(इसवी सन : १९१०)
मला राजकारणात काही करता येण्यासारखे नव्हते म्हणून मी राजकारण सोडले असे म्हणता येण्यासारखे नाही, अशी ही कल्पना देखील माझ्यापासून कोसो दूर आहे. मी त्यापासून दूर आलो कारण कोणत्याही गोष्टीचा माझ्या योगसाधनेमध्ये मला हस्तक्षेप नको होता आणि याबाबतीत मला अगदी निश्चित असा ‘आदेश’ प्राप्त झाला होता.

मी राजकारणाशी असलेले संबंध पूर्णत: तोडून टाकले कारण तसे करण्यापूर्वी मला ह्याची आतूनच जाणीव झाली होती की, मी जे कार्य तिथे हाती घेतले होते ते पुढे चालविले जाणारच, मी ज्या दिशेने त्या कार्याचा विचार केला होता, त्याच दिशेने इतरांकडून केले जाणार आहे, आणि मी ज्या कार्याला सुरुवात केली होती त्या चळवळीचा माझ्या प्रत्यक्ष वैयक्तिक कृतीविना किंवा माझ्या उपस्थितीविनाही अंतिम विजय होणारच, हे मला ज्ञात होते. माझ्या राजकारण निवृत्तीमागे निरर्थकतेची कोणतीही भावना किंवा नैराश्याची यत्किंचितही प्रेरणा नव्हती.

इतर गोष्टींबाबत बोलायचे झाले तर, जागतिक घडामोडींबाबतच्या कोणत्या महत्त्वाच्या घटनेमध्ये माझा संकल्प शेवटी अपयशी झाला असे मला तरी माहीत नाही आणि हो, हे शक्य आहे की, जागतिक शक्तींना तो संकल्प पूर्ण करण्यासाठी खूप वेळ लागला असेल.

– श्रीअरविंद
(CWSA 35 : 26)