शरीरातील चैत्य अस्तित्वाची उपस्थिती हे नेहमीच सुरचना आणि परिवर्तनाचे केंद्र असते. म्हणून, दोन शारीर जन्मांच्या मधल्या संक्रमणाच्या काळात प्रगती होत राहते, असे समजणे किंवा काही जण मानतात त्याप्रमाणे, त्या काळात ही प्रगती अधिक पूर्णत्वाने आणि अधिक त्वरेने होते, असे मानणे ही मोठी चूक आहे. सर्वसाधारणत: त्या काळात कोणतीही प्रगती होत नाही; कारण चैत्य पुरुषाने विश्रांत स्थितीत प्रवेश केलेला असतो आणि इतर सर्व भाग, कमीअधिक क्षणिक जीवनानंतर त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये विसर्जित होऊन गेलेले असतात.

पृथ्वीवरील जीवन हेच प्रगतीचे स्थान आहे. इथे, या पृथ्वीवरच, पृथ्वीवरील जीवनकालावधीमध्येच प्रगती शक्य आहे. तो चैत्य पुरुष स्वत:च स्वत:च्या प्रगतीचे आणि उत्क्रांतीचे नियोजन करीत, एका जन्मामागून दुसऱ्या जन्मांमध्ये ही प्रगती घडवीत राहतो.

– श्रीमाताजी
(CWM 09 : 270)

(इंग्लंड मधील एक स्त्री आश्रमवासी कशी झाली त्याची कहाणी श्रीमाताजी सांगत आहेत…)

वरकरणी पाहिले तर, ती येथे आश्रमात येण्याचे कारण अगदीच मजेशीर होते. ती चारचौघींसारखीच होती, तरुण होती; तिचे लग्न ठरले होते पण ते झाले नाही; तिच्या होणाऱ्या नवऱ्याने दिलेला शब्द पाळला नाही. तेव्हा ती खूप दुःखीकष्टी झाली. ती खूप रडायची आणि त्यामुळे तिचा सुंदर चेहरा खराब होऊन गेला, तिच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या. आणि जेव्हा ती त्या दुःखाच्या भरातून बाहेर पडली, तेव्हा तिचे सौंदर्य लोप पावले होते. त्यामुळे ती खूप त्रस्त झाली. सौंदर्यसेवा पुरविणाऱ्या व्यावसायिकांचा तिने सल्लादेखील घेतला. त्यांनी तिला चेहऱ्यावर पॅराफिनची इंजेक्शन्स घेण्याचा सल्ला दिला आणि म्हणाले, “तसे केलेस तर मग तुझ्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडणार नाहीत.” तिला इंजेक्शन्स देण्यात आली पण त्यामुळे ईप्सित परिणाम साध्य होण्याऐवजी, तिच्या संपूर्ण चेहऱ्यावर त्याच्या गुठळ्या आल्या. ती दुःखाने चूर झाली कारण आता तर ती पूर्वीपेक्षा अधिकच कुरुप दिसू लागली होती.

मग तिला कोणी एक बुवा भेटले आणि त्यांनी तिला सांगितले, ”तुझा सुंदर चेहरा परत मिळविण्यासाठी येथे इंग्लडमध्ये काही उपाय नाहीत. भारतात जा, तेथे मोठेमोठे योगी आहेत, ते तुझे हे काम करतील.” आणि म्हणून ती इथे पाँन्डिचेरीला आली. तिने आल्याआल्या मला विचारले, ”माझा चेहरा किती खराब झाला आहे पाहा ना, तुम्ही मला माझे सुंदर रूप परत मिळवून द्याल का?” मी म्हणाले, “नाही.”

नंतर ती मला योगासंबंधी प्रश्न विचारू लागली आणि तेथेच ती खऱ्या अर्थाने प्रभावित झाली. तेव्हा ती मला म्हणाली, ”या सुरकुत्यांपासून माझी सुटका व्हावी म्हणून खरंतर मी भारतात आले, पण आत्ता तुम्ही मला जे काही सांगत आहात ते मला अधिकच भावते आहे. पण मग मी इथे कशी आले? इथे येण्याचे माझे खरे कारण तर हे नव्हते.”

तेव्हा मी तिला समजावून सांगितले की, “बाह्य व्यक्तिमत्त्वापेक्षा निराळे असेही काही असते. तुझ्यामधील चैत्य पुरुष (Psychic Being) तुला येथे घेऊन आला. चैत्य पुरुषाद्वारे बाह्य प्रेरणा ह्या केवळ निमित्तमात्र म्हणून वापरल्या जातात.”

