Posts

साधना, योग आणि रूपांतरण – ४४

तुम्ही ध्यानाला बसता तेव्हा, तुमच्या बाह्यवर्ती मनाची लुडबूड त्यामध्ये असता कामा नये. कशाची अपेक्षा नाही किंवा कशाचा आग्रहही नाही, असे तुम्ही एखाद्या निरागस बालकाप्रमाणे साधेसरळ आणि मनमोकळे असले पाहिजे. एकदा अशी अवस्था प्राप्त झाल्यावर, मग उर्वरित सारेकाही तुमच्या अंतरंगामध्ये खोलवर असणाऱ्या अभीप्सेवर अवलंबून असते. आणि तुम्ही जर ‘ईश्वरा’ला साद दिलीत तर तुम्हाला प्रतिसाद देखील मिळेल.

– श्रीमाताजी (CWM 14 : 52)

साधना, योग आणि रूपांतरण – ३०

आपले (समग्र) अस्तित्व ‘श्रीमाताजीं’नी हाती घ्यावे म्हणून त्यांच्या उपस्थितीला आणि त्यांच्या शक्तीला, शक्यतो हृदयामध्ये लक्ष एकाग्र करून आवाहन करणे आणि त्यांच्या शक्तिकार्याद्वारे चेतनेचे रूपांतरण होणे याखेरीज पूर्णयोगामध्ये अन्य कोणतीही पद्धत नाही. तुम्ही मस्तकामध्ये किंवा भ्रूमध्यामध्ये देखील चित्त एकाग्र करू शकता परंतु बऱ्याच जणांना अशा प्रकारे उन्मुख, खुले होणे फारच कठीण जाते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 107)

*

साधक : हृदयामध्ये चित्त एकाग्र करणे हे अधिक चांगले, असे का म्हटले आहे?

श्रीमाताजी : श्रीअरविंद येथे सांगत आहेत की, ते अधिक सोपे असते. पण काही लोकांसाठी मात्र ते जरा अधिक कठीण असते, ते ज्याच्या त्याच्या प्रकृतीवर अवलंबून असते. परंतु असे करणे अधिक चांगले असते कारण, जर तुम्ही पुरेशा खोलवर, तेथे (हृदय-केंद्रावर) चित्त एकाग्र केलेत तर, तुम्ही तेथेच प्रथम चैत्य अस्तित्वाच्या (psychic) संपर्कात येता. परंतु जर का तुम्ही मस्तकामध्ये चित्त एकाग्र केलेत तर तुम्हाला नंतर, चैत्य पुरुषाशी (psychic being) एकत्व पावणे शक्य व्हावे यासाठी, मस्तकाकडून हृदयाकडे जावे लागते.

तसेच तुम्ही तुमच्या ऊर्जा एकत्र करून (चित्ताची) एकाग्रता करणार असाल तर, त्या ऊर्जांचे एकत्रीकरण हृदयामध्येच करणे अधिक चांगले; कारण या केंद्रापाशीच, तुमच्या अस्तित्वाच्या या क्षेत्रामध्येच, तुम्हाला प्रगतीची इच्छा, शुद्धीकरणाची शक्ती आणि अगदी उत्कट, परिणामकारी अभीप्सा असल्याचे आढळून येते. मस्तकामधून उदित होणाऱ्या अभीप्सेपेक्षा हृदयातून उदित होणारी अभीप्सा ही कितीतरी अधिक परिणामकारक असते.

– श्रीमाताजी (CWM 06 : 389)

साधना, योग आणि रूपांतरण – २९

‘ईश्वरा’विषयीची अभीप्सा हीच पहिली आवश्यक गोष्ट आहे. ती असेल तर पुढची आवश्यक गोष्ट म्हणजे, या अभीप्सेचे संगोपन करायचे; ती सतत जागृत, सतर्क व जीवित ठेवायची. आणि त्यासाठी आवश्यकता असते ती एकाग्रतेची! ईश्वरी ‘संकल्प’ व ईश्वरी ‘प्रयोजन’ यांच्याप्रत समग्रपणे व नि:शेषतया वाहून घेता यावे या दृष्टिकोनातून ‘ईश्वरा’वर एकाग्रता करणे आवश्यक असते.

स्वत:च्या हृदयामध्ये एकाग्रता करा. त्यात प्रवेश करा, जेवढे तुम्हाला शक्य होईल तेवढे आत खोल खोल, अगदी आत जा. इतरत्र दूरवर पसरलेले तुमच्या चेतनेचे सारे धागे एकत्रित करून, ते सारे गुंडाळून घ्या आणि (हृदयामध्ये) आत बुडी मारा, आत खोल खोल जा.

तुम्हाला आढळेल की, हृदयाच्या त्या निवांत प्रशांत गाभाऱ्यांत एक ज्योत तेवत आहे. तेच तुमच्या अंतरीचे ‘ईश्वरत्व’, तेच तुमचे खरेखुरे अस्तित्व. त्याचा आदेश ऐका, त्याच्या आज्ञेचे अनुसरण करा.

