धम्मपद : रस्त्याच्या कडेलासुद्धा एखादे सुंदर सुवासिक फूल उमललेले आढळते, त्याचप्रमाणे स्वयंप्रकाशित बुद्धांचे शिष्यदेखील, त्यांच्या बुद्धिप्रकाशाच्या योगे, अंध व अज्ञानी जनसमूहात, चारचौघांमध्ये उठून दिसतात.

श्रीमाताजी : येथे काही चांगल्या सूचना करण्यात आल्या आहेत, उदाहरणार्थ, इतर जणं काय करतात किंवा ते कोणत्या चुका करतात याच्याशी तुमचा संबंध असता कामा नये, तर स्वत:चे दोष, निष्काळजीपणा यांकडेच तुम्ही लक्ष पुरविले पाहिजे आणि ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

दुसरी एक सुजाण सूचना अशी की, अशा कोणत्याही गोष्टी, ज्या प्रत्यक्ष कृतीमध्ये कार्यान्वित होत नाहीत, अशा गोष्टींचे वर्णन करताना आपले शब्दपांडित्य खर्च करू नये. कमी बोलावे आणि उत्तम कृती करावी. पोकळ शब्द हे सुगंध नसलेल्या फुलाप्रमाणे असतात.

तुम्ही तुमच्या स्वत:च्या दोषांनी, त्रुटींनी नाउमेद होऊ नका. रस्त्याच्या कडेला असलेल्या कचऱ्याच्या ढिगामध्येसुद्धा अतिशय निर्मळ फूल उमललेले आढळून येते. मथितार्थ असा की, ज्यामधून विशुद्ध अशा साक्षात्काराचा जन्मच होणार नाही इतके त्याज्य काहीच नसते.

व्यक्तीचा भूतकाळ कसा का असेना, हातून कोणत्याही चुका का घडलेल्या असेना, माणूस किती का घोर अज्ञानात जगलेला असेना, तरीही प्रत्येकाच्या अंत:करणात खोलवर एक परमोच्च असे पावित्र्य, शुद्धता दडलेली असते की ज्याचे सुंदर अशा साक्षात्कारामध्ये रूपांतर होऊ शकते. केवळ त्याचाच विचार करा, त्यावरच लक्ष केंद्रित करा, इतर सर्व अडचणी, अडथळे, संकटे यांची चिंता करू नका.

तुम्ही जे बनू इच्छिता केवळ त्यावरच लक्ष केंद्रित करा, तुम्ही जे बनू इच्छित नाही ते संपूर्णपणे, शक्य तितके नि:शेषतया विसरण्याचा प्रयत्न करा.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 215)

धम्मपद : दुष्कृत्य करणारा मनुष्य इहलोकामध्ये व परलोकामध्येही क्लेश भोगतो. तो त्याची दुष्कृत्ये आठवून विलाप करतो आणि दुःखभोग भोगतो.

श्रीमाताजी : आपण करत असलेले कृत्य वाईट, ओंगळ आहे हे दिसण्यासाठी, समजण्यासाठीसुद्धा मनुष्य एका उंचीवर पोहोचलेला असला पाहिजे. त्याला आत गाभ्यात कोठेतरी सौंदर्य, उदात्तता, उदारता या गोष्टींची पूर्वप्रचिती आलेली असावी लागते, तरच त्याला या गोष्टींच्या अभावामुळे सहन करावे लागणारे दुःख नेमके कसे असते याची कल्पना येऊ शकते.

मला वाटते, सुंदर काय, उदात्त काय हे माहीत असूनही जे लोक जाणूनबुजून, मुद्दाम वाईट वागतात, त्यांच्यासाठी जीवन हे खरोखरच वेदनामय ठरते. काय करू नये ते माहीत असतानासुद्धा, एकसारखे तीच गोष्ट करत राहायची तर त्याच्या मोबदल्यात, शांती, स्वास्थ्य याची किंमत मोजावी लागणारच. जो खोटे बोलतो तो त्याचे पितळ कधीतरी उघडे पडेल या भीतीखाली सतत वावरत असतो. जो चुकीचे वागला आहे तो सतत या चिंतेत असतो की त्याला त्याच्या कृत्याची शिक्षा तर होणार नाही ना! जो दुसऱ्याला फसविण्याचा प्रयत्न करीत असतो, त्याला त्याची चोरी उघडकीला येईल की काय याची कायमच धास्ती वाटत असते. वास्तविक अगदी पूर्ण स्वार्थी दृष्टीने पाहिले तरीसुद्धा सत्कृत्य करणे, न्यायाने, सरळपणाने, प्रामाणिकपणाने वागणे हा शांत आणि समाधानी जीवन जगण्याचा आणि स्वत:च्या चिंता, काळज्या कमी करण्याचा उत्तम मार्ग आहे.

