पूर्णयोगांतर्गत पारंपरिक योग – १९

ज्ञानयोग

 

ज्ञानमार्ग परमश्रेष्ठ एकमेवाद्वितीय आत्म्याचा साक्षात्कार हे आपले साध्य मानतो. साधक या मार्गात बुद्धीचा उपयोग करून ‘विचारा’च्या द्वारा ‘विवेका’ कडे, वाटचाल करतो. ज्ञानमार्ग हा आपल्या नामरूपात्मक प्रकट अस्तित्वाचे वेगवेगळे घटक बारकाईने पाहून अलग करतो. ज्ञानमार्गी साधक या प्रत्येक घटकाची स्वतःशी असलेली एकरूपता नाकारतो आणि त्यांच्या पृथगात्मकतेपाशी व व्यवच्छेदकत्वापाशी येऊन पोहोचतो. त्या सगळ्याची गणना तो प्रकृतीचे घटक, नामरूपात्मक प्रकृती, मायेची निर्मिती, नामरूपात्मक जाणीव अशा एका सर्वसाधारण संज्ञेमध्ये करतो. अशा रीतीने अविकारी, अविनाशी असलेल्या, कोणत्याही घटनेने किंवा इंद्रियगोचर घटनांच्या एकत्रीकरणानेही ज्याचे वर्णन करता येणार नाही अशा, शुद्ध एकमेवाद्वितीय आत्म्याशी हा साधक आपले एकत्व योग्य प्रकारे प्रस्थापित करू शकतो. ज्ञानमार्गी साधक येथपर्यंत आल्यावर, सामान्यत: नामरूपात्मक जगाला आपल्या जाणिवेतून भ्रम म्हणून काढून टाकतो आणि सर्वश्रेष्ठ आत्म्यांत आपला वैयक्तिक आत्मा विलीन करून टाकतो, तो परत नामरूपात्मक जगात येत नाही.

परंतु ज्ञानयोगाची ही निष्पत्ती, हा काही ज्ञानयोगाचा एकमेव किंवा अपरिहार्य परिणाम नाही. कारण ज्ञानयोगाची ही पद्धत कमी व्यक्तिगत ध्येय ठेवत, व्यापक स्तरावर अनुसरली तर, ईश्वराच्या विश्वातीत अस्तित्वाप्रमाणेच, त्याच्या विश्वात्मक अस्तित्वाचाही सक्रिय विजय होण्याप्रत घेऊन जाणारी ठरते. हा जो प्रस्थानबिंदू असतो, तो असा असतो की, जेथे व्यक्तीला केवळ स्वतःच्या सर्वोच्च आत्म्याचाच साक्षात्कार झालेला असतो असे नाही तर; सर्वात्मक अस्तित्वातील आत्म्याचा देखील साक्षात्कार झालेला असतो. तसेच अंतिमतः हे नामरूपात्मक जग त्याच्या सत्य प्रकृतीपेक्षा पूर्णतः अलग असे काहीतरी नसून, हे नामरूपात्मक जग म्हणजे दिव्य चेतनेची लीला आहे, याचाही साक्षात्कार व्यक्तीला झालेला असतो. आणि या साक्षात्काराच्या अधिष्ठानावरच अधिक विस्तार करणे शक्य असते. कितीही सांसारिक असेनात का, पण ज्ञानाच्या सर्व रूपांचे दिव्य चेतनेच्या कृतीमध्ये रूपांतर करता येणे शक्य असते आणि अशा या कृतींचा, ज्ञानाचे उद्दिष्ट असलेल्या त्या एकमेवाद्वितीयाच्या आकलनासाठी आणि त्याच्या विविध रूपांच्या आणि प्रतीकांच्या माध्यमातून त्याची जी लीला चालू असते, त्याच्या आकलनासाठी उपयोग करता येणे शक्य असते.