एकाग्रता करण्याची इतरही केंद्रं आहेत. एक असते मस्तकाच्या वर, दुसरे असते भ्रूमध्यामध्ये! प्रत्येक केंद्राची स्वतंत्र अशी उपयुक्तता असते आणि त्यातून तुम्हाला वेगवेगळे विशिष्ट असे परिणामही अनुभवास येतात. पण मध्यवर्ती अस्तित्व (central being) हे हृदयामध्येच असते आणि सर्व मुख्य प्रवृत्ती हृदयामध्येच उत्पन्न होतात. रूपांतरणास आवश्यक असलेली प्रेरणा व तळमळ, आच आणि साक्षात्कार करून घेण्याची शक्ती या गोष्टीसुद्धा तेथूनच निर्माण होतात.

– श्रीमाताजी (CWM 03 : 01)

साधना, योग आणि रूपांतरण – २८

सर्वसाधारणपणे (व्यक्तीमधील) चेतना ही सर्वत्र पसरलेली, विखुरलेली असते. ती या किंवा त्या दिशेने, या किंवा त्या वस्तुंच्या वा विषयांच्या मागे बारा वाटांनी धावत असते. जेव्हा एखादी शाश्वत स्वरूपाची गोष्ट करायची असते तेव्हा व्यक्ती प्रथम कोणती गोष्ट करत असेल तर ती म्हणजे – ही सर्वत्र विखुरलेली चेतना अंतरंगामध्ये ओढून घेते आणि एकाग्रता करते. त्यानंतर मग, जर व्यक्ती अधिक बारकाईने निरीक्षण करू लागली तर तिला असे आढळते की तिचे लक्ष एका जागी आणि कोणत्या तरी एका मनोव्यापारावर, एका विषयावर किंवा एखाद्या वस्तुवर केंद्रित झाले आहे – तुम्ही काव्यरचना करत असता किंवा एखादा वनस्पतीशास्त्रज्ञ फुलाचा अभ्यास करत असतो तसेच असते हे. जर तो विचार असेल तर व्यक्तीचे लक्ष तिच्या मेंदूमध्ये कोठेतरी एखाद्या जागी केंद्रित झालेले असते. आणि जर ती भावना असेल तर व्यक्तीचे लक्ष हृदयामध्ये केंद्रित झालेले असते.

योगमार्गातील एकाग्रता (concentration) म्हणजे याच गोष्टीचे विस्तारित आणि घनीभूत रूप असते. त्राटक करताना, व्यक्ती एखाद्या तेजस्वी बिंदुवर लक्ष केंद्रित करते त्याप्रमाणे एखाद्या वस्तुवर एकाग्रता केली जाऊ शकते. तेव्हा व्यक्तीला त्या बिंदुवर, त्या वस्तुवर अशा रीतीने लक्ष केंद्रित करावे लागते की व्यक्तीला फक्त तो बिंदूच दिसतो आणि त्या व्यतिरिक्त अन्य कोणताही विचार तिच्या मनात नसतो. व्यक्ती एखाद्या संकल्पनेवर, एखाद्या शब्दावर किंवा एखाद्या नामावर, (म्हणजे उदाहरणार्थ) ईश्वराच्या संकल्पनेवर, ॐ या शब्दावर किंवा कृष्णाच्या नामावर किंवा संकल्पना व शब्द किंवा संकल्पना व नाम यांच्यावर एकत्रितपणे लक्ष केंद्रित करू शकते. परंतु पुढे व्यक्ती योगामध्ये (भ्रूमध्यासारख्या) एका विशिष्ट स्थानीसुद्धा लक्ष केंद्रित करू शकते.

भ्रूमध्यामध्ये लक्ष केंद्रित करण्याची एक प्रसिद्ध पद्धत आहे. भ्रूमध्य हे आंतरिक मनाचे, गूढ दृष्टीचे आणि संकल्पाचे केंद्र असते. तेथून तुम्ही तुमच्या एकाग्रतेचा जो विषय असतो त्याचा दृढपणे विचार केला पाहिजे किंवा त्या केंद्राच्या ठिकाणी त्या एकाग्रतेचा विषयाची प्रतिमा पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुम्ही जर असे करण्यात यशस्वी झालात तर, काही काळानंतर, तुमची समग्र चेतना त्या स्थानी (अर्थात काही काळासाठी) एकवटली असल्याचे तुम्हाला जाणवेल. काही काळ आणि पुन्हापुन्हा तसे करत राहिल्याने ही प्रक्रिया सहज सुलभ बनते.

