Posts

साधना, योग आणि रूपांतरण – ११०

अज्ञान आणि अहंभावातून केलेल्या कृतीला, जी कृती अहंकाराच्या तुष्टीसाठी आणि राजसिक इच्छेने प्रेरित होऊन केली जाते त्या कृतीला मी ‘कर्म’ मानत नाही. अज्ञानाचा जणू शिक्काच असणाऱ्या अहंकार, राजसिकता आणि इच्छावासना यांपासून सुटका करून घेण्याचा संकल्प असल्याखेरीज ‘कर्मयोग’ घडूच शकत नाही. परोपकार किंवा मानवतेची सेवा किंवा नैतिक किंवा आदर्शवादी अशा उर्वरित सर्व गोष्टी, ज्या गोष्टी कार्याच्या गहनतर सत्याला पर्यायी आहेत, असे मानवी मन मानते, त्या सुद्धा माझ्या दृष्टीने ‘कर्म’ या संज्ञेला पात्र ठरत नाहीत. जी कृती ‘ईश्वरा’साठी केली जाते, जी कृती ‘ईश्वरा’शी अधिकाधिक एकत्व पावून केली जाते आणि अन्य कशासाठीही नाही तर, केवळ ‘ईश्वरा’साठीच केली जाते अशा कृतीला मी ‘कर्म’ असे संबोधतो. साहजिकच आहे की, ही गोष्ट सुरुवातीला तितकीशी सोपी नसते; गहन ध्यान आणि दीप्तिमान ज्ञान यांच्यापेक्षा ती काही कमी सोपी नसते, किंबहुना त्यामानाने खरेखुरे प्रेम आणि भक्ती या गोष्टी अधिक सोप्या असतात. परंतु इतर गोष्टींप्रमाणेच या गोष्टीची (कर्माची) सुरुवात देखील तुम्ही सुयोग्य वृत्ती आणि दृष्टिकोन बाळगून केली पाहिजे, तुमच्यामधील सुयोग्य संकल्पासहित ही गोष्ट करण्यास तुम्ही सुरुवात केली पाहिजे, अन्य गोष्टी त्यानंतर घडून येतील. अशा वृत्तीने केलेले ‘कर्म’ हे भक्ती किंवा ध्यान यांच्याइतकेच प्रभावी ठरू शकते.

*

कुटुंब, समाज, देश या गोष्टी म्हणजे ‘ईश्वर’ नव्हेत; या गोष्टी म्हणजे अहम् चे व्यापक रूप आहेत. कुटुंब, समाज, देश या उद्दिष्टांसाठी कार्य करावे असा ‘ईश्वरी आदेश’ मिळाला असल्याची जर व्यक्तीला जाणीव असेल किंवा (ते कार्य करत असताना) व्यक्तीला स्वतःच्या अंतरंगामध्ये कार्य करणाऱ्या ‘ईश्वरी शक्ती’ची जाणीव असेल तरच ती व्यक्ती कुटुंब, समाज, देश यांच्यासाठी कार्य करत असूनही, मी ‘ईश्वरा’साठी कार्य करत आहे, असे म्हणू शकते. अन्यथा, देश वगैरे गोष्टी म्हणजे ‘ईश्वर’च आहेत, ही केवळ मनाची एक कल्पना असते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 216), (CWSA 28 : 438)

आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (२८)

जग हे माया आहे, ते मिथ्या आहे या मताशी मी सहमत नाही. ‘ब्रह्म’ हे जसे विश्वातीत ‘केवलतत्त्वा’मध्ये आहे तसेच ते येथेही आहे. ज्या गोष्टीवर मात करणे आवश्यक आहे अशी एक गोष्ट म्हणजे ‘अज्ञान’. जे अज्ञान आपल्याला अंध बनविते आणि आपल्या अस्तित्वाचे सत्य स्वरूप ओळखण्यास तसेच, या जगामध्ये आणि जगाच्या अतीतही असणाऱ्या ‘ब्रह्मा’चा साक्षात्कार करून घेण्यास आपल्याला प्रतिबंध करते, त्या अज्ञानावर आपण मात केली पाहिजे.

– श्री अरविंद (CWSA 29 : 391)

धम्मपद : वास्तविक जी व्यक्ती अजूनही अशुद्ध आहे. अजूनही जिच्या ठिकाणी आत्म-संयम आणि निष्ठा यांचा अभाव आहे, अशी व्यक्ती खरंतर भिक्षुची पीत वस्त्र धारण करण्याच्या योग्यतेची नसते.

श्रीमाताजी : बौद्ध धर्म ज्याला अशुद्धी म्हणून संबोधतो, त्यात मुख्यत: अहंकार आणि अज्ञान या गोष्टींचा अंतर्भाव होतो; कारण बौद्धांच्या दृष्टिकोनातून, सर्वात मोठा कलंक म्हणजे अज्ञान; पण बाह्य गोष्टींचे किंवा प्रकृतीच्या नियमांचे किंवा तुम्ही जे काही शाळेमध्ये शिकता त्याबाबतीतले अज्ञान नव्हे; तर वस्तुमात्राच्या गूढतम सत्याबद्दल असलेले अज्ञान, आपल्या अस्तित्वाच्या मार्गदर्शक तत्त्वाबद्दल, आपल्या जीवितसाराबद्दल असणारे अज्ञान, धर्माबद्दल असणारे अज्ञान.

येथे हे लक्षात घेतले पाहिजे की, आत्मसंयमाचा अभाव व सत्यनिष्ठेचा अभाव या दोन दोषांवर येथे भर देण्यात आलेला आहे. सत्यनिष्ठा म्हणजे प्रामाणिकपणा, सचोटी; धम्मपदाने सर्वाधिक धिक्कार ढोंगीपणाचा केला आहे. आपल्याला आध्यात्मिक जीवन जगावयाचे आहे असे भासवायचे आणि तसे जगावयाचे नाही, आपल्याला सत्यशोधन करावयाचे आहे असे भासवायचे आणि तसे करावयाचे नाही, दिव्य जीवनासाठी स्वत:चे जीवन समर्पित केले असल्याचे ज्यातून दिसून येईल अशा बाह्य गोष्टी धारण करावयाच्या (उदा. पीत वस्त्रे परिधान करावयाची) पण आंतरिकरित्या मात्र स्वत:, स्वत:चा स्वार्थ आणि स्वत:च्या गरजा यातच गुंतलेले असावयाचे, ह्या सर्व गोष्टींची धम्मपद निंदा करते.

धम्मपदाने आत्मसंयमावर किती भर दिला आहे हे पाहण्यासारखे आहे. कारण बुद्धाच्या शिकवणीनुसार, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच. बुद्धाने मध्यममार्गावर, सुवर्णमध्यावर नेहमीच भर दिला आहे. तुम्ही कोणत्याही एका बाजूला अधिक झुकलेले असता कामा नये, किंवा कोणत्याही एखाद्या गोष्टीचा अतिरेक करणे वाईटच. प्रत्येक गोष्टीत समतोल हवा, परिमितता हवी.

म्हणूनच, आंतरिक समतोल असणे, कृतीमध्ये समतोल असणे, प्रत्येक बाबतीत परिमितता असणे, प्रामाणिक असणे, सचोटी व निष्ठा असणे, हे गुण तुम्हाला आध्यात्मिक जीवन आचरण्यासाठी पात्र बनवितात.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 190)