– श्रीमाताजी
(CWM 05 : 03-04)

इ. स. १९५५ च्या नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला श्रीमाताजींनी साधकांना जो संदेश दिला होता, त्याची पार्श्वभूमी खालील प्रश्नोत्तरामध्ये अभिव्यक्त झालेली आहे. कठीण काळाच्या पार्श्वभूमीवर आपण स्वतःला जाणिवपूर्वकपणे आणि निरपवादपणे ईश्वराच्या बाजूस राखले पाहिजे; त्यामुळे सरतेशेवटी विजयाची सुनिश्चिती आहे, हे त्यांनी त्यामध्ये नमूद केले होते.

आज काळ बदलला आहे, परिस्थिती बदलली आहे, संदर्भ बदललेला आहे तरीही श्रीमाताजींनी दिलेला संदेश तेवढाच सार्थ आहे, म्हणून येथे त्या संदेशाची पुन्हा एकदा आठवण…

*

प्रश्न : येणारे हे वर्ष आश्रम किंवा भारतासाठी आणि अखिल जगासाठी अवघड असेल का?

श्रीमाताजी : सामान्यतः जग, भारत, आश्रम आणि व्यक्तींसाठी सुद्धा हे वर्ष अवघड असेल. अर्थात ते ज्याच्या त्याच्या अवस्थेवर अवलंबून आहे, सर्वांसाठी ते सारखेच असेल असे मात्र नाही. काही गोष्टी या इतरांपेक्षा अधिक सोप्या भासतील. पण हो, सर्वसामान्यतः सांगायचे झाले तर हे वर्ष अवघड असेल – जर तुम्ही समजून घेऊ इच्छित असाल तर, मी तुम्हाला सांगू शकते की, सद्यकालीन साक्षात्काराच्या विरोधात विजय प्राप्त करून घेण्याची विरोधी शक्तींसाठीची ही शेवटची संधी असेल.

परंतु व्यक्तीने या काही महिन्यांच्या कालावधीत स्वतःला दृढ राखले तर, या विरोधी शक्ती फारसे काही बिघडवू शकणार नाहीत; त्यांचा विरोध ढासळून पडेल.

हा मूलतः विरोधी शक्तींचा, अदिव्य शक्तींचा संघर्ष आहे; ह्या शक्ती दिव्य साक्षात्काराला त्यांच्या परीने होता होईल तेवढे मागे रेटू पाहत आहेत.. त्या हजारो वर्षे या आशेवर आहेत. आणि आता तो संघर्ष टोकाला गेला आहे. ही त्यांची शेवटची संधी आहे; आणि या त्यांच्या बाह्य कृत्यामागे जे कोणी आहेत ते पूर्णतः जागृत जीव आहेत; त्यांना हे चांगलेच माहीत आहे की, ही त्यांची शेवटची संधी असणार आहे आणि म्हणूनच त्यांना जेवढे शक्य आहे तेवढे आटोकाट प्रयत्न ते करणार. आणि ते जे काही करू शकतात ते खूपच जास्त आहे. सामान्य किरकोळ मानवी जाणिवांसारखी त्यांची जाणीव नाही. त्यांची जाणीव अजिबातच मानवी नाही. मानवी जाणिवांच्या शक्यतेच्या तुलनेत पाहता, त्यांच्या जाणिवा ह्या, त्यांच्या शक्तीच्या, सामर्थ्याच्या आणि अगदी त्यांच्या ज्ञानाच्या बाबतीतसुद्धा दैवी आहेत असे भासते.

म्हणून हा एक भयानक संघर्ष असणार आहे आणि तो पूर्णतः पृथ्वीवर केंद्रित झालेला असणार आहे कारण, त्यांना हे माहीत आहे की, पहिला विजय मिळवायचा आहे तो या पृथ्वीवरच! एक निर्णायक विजय, असा विजय जो पृथ्वीच्या भवितव्याची दिशा ठरविणारा असेल.

जेव्हा गोष्टी भयावह बनतील तेव्हा, जे उदात्त हृदयाचे असून, आपला माथा उन्नत ठेऊ शकतील, ते कुशलमंगल राहू शकतील.

स्वतःचे उत्थान करून घेण्याची ही एक संधी असेल.

– श्रीमाताजी
(CWM 06 : 459-460)

“हे दुर्भाग्या, तुझे कल्याण होवो, कारण तुझ्या माध्यमातूनच मला माझ्या प्राणेश्वराचे मुखदर्शन झाले.” – असे श्रीअरविंदांनी एके ठिकाणी म्हटले आहे त्यावर भाष्य करताना श्रीमाताजी म्हणतात,

जर दुर्भाग्यामुळे एखाद्याला ईश्वराच्या मुखदर्शन झाले तर, त्याला दुर्भाग्य तरी कसे म्हणावे, नाही का ? अर्थातच, त्याला दुर्भाग्य म्हणताच येणार नाही, तो तर कृपाशीर्वाद ठरेल. आणि नेमकेपणाने हेच श्रीअरविंदांना येथे म्हणावयाचे आहे.

