एका विशिष्ट दृष्टीने पाहिले तर समता आणि तमस ह्या दोन्ही गोष्टी म्हणजे एकमेकींच्या उजळ व अंधाऱ्या अशा प्रतिकृती आहेत. उच्चतर प्रकृती शांतीमध्ये आराम शोधते तर, निम्नतर प्रकृती उर्जेच्या विश्रांतीमध्ये आणि तमसामध्ये, अचेतनामध्ये परतण्यामध्ये आराम मिळविण्यासाठी धडपड करते.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 477)

कशामध्ये तरी गढलेली प्रगाढ अशी स्थिरता म्हणजे शांती होय. ती अतिशय सकारात्मक असते, ती जणुकाही शांत, लाटाविरहित आनंदाच्या जवळ जाणारी असते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 137)

उच्चतर आध्यात्मिक चेतनेची शांती, शक्ती, प्रकाश, आनंद ह्या साऱ्या गोष्टी वर आहेत, परंतु त्या झाकलेल्या स्वरूपात आहेत. त्या खाली अवतरण्यासाठी एक विशिष्ट ऊर्ध्वगामी असणारा झरोका असला पाहिजे. मनाची शांती आणि अवतरित होऊ पाहणाऱ्या प्रभावाला खुली असणारी एककेंद्री क्रियाविरहितता ह्या गोष्टी म्हणजे त्या अवतरणासाठी आवश्यक असणारी उत्तम स्थिती होय.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 482)

साधनेमधील पहिली आवश्यक गोष्ट कोणती असेल तर, ती म्हणजे मनामध्ये स्थिर शांती आणि शांतता प्राप्त करून घेणे. अन्यथा तुम्हाला साधनेतील अनुभूती येऊ शकतील पण स्थायी असे काहीही नसेल. शांत मनामध्येच खरीखुरी जाणीव निर्माण करता येते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 149-150)

श्रीमाताजी : तुमच्या अस्तित्वाच्या खूप आत खोलवर, तुमच्या छातीच्या खूप खोलवर आतमध्ये, तेजोमय, शांत, प्रेमपूर्ण आणि प्रज्ञावान असे ईश्वरी अस्तित्व कायमच असते. ते तेथे असते, त्यामुळे तुम्ही त्याच्याशी एकत्व पावू शकता; मग तुम्हाला ते एका तेजोमय, प्रकाशमान अशा चेतनेमध्ये परिवर्तित करू शकेल.

तुम्ही आणि मी आपण दोघेही मिळून, तुमच्या अस्तित्वाच्या पृष्ठवर्ती स्तरावर असणारा सर्व बाह्य गोंगाट शांत करण्याचा प्रयत्न करू, म्हणजे मग शांततेमध्ये आणि शांतीमध्ये तुम्ही आंतरिक वैभवाशी एकत्व पावू शकाल.

– श्रीमाताजी (CWM 17 : 365-366)

जीवामधील ईश्वरी उपस्थितीची पहिली खूण म्हणजे शांती होय.

– श्रीमाताजी (CWM 12 : 114)

प्रश्न : माताजी, मला अधिक शांत करा.

श्रीमाताजी : जेव्हा कधी तुम्हाला अशांत, अस्वस्थ वाटेल तेव्हा त्या प्रत्येक वेळी, माझे चिंतन करा. त्याच वेळी, कोणताही बाह्य आवाज न करता, तुमच्या आतमध्ये स्वत:शी पुन्हापुन्हा उच्चारा, “शांती, शांती, हे माझ्या हृदया, शांती!” हे सुस्थिरपणे करत राहा. तसे केलेत तर जो परिणाम दिसून येईल त्याने तुम्ही संतुष्ट व्हाल.

– श्रीमाताजी (CWM 16 : 150)

दिवसातून किमान दोनदा तरी काही क्षणांसाठी मौनाची सवय करणे चांगले. परंतु केवळ न बोलणे म्हणजे मौन नव्हे, तर ते खरेखुरे मौन असले पाहिजे.

– श्रीमाताजी (CWM 03 : 196)

शांती आणि स्थिरता हे रोगावरील खात्रीशीर उपाय आहेत. जेव्हा आपण आपल्या पेशींमध्ये शांती आणू शकतो, तेव्हा आपण बरे झालेले असतो.

– श्रीमाताजी (CWM 15 : 151)

खऱ्या आध्यात्मिक चेतनेचा मुख्य आधार म्हणजे समता होय. आणि जेव्हा एखादा साधक स्वत:ला प्राणिक भावावेगाच्या लाटेबरोबर, भावनेद्वारे, वाणीद्वारे वा कृतीद्वारे वाहवत जाऊ द्यायला संमती देतो तेव्हा, तो साधक ह्या समतेपासूनच विचलित होतो.