– श्रीअरविंद
(CWSA 23-24 : 38)

पूर्णयोगांतर्गत पारंपरिक योग – १८

आपण हे समजावून घेतले की हठयोग, प्राण आणि शरीराच्या साहाय्याने, शारीरिक जीवन आणि त्याच्या क्षमता यांच्या अलौकिक पूर्णत्वाचे लक्ष्य करतो. त्याचप्रमाणे राजयोग हा मनाच्या साहाय्याने, मानसिक जीवनाच्या क्षमतांच्या विस्ताराचे आणि त्याच्या असाधारण अशा पूर्णत्वाचे लक्ष्य बाळगतो. असे करत असताना तो आध्यात्मिक अस्तित्वाच्या प्रांतामध्ये प्रवेश करतो. पण या प्रणालीचा दोष हा आहे की, त्यामध्ये समाधीच्या असामान्य स्थितीवर अतिरिक्त भर दिला जातो. हा दोष प्रथमतः भौतिक जीवनापासून एक प्रकारच्या दूरस्थपणाकडे घेऊन जाणारा ठरतो. वास्तविक हे भौतिक जीवन म्हणजे आपला आधार आहे आणि हे असे क्षेत्र आहे की, ज्यामध्ये आपल्याला आपले मानसिक आणि आध्यात्मिक लाभ उतरवायचे असतात. विशेषतः या प्रणालीमध्ये आध्यात्मिक जीवन हे समाधी-अवस्थेशी खूपच संबद्ध केले जाते. आध्यात्मिक जीवन आणि त्याचे अनुभव हे जागृत अवस्थेमध्ये आणि अगदी कार्याच्या सामान्य वापरामध्ये देखील पूर्णतः सक्रिय आणि पूर्णतः उपयोगात आणता येतील असे करावयाचे, हे आपले उद्दिष्ट आहे. आपल्या समग्र अस्तित्वाचा ताबा घेण्याऐवजी आणि त्यामध्ये अवतरित होण्याऐवजी, आपल्या सामान्य अनुभवाच्या मागे असणाऱ्या सुप्त प्रदेशामध्ये निवृत्त होण्याकडेच राजयोगाचा कल असतो.

– श्रीअरविंद
(CWSA 23-24 : 37)

राजयोग

पूर्णयोगांतर्गत पारंपरिक योग – १७

 

आंतरात्मिक कारणांसाठी, हठयोगाप्रमाणेच राजयोगदेखील प्राणायामाचा अवलंब करतो; परंतु संपूर्णतः एक आंतरात्मिक प्रणाली म्हणून तिचा उपयोग न करता, अनेक साधन-मालिकांमधील एक साधनापद्धती म्हणून तो प्राणायामाचा अवलंब करतो आणि अगदी मर्यादित अर्थाने, तीन चार मोठ्या उपयोगांसाठी तो त्याचा वापर करतो. राजयोगाचा आरंभ आसन आणि प्राणायामापासून होत नाही, राजयोग मनाच्या नैतिक शुद्धीकरणावर प्रथम भर देतो. आणि ही गोष्ट सर्वांत महत्त्वाची आहे. कारण त्याच्याशिवाय राजयोगाचा क्रम अनुसरू पाहाणे म्हणजे त्यामध्ये अडथळे उत्त्पन्न होण्याची, त्याचा मार्ग अवरूद्ध होण्याची, अनपेक्षित मानसिक, नैतिक आणि शारीरिक संकटांचा सामना करावा लागण्याची दाट शक्यता असते. प्रस्थापित प्रणालीमध्ये या नैतिक शुद्धीकरणाची दोन गटांमध्ये विभागणी केलेली आहे. पाच यम आणि पाच नियम असे हे दोन गट आहेत. यम या सदराखाली सत्य-बोलणे, अहिंसा, चोरी न करणे इ. गोष्टींसारख्या वर्तणुकीबाबतीतील नैतिक स्व-संयमनाच्या गोष्टींचा समावेश होतो. परंतु वस्तुतः या गोष्टी म्हणजे एकंदरच नैतिक स्वनियंत्रणाची आणि शुद्धतेची जी सर्वसाधारण आवश्यकता आहे त्याच्याकडे निर्देश करणाऱ्या गोष्टी आहेत, असे समजले पाहिजे. ज्या योगे, राजसिक अहंकार आणि त्याचे आवेग, मानवामध्ये असणाऱ्या इच्छाआकांक्षा यावर विजय प्राप्त करून, त्या शांत होत होत, त्यांचे परिपूर्ण शमन होईल, अशी कोणतीही स्वयंशिस्त ही अधिक व्यापक अर्थाने, ‘यम’ या सदरात मोडण्यासारखी आहे. राजसिक मानवामध्ये एक नैतिक स्थिरता, आवेगशून्यता निर्माण व्हावी, आणि त्यातून अहंकाराचा अंत घडून यावा, हे याचे उद्दिष्ट असते. नियमित सरावाची एक मानसिक शिस्त, ज्यामध्ये ईश्वरी अस्तित्वावर ध्यान ही सर्वोच्च साधना गणली जाते, अशा साधनापद्धतींचा समावेश ‘नियमा’मध्ये केला जातो. ज्याच्या आधारावर उर्वरित सर्व योगाची पायाभरणी होऊ शकेल अशी सात्विक स्थिरता, शुद्धता आणि एकाग्रतेची तयारी करणे, हे या नियमांचे उद्दिष्ट असते.

