‘प्रामाणिकपणा’चा अर्थ

‘प्रामाणिकपणा’मध्ये नुसत्या सचोटीपेक्षा (honesty) बराच अधिक अर्थ सामावलेला आहे. म्हणजे असे की, तुम्ही जे बोलता तेच तुम्हाला अभिप्रेत असते, तुम्ही जे प्रतिपादित करता त्याची तुम्हाला जाणीव असते, तसेच तुमच्या इच्छेमध्ये खरेपणा असतो. साधक जेव्हा ‘ईश्वरा’चे साधन बनण्याची आणि ‘ईश्वरा’शी एकरूप होण्याची अभीप्सा बाळगत असतो, तेव्हा त्याच्यातील ‘प्रामाणिकपणा’चा अर्थ असा असतो की, तो खरोखरच कळकळीने ‘अभीप्सा’ बाळगत असतो व ‘ईश्वरा’व्यतिरिक्तच्या इतर सर्व इच्छांना किंवा आवेगांना तो नकार देत असतो.

– श्रीअरविंद [CWSA 29 : 50]

प्रामाणिकपणा – ४७

प्रामाणिक असण्यामध्ये एक अद्भुत आनंद असतो. प्रामाणिकपणाच्या प्रत्येक कृतीमध्येच प्रामाणिकपणाचे स्वतःचे असे बक्षिस अनुस्यूत असते. शुद्धीकरणाची भावना, ऊर्ध्वमुख होत झेपावत जाणे, व्यक्तीने मिथ्यत्वाचा अगदी एखादा छोटासा कण दूर केला तरी त्यामुळे मिळालेली मुक्ती, या गोष्टी हे प्रामाणिकपणाचे बक्षिस असते. प्रामाणिकपणा हे सुरक्षाकवच असते, तेच संरक्षण असते, प्रामाणिकपणा हाच मार्गदर्शक असतो आणि अंतिमतः प्रामाणिकता ही एक रूपांतरकारी शक्ती असते.
– श्रीमाताजी [CWM 08 : 400]

प्रामाणिकपणा – ४६

एखाद्या व्यक्तीने भूतकाळात कितीही ठोकरा खाल्लेल्या असल्या किंवा कितीही चुका केलेल्या असल्या तरीसुद्धा, जर ती व्यक्ती ‘ईश्वरा’च्या निवासाचे दरवाजे अगदी प्रामाणिकपणे ठोठावेल तर, तिच्यासाठी ते दरवाजे कधीच बंद नसतात. मानवी गुण आणि मानवी दोष म्हणजे अंतर्यामी असणाऱ्या ‘ईश्वरी’ तत्त्वावरील तेजस्वी व काळोखी आवरणे असतात. हे ईश्वरी तत्त्व जेव्हाकधी त्या आवरणाचा भेद करते तेव्हा, आत्म्याच्या उत्तुंगतेकडे जाताना ते तत्त्व, त्या दोन्ही आवरणांचे दहन करू शकते.

श्रीअरविंद [CWSA 29 : 42]

