Posts

साधना, योग आणि रूपांतरण – १९४

‘अतिमानस योग’ (supramental Yoga) म्हणजे एकाच वेळी, ‘ईश्वरा’प्रत आरोहण (ascent) असते आणि ‘ईश्वरा’चे मूर्त प्रकृतीमध्ये अवतरण (descent) देखील असते. आत्मा, मन, प्राण आणि शरीर यांच्या एककेंद्री समुच्चयाच्या ऊर्ध्वमुख अभीप्सेद्वारेच (aspiration) आरोहण साध्य होऊ शकते. आणि समग्र अस्तित्वाने त्या अनंत आणि शाश्वत ‘ईश्वरा’प्रत आवाहन केले तर त्याद्वारेच अवतरण घडून येऊ शकते. जर हे आवाहन व ही अभीप्सा असेल किंवा अन्य कोणत्याही मार्गाने या गोष्टी उदयाला आल्या, त्या सातत्याने वृद्धिंगत होत राहिल्या आणि त्यांनी जर सर्व प्रकृतीचा ताबा घेतला, तर आणि तरच अतिमानसिक उन्नयन आणि रूपांतरण शक्य होते.

आवाहन आणि अभीप्सा या फक्त प्राथमिक अटी आहेत, त्या बरोबरीने आणि त्यांच्या प्रभावशाली तीव्रतेमुळे सर्व अस्तित्वामध्येच ‘ईश्वरा’प्रत उन्मुखता (opening) आणि संपूर्ण समर्पण उदित होणे आवश्यक असते. मर्त्य अस्तित्वाच्या आधीपासूनच वर असणारी व पाठीमागे असणारी आणि मर्त्य अर्धजागृत अस्तित्वाला कवेत घेणारी एक महान दिव्य ‘चेतना’ असते. ती महान दिव्य चेतना, प्रकृतीला तिच्या सर्व भागांनिशी आणि सर्व स्तरांवर, कोणत्याही मर्यादेविना ग्रहण करता येणे शक्य व्हावे म्हणून, प्रकृतीने स्वत:ला व्यापकतेने खुले करणे म्हणजे ‘उन्मुखता’! या ग्रहणशीलतेमध्ये धारण करण्याची अक्षमता असता कामा नये, किंवा मूलद्रव्यांतरणाच्या तणावामुळे (transmuting stress) शरीर किंवा मज्जातंतू, प्राण किंवा मन, किंवा संपूर्ण व्यवस्थेतील कोणती एखादी गोष्ट कोलमडूनही पडता कामा नये. (म्हणून त्यासाठी) ईश्वरी ‘शक्ती’चे सदोदित बलशाली असणारे आणि अधिकाधिक आग्रही होत जाणारे कार्य धारण करण्यासाठी सतत चढतीवाढती असणारी क्षमता, आणि अपार ग्रहणशीलता असणे आवश्यक असते. अशी ग्रहणशीलता नसेल तर कोणतेच महान आणि चिरस्थायी असे कोणतेही कार्य घडणे शक्य होणार नाही; आणि अशा वेळी ती ‘योगसाधना’ कोलमडून बंद पडेल किंवा जडतायुक्त अडथळा निर्माण झाल्यामुळे बंद होईल किंवा त्या प्रक्रियेमध्येच काहीतरी विनाशक अटकाव किंवा सुस्ती येऊन ती बंद पडेल अशी शक्यता असते; या प्रक्रियेमध्ये अपयश येऊ नये असे जर वाटत असेल तर योगसाधना निरपवाद आणि समग्र असणेच आवश्यक असते.

परंतु कोणत्याही मानवी प्रणालीमध्ये ही अनंत ग्रहणशीलता आणि अमोघ क्षमता नसते, म्हणून ‘ईश्वरी शक्ती’ जेव्हा एखाद्या व्यक्तीमध्ये अवतरित होते तेव्हा, ती त्या व्यक्तीची (ग्रहण)क्षमता वृद्धिंगत करत नेते. ईश्वरी ‘शक्ती’ वरून त्या व्यक्तीमध्ये प्रविष्ट होताना, व्यक्तीच्या प्रकृतीमध्ये कार्य करण्यासाठी ‘सामर्थ्य’ निर्माण करते. ते सामर्थ्य आणि ती ग्रहणक्षमता जेव्हा त्या ईश्वरी शक्तीद्वारे समतुल्य केली जाते तेव्हाच, अतिमानसिक ‘योग’ यशस्वी होण्याची शक्यता असते. आपण ‘जेव्हा आपले अस्तित्व हळूहळू चढत्यावाढत्या समर्पणाद्वारे ईश्वरा’च्या हाती सोपवीत जातो तेव्हाच ही गोष्ट शक्य होते. तेथे एक समग्र आणि अखंडित अशी सहमती आणि कार्यासाठी जी गोष्ट करणेच आवश्यक आहे ती गोष्ट ‘ईश्वरी शक्ती’ला करू देण्याची धैर्ययुक्त इच्छाशक्ती असणेच आवश्यक असते. (उत्तरार्ध उद्याच्या भागात…)