यमनियमांच्या आधारे जेव्हा पाया भक्कम झालेला असतो तेव्हाच आसन आणि प्राणायामाची साधना येते आणि तेव्हाच त्यांना परिपूर्ण फले लागू शकतात. मनाच्या नियंत्रणाद्वारे आणि नैतिक अस्तित्वाद्वारे, केवळ आपली सामान्य जाणीव ही अगदी योग्य अशा प्राथमिक स्थितीत येऊ शकते; परंतु योगाच्या अधिक महान उद्दिष्टांसाठी आवश्यक असणारे उच्चतम अशा चैत्य पुरुषाचे आविष्करण किंवा उत्क्रांती त्याद्वारे घडून येत नाही.

– श्रीअरविंद
(CWSA 23-24 : 538-539)

पूर्णयोगांतर्गत पारंपरिक योग – १६

राजयोग

 

…प्राणायाम म्हणजे त्याच्या वास्तविक अर्थाने, प्रकृतीमध्ये आणि स्वतःमध्ये असणाऱ्या प्राणिक शक्तीवर प्रभुत्व होय. हा प्राणायाम प्रत्येक राजयोग्याला आवश्यक असतो; पण तो अधिक सोप्या पद्धतीने करता येणे शक्य असते. राजयोग्याला एकच शारीरिक प्रक्रिया करण्याजोगी वाटते, जी उपयुक्त अशी असते, ती म्हणजे ‘नाडीशुद्धी’, श्वासोच्छ्वासाच्या नियमनाने नाडीसंस्थेचे शुद्धीकरण घडविणे. आणि ही शुद्धीकरणाची प्रक्रिया व्यक्ती आडवी पडलेली असताना, बसलेली असताना, वाचत असताना, लिहीत असताना, चालत असताना देखील करू शकते. या प्रक्रियेचे अनेक मोठे लाभ आहेत. मन आणि शरीर स्थिर करण्यासाठी या प्रक्रियेचा खूप चांगला उपयोग होतो; शरीरसंस्थेमध्ये दबा धरुन बसलेल्या प्रत्येक आजाराला पळवून लावण्यासाठी तिचा उपयोग होतो; गतजन्मांमध्ये साठलेल्या योगिक शक्तीला जागृत करण्यासाठी तिचा उपयोग होतो आणि जर का अशा प्रकारची सुप्त शक्ती अस्तित्वातच नसेल तर, कुंडलिनी शक्तीच्या जागृतीमधील शारीरिक अडथळे दूर करण्यासाठी तिचा उपयोग होतो.