पूर्णयोगामध्ये आपण तेच करतो पण त्यामध्ये भ्रूमध्यामधल्या एका विशिष्ट बिंदुवरच लक्ष एकाग्र करावे लागते असे नाही, तर मस्तकामध्ये कोठेही तुम्ही लक्ष एकाग्र करू शकता किंवा शरीर-विज्ञान शास्त्रज्ञांनी जेथे हृदयकेंद्राचे स्थान निश्चित केले आहे तेथे म्हणजे छातीच्या मध्यभागी लक्ष एकाग्र केले जाते.

एखाद्या वस्तुवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी, तुम्ही एखादा संकल्प करून मस्तकामध्ये लक्ष एकाग्र करू शकता; वरून तुमच्यामध्ये शांती अवतरित व्हावी म्हणून तिला आवाहन करू शकता किंवा काहीजण करतात त्याप्रमाणे, अदृष्ट (unseen) झाकण उघडावे (अपरा प्रकृती आणि परा प्रकृती यांच्यामध्ये असणारे झाकण, जे आपल्या टाळूच्या ठिकाणी असते.) आणि तेथून त्याच्या ऊर्ध्वस्थित असणाऱ्या चेतनेप्रत आरोहण करता यावे यासाठी तुम्ही लक्ष एकाग्र करू शकता. हृदयकेंद्रामध्ये तुम्ही (‘ईश्वरी शक्ती’प्रत) खुले होण्यासाठी एक अभीप्सा बाळगून, किंवा तेथे ‘ईश्वरा’ची चैतन्यमय प्रतिमा दिसावी किंवा ‘ईश्वरी’ उपस्थितीची जाणीव व्हावी यासाठी किंवा अन्य कोणत्या एखाद्या उद्दिष्टासाठी लक्ष एकाग्र करू शकता. तेथे तुम्ही नामजप करू शकता, पण तसे असेल तर, तेथे तुम्ही त्या नामावर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि हृदयकेंद्रामध्ये ते नाम आपोआप चालू राहिले पाहिजे.

तुम्हाला असा प्रश्न पडू शकतो की, जेव्हा असे एखाद्या विशिष्ट स्थानी लक्ष एकाग्र झालेले असते तेव्हा उर्वरित चेतनेचे काय होते? अशा वेळी, एकतर ती चेतना, इतर एकाग्रतेच्या वेळी जशी शांत होते तशी, ती शांत होऊन जाते किंवा तसे झाले नाही तर, विचार किंवा अन्य गोष्टी जणूकाही (तुमच्या) बाहेर असाव्यात त्याप्रमाणे इतस्ततः हालचाल करत राहतात पण एकाग्र झालेला भाग त्यांच्याकडे लक्ष देत नाही किंवा त्याने विचलितही होत नाही. अशावेळी एकाग्रता बऱ्यापैकी यशस्वी झालेली असते.

परंतु तुम्हाला जर अशा प्रकारे एकाग्रतेची, ध्यानाची सवय नसेल तर तुम्ही दीर्घ काळ ध्यान करून स्वतःला शिणवता कामा नये कारण शिणलेल्या मनाने ध्यान केले तर ध्यानाचे सर्व मोल वा त्याची शक्ती हरवून जाते. अशा वेळी तुम्ही एकाग्रतेच्या (concentration) ऐवजी, ‘विश्रांत’ अवस्थेमध्ये ध्यान (meditation) करू शकता. तुमची एकाग्रता जेव्हा सहजस्वाभाविक होते तेव्हाच तुम्ही अधिकाधिक दीर्घ वेळ ध्यान करू शकता.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 308-309)

साधना, योग आणि रूपांतरण – २७

साधक : मानसिक उपासनेचे प्रत्यक्ष आध्यात्मिक अनुभूतीमध्ये परिवर्तन करण्यासाठी कोणती साधना करायची?

श्रीअरविंद : तुमच्या अंतरंगात असणाऱ्या तुमच्या चेतनेवर एकाग्रता करण्याचा सराव करणे, ही पहिली आवश्यक गोष्ट असते. सामान्य मानवी मनाच्या गतिविधी पृष्ठस्तरीय (surface) असल्यामुळे, खरा आत्मा झाकला जातो. परंतु या पृष्ठस्तरीय भागाच्या मागील बाजूस, अंतरंगामध्ये दुसरी एक गुह्य (hidden) चेतना असते आणि तिच्यामध्ये आपल्याला आपल्या खऱ्या आत्म्याची आणि प्रकृतीच्या महत्तर आणि गहनतर अशा सत्याची जाणीव होऊ शकते; आत्म्याचा साक्षात्कार होऊ शकतो आणि प्रकृतीला मुक्त करून, तिचे रूपांतर घडवून आणता येऊ शकते. पृष्ठस्तरीय मन शांत करणे आणि अंतरंगात जीवन जगायला सुरुवात करणे, हे या एकाग्रतेचे उद्दिष्ट असते.