आणि या उपर, एखादी व्यक्ती जर नि:स्वार्थी, निरपेक्ष असेल, कोणत्याही वैयक्तिक आशाआकांक्षा वा अहंकारापासून मुक्त असेल तर ती व्यक्ती खऱ्या अर्थाने सुखी होणे शक्य आहे.

तुमच्या कर्माने तयार झालेले वातावरण तुम्ही तुमच्याबरोबर, तुमच्याभोवती आणि तुमच्यामध्ये वागवीत असता; जर तुम्ही केलेली कर्मे ही सत्कर्मे असतील, ती सुंदर, हितकर आणि सुसंवादी असतील, तर तुमचे वातावरणही तसेच सुंदर, हितकर व सुसंवादी राहील. पण या उलट तुमचे जीवन क्षुद्र आपमतलबीपणाने, अविचारी स्वार्थीभावनेने आणि घोर दुष्ट इच्छेने भरलेले असेल तर तशाच वातावरणात तुम्हाला तुमचा प्रत्येक श्वास घ्यावा लागणार म्हणजेच सारखे दुःख, सततचा असंतोष तुमच्या वाट्यास येणार; म्हणजेच अंतिमत: निराशाच पदरी पडणार..

– श्रीमाताजी
(CWM 03 : 197-198)

धम्मपद : गौतम बुद्धांचे शिष्य हे दक्ष आणि खरोखरच जागृत असतात; रात्रंदिवस ते ध्यानाचा आनंद घेत असतात.

…जो मनुष्य एकांतात अन्नग्रहण करतो, एकांतात निद्रा घेतो, स्वत:च्या आत्म-प्रभुत्वाची वाटचाल अथकपणे एकाकी रीतीने करतो, त्याला अरण्यातील एकांतवासाच्या जीवनाचा आनंद गवसतो.

श्रीमाताजी : बरेचदा असे आढळते की, जे लोक अरण्यामध्ये एकटेच राहतात त्यांची आजूबाजूच्या प्राण्यांशी, झाडांशी मैत्री होते. पण असे एकटे राहण्यानेच, आंतरिक ध्यानामध्ये प्रविष्ट होण्याची वा ‘परमसत्या’शी योगयुक्त होऊन राहण्याची शक्ती तुम्हाला प्राप्त होते असे मात्र अजिबात नाही. जेव्हा तुम्हाला करण्यासारखे इतर काहीच नसते, अशा परिस्थितीमध्ये कदाचित ते सोपे असेलही पण मला ते काही तितकेसे पटत नाही. कारण माणूस कोणत्याही परिस्थितीत असला तरी काही ना काही उद्योग शोधून काढतो. मला माझ्या जीवनाच्या अनुभवावरून असे वाटते की, सर्व अडीअडचणींच्या धुमश्चक्रीत असतानासुद्धा जी व्यक्ती स्वत:च्या वृत्तीप्रवृत्तींचे दमन करण्यात यशस्वी होते, जी बाह्य परिस्थिती ‘ईश्वरीकृपे’द्वारे आपल्याला बहाल केलेली असते ती तशीच असतानादेखील, जी व्यक्ती आपल्या अंतरंगातील चिरंतन ‘उपस्थिती’सोबत एकांतात राहण्यात यशस्वी होते, अशा वेळी त्या व्यक्तीला जो साक्षात्कार होतो तो अनंतपटीने अधिक खराखुरा, अधिक सखोल व अधिक चिरस्थायी असतो.

अडीअडचणींपासून पलायन करणे हा काही त्यांच्यावर विजय प्राप्त करण्याचा उपाय होऊ शकत नाही. तो नक्कीच आकर्षक आहे. जे लोक आध्यात्मिक जीवन जगू इच्छितात त्यांच्यामध्ये अशी एक मानसिकता असते; ती म्हणते, “झाडाखाली अगदी एकांतात बसणे, ध्यानमग्न होऊन राहणे, बोलण्याची वा कृतीची कोणतीही उर्मी नसणे, हे किती रम्य असेल.” हे असे वाटते कारण त्या दिशेने विचारांची ठाम बैठक तयार झालेली असते पण ती फारच भ्रामक असते.

जे ध्यान अनिवार्य असल्याप्रमाणे एकाएकी तुमचा ताबा घेते, ते ध्यान सर्वोत्तम असते. तुम्हाला कोणता पर्यायच नसतो. एकाग्र होणे, ध्यान लागणे आणि वरकरणी दिसणाऱ्या रूपांच्या पलीकडे जाऊन पाहणे याशिवाय दुसरा कोणता पर्यायच तुमच्यापाशी नसतो. आणि तुम्ही अरण्यात एकांतवासात असताना (ध्यानाकडून) तुमचा असा ताबा घेतला जाईल हे काही अपरिहार्य नसते. जेव्हा तुमच्यातील काहीतरी सज्ज झालेले असते, जेव्हा ती वेळ आलेली असते, जेव्हा तेथे खरी आस लागलेली असते आणि जेव्हा ‘ईश्वरी कृपा’ तुमच्या सोबत असते, तेव्हा हे घडून येते.