परंतु ही प्रक्रियासुद्धा अनिवार्य नाही. कारण राजयोग्याला हे माहीत असते की, मन शांत केल्याने, तो शरीर देखील शांत करू शकतो; आणि त्याला हे ही ज्ञात असते की, मनावर प्रभुत्व मिळविल्याने, तो शरीर व प्राण या दोन्हीवरही नियंत्रण मिळवू शकतो. शरीर हे मनाचे स्वामी नाही, ते निर्माणकर्ताही नाही किंवा मनाचे नियमनकर्ताही नाही; तर मन हे शरीराचे स्वामी आहे, ते शरीराला घडवू शकते, त्याला वळण लावू शकते; हे राजयोगाचे महान रहस्य आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 01 : 508)

पूर्णयोगांतर्गत पारंपरिक योग – १५

राजयोग

 

मनुष्याने शरीरामध्ये स्वतःचे पूर्णत्व साध्य करणे हे हठयोगाने दिलेले साधन आहे. पण जेव्हा एखादा मनुष्य देहाच्या वर उठतो तेव्हा तो त्रासदायक आणि निम्नतर प्रक्रिया म्हणून हठयोगाचा त्याग करतो आणि राजयोगामध्ये उन्नत होतो. मानव आता ज्या युगामध्ये उत्क्रांत झाला आहे त्या युगाशी मिळताजुळता असा हा योगमार्ग आहे. देह म्हणजेच मी, अशी समजूत बाळगणारी जाणिवेची अवस्था म्हणजे ‘देहात्मक बोध’. या देहात्मक बोधाच्या वर, उच्चतर जाणिवेमध्ये उन्नत होणे, ही राजयोगाच्या यशाची पहिली आवश्यक अट आहे. राजयोग्याच्या बाबतीत अशी एक वेळ येते की जेव्हा, त्याचा देह हा त्याला त्याचा वाटत नाही किंवा तो त्याच्या देहाची कोणतीही चिंता करत नाही. त्याला त्याच्या शारीरिक दुःखाने काळजी वाटत नाही किंवा शरीरसुखाने त्याला आनंदही होत नाही; ते त्या शरीरापुरतेच संबंधित असतात आणि तो राजयोगी त्यांना कोणताच थारा देत नसल्याने, या गोष्टी कालांतराने निघूनही जातात. तामसिक जडतत्त्व न उरल्यामुळे आणि आता तो राजसिक आणि आंतरात्मिक मनुष्य असल्याने, त्याची सुख व दुःखं ही हृदय आणि मनाशी संबंधित असतात. स्वतःच्या हृदयामध्ये किंवा स्वतःच्या बुद्धिमध्ये किंवा दोन्ही ठिकाणी, त्याला ईश्वराचा साक्षात्कार व्हावा म्हणून, त्याला हृदयातील आणि मनातील सुखदुःखांवर विजय प्राप्त करून घ्यावा लागतो. हृदयामध्ये ईश्वराचे दर्शन घेण्याची राजयोग्याला आस लागलेली असते.

– श्रीअरविंद
(CWSA 01 : 507)

पूर्णयोगांतर्गत पारंपरिक योग – १४

राजयोग

 

…अवधानपूर्वक, काळजीपूर्वक स्वयंशिस्त लावण्याची क्रिया, ही राजयोगातील सर्वप्रथम क्रिया होय. या आत्मशासनामध्ये, निम्न पातळीवरील नाडीपुरुषाच्या बेबंद क्रियांची जागा मनाच्या चांगल्या सवयींनी घेतली जाते. सत्याचा अभ्यास, अहंकारी धडपडीचे सर्व प्रकार टाकून देणे, दुसऱ्यांना इजा करण्याचे टाळणे, पावित्र्य, मानसिक राज्याचा खरा स्वामी जो दिव्य पुरुष त्याचे नित्य चिंतन, त्याचा नित्य ध्यास या गोष्टींनी मन व हृदय पवित्र, आनंदमय व विचक्षण बनते.