स्थिर झालेली समता ही खूप मोठ्या प्रमाणात, कधीकधी तर अगदी अमर्यादपणे माणसाची सहनशीलता आणि क्षमाशीलता नि:संशयपणे वाढविते तरीही ती सहनशीलता, क्षमाशीलता म्हणजे समता नव्हे.

समता म्हणजे शांत, अविचल मन आणि प्राण.

समता म्हणजे, तुमच्या बाबतीत घडलेल्या किंवा तुमच्याविषयी बोलल्या गेलेल्या गोष्टींनी स्पर्शित वा विचलित न होणे. तर कोणत्याही वैयक्तिक भावभावनांमुळे विकार निर्माण न होऊ देता, त्यांच्याकडे स्वच्छ दृष्टीने पाहणे, आणि त्या गोष्टींच्या पाठीमागे काय आहे ते जाणण्याचा प्रयत्न करणे, त्या गोष्टी का घडल्या, त्यापासून आपण काय धडा घेतला पाहिजे, आपल्यामध्ये असे काय आहे की, ज्यामुळे त्या गोष्टी आपल्या विरोधात उभ्या ठाकल्या, त्यापासून कोणता आंतरिक लाभ किंवा प्रगती आपण करू शकतो हे सारे स्वच्छ दृष्टीने पाहणे.

समता म्हणजे प्राणिक आवेगांवरील आत्म-प्रभुत्व ! राग, संवेदनशीलता, गर्व किंवा ताठा, तसेच इच्छावासना आणि विश्रांती ह्या साऱ्या प्राणिक आवेगांवरील आत्म-प्रभुत्व! त्यांना आपल्या भावनिक अस्तित्वाचा ताबा घेऊन, आपली आंतरिक शांती बिघडवू न देणे ; त्यांच्या भरीस पडून, बोलण्याची किंवा कृती करण्याची घाई न करणे, नेहमी आत्म्याच्या आंतरिक शांत स्थितीत राहून कृती करणे आणि बोलणे..

कोणत्याही व्यक्तीमध्ये ही अशा प्रकारची समता पूर्णांशाने असणे ही काही सोपी गोष्ट नाही; तरीही व्यक्तीने ह्या अशा समतेला आपल्या आंतरिक स्थितीचा आणि बाह्य हालचालींचा पाया बनविण्याचा अधिकाधिक प्रयत्न करावयास हवा.

समतेचा अजूनही एक अर्थ आहे. विविध माणसं, त्यांची प्रकृती, त्यांच्या कृती, त्यांना कृतिप्रवण करणाऱ्या शक्ती ह्या साऱ्याकडे समदृष्टीने पाहणे. हे असे केल्याने, म्हणजे व्यक्तीच्या मनामधील, दृष्टीमधील, न्यायनिवाड्यातील सर्व वैयक्तिक भावना दूर सारल्याने, किंबहुना सारे मानसिक पूर्वग्रह मनातून दूर सारल्याने, व्यक्तीला त्यांच्याविषयीचे सत्य दिसण्यास मदत मिळते. वैयक्तिक भावभावनांमुळे नेहमीच विपर्यास होतो आणि माणसांच्या कृतींकडे पाहताना, कृती पाहण्याचे सोडून व्यक्ती त्यापाठीमागील गोष्टी पाहवयास लागते, अशा गोष्टी की ज्या बहुतांशी तिथे अस्तित्वातच नसतात. आणि ज्या गोष्टी टाळता येऊ शकल्या असत्या अशा गोष्टी म्हणजे गैरसमजुती, चुकीचे आडाखे अशा गोष्टींमध्ये त्यांचे पर्यवसान होते. छोटे परिणाम करणाऱ्या गोष्टीही मग विशालकाय रूप धारण करतात. मी हे पाहिले आहे की, जीवनातील निम्म्यापेक्षा अधिक संख्येने अनिष्ट घटना ह्याच कारणामुळे घडतात.

परंतु सर्वसामान्य आयुष्यात मात्र वैयक्तिक भावभावना, संवदेनशीलता ह्या बाबी मानवी प्रकृतीचा एक नेहमीचा भाग असतात आणि त्यांची स्वसंरक्षणासाठी निकड भासू शकते. असे असूनदेखील मला असे वाटते की, अगदी तेथेसुद्धा माणसं आणि गोष्टींविषयीचा एक दृढ, विशाल आणि समतापूर्ण दृष्टिकोन हा संरक्षणाचा अधिक चांगला मार्ग असू शकतो. साधकासाठी मात्र, त्यांच्यावर मात करून, आत्म्याच्या शांत सामर्थ्यामध्ये जीवन व्यतीत करणे, हे त्याच्या प्रगतीचा एक आवश्यक भाग असतो.