आपण ज्या अपेक्षा करतो, आपण ज्याची आशा बाळगतो, आपल्याला जे हवे असते, तसे जेव्हा घडत नाही; आपल्या इच्छाआकांक्षांपेक्षा काहीतरी विपरितच घडते तेव्हा, आपल्यातील अज्ञानामुळे आपण त्याला दुर्भाग्य म्हणतो आणि शोक करतो.

पण जर का आपण थोडेसे जरी समजदार झालो आणि त्याच घटनांचे खोलवर परिणाम काय झाले याचे अवलोकन केले तर, आपल्या असे ध्यानात येईल की, ह्याच घटना आपल्याला त्वरेने ईश्वराकडे, आपल्या प्राणेश्वराकडे घेऊन जात आहेत.

उलटपक्षी, सहज-सुखासीन परिस्थिती मात्र आपल्याला मार्गावर अळमटळम करण्यास प्रोत्साहित करते, ती परिस्थिती, या मार्गावर आपल्या समोर सौख्याची फुले पसरते आणि ती वेचून घेण्यासाठी आपण मार्गावर मध्येच थांबून राहतो. आपल्या प्रगतीमध्ये विलंब होऊ नये यासाठी, अशा गोष्टींचा निर्धारपूर्वक अस्वीकार करण्याइतपत आपण प्रामाणिकही नसतो किंवा खूपच दुर्बल असतो. यश किंवा छोट्याछोट्या सुखोपभांना सामोरे जायचे आणि तरीही मार्गावरून ढळायचे नाही, हे जमण्यासाठी व्यक्ती मूळातच दृढ असावी लागते किंवा ती मार्गावर पुष्कळ प्रगत झालेली असावी लागते.

असे जे कोणी करू शकतात, जे असे दृढनिश्चयी असतात, ते यशाच्या मागे धावत नाहीत, ते यश मिळविण्यासाठी आटापिटा करत नाही आणि जर यश प्राप्त झालेच तरी ते यश अगदी निःसंगपणे स्वीकारतात. कारण दुःख व दुर्भाग्यामुळे यांना जे तडाखे बसलेले असतात त्याचे मूल्य त्यांना माहीत असते आणि त्याची त्यांना कदरही असते.

आपल्याला यश व अपयश, आनंद व दुःख, सुदैव व दुर्दैव ह्या गोष्टी सारख्याच समाधानी स्थिरचित्तवृत्तीने स्वीकारण्यासाठी जी सक्षम बनवते, ती परिपूर्ण समता ही, आपण आपल्या ध्येयाच्या निकट पोहोचलो आहोत याची खूण, याची साक्ष असते. आणि खराखुरा योग्य दृष्टिकोनदेखील तोच असतो.

तात्पर्य असे की, ईश्वराने त्याच्या अपार करूणेतून, ज्या ज्या गोष्टींचा आपल्यावर वर्षाव केलेला असतो त्या साऱ्याच गोष्टी या आपल्यासाठी अद्भुत वरदान ठरतात.

– श्रीमाताजी
(CWM 10 : 58-59)

मानवातील दिव्यत्वाचा प्रतिनिधी म्हणजे ‘चैत्य पुरुष’ (Psychic Being) होय. असे पाहा की, ईश्वर ही काहीतरी दूर कोठेतरी, अप्राप्य असणारी अशी गोष्ट नाही. ईश्वर तुमच्या अंतरंगामध्येच आहे पण तुम्हाला मात्र त्याची पूर्ण जाणीव नाही.

खरंतर…आत्ता तो तुमच्यामध्ये ‘अस्तित्व’ असण्यापेक्षा, ‘प्रभाव’ या स्वरूपात कृती करतो. पण तो एक जितेजागते अस्तित्व असला पाहिजे. तो काय आहे? कसा आहे? ईश्वर या जगाकडे कोणत्या दृष्टीने पाहतो? इ. प्रश्न, तुम्ही प्रत्येक क्षणी स्वत:लाच विचारू शकला पाहिजेत. प्रथम ईश्वर कसा पाहतो, मग ईश्वर इच्छा कशी बाळगतो आणि अंतत: ईश्वर कशा रीतीने कार्य करतो; असा विचार करावयास हवा. आणि हे शोधण्यासाठी कोणत्यातरी निर्जन प्रदेशामध्ये जाण्याची जरुरी नाही, तो अगदी येथेच आहे.

फक्त इतकेच की, आत्ताच्या या घडीला आपल्यातील सर्व जुन्या सवयी व सर्वसामान्य अचेतना यांनी आपल्यावर एक प्रकारचे आवरण निर्माण केले आहे आणि ते आवरणच आपल्याला त्याला पाहण्यापासून व त्याच्या संवेदनेपासून रोखत आहे. तुम्ही ते आवरण दूर केलेच पाहिजे.