हे जे आत्तापर्यंत वर्णन केले ते राजयोगातील केवळ पहिले पाऊल होय. यानंतर साधकाने मनाचे आणि इंद्रियांचे सामान्य व्यापार अगदी शांत करावयाचे असतात; असे केले म्हणजेच साधकाचा आत्मा जाणिवेच्या उच्चतर स्तरांवर चढून जाण्यास मोकळा होतो आणि पूर्ण स्वातंत्र्य व पूर्ण आत्म-प्रभुत्व यासाठी लागणारा पाया त्याला लाभतो. सामान्य मनाला नाडीसंघाच्या व शरीराच्या प्रतिक्रियांच्या अधीन राहावे लागते आणि त्यामुळे या मनाचे अनेक दोष व उणिवा उत्पन्न होतात, ही गोष्ट राजयोग विसरत नाही. हे दोष व उणिवा घालविण्यासाठी हठयोगातील आसन व प्राणायाम यांचा उपयोग राजयोग करतो; मात्र हठयोगात आसनांचे जे अनेक गुंतागुंतीचे प्रकार असतात, ते राजयोग बाजूला ठेवतो आणि त्याच्या स्वत:च्या साध्यासाठी पुरेसा उपयोगी असा एकच सर्वांत सोपा व परिणामकारक असा आसनाचा प्रकार तो घेतो. प्राणायामाचाही असाच एक सर्वांत सोपा व परिणामकारक प्रकार तो घेतो. शरीरांतर्गत असणारी, वेटोळे घालून सुप्त असलेली ऊर्जासर्पिणी, जिला योगाच्या परिभाषेमध्ये ‘कुंडलिनी’ असे संबोधले जाते, ती सुप्त अलौकिक शक्ती असते. या शक्तीने आंतरिक गतिमान शक्ती ही पूर्णपणे भरलेली असते; या आंतरिक गतिमान शक्तीच्या जागृतीसाठी, तसेच शारीरिक व प्राणिक कार्यावरील नियंत्रणासाठी राजयोग अशा प्रकारे प्रभावी, शीघ्र परिणामकारी प्रक्रियांचा उपयोग करून, हठयोगाची गुंतागुंत आणि अवजडपणा टाळतो. कुंडलिनीची जागृती केल्यानंतर, राजयोग हा चळवळ्या, चंचल मनाला पूर्ण शांत करण्याचा आणि त्याला उच्चतर पातळीवर नेण्याचा उद्योग आरंभतो; मानसिक शक्तींच्या एकाग्रतेद्वारे तो क्रमाक्रमाने अगदी आंतरतम अशा एकाग्रतेप्रत किंवा चेतनेच्या आंतरएकीकृत अशा अवस्थेप्रत मनाला घेऊन जातो; यालाच ‘समाधी’ असे म्हणतात.

– श्रीअरविंद
(CWSA 23 : 36)

पूर्णयोगांतर्गत पारंपरिक योग – १३

हठयोग

 