मला वाटते की, मानवतेने प्रगतीचा काहीएक टप्पा गाठलेला आहे आणि आता जीवनामध्ये राहूनच खराखुरा विजय प्राप्त करून घेतला पाहिजे.

कोणत्याही प्रकारच्या बाह्य परिस्थितीत असतानादेखील, त्या ‘चिरंतन’, ‘अनंत’ अस्तित्वासोबत एकांतात कसे राहायचे हे तुम्हाला समजले पाहिजे. सर्व व्यवहार करीत असतानादेखील, त्यापासून मुक्त होऊन, त्या ‘परमेश्वराला’ आपला सांगाती बनवून कसे राहायचे हे तुम्हाला समजले पाहिजे. हाच ‘खरा विजय’ होय.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 276)

(सौजन्य : @AbhipsaMarathiMasik – अभीप्सा मराठी मासिक)

(आश्रमीय जीवनाच्या सुरुवातीच्या काळात, श्रीमाताजींनी धम्मपदातील वचनांचे विवेचन केले होते, त्यातील हे एक वचन.)

धम्मपद : सत्कृत्य करण्याची त्वरा करा. सारे दुष्ट, अनिष्ट विचार मागे सारा. कारण सत्कृत्य करण्यामागे उत्साह नसेल तर, ते मन अनिष्ट गोष्टींमध्ये रममाण होऊ लागते.

श्रीमाताजी : तुम्हाला असे वाटते की, तुम्ही खूप चांगले आहात, दयाळू आहात, विरक्त आहात आणि नेहमीच सद्भावना बाळगता – असे तुम्ही स्वत:लाच आत्मसंतुष्टीने सांगत असता. पण जर तुम्ही विचार करत असताना, स्वत:कडे प्रामाणिकपणे बघितलेत तर, तुमच्या असे लक्षात येईल की, तुमच्या डोक्यामध्ये असंख्य विचारांचा कल्लोळ असतो आणि कधीकधी त्यामध्ये अत्यंत भयावह असे विचारही असतात आणि त्याची तुम्हाला अजिबात जाणीवदेखील नसते.

उदाहरणार्थ, जेव्हा तुमच्या मनासारखे घडत नाही, तेव्हाच्या तुमच्या प्रतिक्रिया पाहा : तुम्ही तुमचे मित्र, नातेवाईक, परिचित, कोणालाही सैतानाकडे पाठविण्यासाठी किती उतावीळ झालेले असता पाहा. तुम्ही त्यांच्याबद्दल किती नको नको ते विचार करता ते आठवून पाहा, आणि त्याची तुम्हाला जाणीवदेखील नसते. तेव्हा तुम्ही म्हणता, “त्यामुळे त्याला चांगलाच धडा मिळेल.” आणि जेव्हा तुम्ही टिका करता तेव्हा तुम्ही म्हणता, ”त्याला त्याच्या चुकांची जाणीव व्हायलाच हवी.” आणि जेव्हा कोणी तुमच्या कल्पनेनुसार वागत नाही तेव्हा तुम्ही म्हणता, ”त्याला त्याची फळे भोगावीच लागतील.” आणि असे बरेच काही.

तुम्हाला हे कळत नाही, कारण विचार चालू असताना, तुम्ही स्वत:कडे पाहत नाही. जेव्हा तो विचार खूप प्रबळ झालेला असतो तेव्हा तुम्हाला त्याची कधीतरी जाणीव होतेही. पण जेव्हा ती गोष्ट निघून जाते, तेव्हा तुम्ही तिची क्वचितच दखल घेता. – तो विचार येतो, तुमच्यामध्ये प्रवेश करतो आणि निघून जातो. तेव्हा तुमच्या लक्षात येते की, जर तुम्हाला खरोखर शुद्ध आणि सत्याच्या पूर्ण बाजूचे बनायचे असेल तर, त्यासाठी सावधानता, प्रामाणिकता, आत्मनिरीक्षण, आणि स्वयंनियंत्रण या गोष्टी आवश्यक असतात, की ज्या सर्वसाधारणपणे आढळत नाहीत. तुम्हाला मग तेव्हा समजायला लागते की, खरोखरीच प्रामाणिक असणे ही अत्यंत अवघड गोष्ट आहे.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 231)

