Tag Archive for: अक्रियता

साधना, योग आणि रूपांतरण – २८७

अवचेतन व अचेतन यांचे रूपांतरण

आंतरिक अस्तित्व हे अवचेतनावर (subconscient) अवलंबून नसते. परंतु बाह्यवर्ती अस्तित्व मात्र जन्मानुजन्मं अवचेतनावर अवलंबून राहत आले आहे. आणि त्यामुळे बाह्यवर्ती अस्तित्व आणि शारीर-चेतनेची अवचेतनाला प्रतिसाद देण्याची सवय, या गोष्टी साधनेच्या प्रगतीमध्ये एक भयंकर मोठा अडथळा ठरू शकतात आणि बऱ्याच जणांच्या बाबतीत तो तसा अडथळा ठरतो देखील.

अवचेतन हे जुन्या गतिप्रवृत्तींची पुनरावृत्ती साठवून ठेवत असते. ते चेतनेला नेहमी खाली खेचत असते. ते (चेतनेच्या) आरोहण-सातत्याला विरोध करत असते. ते जुन्या प्रकृतीस किंवा मग तामसिकतेस (अ-प्रकाश आणि अ-क्रियता) अवरोहणाच्या (descent) आड आणत असते.

तुम्ही जर समग्रतया आणि गतिशीलपणे, सक्रियपणे आंतरिक अस्तित्वामध्येच जीवन जगत असाल आणि बाह्यवर्ती अस्तित्व हे केवळ एक वरवरची गोष्ट आहे असे तुम्हाला जाणवत असेल, तर तुम्ही (अवचेतनाच्या) या अडथळ्यापासून स्वतःची सुटका करून घेऊ शकता किंवा बाह्यवर्ती चेतनेचे रूपांतरण पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही हा अडथळा निदान कमी तरी करू शकता.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 597)

कर्म आराधना – ३७

आळस आणि अक्रियता (inaction) यांचा शेवट तामसिकतेमध्ये होतो; अचेतनेच्या गर्तेत पडण्यासारखे ते असते, या गोष्टी प्रगती आणि प्रकाश यांच्या विरोधी असतात.

स्वतःच्या अहंकारावर मात करणे आणि केवळ ‘ईश्वरा’च्या सेवेमध्ये जीवन व्यतीत करणे – हा आपला आदर्श असला पाहिजे. तोच सत्य चेतना प्राप्त करून घेण्याच्या दिशेने जाणारा सर्वात जवळचा मार्ग आहे.
*
योग्य वृत्तीने केलेले कर्म हे ध्यानच असते.

– श्रीमाताजी
[CWM 14 : 297, 298]