खऱ्या चेतनेची या पृष्ठस्तरीय चेतनेव्यतिरिक्त आणखी दोन मुख्य केंद्रं असतात. एक केंद्र हृदयामध्ये असते. (शारीरिक हृदयामध्ये नव्हे तर, छातीच्या मध्यभागी असणारे हृदयकेंद्र) आणि दुसरे केंद्र मस्तकामध्ये असते.

हृदयकेंद्रामध्ये केलेल्या एकाग्रतेमुळे अंतरंग खुले होऊ लागते आणि या आंतरिक खुलेपणाचे अनुसरण करत करत, आत खोलवर गेल्यास व्यक्तीला अंतरात्म्याचे किंवा व्यक्तिगत दिव्य तत्त्वाचे म्हणजे चैत्य पुरुषाचे (Psychic being) ज्ञान होते. अनावरण (unveiled) झालेला हा चैत्य पुरुष मग अग्रभागी येण्यास सुरुवात होते, तो प्रकृतीचे शासन करू लागतो, प्रकृतीला आणि तिच्या सर्व हालचालींना ‘सत्या’ च्या दिशेने, ‘ईश्वरा’ च्या दिशेने वळवू लागतो, आणि जे जे काही ऊर्ध्वस्थित आहे, ते अवतरित व्हावे म्हणून त्याला आवाहन करतो. त्याला त्या ईश्वराच्या ‘उपस्थिती’ची जाणीव होते, त्या ‘सर्वोच्चा’प्रत हा पुरुष स्वतःला समर्पित करतो आणि जी महत्तर ‘शक्ती’ आणि ‘चेतना’, ऊर्ध्वस्थित राहून आपली वाट पाहात असते, तिचे आपल्या प्रकृतीमध्ये अवतरण व्हावे यासाठी तो तिला आर्जव करतो.

‘ईश्वरा’प्रति स्वतःला समर्पित करत, हृदयकेंद्रावर एकाग्रता करणे आणि आंतरिक उन्मुखतेची व हृदयातील ईश्वराच्या ‘उपस्थिती’ची अभीप्सा बाळगणे हा पहिला मार्ग आहे आणि ते जर करता आले, तर ती स्वाभाविक सुरुवात म्हटली पाहिजे. कारण एकदा का त्याचे परिणाम दिसू लागले की मग, या मार्गाने केलेल्या वाटचालीमुळे, आध्यात्मिक मार्ग हा (दुसऱ्या मार्गाने सुरुवात केली असती त्यापेक्षा) अधिक सोपा आणि अधिक सुरक्षित होतो.

दुसरा मार्ग म्हणजे मस्तकामध्ये, मानसिक चक्रामध्ये करायची एकाग्रता. त्यामुळे जर का पृष्ठस्तरीय मनामध्ये शांतता येऊ शकली तर, आतील, व्यापक, अधिक गहन असे आंतरिक मन खुले होते. हे मन आध्यात्मिक अनुभूती आणि आध्यात्मिक ज्ञान ग्रहण करण्यास अधिक सक्षम असते. आणि एकदा का येथे एकाग्रता साध्य झाली की मग, व्यक्तीने शांत अशा मानसिक चेतनेस ऊर्ध्वाभिमुख करत मनाच्या वर असणाऱ्या सर्व गोष्टींप्रत खुले केले पाहिजे.

कालांतराने (आपली) चेतना ऊर्ध्व दिशेने वाटचाल करत आहे अशी व्यक्तीला जाणीव होते आणि अंततः ती चेतना, आजवर तिला ज्या झाकणाने शरीरामध्येच बद्ध करून ठेवले होते, त्या झाकणाच्या पलीकडे चढून जाते. आणि मस्तकाच्या वर असलेले केंद्र तिला गवसते, तेथे ती अनंतत्वामध्ये मुक्त होते. तेथे ती चेतना ‘विश्वात्म्या’च्या, ‘दिव्य शांती’च्या, ‘दिव्य प्रकाशा’च्या ‘दिव्य शक्ती’च्या, ‘दिव्य ज्ञाना’च्या, ‘परमानंदा’ च्या संपर्कात येऊ लागते आणि त्यामध्ये प्रवेश करू लागते आणि त्यांच्यासारखीच होऊन जाते. आणि तिला प्रकृतीमध्येही या गोष्टींचे अवतरण अनुभवास येऊ लागते.

अचंचलतेसाठी आणि ऊर्ध्वस्थित ‘आत्म्या’च्या व ‘ईश्वरा’च्या साक्षात्कारासाठी मनामध्ये अभीप्सा बाळगत, मस्तकामध्ये एकाग्र होणे हा एकाग्रतेचा दुसरा मार्ग होय. मात्र मस्तकामध्ये चेतनेची एकाग्रता करणे हा, त्याहूनही वर असणाऱ्या केंद्राप्रत चढून जाण्याच्या तयारीचा केवळ एक भाग असतो, हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. अन्यथा व्यक्ती स्वतःच्या मनामध्ये आणि त्याच्या अनुभवांमध्येच बद्ध होण्याची शक्यता असते. किंवा व्यक्ती आध्यात्मिक विश्वातीतामध्ये जीवन जगण्यासाठी तेथे चढून जाण्याऐवजी ती फार फार तर, ऊर्ध्वस्थित ‘सत्या’ चे केवळ प्रतिबिंबच प्राप्त करून घेऊ शकते.

