मन, प्राण, शरीर ह्यांची अनंत भूमंडळे गळून पडतात आणि साधकाचा ऊर्ध्वगामी प्रवास सुरु होतो. मानवी जीवनाचा सर्व पसारा हळूहळू धूसर होत जातो आणि असा साधक मानवी भूमंडळातील एका अंतिम टप्प्यावर येऊन पोहोचलेला असतो. आता पुढे काय ?

विश्व-प्रकृतीचा विचार करता, आजवरची वाटचाल शरीर, प्राण हे टप्पे ओलांडून मनापर्यंत येऊन पोहोचली आहे. मनाच्या पलीकडे जाण्याचे आजवर झालेले प्रयत्न, हे धूमकेतूसारखे चमकून गेलेले आहेत. कालौघात काही संतसत्पुरुषांचे झालेले प्रकटीकरण म्हणजे विश्व-प्रकृतिद्वारे केले गेलेले हे असेच प्रयत्न आहेत. परंतु आता प्रकृतीच निवडक मानवांच्या माध्यमातून, मनाच्या पलीकडच्या टप्प्यावर जाण्याच्या तयारीत आहे. देश, भाषा, प्रांत, धर्म, जात, वंश यांच्या संकुचित सीमा भेदून, मनाच्या पलीकडे जाऊ पाहणारे या पृथ्वीवरील काही मोजके मानव, या पुढील प्रवासासाठी निघण्याच्या तयारीत, एका उच्चतर प्रतलावर एकत्र आले आहेत.

या उच्चतर प्रतलाला अधिष्ठान आहे ते आद्यशक्तीचे, अदितीचे ! तिच्या अधिष्ठानावर स्थित होऊन, श्रीअरविंद नामक विभूती-अवताराने, या मोजक्या मानवांचे प्रतिनिधी बनून, ‘मन ते अतिमानस’ ही वाटचाल, आपल्या समर्थ बाहूंवर पेलली आहे.

मनाच्या अतीत जाण्याचा प्रयत्न करू पाहणारी व्यक्ती ही जणू स्फटिकवत आहे. त्याच्या खालच्या गोलार्धात आहेत, व्यक्तीचे शरीर, प्राण व मन. ते त्या व्यक्तीचे आधार आहेत. ह्या आधाराला आधार आहे तो श्रीअरविंदांचा आणि त्यांनी स्वतःच्या जीवनात जे साध्य करून घेतले, त्या आध्यात्मिक संपदेचा !

‘मन ते अतिमानस’ ह्या वरच्या गोलार्धात वाटचाल करण्यासाठी साधकाला साहाय्यभूत होणार आहे ‘अभीप्सा’ (Aspiration towards Divine). व्यक्तीच्या अंतःकरणातून, किंबहुना तिच्या समग्र अस्तित्वातून ऊर्ध्वमुख होणारी अभीप्सा किरण रूपाने वर वर जात आहे. ‘अतिमानस’रूपी सूर्याकडून येणारा एक प्रकाशकिरण त्या व्यक्तीचे समग्र अस्तित्व भेदून आरपार जात आहे. ऊर्ध्वमुख अभीप्सा आणि अधोमुख अतिमानसरूपी प्रकाशकिरण परस्परांमध्ये मिसळून व्यक्तीचे समग्र अस्तित्व दिव्य प्रकाशाने उजळून निघत आहे. आणि त्या प्रकाशाच्या उजळण्याने आसमंत प्रकाशमान होत आहे.

अशा व्यक्तींचे समुदाय, हे मानवजातीला मनाकडून अतिमानसाकडे घेऊन जाणाऱ्या वाटचालीतील अग्रणी असणार आहेत.

*

या पृथ्वीवर अतिमानसाचे अवतरण झाले असल्याची स्पष्ट अनुभूती श्रीमाताजींना ज्या दिवशी आली तो दिवस म्हणजे दि.२९ फेब्रुवारी १९५६. हा दिवस ‘अतिमानस अवतरण दिन’ म्हणून साजरा केला जातो.

(श्रीमाताजींचे प्रतीक आणि त्यावर श्रीअरविंदांच्या प्रतीकाने तोललेला स्फटिक ही रचना, ऑरोविल येथे मातृमंदिरातील ध्यानमंदिराच्या केंद्रस्थानी आहे.)