– श्रीअरविंद (CWSA 12 : 169-170)

विचार शलाका – १५

आपल्या आणि सर्व जीवमात्रांच्या अस्तित्वाच्या ‘दिव्य सत्या’शी एकत्व, हे ‘पूर्णयोगा’चे एक अत्यावश्यक उद्दिष्ट आहे. आणि ही गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचे आहे; आपण हे कायम स्मरणात ठेवावयास हवे की, आपण आपला हा योग अतिमानसाच्या प्राप्तीसाठी, अंगीकारलेला नाही, तर तो आपण ‘ईश्वरा’साठी अंगीकारलेला आहे. आपण अतिमानसाच्या प्राप्तीसाठी प्रयत्नशील असतो, ते त्याच्या आनंदासाठी किंवा त्याच्या महानतेसाठी नव्हे; तर दिव्य सत्याशी आपले एकत्व हे अधिक समग्र आणि परिपूर्ण व्हावे, यासाठी आपण प्रयत्नशील असतो. ते दिव्य सत्य संवेदित व्हावे, ते आत्मसात करता यावे, त्याच्या सर्वोच्च तीव्रतांनिशी आणि त्याच्या सर्वाधिक व्यापकतांनिशी, आपल्या अस्तित्वाच्या प्रत्येक शक्य असलेल्या मार्गानिशी ते क्रियाशील करता यावे; आपल्या प्रकृतीच्या प्रत्येक श्रेणीमध्ये, प्रत्येक वळणावाकणावर तसेच तिच्या विश्रांत स्थितीमध्ये सुद्धा ते दिव्य सत्य क्रियाशील करता यावे, म्हणून आपण अतिमानसाच्या प्राप्तीसाठी प्रयत्नशील असतो. अतिमानवतेच्या महाकाय भव्यतेप्रत, ईश्वरी सामर्थ्याप्रत आणि महानतेप्रत आणि व्यक्तिगत व्यक्तिमत्त्वाच्या व्यापकतेच्या आत्म-परिपूर्तीप्रत पोहोचणे, हे अतिमानस योगाचे उद्दिष्ट आहे; असा विचार करण्यास कित्येक जण प्रवृत्त होतील. पण असा विचार करणे म्हणजे विपर्यास करण्यासारखे आहे. ही विपर्यस्त आणि घातक संकल्पना आहे. घातक यासाठी की, त्यातून आपल्यामध्ये असणाऱ्या राजसिक प्राणिक मनाची महत्त्वाकांक्षा आणि गर्व, अभिमान वाढीस लागण्याची शक्यता असते आणि जर त्याच्या अतीत जाता आले नाही आणि त्यावर मात करता आली नाही तर, त्यातून आध्यात्मिक पतनाचा हमखास धोका संभवतो. ही संकल्पना विपर्यस्त एवढ्याचसाठी आहे ; कारण ती अहंजन्य संकल्पना आहे आणि अतिमानसिक परिवर्तनाची पहिली अटच मुळी अहंकारापासून मुक्ती ही आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 23-24 : 280)

विचार शलाका – ११

अतिमानस योगाचा (पूर्णयोगाचा) पहिला शब्द ‘समर्पण’ हा आहे आणि त्याचा अंतिम शब्ददेखील ‘समर्पण’ हाच आहे. दिव्य चेतनेमध्ये उचलून घेण्यासाठी म्हणून, पूर्णत्वासाठी म्हणून आणि रूपांतरणासाठी म्हणून, व्यक्तीची त्या शाश्वत ‘दिव्यत्वा’प्रत आत्मदान करण्याची इच्छा, यापासून या ‘योगा’चा प्रारंभ होतो. आणि निःशेष आत्मदानामध्ये त्याची परिणती होते. कारण जेव्हा आत्मदान पूर्णत्वाला पोहोचते, तेव्हाच या योगाची पूर्णत्वदशा येते, तेव्हाच प्रकृतीचे रूपांतरण होणे, व्यक्तीला पूर्णत्वप्राप्ती होणे आणि अतिमानसिक ‘दिव्यत्वा’मध्ये समग्रतया उन्नत होणे, या गोष्टी घडून येतात.

– श्रीअरविंद
(CWSA 12 : 367)