक-शारीरिक प्रकृतीची मूढता, संशय, अविश्वास, दिङ्मूढता, दुराग्रह, दुर्बोधता, क्षुद्रता, आळस, परिवर्तन-विमुखता, तामसिकता यांना नकार, की ज्यामुळे सतत अधिकाधिक दिव्य होत जाणाऱ्या देहात ‘प्रकाश’, ‘शक्ती’ आणि ‘आनंद’ यांचे खरे स्थैर्य प्रस्थापित होईल.

‘ईश्वर’ आणि त्याची ‘शक्ती’ यांना आपण आपल्या स्वत:चे, आपण जे काही आहोत आणि आपणाजवळ जे काही आहे त्या सर्वाचे, चेतनेच्या प्रत्येक स्तराचे आणि आपल्या प्रत्येक वृत्तींचे समर्पण केले पाहिजे.

– श्रीअरविंद
(CWSA 32 : 06)

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – ०४

येथे योगाचा जो मार्ग आचरला जातो त्या मार्गाचे (पूर्णयोगाचे) इतर योगांपेक्षा काहीएक भिन्न प्रयोजन आहे. कारण सर्वसामान्य अज्ञानी विश्व-चेतनेमधून बाहेर पडून, दिव्य चेतनेमध्ये उन्नत होणे हे केवळ या योगाचे ध्येय नाही, तर मन, प्राण आणि शरीर यांच्या अज्ञानामध्ये दिव्य चेतनेची अतिमानसिक शक्ती उतरविणे; मन, प्राण आणि शरीर यांचे रूपांतरण करणे, इहलोकामध्ये ईश्वराचे आविष्करण घडविणे आणि या जडभौतिकामध्ये दिव्य जीवन निर्माण करणे, हे या योगमार्गाचे ध्येय आहे. हे ध्येय अत्यंत कठीण आहे आणि हा योगमार्गही अत्यंत कठीण आहे; बऱ्याच जणांना किंबहुना बहुतेकांना तर तो अशक्यच भासतो. सर्वसामान्य अज्ञ विश्व-चेतनेच्या साऱ्या प्रस्थापित शक्ती या योगमार्गाच्या विरोधात असतात आणि त्या शक्ती या मार्गाला नाकारतात आणि त्या शक्ती या योगमार्गाला रोखण्याचा प्रयत्न करत असतात. साधकाला असे आढळून येईल की, त्याच्या स्वतःच्या मनामध्ये, प्राणामध्ये आणि शरीरामध्येच या साक्षात्कारासाठी प्रतिकूल असे सर्वाधिक हट्टी अडथळे ठासून भरले आहेत. जर तुम्ही हे ध्येय अगदी पूर्ण अंतःकरणाने स्वीकारलेत, साऱ्या अडीअडचणींना सामोरे गेलात, भूतकाळ आणि त्याचे सारे बंध तुम्ही मागे टाकून दिलेत, आणि सर्व गोष्टींचा त्याग करण्यास तयार झालात, या दिव्य शक्यतेसाठी प्रत्येक जोखीम घेण्यास तयार झालात, तरच केवळ तुम्हाला त्या पाठीमागील ‘सत्य’ हे अनुभवाच्या द्वारे सापडण्याची काही आशा असते.

या योगाची साधना, कोणत्याही ठरावीक साचेबद्ध अशा मानसिक शिक्षणाने किंवा ध्यानधारणेच्या नेमून दिलेल्या प्रकारांच्या द्वारे, कोणत्याही मंत्रांनी किंवा तत्सम गोष्टींनी, प्रगत होत नाही; तर अभीप्सेद्वारे, अंतर्मुख आणि ऊर्ध्वमुख आत्म-एकाग्रतेद्वारे, ईश्वरी शक्तीच्या दिव्य प्रभावाप्रत स्वतःला खुले केल्याने, आपल्या ऊर्ध्वस्थित असणाऱ्या दिव्य शक्तीप्रत आणि तिच्या कार्याप्रत स्वतःला खुले केल्याने, हृदयामध्ये असणाऱ्या दिव्य अस्तित्वाला खुले होत, आणि या साऱ्यांना ज्या ज्या गोष्टी परक्या असतील त्या साऱ्या गोष्टींना नकार दिल्याने ही साधना प्रगत होते. केवळ श्रद्धा, अभीप्सा आणि समर्पण यांच्या द्वारेच हे आत्मउन्मीलन (self-opening) घडून येते.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 19-20)

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – ०२

प्रश्न : आम्हाला योगासंबंधी काही सांगाल काय?