प्रामाणिकपणा – ४५

तुम्हाला घरी राहून आणि कार्यमग्न असतानादेखील साधना करणे शक्य आहे. त्यासाठी सुरुवातीला ही गोष्ट आवश्यक असते की, जितके जमेल तितके श्रीमाताजींचे स्मरण ठेवावे, शक्य असेल तेवढा, त्या ‘दिव्य माता’ आहेत असा विचार करून, दररोज एका ठरावीक वेळी हृदयामध्ये श्रीमाताजींवर लक्ष एकाग्र करा, त्या तुमच्यामध्येच आहेत अशी जाणीव तुम्हाला व्हावी म्हणून अभीप्सा बाळगा. तुमचे सारे कर्म त्यांना अर्पण करा आणि त्यांनी तुम्हाला अंतरंगातून मार्गदर्शन करावे आणि तुमचा सांभाळ करावा, अशी त्यांच्याकडे प्रार्थना करा. ही प्राथमिक पायरी आहे पण बहुतेक वेळा या पायरीवरच बराच वेळ द्यावा लागतो. परंतु जर का एखादी व्यक्ती यातून प्रामाणिकपणे आणि चिकाटीने पार झाली तर, हळू हळू मानसिकता बदलू लागते आणि साधकामध्ये अशी एक नवीन चेतना उमलू लागते की, जिच्याद्वारे साधकाला अंतरंगामधून ‘श्रीमाताजीं’च्या उपस्थितीची अधिकाधिक जाणीव होऊ लागते; प्रकृतीमधील, जीवनातील त्यांच्या कार्याची जाणीव होऊ लागते किंवा मग अशा व्यक्तीला, साक्षात्काराच्या दिशेने द्वारे खुली करणाऱ्या इतर कोणत्यातरी आध्यात्मिक अनुभूतीची जाणीव होऊ लागते.

– श्रीमाताजी
[CWSA 32 : 186]

प्रामाणिकपणा – ४४

तुम्ही तुमचे कर्म ‘ईश्वरा’च्या चरणांशी पूर्ण प्रामाणिकपणे अर्पण केलेत तर, तुमचे कर्म हे ध्यानाइतकेच महत्त्वाचे ठरेल.
*
तुम्ही प्रामाणिक राहा, मग आवश्यकताच पडली तर तुमच्या चुका हजार वेळासुद्धा सुधारण्याची माझी तयारी आहे.
*
जेव्हा जेव्हा एखाद्या ठिकाणी प्रामाणिकपणा असतो तेव्हा तुमच्या लक्षात येईल की तेथे तुम्हाला साहाय्य मार्गदर्शन लाभतेच. तुम्हाला प्रतिसाद देण्यासाठी ‘ईश्वरी’ कृपा तेथे असतेच आणि मग पुढे फार काळ तुमच्याकडून चुका घडत नाहीत.

– श्रीमाताजी
[CWM 16 : 178], [CWM 14 : 68], [CWM 03 : 192]

प्रामाणिकपणा – ४३

‘ईश्वरी कृपे’बाबत शंकाच असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक असेल तर तो ‘ईश्वरा’पर्यंत पोहोचेलच हे अगदी खरे आहे. परंतु याचा अर्थ असा नव्हे की तो अगदी लगेचच, अगदी सहजपणे, विनाविलंब ‘ईश्वरा’पर्यंत पोहोचेल. तुमची अडचण इथेच आहे, तुम्ही ‘ईश्वरा’साठी पाच वर्षे, सहा वर्षे अशी काहीतरी एक मुदत निश्चित करता, आणि तुम्हाला कोणताच परिणाम दिसून आला नाही तर मग शंका घेता. एखादा मनुष्य मूलतः प्रामाणिक असू शकतो परंतु साक्षात्काराचा आरंभ होण्यापूर्वी त्याच्यामधील अनेक गोष्टी बदलणेच आवश्यक असतात, असे असू शकते. त्याच्या प्रामाणिकपणाने त्याला नेहमीच चिकाटी बाळगण्यासाठी सक्षम बनविले पाहिजे – कारण ही ‘ईश्वरा’बद्दलची जी आस असते तिला कोणतीच गोष्ट विझवू शकत नाही, विलंब, निराशा, कोणती एखादी अडचण किंवा अन्य कोणत्याही गोष्टी ती आस विझवू शकत नाहीत.

– श्रीअरविंद [CWSA 29 : 116–117]

प्रामाणिकपणा – ४२

तुमची इच्छा नसतानासुद्धा जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा, तुम्ही केली पाहिजे अशी पहिली गोष्ट म्हणजे, तो आवेग पुन्हा येऊ नये ही इच्छा बाळगली पाहिजे. पण या उलट, ती गोष्ट नाहीशी होऊच नये असे तुम्हाला प्रामाणिकपणे वाटत असेल, तर ती गोष्ट तशीच ठेवा, मात्र मग योगसाधना करण्याचा प्रयत्न करू नका. सर्व अडीअडचणींवर मात करण्याचा संकल्प तुम्ही आधी केला नसेल तर, मग योगमार्गाचा अवलंबच करू नका. योगमार्गाचा स्वीकार करण्याचा तुमचा निर्णय हा प्रामाणिक आणि परिपूर्णच असला पाहिजे.