आंतरिक प्रगतीची पहिली अट ही आहे की, प्रकृतीमधील कोणत्याही भागातील चालू असलेली किंवा आजवर चालत आलेली कोणतीही चुकीची कल्पना, चुकीची भावना, चुकीचे बोलणे, चुकीची कृती ओळखणे आणि ‘चुकीची’ असे म्हणत असताना त्याचा अर्थ असा की, जी कृती सत्यापासून, उच्चतर चेतनेपासून, उच्चतर आत्म्यापासून, ईश्वरत्वाच्या मार्गापासून व्यक्तीची फारकत करते. आणि एकदा ती लक्षात आल्यानंतर, ती कबूल करणे, तिच्यावर पांघरूण न घालणे किंवा तिचे समर्थन न करणे, हे आवश्यक असते. मग अशी कृती, त्यामध्ये प्रकाश व ईश्वरी कृपा अवतरित व्हावी आणि सत्चेतनेच्या सुयोग्य कृतीने तिची जागा घ्यावी म्हणून ती ईश्वराला अर्पण करावी.

*

समता नसेल तर, साधनेचा भरभक्कम पायाच रचला जाऊ शकत नाही. परिस्थिती कितीही त्रासदायक असू दे, इतरांची वागणूक भलेही तुम्हाला न पटणारी असू दे, तुम्ही त्या साऱ्या गोष्टी एका सुयोग्य धीराने आणि कोणत्याही अस्वस्थ प्रतिक्रियांविना स्वीकारायला शिकला पाहिजेत. ह्या गोष्टी म्हणजे समतेची कसोटीच असते. जेव्हा सर्व गोष्टी सुरळीत चालू आहेत, माणसं आणि परिस्थिती सुखकारक आहे तेव्हा समता बाळगणे, धीर राखणे सहजसोपे आहे. परंतु जेव्हा यापेक्षा विपरित परिस्थिती असते तेव्हा धीर, शांती, समता ह्यांच्या पूर्णतेचा कस लागतो, अशा परिस्थितीमध्ये, त्या अधिक बळकट, अधिक परिपूर्ण केल्या जाऊ शकतात.

(CWSA 29 : 130-131), (CWSA 29 : 129)

– श्रीअरविंद

श्रीमाताजींनी औदार्याचे स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे केले आहे : उदारता म्हणजे सर्व वैयक्तिक लाभ-हानीच्या हिशोबांना नकार देणे. दुसऱ्यांच्या समाधानामध्ये स्वत:चे समाधान शोधणे म्हणजे औदार्य.

*

प्रश्न : इथे श्रीअरविंदांनी महालक्ष्मीविषयी असे म्हटले आहे, “ज्या ज्या गोष्टी दारिद्रयुक्त आहेत….त्या साऱ्या गोष्टी ह्या महालक्ष्मीच्या आगमनाला अटकाव करतात.”

श्रीमाताजी : हो, गरीब, औदार्यरहित, तेजहीन, वैपुल्यविहीन, आंतरिक श्रीमंतीविना असलेले जे जे काही शुष्क, थंड, संकुचित असे असते ते महालक्ष्मीच्या आगमनाला अटकाव करते. लक्षात घ्या की, हा काही पुष्कळ पैसा असण्याचा किंवा नसण्याचा प्रश्न नाही. अत्यंत सधन व्यक्तीसुद्धा महालक्ष्मीच्या दृष्टिकोनातून पाहता अतिशय दरिद्री असू शकते. आणि तेच एखादा गरीब माणूस, जर त्याचे हृदय उदार असेल तर तो अत्यंत वैभवसंपन्न असू शकतो. ज्याच्यापाशी गुण नाहीत, शक्ती नाही, सामर्थ्य नाही, औदार्य नाही असा माणूस दरिद्री होय. असा माणूस हा दुःखीकष्टी, असमाधानी असतो.