श्रीमाताजी : योग तुम्हाला कशासाठी हवा आहे? सामर्थ्य लाभावे म्हणून ? मन:शांती, शांतचित्तता प्राप्त व्हावी म्हणून ? का मानवतेची सेवा करायची आहे म्हणून?

परंतु, योगमार्ग स्वीकारण्यास तुम्ही पात्र आहात का हे लक्षात येण्यासाठी यांपैकी कोणतेही उद्दिष्ट पुरेसे नाही.

त्यासाठी तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरे दिली पाहिजेत : तुम्हाला ईश्वराकरता योगसाधना करायची आहे का? ईश्वर हेच तुमच्या जीविताचे परमोच्च सत्य आहे का ? ईश्वरावाचून जगणेच आता अगदी अशक्य झाले आहे, अशी तुमची स्थिती आहे का? ईश्वर हेच तुमच्या अस्तित्वाचे एकमेव कारण आहे आणि ईश्वराविना तुमच्या जीवनास काहीच अर्थ नाही, असे तुम्हाला वाटते का? असे असेल तरच तुम्हाला योगमार्ग स्वीकारण्याविषयी आंतरिक हाक आली आहे असे म्हणता येईल.

ईश्वराविषयीची तळमळ, अभीप्सा (Aspiration) हीच पहिली आवश्यक गोष्ट आहे.

पुढची आवश्यक गोष्ट म्हणजे, या अभीप्सेचे संगोपन करावयाचे; ती सतत जागृत, सावध व जिवंत राखायची. आणि त्यासाठी आवश्यकता असते एकाग्रतेची, ईश्वरावरील एकाग्रतेची ! ईश्वरी संकल्प व उद्दिष्ट यांसाठी समग्रपणे व नि:शेषतया वाहून घेता यावे या दृष्टिकोनातून ईश्वराच्या ठिकाणी एकाग्रता करणे आवश्यक असते.

हृदयामध्ये एकाग्रता करा. त्यात प्रवेश करा, जेवढे तुम्हाला शक्य होईल तेवढे आत खोल खोल, अगदी आत जा. तुमच्या जाणिवेचे बाहेर दूरवर पसरलेले सारे धागे एकत्रित करून, ते सारे गुंडाळून घ्या आणि आत बुडी मारा, अगदी तळाशी जाऊन बसा.

तुम्हाला आढळेल की, हृदयाच्या त्या निवांत प्रशांत गाभाऱ्यात एक अग्नी तेवत आहे. तोच तुमच्या अंतरीचे ईश्वरत्व, तोच तुमचे खरेखुरे अस्तित्व. त्याचा आदेश ऐका, त्याच्या आज्ञेचे अनुसरण करा.

एकाग्रता करण्याची अन्य केंद्रदेखील आहेत, उदाहरणार्थ, एक असते मस्तकाच्या वर, दुसरे असते दोन भुवयांच्या मध्यभागी (भ्रूमध्यामध्ये)! प्रत्येक केंद्राचा स्वतंत्र असा प्रभाव असतो आणि त्यातून तुम्हाला वेगवेगळे विशिष्ट परिणामही अनुभवास येतात. पण मध्यवर्ती अस्तित्व (पुरुष) हे हृदयामध्येच असते आणि सर्व मुख्य प्रवृत्ती हृदयामधूनच उत्पन्न होतात – रूपांतरासाठी आवश्यक असलेली प्रेरणा व उत्कटता आणि साक्षात्कार करून घेण्याची शक्ती या गोष्टीसुद्धा तेथूनच निर्माण होतात.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 01)

समर्पण – ०२

…प्रामाणिक अभीप्सेचा परिणाम नक्कीच होतो; जर तुम्ही प्रामाणिक असाल तर तुम्ही दिव्य जीवनामध्ये उन्नत होता.