काही जणांना मानसिक एकाग्रता सोपी वाटते; तर काही जणांना हृदयकेंद्रावर एकाग्रता साधणे अधिक सोपे जाते; तर काही जणांना या दोन्ही केंद्रांवर आलटूनपालटून एकाग्रता करणे शक्य होते. पण हृदयकेंद्रापासून सुरुवात करणे अधिक इष्ट असते. अर्थात, जर व्यक्तीला तसे करणे शक्य असेल तर!

– श्रीअरविंद (CWSA 29 : 06-07)

साधना, योग आणि रूपांतरण – २३ (उत्तरार्ध)

(श्रीमाताजी ध्यानाचे काही प्रकार येथे सांगत आहेत. काल त्यातील अंशभाग आपण पाहिला.)

काही जण त्यांच्या डोक्यातील सर्व मानसिक आंदोलने, कल्पना, प्रतिक्षिप्त क्रिया, प्रतिक्रिया हटविण्यासाठी व एका खरोखर शांत प्रशांत स्थितीप्रत पोहोचण्यासाठी धडपडत असतात. हे अतिशय कठीण असते. अशाही काही व्यक्ती आहेत की ज्यांनी पंचवीस-पंचवीस वर्षे प्रयत्न केले होते पण त्यांना यश आले नाही, कारण असे करू पाहणे म्हणजे बैलाची शिंगे पकडून त्याच्या आधारे बैलाला पकडण्यासारखे आहे.

आणखी एक अशा प्रकारचे ध्यान असते, ज्या ध्यानामध्ये व्यक्ती कोणत्याही विचारांना थांबविण्याचा प्रयत्न करत नाही, पण शक्य तेवढे शांत राहण्याचा प्रयत्न करते. कारण जे विचार निव्वळ यांत्रिक स्वरूपाचे असतात, ते तुम्ही थांबविण्याचा प्रयत्न कराल तर तुम्हाला अनेक वर्षे लागतील, आणि तरीसुद्धा तुम्हाला परिणामाची खात्री देता येणार नाही. म्हणून विचार थांबविण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा, (अशा प्रकारच्या ध्यानामध्ये) तुम्ही तुमची सर्व चेतना एकवटून, शक्य तितके शांत स्थिर राहण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला बाह्य गोष्टींमध्ये आता स्वारस्य उरलेले नसल्याप्रमाणे तुम्ही त्यांच्यापासून स्वतःला अलिप्त करा, आणि मग अचानक, तुमच्यामध्ये अभीप्सेची ज्योत प्रज्वलित होईल. (ध्यानामध्ये) तुमच्यापाशी जे जे काही येते ते ते सारे तुम्ही या अभीप्सारूपी अग्नीमध्ये हवन करा, ज्यामुळे ती ज्वाला अधिकाधिक उच्च, उच्चतर होत जाईल. तुम्ही त्या अभीप्सारूपी ज्वालेशी एकात्म व्हा आणि उर्ध्वगामी होत, तुम्ही तुमच्या चेतनेच्या आणि अभीप्सेच्या सर्वोच्च बिंदुपाशी जाऊन पोहोचा. अन्य कोणत्याही गोष्टीचा विचार करू नका. ही अभीप्सा वर वर उसळत राहते, ऊर्ध्वगामी होत राहते, ती परिणामाचा किंचितही विचार करत नाही, परिणाम काय होईल किंवा विशेषतः काय होणार नाही याचा क्षणमात्रदेखील ती विचार करत नाही. एवढेच नव्हे तर, वरून काही अवतरित व्हावे अशी इच्छादेखील ती बाळगत नाही तर इथे केवळ, ऊर्ध्वगामी होत राहणाऱ्या अभीप्सेचा आनंद तेवढा असतो…

सातत्याने केलेल्या एकाग्रतेमुळे ती अभीप्सा अधिकाधिक उत्कट होत राहते. आणि अशा वेळी मी तुम्हाला खात्री देऊ शकते की जे काही घडेल ते, सर्वोत्तम शक्य असेल तेच घडेल. म्हणजे असे की, तुम्ही जेव्हा हे सारे करता तेव्हा, तुमच्या क्षमता साकार होण्याची ती परम सीमा असते. या क्षमता प्रत्येक व्यक्तिगणिक भिन्नभिन्न असू शकतात.