खरंतर, जेव्हा व्यक्ती उदार नसते तेव्हाच ती असमाधानी असते – जर एखाद्याची प्रकृती उदार असेल, कोणतीही मोजदाद न करता व्यक्ती दान देऊ करत असेल तर, अशी व्यक्ती कधीच दुःखी असणार नाही. जे स्वत:ला संकुचित करून घेतात आणि साऱ्या गोष्टी त्यांना त्यांच्यापाशीच आलेल्या हव्या असतात, जे केवळ स्वत:च्या माध्यमातून स्वत:साठीच साऱ्या गोष्टींकडे आणि जगाकडे पाहतात, असे लोक दुःखी असतात. पण जेव्हा व्यक्ती कोणतीही गणती न ठेवता, मोजदाद न करता, उदारतेने स्वत:ला देऊ करते, तेव्हा ती कधीच दुःखी राहणार नाही. जो घेऊ इच्छित असतो तो दुःखी असतो पण जो देऊ इच्छित असतो तो कधीच दुःखी असत नाही.

*

आपल्याकडे जे काही आहे ते इतरांना देण्यामध्ये जे भौतिक औदार्य आहे, त्याविषयी मला येथे बोलायचे नाही. परंतु अगदी हा भौतिक गुणसुद्धा मोठ्या प्रमाणात आढळत नाही; कारण जेव्हा कधी एखादा माणूस श्रीमंत होतो तेव्हा, तो ती संपत्ती देण्याऐवजी ती स्वत:जवळच राखू पाहतो.

मी नैतिक औदार्याविषयी बोलू इच्छिते. जेव्हा आपला एखादा साथीदार यशस्वी होतो, तेव्हा त्याच्या यशाने आनंदी होणे हे आहे नैतिक औदार्य. धैर्यशील अशी एखादी कृती, एखादी नि:स्वार्थी अशी कृती, एखादा उत्तम असा त्याग या साऱ्यामध्ये एक प्रकारचे सौंदर्य असते, ज्यामुळे तुम्हाला आनंद होतो. असे म्हणता येईल की, इतरांची श्रेष्ठता आणि त्यांची खरी किंमत ओळखण्याच्या क्षमतेमध्ये नैतिक औदार्य सामावलेले असते.

(CWM 10 : 282), (CWM 04 : 403-404), (CWM 04 : 30)

मी अनेकदा लोकांना असे बोलताना ऐकले आहे की, ”काय हे? मी आता चांगले वागायचा प्रयत्न करतो आहे आणि प्रत्येकजण माझ्याशी वाईटच वागतोय.” पण हे घडते ते तुम्हालाच शिकविण्यासाठी की, व्यक्तीने काहीतरी हेतू बाळगून चांगले असता कामा नये, म्हणजे इतर लोक तुमच्याशी चांगले वागावेत म्हणून तुम्ही चांगले वागायचे, असे नाही तर, व्यक्तीने चांगले असण्यासाठीच चांगले असावयास हवे.

नेहमीसाठी तोच धडा आहे : जितकं काही चांगले, जितके उत्तम करता येईल तेवढे करावे, परंतु फळाची अपेक्षा बाळगू नये, परिणाम दिसावेत म्हणून काही करू नये. अगदी ह्या दृष्टिकोनामुळेच, म्हणजे चांगल्या कृतीसाठी, सत्कार्यासाठी काहीतरी बक्षिसाची अपेक्षा बाळगायची, जीवन सुखकर बनेल असे वाटते म्हणून चांगले वागायचे, ह्या अशा गोष्टींमुळेच सत्कार्याची किंमत नाहीशी होऊन जाते. चांगुलपणाच्या प्रेमापोटी तुम्ही चांगले असला पाहिजेत, तुम्ही न्यायाच्या प्रेमापोटी न्यायी असला पाहिजेत; तुम्ही पावित्र्याच्या, शुद्धतेच्या प्रेमापोटीच पवित्र व शुद्ध असावयास हवे आणि निरपेक्षतेच्या प्रेमापोटीच निरपेक्ष असावयास हवे, तरच तुम्ही मार्गावर प्रगत होण्याची खात्री बाळगू शकता.

(CWM 03 : 264-265)

रुपांतरणाचा हा योग करणे हे सर्व गोष्टींमध्ये सर्वाधिक खडतर आहे. जर का व्यक्तीला असे वाटत असेल की, मी या पृथ्वीवर केवळ त्याचसाठी आलो आहे, मला दुसरेतिसरे काहीही करावयाचे नाही, फक्त तेच करावयाचे आहे आणि तेच माझ्या अस्तित्वाचे एकमेव कारण आहे; मग कितीही रक्ताचे पाणी करावे लागले, कितीही दुःखे सहन करावी लागली, संघर्ष करावा लागला, तरी ते तितकेसे महत्त्वाचे नाही, ”मला तेच हवे आहे, दुसरेतिसरे काहीही नको”, अशी स्थिती असेल तर मात्र गोष्ट निराळी ! अन्यथा मी म्हणेन, ”सुखी असा, चांगले वागा, तुमच्याकडून तेवढीच अपेक्षा आहे. चांगले वागा म्हणजे समजूतदार असा, तुम्ही ज्या परिस्थितीमध्ये जगत आहात, ती अपवादात्मक अशी परिस्थिती आहे, हे जाणून असा आणि सामान्य जीवनापेक्षा अधिक उच्च, अधिक उदात्त, अधिक सत्य जीवन जगायचा प्रयत्न करा. म्हणजे मग या चेतनेचा काही अंश, त्याचा प्रकाश, त्याचा चांगुलपणा या जगामध्ये अभिव्यक्त करण्यासाठी तुम्ही संमती देऊ शकाल आणि ते खूप चांगले असेल.”