पूर्णपणे प्रामाणिक असणे म्हणजे – फक्त आणि फक्त ईश्वरी सत्याचीच अभीप्सा बाळगणे; दिव्य मातेप्रत स्वतःला अधिकाधिक समर्पित करणे; या अभीप्सेव्यतिरिक्त असणाऱ्या वैयक्तिक सर्व मागण्या व वासना यांचा परित्याग करणे; जीवनातील प्रत्येक कृती ही ईश्वरालाच समर्पण करणे आणि कोणताही अहंकार आड येऊ न देता, हे कार्य ईश्वराने दिलेले आहे असे मानून कार्य करणे. हाच दिव्य जीवनाचा पाया आहे.

व्यक्ती एकाएकी एकदम अशी होऊ शकत नाही. पण जर ती सातत्याने तशी अभीप्सा बाळगेल आणि ईश्वरी शक्तीने साहाय्य करावे म्हणून तिचा अगदी अंतःकरणपूर्वक आणि साध्यासरळ इच्छेने, नेहमी धावा करत राहील; तर व्यक्ती या चेतनेप्रत अधिकाधिक उन्नत होत राहते.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 50-51)

मानसिक परिपूर्णत्व – १२

 

ईश्वरावरील श्रद्धा आणि विश्वास या गोष्टी आंतरिक समर्पणाचा गाभा आहेत. ”मला दुसरेतिसरे काहीही नको, ईश्वरच हवा,” असा दृष्टिकोन व्यक्ती अंगीकारते. …”मी ईश्वराला माझे समर्पण करू इच्छितो आणि माझ्या आत्म्याचीच ती मागणी असल्याने, इतर काहीही नाही, तर फक्त तेच. मी त्याला भेटेन, मी त्याचा साक्षात्कार करून घेईन. मी इतर काहीही मागणार नाही, केवळ हीच माझी मागणी असेल. जेणेकरून, मला त्याच्या सन्निध जाता येईल असे कार्य त्याने माझ्यामध्ये करावे; मग त्याचे ते कार्य गुप्त असेल वा प्रकट असेल, ते झाकलेले असेल वा आविष्कृत झाले असेल, मग ते कोणत्याही प्रकारचे असले तरी हरकत नाही. मी माझ्या स्वतःच्या मार्गासाठी आणि वेळेसाठी आग्रह धरणार नाही; त्याने त्याच्या त्याच्या वेळेनुसार व त्याच्या पद्धतीने सारे काही करावे; मी त्याच्यावर विश्वास ठेवेन; त्याची इच्छा प्रमाण मानेन; त्याच्या प्रकाशाची, त्याच्या उपस्थितीची, त्याच्या आनंदाची, अविचलपणे अभीप्सा बाळगेन; कितीही अडचणी आल्या, कितीही विलंब लागला तरी मी त्याच्यावर पूर्ण विसंबून राहीन आणि कधीही मार्ग सोडणार नाही. माझे मन शांत होऊन, त्याच्याकडे वळू दे आणि ते त्याच्या प्रकाशाप्रत खुले होऊ दे; माझा प्राण शांत होऊ दे आणि केवळ त्याच्याकडेच वळू दे; त्याच्या शांतीप्रत आणि त्याच्या आनंदाप्रत तो खुला होऊ दे. सारे काही त्याच्यासाठीच आणि मी स्वतःसुद्धा त्याच्यासाठीच. काहीही झाले तरी, मी अभीप्सा आणि आत्मदान दृढ बाळगेन आणि हे घडून येईलच अशा पूर्ण विश्वासाने वाटचाल करत राहीन.” व्यक्तीने हा दृष्टिकोन चढत्यावाढत्या प्रमाणात बाळगला पाहिजे. कारण ह्या गोष्टी परिपूर्णतया एकदम होणे शक्य नाहीत; मानसिक व प्राणिक हालचाली आड येत राहतात; पण जर व्यक्ती वरीलप्रमाणे इच्छा बाळगेल, तर त्या गोष्टी व्यक्तीमध्ये विकसित होत राहतात.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 70-71)

मानसिक परिपूर्णत्व – ०६

 

इतर कोणा व्यक्तीला, कोणत्याही कल्पनेला, कोणत्याही गोष्टीला, तुम्ही तुमच्या आणि ईश्वराच्यामध्ये का येऊ देता? जेव्हा तुम्ही पूर्ण अभीप्सायुक्त असता, आनंदात असता तेव्हा इतर कोणतीच गोष्ट महत्त्वाची नाही; ईश्वर आणि तुमची अभीप्सा याव्यतिरिक्त इतर कोणत्याही गोष्टीला महत्त्व देता कामा नये. जर एखाद्या व्यक्तीला ईश्वर त्वरेने, संपूर्णतः, समग्रतेने मिळावा असे वाटत असेल, तर त्या व्यक्तीचा दृष्टिकोन तसाच संपूर्ण, सर्वसमावेशक असावयास हवा. तोच त्याचा एकमेव उद्दिष्टबिंदू असावयास हवा आणि त्यामध्ये इतर कशाचीही, अगदी कशाचीही लुडबूड असता कामा नये.