पण तुम्ही असे केलेत म्हणजे मग, शांत राहण्याचा प्रयत्न करणे, दृश्य रूपांच्या मागे जाण्याचा प्रयास करणे, प्रतिसाद देणाऱ्या शक्तीला आवाहन करणे, तुमच्या प्रश्नांना उत्तर मिळावे म्हणून खोळंबून राहणे, या साऱ्या गोष्टींबाबतच्या चिंता, आभासी असणाऱ्या वाफेप्रमाणे नाहीशा होऊन जातात. तुम्ही या अभीप्सारूपी ज्वालेमध्ये, या ऊर्ध्वगामी झालेल्या अभीप्सेच्या स्तंभामध्ये, जाणीवपूर्वक, सचेतरीतीने जीवन जगण्यात यशस्वी झालात तर याचा परिणाम – अगदी त्वरित जरी आढळून आला नाही तरी, – कालांतराने नक्कीच घडून येणार आहे, हे तुमच्या लक्षात येईल.

– श्रीमाताजी (CWM 04 : 104-105)

आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (२७)

(उत्तरार्ध)

(‘ईश्वरा’प्रति आत्मदान करण्याची प्रेरणा) ही प्रेरणा प्राणिक इच्छा नसते तर ती आत्म्याची प्रेरणा असते; (त्या पाठीमागे) एक तर्कही असतो पण तो मनाचा तर्क नसतो, तर तो आत्म्याचा आणि जीवात्म्याचा तर्क असतो. तेथेही एक मागणी असते, पण ती मागणी म्हणजे प्राणिक लालसा नसते तर ती आत्म्याची अंगभूत अभीप्सा असते. जेव्हा, “मी तुझा अमुक कारणासाठी शोध घेत आहे, मी तुझा त्या करणासाठी शोध घेत आहे,” अशी भाषा जाऊन तेथे, “मी तुझा शोध केवळ तुझ्यासाठीच घेत आहे,” असा बदल घडून येतो; म्हणजे जेव्हा निव्वळ आत्मदान घडून येते तेव्हा अशा प्रकारची अभीप्सा उदयाला येते. कृष्णप्रेम (रोनाल्ड हेनरी निक्सन नावाचे एक ब्रिटिश साधक, यांनी वैष्णव संप्रदायाचा स्वीकार केला.) जेव्हा म्हणतात, ‘ज्ञान नको, हेही नको आणि तेही नको, तर फक्त कृष्णच हवा,” तेव्हा त्यांना ‘ईश्वरा’च्या या अदभुत आणि अनिर्वचनीय केवलाविषयी बोलायचे असते.

‘ईश्वरा’ची ओढ ही खरोखरच एक सुस्पष्ट अनिवार्यता असते, आपल्यामधील जीवात्मा ‘ईश्वरा’कडे ओढला जातो कारण त्याला त्या महत्तर ‘आत्म्या’ची अनिवार्य हाक आलेली असते. जीवात्मा आपल्या आराध्य दैवताकडे अनिवार्यपणे ओढला जातो, कारण ‘ईश्वरा’शिवाय त्याचे अस्तित्वच असू शकत नाही. कारण जीवात्मा हा जीवात्मा असतो आणि ‘ईश्वर’ हा ‘ईश्वर’ असतो. ‘ईश्वरा’साठीच ईश्वराचा शोध, अन्य कशासाठीही नाही, असे आम्ही जेव्हा म्हणत असतो, तेव्हा त्याचा नेमका अर्थ काय असतो हे स्पष्ट व्हावे म्हणून, (अर्थात जेवढे स्पष्ट करण्याजोगे होते तेवढे) मी हे सर्व लिहिले आहे. स्पष्टीकरण करण्याजोगे असू देत वा नसू देत, आध्यात्मिक अनुभूतीची ही एक सर्वात प्रभावी वास्तविकता असते. ‘आत्मदानाची प्रेरणा’ ही या वास्तविकतेची केवळ एक अभिव्यक्ती असते.

परंतु याचा अर्थ असा होत नाही की, मी तुमच्या ‘आनंदा’च्या मागणीवर आक्षेप घेत आहे. जोपर्यंत तुमच्या व्यक्तित्वाच्या कोणत्याही एखाद्या भागाला तशी गरज असते, तोपर्यंत तुम्ही खुशाल त्याची मागणी करू शकता, कारण जोपर्यंत आपल्यामध्ये सदोदित असलेली निरपवाद आंतरिक हाक, स्वतःला पृष्ठस्तरावर नेण्यासाठी जोर लावत नाही तोपर्यंत (आनंद, प्रकाश, शक्ती, ज्ञान, शांती इत्यादी) याच गोष्टी व्यक्तीला ‘ईश्वरा’कडे घेऊन जाणाऱ्या असतात. आणि ही आंतरिक हाक खरोखरच अगदी आरंभापासूनच असते आणि पाठीशी असते – ती आध्यात्मिक सुस्पष्ट अनिवार्यता असते, आत्म्याची ‘ईश्वरा’प्रति असलेली ही निखालस (absolute) गरज असते.