– श्रीमाताजी [CWM 04 : 77]

प्रामाणिकपणा – ४१

कोणत्या गुणामुळे व्यक्ती (योगासाठी) सुपात्र ठरते किंवा कोणत्या गुणाच्या अभावामुळे ती अपात्र ठरते हे तसे सांगणे कठीण आहे. एखाद्या व्यक्तीमध्ये तीव्र कामवासना असेल, शंकाकुशंका असतील, बंडखोर वृत्ती असेल, आणि असे असूनदेखील तिला अंतिमतः यश मिळू शकेल, तर दुसरी एखादी व्यक्ती अपयशी ठरू शकेल. मात्र, एखाद्या व्यक्तीकडे मूलभूत प्रामाणिकपणा असेल, सर्व गोष्टींवर मात करून पुढे जाण्याची इच्छाशक्ती असेल आणि मार्गदर्शन घेण्याची तयारी असेल, तर ते साधनेमधील सर्वोत्तम संरक्षण असते.

– श्रीअरविंद [CWSA 29 : 33]

प्रामाणिकपणा – ४०

वाचन आणि अभ्यास या गोष्टी मनाची पूर्वतयारी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात, पण त्या गोष्टी म्हणजेच काही ‘योग’मार्गामध्ये प्रवेश करण्याची सर्वोत्तम साधने ठरू शकत नाहीत. अंतरंगातून होणारे आत्मार्पण (self-dedication) हे उत्तम साधन असते. तुम्ही श्रीमाताजींच्या चेतनेशी एकरूप झाले पाहिजे, मन, हृदय आणि ‘संकल्प’ यांमधील प्रामाणिक आत्मनिवेदन (self-consecration) ही त्यासाठीची साधने असतात. श्रीमाताजींकडून देण्यात आलेले काम हे नेहमीच आत्मनिवेदनाचे क्षेत्र मानले जाते, ते काम त्यांना अर्पण करण्याच्या भावनेतून केले गेले पाहिजे, म्हणजे मग त्या आत्मार्पणाच्या माध्यमातून व्यक्तीला श्रीमाताजींच्या कार्यकारी शक्तीची आणि त्यांच्या उपस्थितीची जाणीव होऊ शकते.

– श्रीअरविंद [CWSA 29 : 246]

प्रामाणिकपणा – ३९

पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी, भयविरहित शौर्य असणे आवश्यकच आहे. तुम्ही क्षुद्र, क्षुल्लक, दुर्बल आणि कुरूप स्पंदनामुळे म्हणजेच भीतीमुळे या मार्गाकडे कधीही पाठ फिरविता कामा नये.

तुमच्या ठायी दुर्दम्य धैर्य, परिपूर्ण प्रामाणिकपणा असला पाहिजे, तुमचे संपूर्ण आत्मदान अशा कोटीचे असावे की, त्याची कोणतीही गणना किंवा तुलना होता कामा नये. तुम्ही दिलेले दान हे त्या मोबदल्यात काहीतरी मिळावे या अपेक्षेने केलेले असता कामा नये. तुम्ही स्वत:चे जे अर्पण करता ते तुमचे संरक्षण व्हावे या हेतूने केलेले असता कामा नये. तुमच्या श्रद्धेला कोणत्याही पुराव्याची आवश्यकता भासता कामा नये. मार्गावर प्रगत व्हायचे असेल तर या गोष्टी अपरिहार्य (indispensable) असतात – या गोष्टीच तुमचे सर्व संकटापासून रक्षण करतात.

– श्रीमाताजी [CWM 15 : 190]