(सप्टेंबर १९०९)

…भारतभरातील जे युवक आज एका मार्गाच्या शोधात आहेत, कार्य करण्यासाठी धडपडू पाहत आहेत, त्यांना या भावावेगावर स्वार होऊ द्या आणि शक्तिसंपादन करण्याची साधने शोधून काढू द्यात. जे उदात्त कार्य आपल्याला सिद्धीस न्यावयाचे आहे ते कार्य केवळ भावावेगाने साध्य होणार नाही, तेथे सामर्थ्याची आवश्यकता आहे. तुमच्या पूर्वजांच्या शिकवणुकीतून प्राप्त होऊ शकेल अशा शक्तीच्या आधारे, ‘असाध्य ते साध्य’ होऊ शकेल. ती ‘शक्ती’ तुमच्या शरीरामध्ये उतरू पाहण्याच्या तयारीत आहे. ती शक्ती म्हणजे साक्षात ‘माता’च होय. तिला शरण जायला शिका. तुम्हाला साधन म्हणून उपयोगात आणून ती दिव्य ‘माता’ ते कार्य इतक्या त्वरेने आणि इतक्या सामर्थ्याने पूर्णत्वाला नेईल की, त्यामुळे जग आश्चर्यचकित होऊन जाईल. या शक्तिविना तुमचे सारे प्रयत्न धुळीस मिळतील. आता जर तुमच्या हृदयांमध्ये मातेच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना झालीच आहे, तुम्हीही तिची सेवा करावयास शिकले आहात आणि तिची उपसना करत आहात, तर आता तुमच्या अंतरंगातील मातेला समर्पित व्हा. कार्यपूर्तीचा अन्य कोणताच मार्ग नाही.

– श्रीअरविंद
(CWSA 09 : 222-223)

(भारताला स्वातंत्र्य मिळाले त्या दिवशीच्या पूर्वसंध्येला म्हणजे दि. १४ ऑगस्ट १९४७ रोजी, श्रीअरविंदांनी दिलेला पुढील संदेश तिरूचिरापल्लीच्या ‘ऑल इंडिया रेडिओ’ वरून प्रसारित करण्यात आला. त्या भाषणातील हा अखेरचा भाग…)

विश्वाला भारताचे जे आध्यात्मिक योगदान आहे ते प्रदान करण्यास त्याने केव्हाच प्रारंभ केला आहे. सतत चढत्यावाढत्या प्रमाणात भारताची आध्यात्मिकता युरोप आणि अमेरिकेमध्ये प्रवेश करत आहे. ही चळवळ वाढतच राहील. काळाच्या आपत्तींमध्ये भारताकडे जगाचे अधिकाधिक डोळे मोठ्या आशेने वळत आहेत. केवळ भारताच्या शिकवणुकीकडेच नाही तर भारताच्या अंतरात्मिक आणि आध्यात्मिक साधनापद्धतींचा ते उत्तरोत्तर अधिकाधिक आश्रय घेत आहेत.

उर्वरित जे काही आहे ती अजूनतरी वैयक्तिक आशा आहे आणि एक अशी संकल्पना, एक असे उद्दिष्ट आहे की, ज्याने भारतातील आणि पाश्चात्त्य देशांमधील पुरोगामी मनांचा ठाव घ्यायला सुरुवात केली आहे. कोणत्याही क्षेत्रामध्ये प्रयत्न करू लागल्यावर, मार्गामध्ये ज्या अडीअडचणी येतात त्यापेक्षा कितीतरी कठीणतर अडचणी या मार्गावर आहेत; परंतु अडचणी ह्या त्यांवर मात करण्यासाठीच असतात आणि जर ‘ईश्वरी इच्छा’ तेथे असेल तर अडचणींवर मात केली जाईलच. येथे देखील, जर अशा प्रकारचे विकसन होणारच असेल तर ते आत्म्याच्या विकसनातूनच आणि आंतरिक जाणिवेतूनच उदयास यावयास हवे, यामध्ये भारत पुढाकार घेऊ शकतो. आणि त्याची व्याप्ती वैश्विक असणेच भाग आहे, त्याची केंद्रवर्ती प्रक्रिया भारताचीच असू शकेल.