पूर्णयोग आणि बौद्धमत – २३

श्रीमाताजी : धम्मपदामध्ये एका गोष्टीचा उल्लेख झालेला नाही; ती गोष्ट म्हणजे आत्मपरिपूर्णता. परम निर्लिप्तता (Supreme Disinterestedness) आणि परम मुक्ती (Supreme Liberation) ह्या नंतर आत्मपरिपूर्णतेची (Self-perfection) साधना अनुसरली पाहिजे. येथे ‘निर्वाणाची मुक्ती’ हे नियोजित साध्य आहे, असे सांगण्यात आले आहे, परंतु ते तसे नसून प्रगतीची वाटचाल करीत राहणे, प्रगतिपथावर वाटचाल करीत राहणे, हा या पार्थिव जीवनाचा गहन कायदा व प्रयोजन आहे, वैश्विक जीवनाचे ते सत्य आहे आणि तुम्ही त्याच्याशी सममेळ राखत असल्यामुळे, साहजिकपणे, जे काही फळ असेल, त्याची चिंता न करता प्रगतिपथावर वाटचाल करीत राहिले पाहिजे.

दिव्य कृपेमध्ये प्रगाढ विश्वास; दिव्य इच्छेप्रत संपूर्ण समर्पण; दिव्य योजना, जी व्यक्तीस फळाची आशा न बाळगता, जे करावयास हवे ते करण्यास प्रवृत्त करते त्या दिव्य योजनेप्रत समग्र निष्ठा असणे, म्हणजे परिपूर्ण मुक्ती होय.

ह्यामध्येच दु:खभोगाचा खराखुरा निरास आहे. जाणिवशक्ती ही अचल आनंदाने भरून जाते आणि प्रत्येक पावलागणिक त्या दिव्यत्वाच्या परमवैभवाचे अचंबित करणारे आविष्कार तुमच्यासमोर उलगडत राहतात.

मानवी प्रगतीसाठी भगवान बुद्धांनी जे काही मांडले आहे त्याबद्दल आपण कृतज्ञ आहोत आणि मी अगदी सुरुवातीला सांगितले त्याप्रमाणे, त्यांनी शिकविलेल्या अनेकानेक उत्तमोत्तम गोष्टींपैकी थोड्यातरी आचरणात आणण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. त्या प्रयत्नांचे साध्य आणि त्या प्रयत्नांचा परिणाम हे त्या परम प्रज्ञेवर सोपविले पाहिजे, की जी परमप्रज्ञा मानवी बुद्धिच्या आकलनशक्तीच्या कितीतरी अतीत अशी असते.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 297)

पूर्णयोग आणि बौद्धमत – २२

(कालचे वचन हे, दु:खभोगापासून मुक्तता ज्यामुळे घडून येईल त्या चार तत्त्वांशी आणि अष्टपदी मार्गाशी संबंधित होते. काल आपण ती चार उदात्त तत्त्वे विचारात घेतली. आता, श्रीमाताजींनी अष्टपदी मार्गाविषयी – अष्टांग मार्गाविषयी – जे विवेचन केले आहे ते पाहू.)

श्रीमाताजी : उदात्त मार्गामध्ये पुढील आठ पायऱ्यांच्या प्रशिक्षणाचा समावेश होतो.

१) सम्यक दृष्टी : गोष्टी जशा आहेत तशा पाहणे, ह्याला म्हणायचे शुद्ध व अचूक दृष्टी, सर्वोत्तम दृष्टी. वेदना, अशाश्वतता आणि सघन अशा स्व-जाणिवेचा (fixed ego) अभाव, ही अस्तित्वाची तीन वैशिष्ट्ये आहेत, असे धम्मपदात म्हटले आहे. पण ते खरेतर तसे नसून, मनोभावनांच्या समुच्चयामध्ये सघन, टिकाऊ, स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचा अभाव, वैयक्तिक चेतनेतील खऱ्या सातत्याचा अभाव असा त्याचा अर्थ आहे. आणि यामुळेच माणसाला सर्वसामान्यपणे त्याचे गतजन्म आठवत नाहीत किंवा व्यक्तीच्या सर्व जीवनांमध्ये काही प्रयोजनात्मक सातत्य असल्याचेही त्याला जाणवत नाही.

पहिला मुद्दा म्हणजे योग्य रीतीने पाहणे. योग्य रीतीने पाहणे म्हणजे, सर्वसामान्य जीवनाशी दुःखभोग, वेदना सहसंबंधित झालेल्या आहेत हे पाहणे, सर्व गोष्टी अस्थायी आहेत आणि वैयक्तिक जाणिवेमध्ये कोणतेही सातत्य नाही, हे पाहणे.