(CWM 07 : 200)

तोंडात असलेल्या गोड पदार्थापेक्षा एखाद्या सत्कृत्याची गोडी ही हृदयाला अधिक गोड वाटते. सत्कृत्याविना एखादा दिवस घालविणे म्हणजे आत्म्याविना एक दिवस घालविण्यासारखे आहे.

(CWM 15 : 225)

व्यक्तीने अंत:करणामध्ये नेहमी सद्भाव व प्रेम बाळगले पाहिजे आणि तिने समचित्ततेने, समतेने सर्वांवर त्याची पखरण केली पाहिजे.

(CWM 14 : 186)

स्वच्छ दृष्टी व सर्वसमावेशकता असणारी, कोणत्याही वैयक्तिक प्रतिक्रियांपासून मुक्त असणारी, अथक अशी परोपकारिता, हा ईश्वरावर प्रेम करण्याचा व या भूतलावर त्याची सेवा करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.

(CWM 14 : 187)

कोणत्याही प्रकारे भीतीचा लवलेश नसणे म्हणजे धैर्य.

(CWM 10 : 282)

भीती ही एक अशुद्धता आहे. पृथ्वीवरील दिव्य कृती उद्ध्वस्त करू पाहणाऱ्या अ-दिव्य शक्तींपासून अगदी थेटपणे येणाऱ्या अशुद्धतांपैकी ही सर्वात मोठी अशुद्धता आहे. आणि जे खरोखर योगसाधना करू इच्छितात त्यांचे पहिले कर्तव्य हे असले पाहिजे की, त्यांनी त्यांच्या चेतनेमधून, सर्वशक्तिनिशी, संपूर्ण प्रामाणिकतेने, त्यांच्यापाशी आहे नाही तेवढे सगळे धैर्य एकवटून, भीतीचे, किंबहुना भीतीच्या छायेचे देखील निर्मूलन केले पाहिजे. या मार्गावर वाटचाल करायची तर व्यक्तीने निर्भय असले पाहिजे आणि तिने क्षुद्र, क्षुल्लक, चंचल, ओंगळ अशा भीतीमध्ये स्वत:चे अंग चोरून घेता कामा नये.

एक दुर्दम्य धैर्य, अगदी परिपूर्ण अशी प्रामाणिकता, प्रांजळ आत्मदान म्हणजे, ज्यामध्ये व्यक्ती कोणतेही आडाखे बांधत नाही, गणिते करत बसत नाही, किंवा घासाघीसही करत नाही, काहीतरी परत मिळेल या अपेक्षेने काही देऊ करत नाही. विश्वास ठेवते तेदेखील स्वत:ला संरक्षण मिळावे म्हणून नव्हे ! तसेच ही श्रद्धा अशीही नसते की, जी पुरावे मागत बसेल ! ही गोष्ट या मार्गावरील वाटचालीसाठी अत्यावश्यक आहे आणि केवळ ही गोष्टच तुमचे सर्व प्रकारच्या धोक्यांपासून खऱ्या अर्थाने संरक्षण करते.

(CWM 08 : 260-261)

समग्र धैर्य : क्षेत्र कोणतेही असू दे, धोका कोणताही असू दे, दृष्टिकोन एकच असला पाहिजे – शांत आणि खात्रीचा !

(CWM 14 : 169)

जशी मेणबत्तीची ज्योत इतर अनेक ज्योती प्रज्वलित करू शकते त्याप्रमाणे, ज्या व्यक्तीकडे धैर्य आहे तीच व्यक्ती इतरांना धीर देऊ शकते.