पूर्णयोगांतर्गत पारंपरिक योग – ०१

श्रीअरविंदप्रणित पूर्णयोग’ हा सर्व पारंपरिक योगांचा समन्वय आहे आणि त्याहूनही अधिक असे काही त्यामध्ये आहे. हा समन्वय करताना, पारंपरिक योगमार्गांचे स्वतः आधी अनुसरण करून, तसे प्रयोग करून, श्रीअरविंदांनी त्याआधारे प्रत्येक पारंपरिक योगामधील बलस्थानं आणि त्यांच्या मर्यादा स्वतः ज्ञात करून घेतल्या. पारंपरिक योगमार्गांच्या आधारे व्यक्ती आंशिक साक्षात्कारापर्यंत जाऊन पोहोचते, परंतु पूर्ण साक्षात्काराप्रत जाण्यासाठी त्या पारंपरिक योगमार्गांमधील क्रियाप्रकियांना जो नवीन अर्थ, जो नवीन संदर्भ प्राप्त करून द्यावा लागतो, तो नवीन अर्थ, नवीन संदर्भ नेमका कोणता, तो श्रीअरविंदांनी त्यांच्या लेखनातून स्पष्ट केला आहे. विशेषतः त्यांच्या ‘Synthesis of Yoga’ या ग्रंथामध्ये पारंपरिक योग, त्यांची बलस्थाने आणि त्यांच्या मर्यादा यांचा खूप सविस्तर धांडोळा घेण्यात आला आहे. श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांच्या या शिकवणीतील अंशभागाचा समावेश, आजपासून सुरु होणाऱ्या ‘पूर्णयोगांतर्गत पारंपरिक योग’ या मालिकेत केला आहे.

धन्यवाद
संपादक, अभीप्सा मराठी मासिक

पूर्णयोग आणि बौद्धमत – ०१

श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांनी आपल्या जीवनात सर्वच पारंपरिक योगांचा, तत्त्वज्ञानांचा समन्वय करण्याचा प्रयत्न केला. श्रीअरविंदांनी तर त्यावर आधारित ‘Synthesis of Yoga’ या नावाचा ग्रंथराजच संपन्न केला. श्रीमाताजी गीतेच्या योगाच्या तसेच बौद्ध तत्त्वज्ञानाच्याही अभ्यासक आणि उपासक होत्या. त्यांना ध्यानावस्थेमध्ये भगवान बुद्धांचा संदेश प्राप्त झाला होता. श्रीमाताजींनी केलेल्या उपासनेच्या आधारावर, पूर्णयोगाच्या प्रकाशात, बौद्ध तत्त्वज्ञानाचे सारच शिष्यवर्गासमोर खुले केले. त्यांनी पूर्णयोगाच्या प्रकाशात, ‘धम्मपद’ या ग्रंथातील एकेक वचनाच्या आधारे, त्याचे स्पष्टीकरण केले.

श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांचे वैशिष्ट्य हे आहे की, त्यांना कोणत्याही धर्माचे, कोणत्याही पंथाचे, कोणत्याही तत्त्वज्ञानाचे, कोणत्याही संप्रदायाचे वावडे नव्हते. वैश्विक व्यवस्थेमध्ये, प्रत्येक अवताराचे त्याचे त्याचे म्हणून एक विशिष्ट असे कार्य असते. आणि हे सारे अवतार म्हणजे वैश्विक उत्क्रांतीच्या मार्गावरील विविध टप्पे असतात, अशी त्यांची धारणा होती. त्यामुळे या सर्वच विचारधारांमधील सार ग्रहण करण्याची स्वीकारशीलता आणि त्या विचारधारांमधील कालबाह्य गोष्टींचा त्याग करण्याची विचक्षणता त्यांच्यापाशी होती. सर्वच तत्त्वज्ञानांमधील सार घेऊन, त्याच्या आधारावर पुढे पूर्णयोगाची मांडणी श्रीअरविंद व श्रीमाताजी यांनी केलेली दिसते.

‘धम्मपद’ या ग्रंथाला बौद्ध तत्त्वज्ञानामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. आध्यात्मिक जीवनाची पूर्वतयारी कशी करावी यासंबंधी, तसेच दैनंदिन जीवनामध्ये आचरण कसे असावे यासंबंधी, अनेक मौलिक विचार या ग्रंथामध्ये मांडण्यात आलेले आहेत. तेव्हा धम्मपदामधील मूळ वचने आणि त्याचे श्रीमाताजीकृत स्पष्टीकरण यांतील काही निवडक भाग आपण नव्याने सुरु होणाऱ्या लेखमालिकेमध्ये विचारार्थ घेणार आहोत.

श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांच्या लिखाणामधून, आपल्या पूर्णयोगाच्या वाटचालीमध्ये बौद्धविचाराचे नेमके स्थान कोणते, ह्याचाही बोध जाणकारांना होईल, असा विश्वास वाटतो. वाचक त्याला नेहमीप्रमाणेच प्रतिसाद देतील अशी आशा आहे.

प्रश्न : योग करण्याची पात्रता येण्यासाठी आम्ही काय केले पाहिजे?