२) सम्यक प्रयोजन वा इच्छा : येथे इच्छा ह्या शब्दाचा उपयोग करायला नको होता कारण आत्ताच आपणांस सांगण्यात आले आहे की, आपल्यामध्ये इच्छावासना असता कामा नयेत. खरेतर येथे ‘योग्य अभीप्सा’ अशी शब्दरचना हवी होती. ‘इच्छा’ या शब्दाच्या जागी ‘अभीप्सा’ हा शब्द पाहिजे.

”सर्व प्रकारच्या आसक्तीपासून मुक्त असणे आणि अस्तित्वात असलेल्या सर्वांविषयी प्रेमळ विचार असणे.” सातत्याने दयाळूपणाच्या स्थितीमध्ये असणे. सर्वांविषयी नेहमीच सदिच्छा बाळगणे.

३) सम्यक वाणी – कोणालाच न दुखविणारी वाणी : कधीही निरर्थकपणे बोलू नये, आणि द्वेषपूर्ण, आकसयुक्त बोलणे कटाक्षाने टाळावे.

४) सम्यक वर्तन – शांतिपूर्ण व प्रामाणिक वर्तन : केवळ भौतिक दृष्ट्याच नव्हे तर नैतिकदृष्ट्याही, तसेच मानसिकदृष्ट्यादेखील शांतिपूर्ण व प्रामाणिक वर्तन असले पाहिजे. मानसिक सचोटी ही साध्य करून घेण्यास सर्वात अवघड असलेल्या गोष्टींपैकी एक गोष्ट आहे.

५) जगण्याची सम्यक पद्धत – कोणत्याही जीवाला इजा वा धोका न पोहोचविणे : ही गोष्ट समजून घेणे तुलनेने सोपे आहे. काही लोक असेही असतात की जे ह्या तत्त्वाचे अगदी टोकाचे पालन करतात. ते लोक जीवजंतू पोटात जाऊ नयेत म्हणून तोंडाला रूमाल बांधतात, रस्त्यामध्ये एखाद्या किड्यावर आपला पाय पडायला नको म्हणून चालायच्या आधी रस्ता झाडून घेतात. मला हे काहीसे अतिरेकी वाटते, कारण तसेही सद्यस्थितीमध्ये समग्र जीवनच विध्वंसक वृत्तीने भरलेले आहे. पण जर तुम्ही या वचनाचा अर्थ नीट समजून घेतलात तर, ज्यामुळे कोणासही इजा होईल अशा सर्व शक्यता टाळायचा प्रयत्न करावयाचा, व्यक्तीने जाणूनबुजून कोणत्याही जीवाला त्रास द्यावयाचा नाही असा त्याचा अर्थ आहे. तुम्ही येथे सर्व जीवजंतूंचा समावेश करू शकता आणि पुढे जाऊन तुम्ही ही काळजी व दयाळुता, अस्तित्वात असणाऱ्या सर्वच गोष्टींसाठी बाळगलीत तर, आंतरिक विकासाच्या दृष्टीने ते खूपच उपयुक्त ठरेल.

६) सम्यक प्रयत्न : निरुपयोगी गोष्टींसाठी व्यर्थ प्रयत्न करू नका; किंबहुना, या अज्ञानावर मात करण्यासाठी आणि स्वत:ची मिथ्यत्वापासून सुटका करून घेण्याच्या प्रयत्नांसाठी, तुमची सर्व शक्ती राखून ठेवा.

७) सम्यक जागरूकता (VIGILANCE) : आधीच्या सहाव्या तत्त्वाची पुष्टी करण्यासाठी हे सातवे तत्त्व आले आहे. तुमच्याकडे सक्रिय आणि सावध मन असले पाहिजे. अर्धवट झोपेत, अर्धवट अचेतनेमध्ये जगू नका – सहसा, तुम्ही जीवन जसे समोर येईल तसे, तुमच्या तुमच्या पद्धतीने नुसते जगत राहता. प्रत्येकजण हे असेच करत असतो. जेव्हा जेव्हा तुम्ही भानावर येता तेव्हा तुमच्या असे लक्षात येते की, तुम्ही वेळ वाया घालविला आहे. मग तुम्ही खूप धडपड करता, ती जणूकाही पुन्हा होतात तिथेच जाऊन पडण्यासाठी. लगेच पुढच्याच क्षणी तुमचा उत्साह मावळून जातो. त्यापेक्षा, कमी जोशाचे पण अधिक सातत्यपूर्ण प्रयत्न असणे, हे अधिक बरे.

८) सम्यक चिंतन : वस्तुंच्या सारतत्त्वावर, अगदी सखोल सत्यावर आणि साध्य करून घ्यावयाच्या लक्ष्यावर केंद्रित केलेला अहंविरहित विचार म्हणजे सम्यक चिंतन होय.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 248-250)

(सौजन्य : @AbhipsaMarathiMasik – अभीप्सा मराठी मासिक)

पूर्णयोग आणि बौद्धमत – २१

धम्मपद : भयभीत होऊन माणसं पर्वतराजींमध्ये, अरण्यामध्ये, वनराजींमध्ये, मठमंदिरांमध्ये, ठिकठिकाणी आश्रय घेतात.