ईश्वर कसा असावा, त्याने कसे वागावे, त्याने कसे वागता कामा नये, यासंबंधीच्या मानसिक कल्पनांना काहीही किंमत नाही, उलट त्या मानसिक कल्पना म्हणजे मार्गातील धोंडच ठरतात. एक ईश्वरच केवळ महत्त्वाचा आहे. जेव्हा तुमची चेतना ईश्वराला कवळून घेते, तेव्हाच खऱ्या अर्थाने ईश्वर काय आहे हे तुम्हाला समजते, त्या आधी नाही. कृष्ण हा कृष्ण आहे, त्यामुळे त्याने काय केले, काय केले नाही याला मग अशी व्यक्ती महत्त्व देत नाही तर ती व्यक्ती त्याला पाहाते, त्याला भेटते; त्याचा प्रकाश, त्याची उपस्थिती, त्याचे प्रेम, त्याचा आनंद हाच काय तो त्याच्यासाठी महत्त्वाचा ठरतो. आध्यात्मिक अभीप्सेबाबतीत नेहमी हे असेच असते – हा आध्यात्मिक जीवनाचा कायदा आहे.

कोणत्याही मानसिक कल्पना किंवा प्राणिक चढउतार यांच्यावर वेळ वाया घालवू नका – ते ढग पळवून लावा. जी एकमेव आवश्यक गोष्ट आहे त्यावरच तुमचे लक्ष केंद्रित करा.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 55-56)

मानसिक परिपूर्णत्व – ०५

 

हृदयापासून केलेला साधा, सरळ, प्रामाणिक धावा आणि अभीप्सा हीच एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती गोष्ट क्षमतांपेक्षाही अधिक आवश्यक आणि अधिक प्रभावी असते.
*
व्यक्तीने जितके शक्य आहे तितके स्वतःला श्रीमाताजींच्या शक्तीप्रत खुले राखणे आणि प्रामाणिकपणे अभीप्सा बाळगणे आवश्यक आहे. मग कितीही अडचणी आल्या तरीही त्यावर मात करता येते – कदाचित त्याला काही वेळ लागेल पण परिणामाची खात्री असते.
*
श्रीमाताजींची शक्ती आपल्या अवतीभोवती सर्वत्र आहे असे समजून, ती आत प्रविष्ट व्हावी म्हणून व्यक्तीने तिचा धावा करावयास हवा. जर व्यक्तीला तशी खरीच जाणीव झाली तर उत्तमच, पण जरी तसे झाले नाही तरीही व्यक्तीची श्रद्धा असेल आणि त्या धाव्यामध्ये शक्ती असेल तरीही, श्रीमाताजींची शक्ती आत प्रवाहित होऊ शकते.
*
व्यक्तीने ईश्वरावर विसंबून असावे आणि त्यासोबतच काही सक्षम साधनासुद्धा करावी. साधनेच्या प्रमाणात नव्हे तर, जीवाच्या आणि त्याच्या अभीप्सेच्या प्रमाणात, ईश्वर त्याचे फल प्रदान करतो. चिंता करत बसणे देखील उपयोगाचे नाही. ”मी असा होईन, मी तसा होईन, मी कसे असावे बरे?” याऐवजी, ”मला मी काय व्हावेसे वाटते यासाठी नाही तर, ईश्वराला मी कोण बनणे अपेक्षित आहे, तसे व्हावयास मी तयार आहे” असे म्हणणे आवश्यक आहे आणि बाकी सगळ्या गोष्टी त्याच आधारावर झाल्या पाहिजेत.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 55-56)

अंतिम विजयाविषयी कोणतीही शंका न बाळगता योगमार्गावरून वाटचाल करा – तुम्हाला अपयश येऊच शकणार नाही! शंकाकुशंका या क्षुल्लक गोष्टी आहेत; अभीप्सेचा अग्नी प्रज्ज्वलित ठेवा, हाच तो अग्नी असतो जो विजयी होतो.