खरं तर, तुम्ही आता एक जाणीवयुक्त असे साधन बनले पाहिजे – ईश्वराविषयी जागरूक बनले पाहिजे. बहुधा यासाठी एक उभे आयुष्य खर्ची पडते, तर कधीकधी काही लोकांना त्यासाठी जन्मानुजन्मं लागू शकतात. इथे सद्यस्थितीत तुम्ही काही महिन्यातच ते करू शकता. ज्यांच्यापाशी अतिउत्कट अशी अभीप्सा आहे, ते अगदी थोड्या महिन्यातच हे साध्य करून घेऊ शकतील.

-श्रीमाताजी
(CWM 12 : 428)

भौतिक नियतीवादाने मार्गामध्ये अडचणी निर्माण करण्याचा जोर धरला आहे; अशावेळी त्याला अधिक धैर्याने आणि निश्चयाने तोंड देणे आवश्यक आहे.

पण कोणत्याही परिस्थितीत, काहीही झाले तरी, तुम्ही काहीही करीत असलात तरी, तुम्ही तुमच्यावर ‘भीती’चा पगडा पडू देता कामा नये. अगदी यत्किंचितही भीतीचा स्पर्श तुम्हाला होत आहे असे जाणवले तर, चटकन प्रतिकार करा आणि मदतीसाठी हाक मारा.

तुम्ही म्हणजे देह नाही हे तुम्ही शिकले पाहिजे. त्याला लहान बालकाप्रमाणे समजावले पाहिजे की, त्याने घाबरण्याची आवश्यकता नाही.

‘भीती’ हा सर्व शत्रूंपैकी सर्वात मोठा शत्रू आहे आणि आपण इथे, त्यावर एकदाच कायमची मात केली पाहिजे.

– श्रीमाताजी
(CWM 15 : 183)

प्रश्न : कोणीतरी असे म्हटले आहे की, नैसर्गिक आपत्ती व अरिष्टं, भूकंप, अतिवृष्टी व जलप्रलय यासारख्या गोष्टी म्हणजे विसंवादी व पापी मानवतेचे परिणाम आहेत आणि मानव वंशाच्या प्रगतीबरोबर व विकासाबरोबर, त्याच्या अनुषंगाने जडभौतिक प्रकृतीमध्ये देखील बदल घडून येतील. यामध्ये कितपत तथ्य आहे?

श्रीमाताजी : कदाचित त्यातील सत्य असे आहे की, आपत्ती व अरिष्टांसहित स्वार झालेली प्रकृती आणि विसंवादी मानवता यांच्यामध्ये, चेतनेची एकच आणि एकसमान गती अभिव्यक्त होत असते. या दोन गोष्टी कारणभूत निमित्त व परिणाम (cause and effect) अशा स्वरूपाच्या नाहीत, तर त्या दोन्ही एकसमान पातळीच्या आहेत.

त्या दोन्हीच्या अतीत असणारी अशी एक चेतना आविष्कृत होण्याचा प्रयत्न करू पाहत आहे, या पृथ्वीवर मूर्त रूप घेण्याचा प्रयत्न करू पाहत आहे आणि या तिच्या जडभौतिकामध्ये चाललेल्या अवतरणामध्ये, तिला सर्वत्र सारख्याच विरोधाला सामोरे जावे लागत आहे; मग तो मानव असो किंवा जडभौतिक प्रकृती असो.

आपण या पृथ्वीवर ही जी अव्यवस्था आणि विसंवाद पाहत आहोत तो सर्व या विरोधाचाच परिणाम आहे. संकटं, अरिष्ट, वितुष्ट, हिंसा, अंधकार, अज्ञान – ह्या साऱ्या अनिष्ट गोष्टींचे मूळ एकच आहे.

मनुष्य हा बाह्य प्रकृतीचे कारणभूत-निमित्त नाही किंवा बाह्य प्रकृतीदेखील मनुष्याचे कारणभूत-निमित्त नाही; तर ह्या दोन्ही गोष्टी, त्यांच्यामागे असणाऱ्या एकाच व महत्तर गोष्टीवर अवलंबून असतात; आणि दोन्हीही गोष्टी, त्या महत्तर गोष्टीला अभिव्यक्त करणाऱ्या, ह्या जडभौतिक विश्वाच्या नित्यनिरंतर व प्रगमनशील प्रक्रियेचा एक भाग असतात.
आज, त्या दिव्य चेतनेची थोडीशी जरी शुद्धता खाली उतरविण्यासाठी, पुरेशी अशी ग्रहणशीलता आणि खुलेपणा, या पृथ्वीवर जर कोठे जागृत झाला असेल तर, हे अवतरण आणि जडातील त्याचे आविष्करण यामुळे केवळ आंतरिक जीवनच नाही तर, स्थूल परिस्थिती आणि मानवातील व प्रकृतीतील भौतिक अभिव्यक्ती देखील बदलू शकते.