पण हा सुरक्षित आश्रय नाही, हा सर्वोच्च आश्रय नाही. ह्या आश्रयस्थानी येऊनही माणसाचा दु:खभोगापासून बचाव होऊ शकत नाही.

जो बुद्धाचा, धम्माचा आणि संघाचा पूर्णज्ञानानिशी आश्रय घेतो, त्याला चार उदात्त तत्त्वांचा बोध होतो –

१) दुःखभोग २) दुःखभोगाचे मूळ ३) दु:खभोगाची समाप्ती आणि ४) या समाप्तीकडे घेऊन जाणारा अष्टपदी मार्ग

वास्तविक, हे खरे खात्रीचे आश्रयस्थान आहे, हे सर्वोच्च आश्रयस्थान आहे. ह्या आश्रयाची निवड करणे म्हणजे सर्व दुःखभोगापासून मुक्त होणे.

श्रीमाताजी : दु:खभोगाची समाप्ती ज्यामधून घडून येईल त्या चार तत्त्वांशी आणि अष्टपदी मार्गाशी हे वचन संबंधित आहे.

चार उदात्त तत्त्वे पुढीलप्रमाणे :

१) ज्या सामान्य अर्थाने जीवन या शब्दाचा अर्थ घेतला जातो ते जीवन अज्ञानाचे आणि मिथ्यत्वाचे जीवन आहे. ते देहाच्या व मनाच्या दुःखभोगाशी अतूटपणे जोडले गेलेले आहे.

२) वासना हे दुःखभोगाचे मूळ आहे, विभक्त जीवनाच्या स्वरूपाबद्दलचे अज्ञान हे वासनांचे मूळ आहे.

३) दुःखभोगापासून सुटका करून घेण्याचा, वेदनांचा अंत करण्याचा एक मार्ग आहे.

४) अष्टपदी मार्गाच्या आचरणाने हळूहळू मनाची अज्ञानापासून शुद्धी होत जाते आणि त्यातून ही मुक्ती प्राप्त होते. ह्या चौथ्या सत्याला अष्टपदी मार्गाची पद्धत असे संबोधले जाते.

(अष्टपदी मार्ग उद्याच्या भागात…)

– श्रीमाताजी
(CWM 03 : 248)

(सौजन्य : @AbhipsaMarathiMasik – अभीप्सा मराठी मासिक)

पूर्णयोग आणि बौद्धमत – १९

(धम्मपदातील कालच्या वचनाचे विवेचन करताना, त्याची अकरणात्मक बाजू (Negative) आधी श्रीमाताजींनी सांगितली. ती आपण काल विचारात घेतली. आता त्या सकारात्मक बाजू (Positive) सांगत आहेत. वाचकांच्या सोयीसाठी धम्मपदातील ते वचन पुन्हा देत आहोत.)

धम्मपद : नैतिक नियमांचे पालन करून, किंवा बहुविध प्रकारच्या ज्ञानाने, किंवा ध्यानधारणेच्या सरावाने किंवा विजनवासातील जीवन जगण्याने किंवा “जे या संसारी जगात जगतात त्यांना अनभिज्ञ असलेला असा मुक्तीचा आनंद मला लाभला आहे” असा विचार करणाऱ्या व्यक्तीला भिक्षु म्हटले जात नाही. भिक्षुंनो, सावध असा, जोपर्यंत तुम्ही सर्व इच्छावासनांचा निरास करीत नाही तोपर्यंत सावध असा.

श्रीमाताजी : बुद्धाने असे म्हटले आहे वा त्याने म्हटल्याचे सांगितले गेले आहे की, जेव्हा व्यक्ती सर्व वासनाविकारांपासून मुक्त होते तेव्हा ती अनिवार्यपणे अनंत अशा आनंदामध्ये प्रवेश करते. पण हा आनंद कदाचित काहीसा कोरडा, रुक्ष असू शकतो आणि मला तरी तो काही सर्वात जवळचा मार्ग वाटत नाही.