– श्रीअरविंद
(CWSA 28: 347)

बहुधा कोणतेही दोन मार्ग अगदी एकसारखेच असत नाहीत, प्रत्येकाने स्वत:चा मार्ग स्वत:च शोधावयास हवा. पण याचा अर्थ असा नव्हे की, तो मार्ग बुद्धीने ‘शोधायचा’, तो मार्ग अभीप्सेच्या (aspiration) आधारे ‘शोधावयास’ हवा; विश्लेषण आणि अभ्यास याद्वारे नव्हे तर अभीप्सेची तीव्रता आणि आंतरिक उन्मुखतेबद्दलची निष्ठा यांच्या माध्यमातून शोधावयास हवा.

जेव्हा व्यक्ती खरोखर आणि पूर्णपणे त्या आध्यात्मिक सत्यालाच अभिमुख झालेली असते, मग त्याला नाव कोणतेही दिलेले असू देत, बाकी सर्व गोष्टी तिच्या दृष्टीने गौण ठरतात; जेव्हा ते आध्यात्मिक सत्यच तिच्या लेखी अपरिहार्य आणि अटळ गोष्ट बनते, तेव्हा त्याकडून उत्तर मिळण्यासाठी, त्याकडून प्रतिसाद मिळण्यासाठी तीव्र व संपूर्ण एकाग्रतेचा केवळ एक क्षणदेखील पुरेसा असतो.

अशा उदाहरणामध्ये अनुभव आधी येतो, त्याचा परिणाम आणि स्मृती म्हणून त्या अनुभवाची मांडणी नंतर स्पष्ट बनते. त्यामुळे व्यक्तीला खात्री असते की, कोणतीही चूक घडणार नाही. ही मांडणी कमी-अधिक यथार्थ असू शकते, पण त्याला तितकेसे महत्त्व नाही; जोपर्यंत व्यक्ती त्याचा सिद्धांत बनवीत नाही तोपर्यंत काही अडचण नाही.

ती मांडणी तुमच्यासाठी चांगली आहे, हेच केवळ महत्त्वाचे आहे. ती कशीही असू दे, अगदी ती स्वयंपूर्ण असली तरीदेखील जेव्हा तुम्ही ती इतरांवर लादू पाहता तेव्हाच ती मिथ्या बनते.

यामुळेच धर्मांची नेहमी गल्लत होते – अगदी नेहमीच – कारण धर्म त्या अनुभवांच्या अभिव्यक्तीचे प्रमाणीकरण करू पाहतात आणि तेच निर्विवाद सत्य असल्याचे मानून प्रत्येकावर लादू पाहतात. ती अनुभूती सत्य होती, ती अनुभूती स्वत:परिपूर्ण होती, ज्याला ती अनुभूती आली होती त्याला ती पटण्यासारखी होती. त्या अनुभूतीची जी मांडणी त्याने केली होती ती उत्कृष्ट होती – पण ती फक्त त्याच्यापुरती. पण सिद्धान्तरूपाने ती इतरांवर लादू पाहणे ही एक मूलभूत चूक असते, ज्याचे अत्यंत भयंकर परिणाम दिसून येतात आणि ते नेहमीच सत्यापासून दूर दूर घेऊन जाणारे असतात.

आणि यामुळेच धर्म, मग ते कितीका चांगले असले तरी, ते कायमच माणसाला अतिहीन अशा टोकांकडे घेऊन गेलेले आहेत. धर्माच्या नावाखाली झालेले गुन्हे, भयानक हिंसाचार ह्या मानवी इतिहासातील काळिमा फासणाऱ्या गोष्टी आहेत. ह्या साऱ्याचे कारण आहे मुळातील एक छोटीशी चूक; ती म्हणजे, जे एका व्यक्तीसाठी सत्य आहे ते समूहासाठी किंवा समाजासाठी सत्य असले पाहिजे असे मानणे.