हठयोगाचे परिणाम हे डोळे दिपविणारे असतात आणि लौकिक किंवा शारीरिक मनाला त्याची सहजी भुरळ पडते. आणि तरीही एवढ्या सगळ्या खटाटोपामधून सरतेशेवटी नक्की काय मिळविले, असा प्रश्न आपल्याला पडू शकतो. शारीरिक प्रकृतीचे उद्दिष्ट, केवळ शारीरिक जीवनाचे जतन, त्याचे उच्चतम पूर्णत्व, अगदी शारीरिक जीवनाचा महत्तर उपभोग घेण्याची क्षमता, या साऱ्याच गोष्टी एका विशिष्ट अर्थाने, अस्वाभाविक स्तरावर घडून येतात. हठयोगाची उणीव अशी की, या कष्टकर आणि अवघड प्रक्रियांसाठी प्रचंड वेळ खर्च करावा लागतो आणि खूप शक्तिवेच करावा लागतो. तसेच हठयोगामध्ये माणसांवर सामान्य जीवनापासून इतकी समग्र पराङ्मुखता (Severance) लादली जाते की, मग त्याच्या परिणामांचा या लौकिक जीवनासाठी उपयोग करणे, हे एकतर अव्यवहार्य ठरते किंवा मग ते उपयोजन आत्यंतिक मर्यादित ठरते. हा जो तोटा आहे त्याच्या मोबदल्यात, अन्य जगांमध्ये, अंतरंगामध्ये ज्या अन्य जीवनाची, मानसिक, गतिशील जीवनाची प्राप्ती आपल्याला होते; तीच प्राप्ती आपल्याला राजयोग, तंत्रमार्ग इ. अन्य मार्गांनी, कमी परिश्रमकारक पद्धतींनी आणि तुलनेने कमी कठोर नियमांच्या आधारे होऊ शकते. दुसरे असे की, याचे शारीरिक परिणाम म्हणून प्राप्त होणारी वाढीव प्राणशक्ती, दीर्घकाळ टिकून राहणारे तारुण्य, आरोग्य, दीर्घायुष्य या साऱ्या गोष्टींचा जर वैश्विक कृतींच्या एका सामायिक संचितामध्ये विनिमय केला नाही, त्यांचा सामान्यांच्या जीवनासाठी उपयोग केला नाही आणि जसा एखादा कंजुष मनुष्य सर्व काही स्वतःकडेच राखून ठेवतो त्याप्रमाणे, केवळ स्वतःसाठीच त्याचा वापर केला, तर मग ही प्राप्ती खूपच अल्प स्वरूपाची आहे. हठयोगामुळे मोठे परिणामही साध्य होतात पण त्याची किंमत अवाजवी असते आणि त्याने अतिशय अल्प हेतूच साध्य होतो.

– श्रीअरविंद
(CWSA 23-24 : 35)

पूर्णयोगांतर्गत पारंपरिक योग – १२

हठयोग

 

योगशास्त्रानुसार, संपूर्ण जडभौतिक देह आणि त्याची सर्व कार्य, तसेच सगळी मज्जासंस्था यांना व्यापून असणाऱ्या प्राणांच्या पाच प्रकारच्या हालचाली असतात. हठयोगी श्वसनाची बाह्य प्रक्रिया थांबवितो आणि एक प्रकारे ती किल्ली, प्राणाच्या या पाच शक्तींवर नियंत्रण निर्माण करण्याचा मार्ग खुला करते. हठयोगी या प्राणाच्या आंतरिक क्रिया संवेदनपूर्वक जाणू लागतो. तसेच तो स्वतःच्या संपूर्ण शारीरिक जीवनाविषयी आणि कृतींविषयी मानसिकदृष्ट्या देखील जागरूक होतो. तो आपला प्राण आपल्या शरीराच्या सर्व नाड्यांमधून किंवा नाडी-प्रवाहांमधून फिरवू शकतो. नाडीसंस्थेची जी सहा चक्रे अथवा स्नायुग्रंथिमय केंद्रे आहेत, त्यांच्या कार्याविषयी तो जागृत होतो आणि त्यांचे सद्यस्थितीत जे मर्यादित, सवयीनुसार, यांत्रिक कार्य चाललेले असते; त्या प्रत्येकाचे कार्य या मर्यादांच्या पलीकडे जावे म्हणून, ती केंद्रे तो खुली करू शकतो. थोडक्यात सांगावयाचे तर, हठयोगी शरीरातील प्राणावर पूर्ण हुकमत चालवू शकतो; सूक्ष्मतम नाडीगत प्राणावर तसेच स्थूलतम शारीर अवयवातील प्राणावर तो सारखीच हुकमत चालवू शकतो…

– श्रीअरविंद
(CWSA 23-24 : 535)

हठयोग

पूर्णयोगांतर्गत पारंपरिक योग – ११

प्राकाम्य – इंद्रिय आणि मनावर पूर्णतया पटुता म्हणजे प्राकाम्य. प्राकाम्यामध्ये टेलिपथी, अतिंद्रिय दृष्टी या व यासारख्या असामान्य समजल्या जाणाऱ्या गोष्टींचा समावेश होतो.

