Posts

एखादी व्यक्ती जेव्हा दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करते तेव्हा व्यक्ती अशी अपेक्षा करते की, त्या दुसऱ्या व्यक्तीनेही माझ्यावर प्रेम केले पाहिजे आणि ते प्रेमदेखील तिने तिच्या पद्धतीने व तिच्या स्वभावानुसार करता कामा नये तर, माझ्या पद्धतीने व माझ्या इच्छांचे समाधान होईल अशा पद्धतीनेच केले पाहिजे, आणि सहसा हीच व्यक्तीची पहिली चूक असते. सर्व मानवी दुःखांचे, निराशांचे, हालअपेष्टांचे हेच प्रमुख कारण आहे.

–श्रीमाताजी (CWM 17 : 370)

पूर्णयोग आणि बौद्धमत – १७

धम्मपद : जो नेहमीच दुसऱ्यांच्या दोषांवर टिका करतो आणि त्याने संत्रस्त होऊन जातो तो स्वत:च्या दोषांपासून मुक्त होण्याऐवजी, उलट स्वत:चे अवगुण अधिकच वाढवितो.

श्रीमाताजी : जर तुम्ही सरळ मार्गाचा अवलंब करू पाहात असाल, तुम्ही विनम्र असाल, तुम्ही शुद्धतेसाठी प्रयत्नशील असाल, जर तुम्ही निरपेक्ष असाल, तुम्हाला एकांतवासाचे जीवन जगावयाचे असेल, तुम्हाला विवेकपूर्ण जीवन जगायचे असेल तर तुमचा मार्ग सुकर होईल, गोष्टी सोप्या होतील या भ्रमात तुम्ही राहता उपयोगी नाही, किंवा त्याला खतपाणीही घालता कामा नये…खरेतर ह्याच्या अगदी उलट असते. जेव्हा तुम्ही आंतरिक व बाह्य पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करू लागता, त्याचवेळी एकदम सर्व अडचणी यायला सुरुवात होते.

मी लोकांना अनेक वेळा असे बोलताना ऐकले आहे की, “आता मी चांगले वागायचा प्रयत्न करत आहे तर प्रत्येकजणच माझ्याशी वाईट वागतो आहे.” पण असे घडते कारण यातून तुम्ही शिकले पाहिजे की, काहीतरी अंतस्थ हेतू बाळगून तुम्ही चांगले वागता कामा नये, दुसरे आपल्याशी चांगले वागावेत म्हणून आपण चांगले वागले पाहिजे, असे नाही. तर केवळ चांगले असण्यासाठीच चांगले वागले पाहिजे.

नेहमी हाच एक धडा शिकण्याजोगा आहे – तुम्हाला जेवढे जास्तीत जास्त चांगले करता येईल तेवढे उत्तम करा, पण फळाची अपेक्षा बाळगू नका. फळ मिळावे या अपेक्षेने कृती करू नका. सत्कृत्यासाठी बक्षिसाची अपेक्षा बाळगणे, आयुष्य सोपे होईल म्हणून चांगले बनणे ह्या अशा प्रकारच्या वृत्तीमुळेच त्या सत्कृत्याची सर्व किंमत मातीमोल होते.

भलेपणावरील प्रेमापोटी तुम्ही भले असले पाहिजे, न्यायावरील प्रेमापोटी तुम्ही न्यायी असले पाहिजे, शुद्धतेवरील प्रेमापोटी तुम्ही शुद्ध, पवित्र असले पाहिजे, निरपेक्षतेच्या प्रेमापायी तुम्ही निरपेक्ष असले पाहिजे; असे असेल तरच मार्गावर प्रगती करण्याची खात्री बाळगता येईल.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 264-265)