मार्ग दाखविला पाहिजे, प्रवेशद्वारे खुली केली पाहिजेत पण प्रत्येकाने स्वत:चा मार्ग स्वत:च आक्रमिला पाहिजे, प्रत्येकाने त्या प्रवेशद्वारांमधून जात, स्वत:च्या वैयक्तिक साक्षात्काराच्या दिशेने स्वत:च वाटचाल करावयास हवी. अशा वेळी, केवळ एकच मदत मिळू शकते आणि तीच स्वीकारली पाहिजे. ती मदत असते ईश्वरी कृपेची, ही कृपा, प्रत्येकामध्ये ज्याच्या त्याच्या गरजेनुरूप, स्वत:ची अशी योजना करीत असते.

– श्रीमाताजी
(CWM 09 : 406-407)

(उदयाला येऊ घातलेल्या अतिमानवाच्या आगमनाच्या तयारीविषयी जपानमधील स्त्रियांसमोर, श्रीमाताजी बोलत आहेत. गर्भवती स्त्रियांनी कसा दृष्टिकोन बाळगला पाहिजे, हे त्या सांगत आहेत.)

अतिमानव जन्माला यावयाचा आहे आणि तो स्त्रीच्या उदरातूनच जन्माला येणार, हे निर्विवाद सत्य आहे; पण म्हणून या सत्याविषयी केवळ अभिमान बाळगणे पुरेसे नाही; तर त्याचा अर्थ काय, हे आपण नीट समजून घेतले पाहिजे. त्यामधून आपल्यावर काय जबाबदारी येते, ह्याचे आपल्याला भान असले पाहिजे आणि आपल्यावर जे कार्य सोपविण्यात आले आहे, ते आपण अत्यंत जीव तोडून करावयास शिकले पाहिजे.

सध्याच्या विश्वव्यापक कार्यामध्ये आपल्या वाट्याला आलेले हे सर्वाधिक महत्त्वाचे कार्य आहे. यासाठी आपण सर्वप्रथम हे जाणून घेणे गरजेचे आहे की, सद्यकालीन गोंधळाचे आणि अंधकाराचे, प्रकाश आणि सुसंवादामध्ये परिवर्तन घडवून आणण्याची माध्यमे कोणती असतील ? आणि किमान हे ढोबळमानाने तरी जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

…एका नवीनच आध्यात्मिक प्रकाशाचे, आपल्याला आजवर अज्ञात असलेल्या कोणत्यातरी दिव्य शक्तीचे या पृथ्वीवर आविष्करण होणार आहे; ईश्वरासंबंधीचा एक सर्वस्वी नवीन विचार, या विश्वामध्ये अवतरणार आहे आणि इथे एक नवीनच आकार जन्माला येणार आहे. आणि इथेच आपण, ‘खऱ्याखुऱ्या मातृत्वाची आपली जबाबदारी’ या आपल्या आरंभीच्या मुद्द्याकडे येतो.

कारण या नवीन आकारातूनच, पृथ्वीची सद्यकालीन स्थिती परिवर्तित करण्यासाठी, सक्षम असणारी आध्यात्मिक शक्ती आविष्कृत होणार आहे. हा नवीन आकार, हे नवीन रूप एक स्त्री घडविणार नाही तर दुसरे कोण?

… ज्यांच्याविषयी आपण ऐकलेले असते, वा ज्यांच्याविषयी आपल्याला माहिती असते, अशा कितीही का थोर व्यक्ती असेनात, त्यांच्यासारख्या किंवा त्यांच्याही पेक्षा थोर, अधिक विख्यात, सिद्ध आणि प्रतिभावान अशी व्यक्ती वा मानव घडविणे हे आता पुरेसे नाही; तर, जी परमोच्च शक्यता आजवरच्या मानवाची सर्व परिमाणं आणि वैशिष्ट्य ओलांडून, अतिमानवाला जन्म देणार आहे; त्या परमोच्च शक्यतेच्या संपर्कात येण्यासाठी, आपण आपल्या मनाने, आपल्या विचाराच्या आणि इच्छेच्या सातत्यपूर्ण अभीप्सेद्वारे, धडपडले पाहिजे.

काहीतरी पूर्णत: नवीन, आजवर कल्पनाही केली नव्हती, असे काही नवेच निर्माण करण्याची एक आस या प्रकृतीला पुन्हा एकवार लागली आहे आणि तिच्यामधील ह्या आवेगालाच आपण प्रतिसाद दिला पाहिजे आणि तिचे आज्ञापालन केले पाहिजे.

– श्रीमाताजी
(CWM 02 : 160-161)