हे अवतरण त्याच्या संभाव्यतेसाठी अखिल मानवजातीच्या परिस्थितीवर अवलंबून नसते. सगळी मानवजात ही सुसंवाद, एकात्मता आणि अभीप्सेच्या अवस्थेत पोहोचावी आणि ती तो प्रकाश उतरविण्यासाठी, भौतिक परिस्थिती बदलण्यासाठी आणि प्रकृतीच्या गतिविधी बदलण्यासाठी पुरेशी समर्थ बनावी, ह्यासाठी जर आपल्याला थांबत बसावे लागले असते, तर मग आशेला जराही वाव नव्हता.

मात्र एखादी व्यक्ती किंवा एखादा छोटासा समूह किंवा काही व्यक्ती अवतरण घडवून आणू शकतील अशी शक्यता आहे. त्यांची संख्या किंवा विस्तार याला फारसे महत्त्व नाही. या पृथ्वीचेतनेमध्ये प्रवेश करणारा दिव्य चेतनेचा एक थेंबसुद्धा येथील सर्वकाही बदलवू शकतो. चेतनेच्या उच्चतर आणि निम्नतर प्रतलांच्या संपर्काचे आणि त्यांच्या संमीलनाचे हेच गुह्य आहे ; हे महान रहस्य हीच गुप्त किल्ली आहे. ह्यामध्ये नेहमीच रुपांतरकारी शक्ती असते; याबाबतीत मात्र ही शक्ती अधिक मोठ्या प्रमाणात आणि उच्चतर स्तरावर असेल.

आजवर येथे ज्याचे आविष्करण झालेले नाही अशा एखाद्या प्रतलाच्या जाणिवपूर्वक संपर्कात येण्यासाठी सक्षम असणारी अशी एखादी व्यक्ती जर या पृथ्वीवर असेल आणि जर ती व्यक्ती स्वतःच्या चेतनेत राहून, त्या प्रतलामध्ये चढून गेली आणि जर का तिने, ते प्रतल आणि जडभौतिक यांचे संमीलन घडवून आणले, त्यांचा सुमेळ घडवला तर, प्रकृतीने आजवर न अनुभवलेले असे रुपांतरण घडून येण्याची एक महान निर्णायक प्रक्रिया घडून येईल. एक नवीन शक्ती येथे अवतरेल आणि या पृथ्वीवरील जीवनाची परिस्थिती बदलवून टाकेल.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 37-40)

जर आपली प्रगती समग्रपणे व्हावी अशी आपली इच्छा असेल तर आपल्या चेतनायुक्त अस्तित्वामध्ये आपण एक बलवान आणि शुद्ध मानसिक समन्वय (Mental Synthesis) घडविले पाहिजे की, जे सर्व बाह्य प्रलोभनांपासून आपले संरक्षण करू शकेल, जे आपल्याला इतस्तत: भटकण्यापासून रोखणाऱ्या मैलाच्या दगडाप्रमाणे असेल, जीवनाच्या या हालत्याडुलत्या सागरामधून जे आपल्याला दीपस्तंभाप्रमाणे मार्ग दाखवेल.

प्रत्येक व्यक्तीने स्वत:च्या वृत्तीप्रवृत्तीनुसार, आवडीनिवडीनुसार आणि आकांक्षांनुसार स्वत:ची मानसिक संरचना घडविली पाहिजे. पण जर आपल्याला ती संरचना खरोखरच जिवंत आणि प्रकाशमान अशी हवी असेल तर तिची घडण आपल्या अस्तित्वाच्या केंद्रस्थानी असणाऱ्या ईश्वराचे बौद्धिक प्रतिनिधित्व करणाऱ्या संकल्पनेभोवती झाली पाहिजे. तो ईश्वरच आपले जीवन आणि तो ईश्वरच आपला प्रकाश. ही संकल्पना अनेकविध प्रांतांमध्ये, अनेकानेक युगे सर्व महान गुरुंकडून विविध प्रकारे शिकविण्यात आलेली आहे, ती अतिशय उत्कृष्टपणे शब्दबद्ध झालेली आहे.

प्रत्येकाचा आत्मा आणि या विश्वाचा महान आत्मा हे एकच आहेत; (ही ती संकल्पना होय.) आपल्या पूर्वसुरींनी योग्य असेच सांगितले आहे की, आपले मूळ आणि आपण, आपला देव आणि आपण हे एकच आहोत. आणि हे एकत्व म्हणजे एकत्वाचे केवळ कमीअधिक जवळचे, घनिष्ठ नाते आहे असे समजता कामा नये, कारण ते खरोखरच एक आहेत.

