प्रत्येक क्षणी आपल्याला जे सर्वोत्तम शक्य असेल ते करणे आणि त्याचे फळ ईश्वराच्या निर्णयावर सोडून देणे, हा शांती, आनंद, सामर्थ्य, प्रगती आणि संपूर्ण परिपूर्णत्व मिळविण्याचा खात्रीशीर मार्ग आहे.

– श्रीमाताजी
(CWM14 : 111)

स्वत:चा विचार न करता, स्वत:साठी न जगता, स्वतःशी काहीही निगडित न ठेवता; जे परमोच्च सुंदर, तेजोमय, आनंदमय, शक्तिवान, करुणामय, अनंत आहे केवळ त्याचाच विचार करणे, त्या विचारांमध्ये निमग्न राहणे ह्यामध्ये इतका अगाध आनंद आहे की त्याची तुलना दुसऱ्या कशाबरोबरच होऊ शकत नाही.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 269)

…भगवंताचा गुलाम असणे हे अधिक उत्तम !

– श्रीअरविंद
(CWSA 12 : 495)

जोवर स्त्रिया स्वत:ला मुक्त करत नाहीत तोवर,
कोणताही कायदा त्यांना मुक्त करू शकणार नाही.

पुढील गोष्टी स्त्रियांना गुलाम बनवतात –
१) पुरुष आणि त्याच्या सामर्थ्याविषयीचे आकर्षण
२) सांसारिक जीवन आणि त्याची सुरक्षा यांविषयीची इच्छा
३) मातृत्वाविषयीची आसक्ती

पुढील तीन गोष्टींमुळे पुरुष गुलाम होतात –
१) स्वामित्वाची भावना आणि सत्ता व प्रभुत्व यांबद्दलची आसक्ती
२) स्त्रीबरोबर लैंगिक संबंधाची इच्छा
३) वैवाहिक जीवनातील छोट्या छोट्या सुखांविषयीची आसक्ती

– श्रीमाताजी
(CWM 14 : 289)

…पूर्वीचे सर्व संबंध आणि परिस्थिती यांचा सातत्याने परित्याग करत; येणाऱ्या प्रत्येक नवीन क्षणी, आपण जणू काही नव्यानेच जीवनाला सुरुवात करत आहोत, अशा जगण्याकडे वाटचाल करणे म्हणजे ‘आध्यात्मिक पुनर्जन्म’!

– श्रीमाताजी
(CWM03 : 176)

तुम्हाला जर बरे व्हायचे असेल तर दोन अटी आहेत. पहिली अट अशी की, तुम्ही भीती बाळगता कामा नये, अगदी निर्भय राहायला हवे. आणि दुसरी अट अशी की, तुमच्यामध्ये ईश्वरी संरक्षणाबद्दल पूर्ण श्रद्धा असली पाहिजे. ह्या दोन गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत.

– श्रीमाताजी
(CWM 15: 141)

अंतिम विजयाविषयी कोणतीही शंका न बाळगता योगमार्गावरून वाटचाल करा – तुम्हाला अपयश येऊच शकणार नाही! शंकाकुशंका या क्षुल्लक गोष्टी आहेत; अभीप्सेचा अग्नी प्रज्ज्वलित ठेवा, हाच तो अग्नी असतो जो विजयी होतो.

– श्रीअरविंद
(CWSA 28: 347)

जग जसे आहे तसे आहे. जग क्षुद्रतेने आणि अंधकाराने भरलेले आहे; त्याला तुम्हास अस्वस्थ करण्याची मुभा देऊ नका. केवळ ईश्वरच प्रकाश आणि व्यापकता, सत्य आणि करुणा आहे. म्हणून त्या ईश्वराचाच आश्रय घ्या आणि जगाच्या क्षुद्रतेविषयी काळजी करू नका; केवळ ईश्वराची उपस्थिती, त्याच्या शांती व निश्चलतेसहित तुमच्यामध्ये बाळगा.

– श्रीमाताजी
(White roses : 02)

भीती म्हणजे मूक संमती असते. तुम्ही जेव्हा एखाद्या गोष्टीची भीती बाळगता तेव्हा, तिची संभाव्यता तुम्ही मान्य करता असा त्याचा अर्थ होतो आणि अशा प्रकारे तुम्ही तिचे हात बळकट करत असता. ती अवचेतन संमती असते असे म्हणता येईल. भीतीवर अनेक मार्गांनी मात करता येते. धैर्याचा, श्रद्धेचा, ज्ञानाचा मार्ग हे त्यापैकी काही मार्ग आहेत.

– श्रीमाताजी
(CWM 14:243-244)

अज्ञानमूलक चुका सुधारणे म्हणजे अंधकार नाहीसा करण्यासारखे आहे, जणू तुम्ही दिवा लावता आणि अंधार नाहीसा होतो; पण एखादी गोष्ट चुकीची आहे असे माहीत असूनदेखील, तीच चूक पुन्हा करणे म्हणजे जणू कोणीतरी दिवा प्रज्ज्वलित केलेला असावा आणि तुम्ही तो हेतुपुरस्सर विझवून टाकावा!… हे असे करणे म्हणजे, अंधकाराला हेतुपुरस्सर परत बोलावण्यासारखेच आहे.

-श्रीमाताजी
(CWM 09 : 306)