व्याप्ती – इतर व्यक्तींचे विचार, त्यांची शक्ती, त्यांच्या भावना ग्रहण करण्याची शक्ती आणि स्वतःचे विचार, भावना, शक्ती आणि व्यक्तिमत्त्व यांचे इतरांवर प्रक्षेपण करण्याची शक्ती म्हणजे व्याप्ती.

ऐश्वर्य – घटनांवर नियंत्रण, ईशत्व, समृद्धी आणि इच्छित अशा सर्व वस्तुमात्रांवर नियंत्रण म्हणजे ऐश्वर्य.

वशिता – मौखिक किंवा लिखित शब्दांच्या त्वरित आज्ञापालनाची शक्ती म्हणजे वशिता.

इशिता – जड किंवा बुद्धिविहीन असणाऱ्या सर्व वस्तुमात्रांवर आणि प्रकृतीच्या सर्व शक्तींवर परिपूर्ण नियंत्रण म्हणजे इशिता.

यापैकी काही शक्तींचा संमोहनाची किंवा इच्छाशक्तीची लक्षणे या सदराखाली युरोपमध्ये नुकताच शोध लागला आहे; परंतु प्राचीन काळातील हठयोग्यांच्या किंवा अगदी आत्ताच्याही काही आधुनिक हठयोग्यांच्या सिद्धीच्या तुलनेत, युरोपियन अनुभव अगदीच तोकडे आणि अशास्त्रीय आहेत. प्राणायामातून विकसित झालेल्या इच्छाशक्तीची गणना आध्यात्मिक नव्हे तर, आंतरात्मिक शक्तीमध्ये केली पाहिजे.

– श्रीअरविंद
(CWSA 01 : 505-506)

(सौजन्य : @AbhipsaMarathiMasik – अभीप्सा मराठी मासिक)

पूर्णयोगांतर्गत पारंपरिक योग – १०

हठयोग

ज्या गतिशील ऊर्जेमुळे हे ब्रह्मांड चालत राहाते त्या प्राणिक शक्तीवर प्रभुत्व म्हणजे ‘प्राणायाम’. प्राणाचे किंवा प्राणिक शक्तीचे, मानवी शरीरातील सर्वाधिक लक्षात येणारे कार्य म्हणजे श्वासोच्छ्वास, जो सामान्य माणसांना जीवनासाठी आणि हालचालींसाठी आवश्यक असतो. हठयोगी त्यावर विजय मिळवितो आणि स्वतःला त्यापासून वेगळे राखतो. परंतु या एवढ्या एकाच प्राणिक क्रियेवर त्याचे लक्ष केंद्रित झालेले नसते.

हठयोगी पाच मुख्य प्राणिक शक्तींमधील आणि इतर लहानमोठ्या पुष्कळ प्राणिक शक्तींमधील भेद जाणू शकतो. त्या प्रत्येक प्राणिक शक्तींना त्याने स्वतंत्र नामाभिधान दिलेले आहे आणि हे जे प्राणिक प्रवाह कार्यरत असतात, त्या सर्व असंख्य प्राणिक प्रवाहांवर नियंत्रण ठेवायला तो योगी शिकतो. जशी आसनं असंख्य आहेत, तशीच प्राणायामाच्या विविध प्रकारांची संख्याही पुष्कळ मोठी आहे. आणि जोपर्यंत मनुष्य त्या साऱ्या प्रकारांवर प्रभुत्व मिळवीत नाही, तोपर्यंत तो मनुष्य परिपूर्ण हठयोगी आहे, असे मानले जात नाही. आसनांमधून प्राप्त झालेली प्राणिक ऊर्जा, जोश, सुदृढ आरोग्य या गोष्टींवर प्राणजयामुळे शिक्कामोर्तब होते; प्राणजयामुळे व्यक्तीला, तिला हवे तितक्या काळ जीवन जगण्याची शक्ती प्रदान करण्यात येते. आणि प्राणजयामुळे चार शारीरिक सिद्धींमध्ये, पाच आंतरात्मिक सिद्धींचीही भर पडते…

– श्रीअरविंद
(CWSA 01 : 505)