जेव्हा माणूस त्या दिव्यत्वाला गवसणी घालू पाहतो तेव्हा तो अप्राप्याच्या दिशेने कलेकलेने उन्नत होत जाण्याची धडपड करू इच्छितो, तेव्हा तो हे विसरून जातो की, त्याच्याकडे असलेला सर्व ज्ञानसाठा आणि त्याच्याकडील अगदी अंतर्ज्ञानसुद्धा त्या अनंताच्या दिशेने जाण्याच्या वाटेवरील एक पाऊलसुद्धा नव्हे. तसेच त्याला ही जाणीवसुद्धा नसते की, जे प्राप्त करण्याची इच्छा तो बाळगत आहे, जे त्याच्यापासून कित्येक योजने दूर आहे असे त्याला वाटत असते, ते त्याच्या स्वत:च्याच अंतरंगामध्ये असते.

जोपर्यंत त्याच्यामध्ये असलेल्या ह्या ‘आद्या’ विषयी तो जागृत होत नाही तोवर त्याला उत्पत्तीविषयी ज्ञान कसे बरे होईल?

स्वत:ला समजून घेतल्यानेच आणि स्वत:ला कसे जाणून घ्यायचे हे शिकल्यानेच तो परमशोध लावू शकतो आणि तो आश्चर्यचकित होऊन बायबलमध्ये लिहिल्याप्रमाणे त्या कुल-प्रमुखाप्रमाणे म्हणू शकतो, “देवाचे घर हे इथेच तर होते आणि मला ते माहीतही नव्हते.” म्हणून, ज्या शब्दांमुळे स्वर्ग आणि पृथ्वी भरून जातात असा तो, भौतिक जगताच्या निर्मिकाचा ”मी सर्व वस्तुमात्रांमध्ये आणि सर्व जीवांमध्ये आहे;” हा जो परमबोध आहे तो आपण अभिव्यक्त केला पाहिजे; ते शब्द सर्वांना माहीत करून दिले पाहिजेत.

जेव्हा सर्वांना हे सारे ज्ञात होईल तेव्हा, ज्या दिवसाचे आश्वासन आपल्याला देण्यात आले आहे तो रूपांतरणाचा दिवस आपल्या अगदी नजीक आलेला असेल.

– श्रीमाताजी
(CWM 02 : 40-41)

प्रश्न : योग करण्याची पात्रता येण्यासाठी आम्ही काय केले पाहिजे?

श्रीमाताजी : प्रथमतः आपण जागृत झालो पाहिजे. आपल्याला आपल्या अस्तित्वाच्या अगदीच अल्प अंशाची जाणीव असते. उरलेला बहुतेक सर्व भाग आपल्याला अज्ञात असतो. आपण त्याविषयी अजागृत असतो. या अजागृतीमुळेच आपण आपल्या असंस्कारित प्रकृतीला चिकटून राहतो आणि या अजागृतीमुळेच प्रकृतीमध्ये काही बदल किंवा रूपांतरण घडून आणण्यामध्ये अडसर निर्माण होतो. या अजागृतीच्या माध्यमातूनच अदिव्य शक्ती आपणामध्ये प्रवेश करतात आणि आपल्याला त्यांचे गुलाम बनवून टाकतात.

तुम्ही स्वत:विषयी जागृत झाले पाहिजे, तुमची प्रकृती व तुमच्यामध्ये निर्माण होणारी आंदोलने यांविषयी तुम्ही जागृत झाले पाहिजे. तुम्ही काही गोष्टी का करता व कशा करता, त्याविषयी तुमच्या भावना कशा प्रकारच्या आहेत व त्या तशा का आहेत, त्या गोष्टीसंबंधी तुमचे विचार काय आहेत व ते तसे का आहेत ह्याचे ज्ञान तुम्ही करून घेतले पाहिजे. जे हेतु व ज्या उर्मी, ज्या प्रकट वा अप्रकट शक्ती तुम्हाला कृतिप्रवण करतात त्या तुम्ही समजून घेतल्या पाहिजेत.

सारांश असा की, तुम्ही आपल्या अस्तित्वरूपी यंत्राचे भाग सुटे सुटे करून निरखून पारखून पाहिले पाहिजेत. अशा रीतीने तुम्ही एकदा का जागृत झालात की, तुम्हाला वस्तुस्थिती ओळखता येईल, तिचे पृथक्करण करता येईल. तुम्हाला खाली खेचणाऱ्या शक्ती कोणत्या व तुम्हाला साह्यभूत होणाऱ्या शक्ती कोणत्या, हे तुम्हाला ओळखता येईल. योग्य काय नि अयोग्य काय, सत्य काय नि असत्य काय, दिव्य काय नि अदिव्य काय हे एकदा का तुम्हाला समजू लागले की जे योग्य, सत्य, दिव्य असेल त्याला धरूनच तुम्ही अगदी काटेकोरपणे आचरण केले पाहिजे.