त्या ठिकाणी ‘आनंद’ असताच कामा नये, असे काही माझे म्हणणे नाही. आत्मदान म्हणजेच स्वयमेव एक अपार ‘आनंद’ असतो, आणि जेव्हा ते आत्मदान स्वत:सोबत ‘आनंद’ घेऊन येते, तेव्हा ते एक अनिर्वचनीय ‘आनंद’ जागृत करते आणि इतर कोणत्याही पद्धतीपेक्षा, (निःस्वार्थी आत्मदान करणे) या पद्धतीद्वारे हा ‘आनंद’ लवकर गवसतो, म्हणून एखादी व्यक्ती असे म्हणू शकते की, “निःस्वार्थी आत्मदान ही सर्वोत्तम नीती आहे.” अर्थातच केवळ एक ‘नीती’ म्हणून ती व्यक्ती ते आत्मदान आचरणात आणत नाही. ‘आनंद’ हे फल असते, पण या फलासाठी आत्मदान केले जात नाही, तर ते स्वयमेव आत्मदानासाठी आणि साक्षात ‘ईश्वरा’साठीच केले जाते – यामध्ये अगदी सूक्ष्मसा फरक आहे; तो मानसिक आहे असे वाटेल, पण त्यामध्ये खरोखरच फरक असतो.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 12-13)

आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (१७)

‘दिव्य’ चेतनेप्रत स्वतःला खुले करण्याचे किंवा त्यामध्ये प्रवेश करण्याचे अनेक मार्ग आहेत. मी जो माझा मार्ग सांगतो तो असा आहे की, व्यक्तीने स्वतःच्या अंतरंगात शिरण्याचा सातत्यपूर्ण सराव करायचा; अभीप्सेच्या माध्यमातून त्या ‘ईश्वरा’प्रति स्वत:ला खुले करायचे आणि एकदा का व्यक्ती त्या ‘ईश्वरा’विषयी आणि त्याच्या कार्याविषयी सजग झाली की त्या ‘ईश्वरा’प्रति स्वतःचे संपूर्णपणे आत्मदान करायचे.

या आत्मदानाचा अर्थ असा की, कशाचीही मागणी न करता, त्या ‘दिव्य चेतने’च्या सतत संपर्कात राहायचे किंवा तिच्याशी ऐक्य राखायचे; तिची शांती, शक्ती, प्रकाश, आणि आनंद यांबद्दल अभीप्सा बाळगायची; मात्र अन्य कशाचीही मागणी करायची नाही. या जगामध्ये व्यक्तीला जे कार्य नेमून देण्यात आले आहे ते कार्य, जीवनात व कृतीमध्ये उतरविण्यासाठी त्या ‘दिव्य शक्ती’चे माध्यम बनायचे. व्यक्तीला एकदा का मन, हृदय व शरीर यांमध्ये कार्यरत असणाऱ्या ‘आत्मशक्ती’ची, ‘दिव्य शक्ती’ची जाणीव होऊ शकली आणि त्याप्रत व्यक्ती खुली होऊ शकली, म्हणजे मग शिल्लक उरते ते म्हणजे त्या ‘दिव्य शक्ती’शी एकनिष्ठ राहणे, सातत्याने तिला आवाहन करणे, आणि जेव्हा ती अवतरते, तेव्हा तिला तिचे कार्य करू देणे आणि निम्नतर चेतनेशी व निम्नतर प्रकृतीशी संबंधित असणाऱ्या इतर सर्व गोष्टींना आणि कनिष्ठ ‘शक्तीं’ना नकार देणे.

– श्रीअरविंद (CWSA 36 : 441)

अमृतवर्षा ०४

 

आपल्याला समग्र रूपांतरण हवे आहे; शरीराचे आणि त्याच्या सर्व क्रियांचे रूपांतरण हवे आहे. पूर्वी जेव्हा रूपांतरणाविषयी बोलले जात असे तेव्हा तेथे केवळ आंतरिक चेतनेचे रूपांतरणच अभिप्रेत असे. ही सखोल चेतना स्वत:मध्ये शोधण्याचा व्यक्ती प्रयत्न करत असे; हे करत असताना, आंतरिक गतिविधींवरच लक्ष केंद्रित करायचे असल्याने, शरीराला आणि त्याच्या क्रियाकलापांना, ती व्यक्ती एक लोढणं समजत असे; आणि निरुपयोगी गोष्ट म्हणून त्यास ती धुडकावून देत असे.

परंतु, हे पुरेसे नसल्याचे श्रीअरविंदांनी स्पष्ट केले. जडभौतिक जगताने देखील या रूपांतरणामध्ये सहभागी व्हावे आणि त्यानेही या गहनतर ‘सत्या’ची अभिव्यक्ती करावी, अशी त्या ‘सत्या’कडून मागणी होत आहे, हे त्यांनी स्पष्ट केले आहे.