या देहाने ही समस्या सोडवायची असेल तर धैर्य आणि निश्चय बाळगून झोकून द्या; वासनांच्या मागे धावण्याचा लांबचा, दुष्कर, कष्टदायक आणि निराशाजनक मार्ग सोडून, जर व्यक्तीने स्वत:ला साधेपणाने, पूर्णपणाने, विनाअट, नफ्यातोट्याची कोणतीही समीकरणे न मांडता, त्या परमोच्च सत्याप्रत, परमोच्च संकल्पशक्तिप्रत, परमोच्च अस्तित्वाप्रत समर्पित केले; स्वत:चे संपूर्ण अस्तित्व, अस्तित्वाच्या सर्व अंगांनिशी जर ‘त्या’च्या हातात संपूर्णतया सोपविले, तर तो अहंकारापासून सुटका करून घेण्याचा सर्वात वेगवान आणि क्रांतिकारी मार्ग आहे. लोकांना वाटेल की, तो आचरणात आणणे खूप अवघड आहे, परंतु तेथे एक प्रकारची ऊब आहे, उत्कटता आहे, उत्साह आहे, प्रकाश आहे, सौंदर्य आहे, उत्कट आणि सर्जशनशील जीवन आहे.

हे खरे आहे की, वासनांशिवाय अहंकार दीर्घकाळ अस्तित्वात राहू शकत नाही. व्यक्तीच्या जाणिवा इतक्या घट्ट झालेल्या असतात की, जेव्हा अहंकार धुळीला मिळतो तेव्हा व्यक्तीच्या अस्तित्वाचाच काही भाग जणूकाही धुळीला मिळतो आणि आपण निर्वाणामध्ये प्रविष्ट होण्यास सज्ज झालो आहोत, असे त्या व्यक्तीला वाटते.

त्या सर्वोच्च अस्तित्वाच्या वैभवामध्ये अहंकाराचा विलय असा आपण येथे खऱ्या निर्वाणाचा अर्थ घेत आहोत. संपूर्ण, समग्र, परिपूर्ण, नि:शेष आणि देवघेवीविना असे जे आत्मदान, त्यालाच मी सकरणात्मक मार्ग (Positive Side) म्हणते.

स्वत:चा कोणताही विचार न करणे, स्वत:साठी न जगणे, स्वत:शी काहीही निगडित न करणे, आणि सर्वाधिक सुंदर, तेजोमय, आनंदमय, शक्तिवान, करुणामय, अनंत असे जे आहे केवळ त्याचाच विचार करणे, त्या विचारांमध्ये निमग्न राहणे ह्यामध्ये इतका अगाध आनंद आहे की, त्याची तुलना दुसऱ्या कशाबरोबरच होऊ शकत नाही.

ही एकच गोष्ट अर्थपूर्ण आहे, प्रयत्न करून पाहण्याजोगी आहे. इतर सर्व गोष्टी म्हणजे निव्वळ कालापव्यय असतो.

वळणावळणाच्या रस्त्याने, धीम्या गतीने, कष्टपूर्वक, पायरीपायरीने वर्षानुवर्षे पर्वत चढत जाणे आणि अदृश्य पंख पसरवून, थेट शिखराकडे झेपावणे यामध्ये जो फरक आहे, तो येथे आहे.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 267-269)

(सौजन्य : @AbhipsaMarathiMasik – अभीप्सा मराठी मासिक)

पूर्णयोग आणि बौद्धमत – १८

धम्मपद : नैतिक नियमांचे पालन करून, किंवा बहुविध प्रकारच्या ज्ञानाने, किंवा ध्यानधारणेच्या सरावाने किंवा विजनवासातील जीवन जगण्याने किंवा “जे या संसारी जगात जगतात त्यांना अनभिज्ञ असलेला असा मुक्तीचा आनंद मला लाभला आहे” असा विचार करणाऱ्या व्यक्तीला भिक्षु म्हटले जात नाही. भिक्षुंनो, सावध असा, जोपर्यंत तुम्ही सर्व इच्छावासनांचा निरास करीत नाही तोपर्यंत सावध असा.

श्रीमाताजी : नैतिक नियमांचे पालन करून किंवा बहुविध प्रकारच्या ज्ञानाने किंवा ध्यानधारणेच्या सरावाने, किंवा विजनवासातील जीवन जगण्याने वा विचाराने व्यक्तीला खराखुरा आनंद प्राप्त होत नाही; तर वासनामुक्तीतूनच खराखुरा आनंद प्राप्त होतो. इच्छावासनांपासून सुटका होणे ही निश्चितच सोपी गोष्ट नाही. कधीकधी तर ह्यासाठी उभे आयुष्य खर्ची पडते. पण खरे सांगायचे तर, जरी विकासाच्या एका ठरावीक टप्प्यावर, अशा प्रकारची साधना पुष्कळ उपयुक्त, किंवा अनिवार्य असली तरी देखील मला हा नकारार्थी मार्ग वाटतो. कारण अगदी सुरुवातीला तुम्ही मोठ्या प्रबळ वासनांपासून सुटका करण्याचा प्रयत्न करता, की ज्या अगदी स्पष्ट असतात आणि त्यांचा तुम्हाला प्रचंड त्रास होत असतो आणि त्याबद्दल तुमच्या मनात तीळमात्रही शंका नसते.