म्हणजेच जे योग्य व दिव्य त्याचा निश्चयपूर्वक स्वीकार करून, तद्विरोधी सर्वांचा त्याग केला पाहिजे. पदोपदी हे द्वंद्व तुमच्यापुढे उभे राहील आणि पदोपदी तुम्हाला निवड करावी लागेल. तुम्हाला धीर धरावा लागेल, चिकाटीने व सावधगिरीने प्रयत्न करावा लागेल. जणू डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावे लागेल. संतसत्पुरुष सांगतात त्याप्रमाणे, दिव्यत्वाच्या विरोधी असणाऱ्या अदिव्याला कोणतीच संधी मिळू नये यासाठी तुम्ही प्रत्येक वेळी अदिव्याला नकार दिला पाहिजे.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 01-02)

“पूर्णत्वप्राप्तीसाठी पहिली पायरी म्हणजे स्वत:विषयी जागृत होणे. आपल्या अस्तित्वाचे भिन्न भिन्न भाग व त्या प्रत्येकाची निरनिराळी कार्ये यांविषयी जागृत होणे. हे भाग एकमेकांपासून अलगपणे पाहण्यास तुम्ही शिकले पाहिजे; तेव्हाच तुम्हाला तुमच्या ठिकाणी घडणाऱ्या क्रिया व तुम्हाला कृतिप्रवण करणारे अनेक आवेग, प्रतिक्रिया आणि परस्परविरोधी इच्छा यांचा उगम कोठे आहे हे स्पष्टपणे सापडू शकेल… या क्रियांचे विशेष काळजीपूर्वक निरीक्षण करून, त्यांना उच्चतम ध्येय-न्यायासनासमोर आणून, आपण त्याने दिलेला निर्णय मानण्याची मनापासून खरी इच्छा बाळगली असेल, तरच आपल्यामधील अप्रमादशील विवेकशक्ती जागृत होण्याची आशा आपण बाळगू शकू.” श्रीमाताजींनी ‘जीवनाचे शास्त्र’ या लेखमालिकेमध्ये वरील विचार मांडले होते.

त्यावर भाष्य करताना त्या म्हणतात – आपल्यामधील ह्या आंतरिक हालचालींचा कोठे, कसा उगम होतो यासंबंधी आपल्याला स्पष्ट कल्पना आली पाहिजे. कारण आपल्या अस्तित्वामध्ये परस्परविरोधी प्रवृत्ती असतात. काही प्रवृत्ती तुम्हाला एका बाजूस खेचतात, दुसऱ्या प्रवृत्ती तुम्हाला दुसऱ्या बाजूस खेचतात आणि त्यामुळे जीवनामध्ये सगळा गोंधळ माजतो.

तुम्ही स्वत:चे नीट निरीक्षण केलेत तर असे दिसून येईल की, अस्वस्थ होण्याजोगे तुमच्याकडून काही घडले तर, लगेचच तुमच्या त्या कृतीचे समर्थन करण्यासाठी मन अनुकूल कारणे देऊ लागते. हे मन कोणत्याही गोष्टीला मुलामा देण्यासाठी तयारच असते. आणि त्यामुळेच अशा परिस्थितीमध्ये स्वत:ला जाणणे कठीण होऊन बसते. मनोमय अस्तित्वाच्या या छोट्या छोट्या खोटेपणाकडे स्पष्टपणे पाहण्यासाठी आणि स्वत:ला खऱ्या अर्थाने जाणण्यासाठी व्यक्ती पूर्ण प्रामाणिकच असावी लागते.

सबंध दिवसातील तुमच्या हालचाली, क्रियाप्रतिक्रिया तुम्ही एकामागून एक यंत्रवत अखंडपणे नुसत्या न्याहाळत बसलात, तर त्याने तुमची प्रगती होऊ शकणार नाही. या निरीक्षणातून तुम्हाला प्रगती करून घ्यावयाची असेल, तर तुमच्या अंतरंगांतील असे काहीतरी, असा एखादा उत्तम भाग तुम्ही शोधून काढला पाहिजे की, जो प्रकाशयुक्त असेल, सदिच्छायुक्त असेल आणि प्रगतीसाठी अत्यंत उत्सुक असेल; आणि त्यामुळे त्याच्या प्रकाशात तुम्ही स्वत:ला तपासू शकाल. तो प्रकाशयुक्त भाग समोर ठेवून, चित्रपटात जशी एकामागून एक चित्रे सरकतात, त्याप्रमाणे दिवसभरातील तुमच्या सर्व कृती, सर्व भावना, सर्व आवेग, उर्मी, विचार त्याच्या समोरून सरकत जाऊ देत. त्यानंतर त्यामध्ये सुसंगती लावण्याचा प्रयत्न करा; म्हणजेच असे पाहा की, अमुक एका गोष्टीनंतरच दुसरी गोष्ट का घडली?