परंतु लोकांनी जेव्हा हे ऐकले तेव्हा त्यांच्यापैकी बऱ्याच जणांना असे वाटले की, अंतरंगामध्ये काय घडत आहे याची अजिबात काळजी न करतादेखील शरीर आणि त्याच्या क्रिया यांचे रूपांतरण घडविणे शक्य आहे, – अर्थात हे खरे नाही.

हे शारीरिक रूपांतरणाचे कार्य हाती घेण्यापूर्वी, – हे कार्य म्हणजे, जे सर्वात अवघड असे कार्य आहे ते हाती घेण्यापूर्वी – तुमची आंतरिक चेतना ही ‘सत्या’मध्ये दृढपणे, सघनपणे प्रस्थापित झालेली असली पाहिजे; म्हणजे मग हे रूपांतरण म्हणजे त्या ‘सत्या’चा चरम आविष्कार असेल – किमान आत्ताच्या घडीपुरता तरी ‘चरम’.

या रूपांतरणाचा प्रारंभबिंदू असतो ग्रहणशीलता! रूपांतरण प्राप्त करून घेण्यासाठीची ही अत्यावश्यक अट आहे. त्यानंतर चेतनेमध्ये परिवर्तन घडून येते.

चेतनेचे हे परिवर्तन आणि त्याची पूर्वतयारी यांची तुलना नेहमी अंड्यातील कोंबडीच्या पिलाच्या घडणीशी केली जाते. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत अंडे जसेच्या तसे असते, त्यामध्ये काहीही बदल दिसत नाही आणि जेव्हा ते पिल्लू आत पूर्ण विकसित झालेले असते, पूर्णतया जिवंत झालेले असते, तेव्हा ते त्याच्या छोट्याशा चोचीने त्या कवचाला टोचे मारते आणि त्यातून बाहेर पडते.

चेतनेच्या परिवर्तनाच्या क्षणीसुद्धा असेच काहीसे घडून येते. दीर्घ काळपर्यंत काहीच घडत नाही असेच तुम्हाला वाटत असते; तुमची चेतना नेहमीप्रमाणेच आहे, त्यात काहीच बदल नाही असेच तुम्हाला वाटत असते. तुमच्यापाशी जर का तीव्र अभीप्सा असेल तर तुम्हाला कधीकधी विरोधदेखील जाणवतो; जणूकाही तुम्ही एखाद्या भिंतीवर धक्के देत असता पण ती काही ढासळत नाही. पण जेव्हा तुमची अंतरंगातून तयारी झालेली असते तेव्हा एक शेवटचा प्रयत्न – तुमच्या अस्तित्वाच्या कवचाला धक्के देण्याचा एक प्रयत्न पुरेसा ठरतो आणि मग सर्वकाही खुले होते आणि तुम्ही एका आगळ्यावेगळ्या चेतनेमध्ये उन्नत झालेले असता.

 

– श्रीमाताजी [CWM 04 : 18-19]

विचारशलाका ४३

मानवाची महानता तो काय आहे यामध्ये नसून, तो काय करू शकतो यामध्ये सामावलेली आहे. मानव ही अशी एक बंदिस्त जागा आहे आणि जिवंत परिश्रमांची ती अशी एक गुप्त कार्यशाळा आहे की, ज्यामध्ये त्या दिव्य ‘शिल्पकारा’कडून ‘अतिमानवता’ (supermanhood) घडवली जात आहे आणि हेच मानवाचे खरेखुरे वैभव आहे.

पण यापेक्षाही एका अधिक महानतेमध्ये मानवाचा प्रवेश झाला आहे. ती महानता अशी की, कोणत्याही कनिष्ठ प्रजातींना मिळालेली नाही अशी एक संधी त्याला मिळालेली आहे. मानवामध्ये होणाऱ्या दिव्य परिवर्तनाचा जाणीवसंपन्न व सचेत कारागीर बनण्याची आणि त्या परिवर्तनामध्ये थोड्याफार प्रमाणात सहभागी होण्याची अनुमती त्याला मिळालेली आहे.

मात्र त्याच्या देहामध्ये ही महानता प्रत्यक्षात उतरावी याकरिता, म्हणजेच मानवी देहाचे अतिमानवामध्ये रूपांतरण शक्य व्हावे याकरता, मानवाची स्वेच्छापूर्वक संमती, त्याची पवित्र (consecrated) इच्छाशक्ती आणि त्याचा सहभाग यांची आवश्यकता आहे. मानवाची ‘अभीप्सा’ म्हणजे पृथ्वीने त्या ‘अतिमानसिक’ ‘सृष्टी-निर्माणकर्त्या’ला दिलेली हाक आहे.

पृथ्वी जर आवाहन करेल आणि तो ‘परमश्रेष्ठ’ (Supreme) त्याला प्रतिसाद देईल तर, त्या भव्य आणि गौरवशाली रूपांतरणाची घटिका अगदी आत्तादेखील असू शकते.

 

– श्रीअरविंद [CWSA 12 : 160]