Posts

विचार शलाका – ४०

प्रश्न : मानसिक प्रयत्नांचे, जिवंत अशा आध्यात्मिक अनुभूतीमध्ये परिवर्तन कसे करायचे, त्यासाठी कोणती साधना करावयाची?

श्रीअरविंद : तुमच्या अंतरंगात असणाऱ्या तुमच्या चेतनेवर एकाग्रता करण्याचा सराव करणे, ही पहिली आवश्यक गोष्ट आहे. सामान्य मानवी मनाच्या गतिविधी पृष्ठस्तरीय असल्यामुळे, खरा आत्मा झाकला जातो. परंतु या पृष्ठस्तरीय भागाच्या मागील बाजूस, अंतरंगामध्ये दुसरी एक गुप्त असणारी चेतना असते आणि तिच्यामध्येच आपल्याला आपल्या खऱ्या आत्म्याची आणि प्रकृतीच्या महत्तर आणि गहनतर अशा सत्याची जाणीव होऊ शकते. परिणामतः आत्म्याचा साक्षात्कार होऊ शकतो आणि प्रकृतीला मुक्त करून, तिचे परिवर्तन घडवून आणता येऊ शकते. पृष्ठस्तरीय मन शांत करणे आणि अंतरंगात जीवन जगायला सुरुवात करणे, हे या एकाग्रतेचे उद्दिष्ट असते. या पृष्ठस्तरीय चेतनेव्यतिरिक्त अन्य अशी ही जी सत्य चेतना असते तिची दोन मुख्य केंद्रं असतात. एक केंद्र हृदयामध्ये (शारीरिक हृदयामध्ये नाही तर, छातीच्या मध्यभागी असणारे हृदयकेंद्र) आणि दुसरे केंद्र मस्तकामध्ये असते. हृदयकेंद्रामध्ये केलेल्या एकाग्रतेमुळे अंतरंग खुले होऊ लागते आणि या आंतरिक खुलेपणाचे अनुसरण करत करत, आत खोलवर गेल्यास व्यक्तीला आत्म्याचे किंवा व्यक्तिगत दिव्य तत्त्वाचे म्हणजे चैत्य पुरुषाचे ज्ञान होते. अनावृत (unveiled) झालेला तो पुरुष मग पुढे यायला सुरुवात होते, तो प्रकृतीचे शासन करू लागतो, प्रकृतीला आणि तिच्या सर्व हालचालींना ‘सत्या’च्या दिशेने वळवू लागतो, ‘ईश्वरा’च्या दिशेने वळवू लागतो आणि जे जे काही ऊर्ध्वस्थित आहे, ते अवतरित व्हावे म्हणून त्याला साद घालतो. त्यामुळे त्याला त्या ईश्वराच्या उपस्थितीची जाणीव होते, त्या ‘सर्वोच्चा’प्रत हा पुरुष स्वतःला समर्पित करतो आणि जी महत्तर ‘शक्ती’ आणि ‘चेतना’, आपल्या ऊर्ध्वस्थित राहून, आपली वाट पाहात असते, तिचे आपल्या प्रकृतीमध्ये अवतरण व्हावे यासाठी तो तिला आवाहन करतो. ‘ईश्वरा’प्रत स्वतःला समर्पित करत, हृदयकेंद्रावर (अनाहत केंद्रावर) एकाग्रता करणे आणि हृदयातील ईश्वराच्या ‘उपस्थिती’ची व आंतरिक उन्मुखतेची अभीप्सा बाळगणे हा पहिला मार्ग आहे आणि ते जर करता आले, तर ती स्वाभाविक सुरुवात म्हटली पाहिजे. कारण एकदा का त्याचे परिणाम दिसू लागले की मग, या मार्गाने केलेल्या वाटचालीमुळे, आध्यात्मिक मार्ग हा (दुसऱ्या मार्गाने सुरुवात केली असती त्यापेक्षा) अधिक सोपा आणि अधिक सुरक्षित होतो.

दुसरा मार्ग म्हणजे मस्तकामध्ये, मानसिक चक्रामध्ये (आज्ञाचक्र) करायची एकाग्रता. त्यामुळे जर का पृष्ठस्तरीय मनामध्ये शांतता येऊ शकली तर, आतील, व्यापक, अधिक गहन असे आंतरिक मन खुले होते; हे मन आध्यात्मिक अनुभूती आणि आध्यात्मिक ज्ञान ग्रहण करण्यास अधिक सक्षम असते. पण एकदा का येथे एकाग्रता साध्य झाली की मग, व्यक्तीने मनाच्या वर असणाऱ्या ऊर्ध्वस्थित शांत मानसिक चेतनेप्रत स्वतःला खुले केलेच पाहिजे. कालांतराने चेतना ऊर्ध्व दिशेने वाटचाल करत आहे अशी व्यक्तीला जाणीव होते आणि अंततः चेतना, आजवर तिला ज्या झाकणाने शरीरामध्येच बद्ध करून ठेवले होते, त्या झाकणाच्या पलीकडे चढून जाते. आणि मस्तकाच्या वर असलेले केंद्र तिला गवसते, तेथे ती अनंतत्वामध्ये मुक्त होते. तेथे ती चेतना ‘विश्वात्म्या’च्या, ‘दिव्य शांती’च्या, ‘दिव्य प्रकाशा’च्या, ‘दिव्य शक्ती’च्या, ‘दिव्य ज्ञाना’च्या, ‘दिव्य आनंदा’च्या संपर्कात येते आणि त्यामध्ये प्रवेश करते आणि प्रकृतीमध्येही या गोष्टींचे अवतरण अनुभवास यावे म्हणून, तेच होऊन जाते. अचंचलतेसाठी अभीप्सा बाळगत, मस्तकामध्ये एकाग्र होणे आणि ‘आत्म्या’चा व ऊर्ध्वस्थित अशा ‘ईश्वरा’चा साक्षात्कार करून घेणे हा एकाग्रतेचा दुसरा मार्ग होय. मात्र मस्तकामध्ये जाणिवेचे केंद्रीकरण करणे हा, त्याहूनही वर असणाऱ्या केंद्राप्रत चढून जाण्याच्या तयारीचा केवळ एक भाग असतो, हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. अन्यथा कदाचित व्यक्ती स्वतःच्या मनामध्ये आणि त्याच्या अनुभवांमध्येच बद्ध होण्याची शक्यता असते. किंवा व्यक्ती आध्यात्मिक विश्वातीतामध्ये चढून तेथे जीवन जगण्याच्या ऐवजी, फार फार तर, ऊर्ध्वस्थित ‘सत्या’चे केवळ प्रतिबिंबच प्राप्त करून घेऊ शकते. काही जणांना मानसिक एकाग्रता सोपी वाटते; तर काही जणांना हृदयकेंद्रावर एकाग्रता साधणे अधिक सोपे जाते; काही जणांना या दोन्ही केंद्रांवर आलटूनपालटून एकाग्रता करणे शक्य होते – जर एखाद्याला हृदय केंद्रापासून सुरुवात करणे शक्य झाले, तर ते अधिक इष्ट असते.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 06-07)