तुमच्यासमोरील प्रकाशमय पडद्याकडे निरखून पाहा. काही गोष्टी त्याच्या समोरून जातात, सहज सरळ जातात. दुसऱ्या काही गोष्टींची थोडीशी छाया पडते आणि काही गोष्टी अशा असतात की, त्यांची अतिशय काळीकुट्ट आणि आपल्याला आवडणार नाही अशी छाया पडते. तुम्ही या बाबतीत अत्यंत प्रामाणिक, प्रांजळ असले पाहिजे. एखादा खेळ खेळत असल्याप्रमाणे अगदी प्रामाणिकपणे हे काम करा.

”अमुक परिस्थितीमध्ये मी अशी एक कृती केली, माझ्या मनात अशा अशा भावना होत्या, मी अमुक एका रीतीने त्यावेळी विचार केला. खरेतर, माझे ध्येय आहे आत्मज्ञान आणि आत्मप्रभुत्व! पण आत्ता माझी कृती या ध्येयाला धरून होती की नाही?” असा विचार करा. जर ती कृती तुमच्या ध्येयाला धरून घडली असेल, तर त्या प्रकाशमय पडद्यावर तिची काळी छाया पडणार नाही; ती कृती पारदर्शक असेल. मग त्या कृतीविषयी चिंता करण्याचे तुम्हाला कारण नाही.

ती कृती तुमच्या ध्येयाशी सुसंगत नसेल तर मात्र तिची छाया पडेल. मग तुम्ही विचार करा – “का बरे ही अशी छाया पडली? आत्मज्ञान आणि आत्मप्रभुत्व यांविषयीच्या माझ्या संकल्पाच्या विरोधी असे या कृतीमध्ये काय होते?” बहुतेक वेळा तिचा संबंध अचेतनेशी, बेसावधपणाशी असल्याचे तुम्हाला आढळून येईल. तेव्हा मग आपण केलेल्या बेसावध गोष्टींमध्ये तिची नोंद करा आणि ठरवा की, पुढच्या वेळेस अशी एखादी गोष्ट करण्यापूर्वीच मी सावध राहण्याचा प्रयत्न करीन.

इतर काही बाबतीत तुम्हाला असे आढळून येईल की, ज्याची छाया पडली ती गोष्ट म्हणजे तुमचा क्षुद्र घृणास्पद अहंकार होता, अगदी काळा; आणि तुमची कृती, तुमचे विचार विकृत करावयास तो आला होता. नंतर हा अहंकार तुम्ही तुमच्या प्रकाशकेंद्रासमोर ठेवा आणि स्वत:ला विचारा, ‘मला अशी कृती, असे विचार करावयास लावण्यास, ह्या अहंकाराला काय बरे अधिकार आहे?’

त्यासंबंधीचे कोणतेही विसंगत असे समर्थन ग्राह्य न मानता, तुम्ही शोध घेतला पाहिजे आणि मग तुम्हाला तुमच्या अस्तित्वाचा एक असा भाग एका कोपऱ्यामध्ये दिसेल की, जो विचार करत असतो, म्हणत असतो, “नाही, नाही, मला इतर काहीही चालेल पण हे मात्र नाही.”

तुम्हाला असे स्पष्ट दिसेल की, तो भाग म्हणजे क्षुद्र अभिमान, आत्मप्रीती असते. कुठेतरी दडून असलेली अहंकाराची एक छुपी भावना असते, अशा शेकडो गोष्टी असतात.

या सर्व गोष्टी तुमच्या ध्येयप्रकाशात बघा. ”ह्या अमुक एका वृत्तीची जोपासना करणे हे माझ्या आत्मशोधाशी, ध्येयप्राप्तीशी मिळतेजुळते आहे का? मी हा काळा कोपरा प्रकाशासमोर ठेवीत आहे. प्रकाश त्यामध्ये शिरून तो काळा भाग नाहीसा होईपर्यंत मी हे करणार आहे.” तुम्ही हे केल्यानंतर खरोखरी हे नाटक संपते. मात्र तुमच्या सबंध दिवसाचे नाटक एवढ्याने संपत नाही, हे तर स्पष्टच आहे. कारण त्या प्रकाशासमोरून तुम्हाला आणखी कित्येक गोष्टी न्यावयाच्या राहिलेल्या असतात.

मात्र हा खेळ, तुम्ही पुढे चालू ठेवलात आणि अत्यंत मनःपूर्वकतेने तुम्ही हा खेळ पुन्हा पुन्हा खेळत राहिलात तर मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगते की, त्यानंतर सहा महिन्यांनी तुम्ही तुम्हालाच ओळखू शकणार नाही. तुम्ही स्वत:शीच म्हणाल, ”काय? मी अशी होते? अवघडच होते माझे सारे.”

– श्रीमाताजी
(CWM 04 : 38-39)