(CWM 14 : 170)

मला आठवते की, आपण एकदा परिपूर्णतेच्या अनेक अंगांपैकी एक अंग या दृष्टीने धैर्याचा विचार केला होता. पण येथे धैर्याचा अर्थ, ‘परमोच्च साहसाची चव चाखणे’ असा आहे. आणि या परमोच्च साहसाची चव तुमचा पूर्णपणे ताबा घेते आणि कोणतेही मोजमाप न करता, काहीही हातचे राखून न ठेवता, आणि परतीचे सारे दोर कापलेले असावेत अशा प्रकारे, तुम्हाला ईश्वरी शोधाच्या परम साहसामध्ये झेप घेण्यास प्रवृत्त करते; ईश्वराच्या भेटीच्या महान साहसासाठी, किंबहुना त्याहूनही अधिक महान अशा, ईश्वरी साक्षात्काराच्या साहसासाठी प्रवृत्त करते. मागचा पुढचा विचार न करता, किंवा ‘पुढे काय होणार आहे?’ ह्याचा क्षणभरही विचार न करता, तुम्ही स्वत:ला त्या साहसामध्ये झोकून देता. कारण पुढे काय होणार आहे, असा जर तुम्ही विचार करत बसलात तर, तुम्ही कधीच प्रारंभ करू शकणार नाही, तुम्ही तिथेच कायमस्वरूपी खिळून राहाल, त्याच जागी चिकटून राहाल, काहीतरी गमावण्याच्या, तुमचा तोल जाण्याच्या भीतीने तिथेच खिळून राहाल.

(CWM 08 : 40-41)

कदाचित प्रगती मंदही असेल, कदाचित वारंवार परागतीही होत असेल, परंतु जर का धीरयुक्त इच्छा कायम राखली तर, व्यक्ती एक ना दिवस विजयी होईल, सत्य-चेतनेच्या प्रभेपुढे तिच्या अडीअडचणी विरघळून नाहीशा झालेल्या असतील हे निश्चित.

(CWM 12 : 07)

स्वत:चे दोष जाणण्यामध्ये उदात्त धैर्य असते.

(CWM 14 : 170)

पृथ्वीवरील जीवनाचे प्रयोजनच प्रगती हे आहे. जर तुम्ही प्रगत होत राहणे थांबविलेत तर तुम्ही मरून जाल. प्रगत न होता जो कोणता क्षण तुम्ही व्यतीत करता, तो तुम्हाला स्मशानाच्या एक पाऊल जवळ घेऊन जाणारा असतो.

*

ज्या क्षणी तुम्ही समाधानी होता आणि अभीप्सा बाळगेनाशी होता, तत्क्षणी तुम्ही मरु लागता. जीवन ही एक वाटचाल आहे, जीवन हा एक प्रयास आहे आहे; जीवन म्हणजे पुढे चालत राहणे आहे, भावी प्रकटीकरण आणि साक्षात्काराप्रत उन्नत होणे आहे.

विश्रांती घेण्याची इच्छा बाळगणे याइतकी दुसरी कोणतीच भयानक गोष्ट नाही.

*

शिकायला हवे आणि प्रगती करायला हवी असे नेहमीच काहीतरी व्यक्तीकडे असते. आणि प्रत्येक परिस्थितीमध्ये ज्यामधून काही धडा घेता येईल असे आणि ज्याद्वारे प्रगती करता येईल असे प्रसंग आपण शोधू शकतो.

*

मार्गावर प्रगत होण्यासाठी म्हणून, व्यक्ती स्वत: जशी आहे आणि जे काही तिच्याकडे आहे ते सारे त्यागण्यासाठी, व्यक्तीने प्रत्येक क्षणी सिद्ध असणे म्हणजे प्रगती होय.

*

ईश्वराच्या नेहमी अधिकाधिक समीप जाणे म्हणजे खरी प्रगती.

– श्रीमाताजी
(CWM 15 : 75 & 77)

माझे प्रेम सततच तुझ्या बरोबर आहे. पण जर तुला ते जाणवत नसेल तर त्याचे कारण हेच की, तू ते स्वीकारण्यास सक्षम नाहीस. तुझी ग्रहणशीलता उणी पडत आहे, ती वाढविली पाहिजे. आणि त्यासाठी तुला स्वत:ला खुले केले पाहिजे आणि व्यक्ती स्वत:ला तेव्हाच खुली करू शकते, जेव्हा ती स्वत:चे आत्मदान करते.

तू नक्कीच कळत वा नकळतपणे, शक्ती आणि ईश्वरी प्रेम तुझ्याकडे खेचू पाहत आहेस. ही पद्धत चुकीची आहे. कोणतेही आडाखे न बांधता, कोणत्याही परतफेडीची अपेक्षा न बाळगता, स्वत:चे आत्मदान कर म्हणजे मग तू ग्रहणक्षम होऊ शकशील.