श्रीमाताजी : प्रथमतः आपण जागृत झालो पाहिजे. आपल्याला आपल्या अस्तित्वाच्या अगदीच अल्प अंशाची जाणीव असते. उरलेला बहतेक सर्व भाग आपल्याला अज्ञात असतो. आपण त्याविषयी अजागृत असतो. या अजागृतीमुळेच आपण आपल्या असंस्कारित प्रकृतीला चिकटून राहतो आणि या अजागृतीमुळेच प्रकृतीमध्ये काही बदल किंवा रूपांतरण घडून आणण्यामध्ये अडसर निर्माण होतो. या अजागृतीच्या माध्यमातूनच अदिव्य शक्ती आपणामध्ये प्रवेश करतात आणि आपल्याला त्यांचे गुलाम बनवून टाकतात.

तुम्ही स्वत:विषयी जागृत झाले पाहिजे, तुमची प्रकृती व तुमच्यामध्ये निर्माण होणारी आंदोलने यांविषयी तुम्ही जागृत झाले पाहिजे. तुम्ही काही गोष्टी का करता व कशा करता, त्याविषयी तुमच्या भावना कशा प्रकारच्या आहेत व त्या तशा का आहेत, त्या गोष्टीसंबंधी तुमचे विचार काय आहेत व ते तसे का आहेत ह्याचे ज्ञान तुम्ही करून घेतले पाहिजे. जे हेतु व ज्या उर्मी, ज्या प्रकट वा अप्रकट शक्ती तुम्हाला कृतिप्रवण करतात त्या तुम्ही समजून घेतल्या पाहिजेत.

सारांश असा की, तुम्ही आपल्या अस्तित्वरूपी यंत्राचे भाग सुटे सुटे करून निरखून पारखून पाहिले पाहिजेत. अशा रीतीने तुम्ही एकदा का जागृत झालात की, तुम्हाला वस्तुस्थिती ओळखता येईल, तिचे पृथक्करण करता येईल. तुम्हाला खाली खेचणाऱ्या शक्ती कोणत्या व तुम्हाला साह्यभूत होणाऱ्या शक्ती कोणत्या, हे तुम्हाला ओळखता येईल.

योग्य काय नि अयोग्य काय, सत्य काय नि असत्य काय, दिव्य काय नि अदिव्य काय हे एकदा का तुम्हाला समजू लागले की जे योग्य, सत्य, दिव्य असेल त्याला धरूनच तुम्ही अगदी काटेकोरपणे आचरण केले पाहिजे. म्हणजेच जे योग्य व दिव्य त्याचा निश्चयपूर्वक स्वीकार करून, तद्विरोधी सर्वांचा त्याग केला पाहिजे.

पदोपदी हे द्वंद्व तुमच्यापुढे उभे राहील आणि पदोपदी तुम्हाला निवड करावी लागेल. तुम्हाला धीर धरावा लागेल, चिकाटीने व सावधगिरीने प्रयत्न करावा लागेल. जणू डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावे लागेल. संतसत्पुरुष सांगतात त्याप्रमाणे, दिव्यत्वाच्या विरोधी असणाऱ्या अदिव्याला कोणतीच संधी मिळू नये यासाठी तुम्ही प्रत्येक वेळी अदिव्याला नकार दिला पाहिजे.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 01-02)

ऑरोविल ह्या प्रकल्पाचे उद्घाटन दि. २८ फेब्रुवारी १९६८ रोजी झाले. त्याच्या संस्थापक श्रीमाताजी यांनी, ऑरोविल विषयीची त्यांची भूमिका ‘ऑरोविलची सनद’ यामध्ये स्पष्ट केली आहे. हा उद्घाटनाचा कार्यक्रम चालू असताना, ‘ऑल इंडिया रेडिओ’वरून या सनदीचे सोळा भाषांमध्ये प्रक्षेपण करण्यात आले.

ऑरोविल मधील लहान मोठे निर्णय घेताना, धोरणे ठरविताना या सनदीचा आधार घेतला जातो. यामध्ये नमूद केलेल्या संकल्पना प्रत्यक्ष व्यवहारात उतरविण्याचा प्रयत्न केला जातो. ऑरोविलमध्ये जीवन जगू इच्छितात, त्यांच्यासाठी असलेली ही मार्गदर्शक तत्त्वेच आहेत.

१२४ देशांतील व भारताच्या २३ राज्यांतील प्रत्येकी एक युवक व एक युवती अशा प्रतिनिधींनी आपापल्या मायभूमीतून मूठभर माती आणली आणि ती ऑरोविलच्या केंद्रस्थानी असणाऱ्या संगमरवरी कमळामध्ये समारंभपूर्वक ठेवण्यात आली. श्रीमाताजींनी फ्रेंचमध्ये लिहिलेली ‘ऑरोविलची सनद’ देखील ह्यासोबत ठेवण्यात आली.

…ऑरोविलची पायाभरणी झाली. वैश्विक एकतेचा पाया रचला गेला.