नंतर क्रम लागतो तो सूक्ष्म अशा वासनांचा, की ज्या कधीकधी कर्तव्याचे रूप धारण करून समोर येतात, अत्यंत निकडीच्या असल्याप्रमाणे त्या भासतात, कधीकधी तर आंतरिक आदेशाच्या रूपात समोर येतात आणि त्यांचा शोध लागण्यासाठी आणि त्यांच्यावर मात करण्यासाठी पुष्कळ प्रामाणिकपणा व वेळ देण्याची आवश्यकता असते.

सरतेशेवटी या बाह्य गोष्टींमधून, भावभावना, संवेदना यांच्या विश्वामधून, कल्पनांच्या मानसिक विश्वामधून, भौतिक जगातील पापी वासनांपासून तुमची सुटका झाल्यासारखे तुम्हाला वाटते, पण पुढे गेल्यावर, परत एकदा त्या तुम्हाला आध्यात्मिक विश्वामध्येही आढळतात. तेथे त्या अधिक भयंकर, अधिक सूक्ष्म, अधिक तीक्ष्णभेदक, अधिक अदृश्य आणि सात्विकतेच्या पडद्याआड दडलेल्या असतात की त्यांना वासना म्हणण्यासदेखील कोणी धजावणार नाही.

आणि एखादी व्यक्ती जेव्हा त्यांच्यावरदेखील मात करण्यात यशस्वी होते; त्यांचा शोध लावण्यात, त्यांना दूर करण्यात, त्यांचे निर्मूलन करण्यात यशस्वी होते, तरीदेखील वासनामुक्तीच्या कार्यातील ही केवळ अकरणात्मक बाजूच (Negative Side) पूर्ण झालेली असते.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 267-269)

पूर्णयोग आणि बौद्धमत – १७

धम्मपद : जो नेहमीच दुसऱ्यांच्या दोषांवर टिका करतो आणि त्याने संत्रस्त होऊन जातो तो स्वत:च्या दोषांपासून मुक्त होण्याऐवजी, उलट स्वत:चे अवगुण अधिकच वाढवितो.

श्रीमाताजी : जर तुम्ही सरळ मार्गाचा अवलंब करू पाहात असाल, तुम्ही विनम्र असाल, तुम्ही शुद्धतेसाठी प्रयत्नशील असाल, जर तुम्ही निरपेक्ष असाल, तुम्हाला एकांतवासाचे जीवन जगावयाचे असेल, तुम्हाला विवेकपूर्ण जीवन जगायचे असेल तर तुमचा मार्ग सुकर होईल, गोष्टी सोप्या होतील या भ्रमात तुम्ही राहता उपयोगी नाही, किंवा त्याला खतपाणीही घालता कामा नये…खरेतर ह्याच्या अगदी उलट असते. जेव्हा तुम्ही आंतरिक व बाह्य पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करू लागता, त्याचवेळी एकदम सर्व अडचणी यायला सुरुवात होते.

मी लोकांना अनेक वेळा असे बोलताना ऐकले आहे की, “आता मी चांगले वागायचा प्रयत्न करत आहे तर प्रत्येकजणच माझ्याशी वाईट वागतो आहे.” पण असे घडते कारण यातून तुम्ही शिकले पाहिजे की, काहीतरी अंतस्थ हेतू बाळगून तुम्ही चांगले वागता कामा नये, दुसरे आपल्याशी चांगले वागावेत म्हणून आपण चांगले वागले पाहिजे, असे नाही. तर केवळ चांगले असण्यासाठीच चांगले वागले पाहिजे.

नेहमी हाच एक धडा शिकण्याजोगा आहे – तुम्हाला जेवढे जास्तीत जास्त चांगले करता येईल तेवढे उत्तम करा, पण फळाची अपेक्षा बाळगू नका. फळ मिळावे या अपेक्षेने कृती करू नका. सत्कृत्यासाठी बक्षिसाची अपेक्षा बाळगणे, आयुष्य सोपे होईल म्हणून चांगले बनणे ह्या अशा प्रकारच्या वृत्तीमुळेच त्या सत्कृत्याची सर्व किंमत मातीमोल होते.

भलेपणावरील प्रेमापोटी तुम्ही भले असले पाहिजे, न्यायावरील प्रेमापोटी तुम्ही न्यायी असले पाहिजे, शुद्धतेवरील प्रेमापोटी तुम्ही शुद्ध, पवित्र असले पाहिजे, निरपेक्षतेच्या प्रेमापायी तुम्ही निरपेक्ष असले पाहिजे; असे असेल तरच मार्गावर प्रगती करण्याची खात्री बाळगता येईल.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 264-265)