(CWM 14 : 148)

प्रश्न : ग्रहणशीलता कशावर अवलंबून असते?

श्रीमाताजी : ती मूलत: प्रामाणिकपणावर अवलंबून असते. खरोखरच व्यक्तीला ईश्वरी शक्ती ग्रहण करण्याची इच्छा आहे का ह्यावर ती अवलंबून असते. मला असे वाटते की, ह्यासाठी प्रामाणिकपणा आणि विनम्रता हे मुख्य घटक आहेत.

आत्मप्रौढीइतकी दुसरी कोणतीच गोष्ट तुम्हाला एव्हढी बंधनात अडकवत नाही. जेव्हा तुम्ही स्व-संतुष्ट असता, तेव्हा तुमच्यामध्ये अशा प्रकारची एक आढ्यता असते की, जी तुमच्यामध्ये काही कमतरता आहे हे मान्य करण्यास तयारच नसते, तुमच्याकडून काही चुका झाल्या आहेत, तुम्ही अपूर्ण आहात, तुम्ही परिपूर्ण नाही. …अशा कोणत्याही गोष्टी मान्य करण्यास ती तयार नसते. तुमच्या स्वभावामध्ये, प्रकृतीमध्ये असे काहीतरी असते की, जे अशाप्रकारे आडमुठे बनते, त्याला हे मान्यच करावयाचे नसते – आणि तीच गोष्ट तुमच्या ग्रहणशीलतेमध्ये बाधा उत्पन्न करते. वास्तविक, तुम्हीच हा प्रयत्न करून पाहा, अनुभव घ्या.

जर इच्छाशक्तीच्या प्रयत्नाद्वारे, तुमच्या अस्तित्वाच्या अगदी अंशभागाद्वारे जरी तुम्ही हे मान्य करू शकलात की, “अं, हो, मी चुकलो खरा, मी असे करायला नको होते आणि मी असे वागायला नको होते, मला असे वाटायला नको होते, हो, ती चूकच आहे.”

जर का तुम्ही ते मान्य करू शकलात, तर सुरुवाती सुरुवातीला, तुम्हाला वाईट वाटते पण जेव्हा तुम्ही त्यावर ठाम राहता, तेव्हा अगदी ताबडतोब तुमच्यातील आजवर बंदिस्त असलेला तो भाग खुला होतो. तो खुला होतो आणि अगदी विलक्षण रीतीने प्रकाशाचा ओघच जणू आत प्रवेश करतो आणि मग नंतर मात्र तुम्हाला खूप आनंदी वाटते. इतके आनंदी वाटते की, तुम्ही स्वत:लाच प्रश्न करू लागता, ‘हा ओघ थोपविण्याचा वेडेपणा मी इतका काळ का केला होता?”

– श्रीमाताजी
(CWM 06 : 117)

ग्रहणशीलता म्हणजे ईश्वरी शक्तीचा स्वीकार करण्याची आणि तिचे अस्तित्व अनुभवण्याची शक्ती होय. त्यामध्ये श्रीमाताजींची उपस्थिती अनुभवणे हेही अनुस्यूत आहे. व्यक्तीने स्वत:च्या दृष्टीला, इच्छेला आणि कृतीला मार्गदर्शन करण्याचे कार्य श्रीमाताजींना करू देणे म्हणजे ग्रहणशीलता होय.

(CWSA 29:266)

मर्त्य अर्धजागृत अस्तित्वाला कवेत घेणाऱ्या आणि मर्त्य अस्तित्वाच्या आधीपासूनच वर व मागेही अस्तित्वात असणाऱ्या अशा महान दिव्य चेतनेला, स्वत:च्या सर्व अंगांनिशी आणि सर्व स्तरांवर, कोणतीही मर्यादा येऊ न देता, स्वीकारता येणे शक्य व्हावे म्हणून, प्रकृतीने स्वत:ला व्यापकतेने खुले करणे म्हणजे उन्मुखता (opening) होय.

(CWSA 12 : 169)

– श्रीअरविंद

मानवामध्ये उपजतच आध्यात्मिक आस असते; कारण पशुंमध्ये नसणारी अपूर्णतेची आणि मर्यादांची जाणीव त्याच्यामध्ये असते आणि तो आज जे काही आहे त्याच्या पलीकडे प्राप्त करण्याजोगे काहीतरी आहे, हे ही त्याला जाणवत असते. स्वत:च्या पलीकडे जाण्याची ही उर्मी मानववंशामधून पूर्णपणे कधीही नाहीशी होत नाही.

जडामधून, विकसित अशा विचारी मनाचा उदय होण्याची आजवर झालेली वाटचाल ही आत्मभान असणाऱ्या अभीप्सेमुळे, हेतुपूर्वक, संकल्पपूर्वक किंवा जिवंत व्यक्तीच्या धडपडीतून घडून आलेली नसून, ती अर्धजागृतपणे किंवा नकळतपणे, प्रकृतीच्या यांत्रिक कार्याचा भाग म्हणून घडून आली आहे.

हे असे घडले कारण, अचेतनेपासून उत्क्रांतीला सुरुवात झाली आणि त्या अचेतनेपासून गुप्त चेतना अजूनपर्यंत पुरेशी उदयास आली नव्हती. जिवंत प्राणिमात्राची आत्म-जागृत वैयक्तिक इच्छेचा सहभाग होऊन, त्या माध्यमातून काही कार्य घडून यावे इतपत ती उदयास आली नव्हती. परंतु मानवामध्ये मात्र आवश्यक तो बदल घडून आलेला आहे – मानव जागृत झाला आहे आणि त्याला स्वत:विषयीची जाणीव निर्माण झालेली आहे. ज्यायोगे इच्छाशक्ती विकसित होईल, ज्ञान वृद्धिंगत होईल व आंतरिक अस्तित्व अधिक सखोल होईल, बाह्य अस्तित्व अधिक व्यापक होईल, प्रकृतीच्या क्षमता वाढीस लागतील अशा प्रकारच्या शक्ती मनामध्ये आविष्कृत करण्यात आल्या आहेत.

आपल्यापेक्षा अधिक उच्च अशी जाणिवेची एक अवस्था आहे हे मानवाला दिसले आहे. त्याच्या मनामध्ये, त्याच्या प्राणामध्ये उत्क्रांतीची प्रेरणा वसलेली आहे, स्वत:ला ओलांडून पलीकडे जाण्याची आस त्याच्यामध्ये वसली आहे. त्याला त्याच्या आत्म्याची जाणीव झाली आहे, त्याला स्व आणि चेतनेचा शोध लागला आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 21 : 875-76)

*

जर तुम्ही जागरूक अभीप्सेच्या स्थितीमध्ये असाल आणि अगदी प्रामाणिक असाल तर, तुमच्या सभोवताली असणाऱ्या साऱ्या गोष्टी या तुमच्या अभीप्सेला प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे साहाय्यक होतील, अशा रीतीनेच रचल्या जातील. एकतर त्या तुमची प्रगती व्हावी म्हणून, एखाद्या नवीनच गोष्टीशी तुमचा संपर्क साधून देतील किंवा जी गोष्ट नाहीशी होणे गरजेचे होते अशी तुमच्या प्रकृतीमधील एखादी गोष्ट काढून टाकतील. ही काहीतरी लक्षणीय गोष्ट आहे.

जर तुम्ही खरोखर अभीप्सेच्या उत्कट स्थितीमध्ये असाल, तर अशी कोणतीच परिस्थिती नसते की, जी तुमची अभीप्सा प्रत्यक्षात उतरविण्यासाठी मदत करत नाही. प्रत्येक गोष्ट, अगदी प्रत्येक गोष्ट जणु काही एका अतिशय परिपूर्ण व निपुण चेतनेने तुमच्याभोवती गुंफली जाते. आणि तुमच्या बहिर्वर्ती चेतनेला कदाचित ते जाणवणारही नाही आणि परिस्थिती जे रूप धारण करून तुमच्या समोर उभी ठाकते ती पाहून, तुम्ही कदाचित तिला विरोध करता, तक्रार करता, ती बदलविण्याचा प्रयत्न करता; परंतु काही काळाने, जेव्हा तुम्ही काहीसे अधिक प्रगल्भ होता आणि तुम्ही व ती घटना यांमध्ये काहीसे अंतर निर्माण होते, तेव्हा तुम्हाला कळून चुकते की, तुम्हाला आवश्यक असणारी प्रगती घडविण्यासाठी ती परिस्थिती अगदी तशीच असणे भाग होते.

तुम्ही हे जाणून घेतले पाहिजे की, एक संकल्प, परम सद्भाव हाच तुमच्या सभोवार साऱ्या गोष्टींची रचना करत आहे आणि तुम्ही अगदी कितीही तक्रार केलीत, ती स्वीकारण्याऐवजी त्याचा विरोध करत राहिलात तरीही, अगदी त्याच घडीला तो सद्भाव सर्वाधिक परिणामकारक रीतीने कार्य करत असतो.

– श्रीमाताजी
(CWM 06 : 176)