भारताच्या स्वातंत्र्यदिनी मी हा आशय आपणापुढे मांडू इच्छितो. हा विचारांचा धागा पूर्णत्वास जाईल किंवा नाही, तो किती प्रमाणात पूर्णत्वास जाईल, हे सर्व काही या नूतन आणि स्वतंत्र भारतावर अवलंबून आहे.
– श्रीअरविंद
(CWSA 36 : 477)

(भारताला स्वातंत्र्य मिळाले त्या दिवशीच्या पूर्वसंध्येला म्हणजे दि. १४ ऑगस्ट १९४७ रोजी, श्रीअरविंदांनी दिलेला पुढील संदेश तिरूचिरापल्लीच्या ‘ऑल इंडिया रेडिओ’ वरून प्रसारित करण्यात आला. त्या भाषणातील हा तिसरा भाग…)

आशिया खंडाचा उदय होत आहे आणि या खंडातील बहुतांशी भाग हे स्वतंत्र झाले आहेत किंवा ह्या घडीला ते स्वतंत्र होत आहेत; त्यातील इतर काही अंकित भाग हे स्वातंत्र्यप्राप्तीसाठी झगडत आहेत, लढा देत आहेत. अगदी थोड्याच गोष्टी करण्याची आवश्यकता आहे आणि त्या आज ना उद्या केल्या जातीलच. तेथे भारताला त्याची भूमिका पार पाडावीच लागेल आणि भारताने पूर्ण सामर्थ्यानिशी आणि क्षमतेनिशी ती भूमिका पार पाडायला सुरुवात देखील केली आहे; आणि त्यातून भारताच्या अंगी असणाऱ्या संभाव्यतेच्या मोजमापाचा आणि ‘राष्ट्रसमूहांच्या समिती’मध्ये तो जे स्थान प्राप्त करून घेईल त्याचा निर्देश होत आहे.

समग्र मानवजात आज एकात्म होण्याच्या मार्गावर आहे. तिची ही वाटचाल सदोषपूर्ण अशी, अगदी प्रारंभिक अवस्था ह्या स्वरूपात असली तरी, असंख्य अडचणींशी झगडा देत, परंतु सुसंघटितपणे तिची वाटचाल चालू आहे. आणि त्याला चालना मिळालेली दिसत आहे आणि इतिहासाचा अनुभव गाठीशी धरला, त्याला मार्गदर्शक केले तर विजय प्राप्त होत नाही तोवर ती गती अगदी अनिवार्यपणे वाढवत नेली पाहिजे. अगदी येथेसुद्धा भारताने त्याची महत्त्वाची भूमिका बजावयाला सुरुवात केली आहे, आणि केवळ सद्यकालीन तथ्यं आणि नजीकच्या शक्यता एवढ्यापुरतेच स्वत:ला मर्यादित न ठेवता भारत जर, भविष्याचा वेध घेऊ शकला आणि ते भविष्य निकट आणू शकला तर, आणि तसेच, एक व्यापक मुत्सद्देगिरी विकसित करू शकला तर मग, स्वत:च्या निव्वळ अस्तित्वानेही भारत, मंदगती व भित्रे तसेच धाडसी व वेगवान प्रगती करणारे यांच्यामध्येसुद्धा फरक घडवून आणू शकेल. यामध्ये एखादे अरिष्टसुद्धा येऊ शकते, हस्तक्षेप करू शकते वा जे काही घडविण्यात आलेले आहे त्याचा विध्वंसही करू शकते, असे घडले तरीसुद्धा अंतिम परिणामाची निश्चित खात्री आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये, एकत्रीकरण ही प्रकृतीच्या वाटचालीतील एक आवश्यकता आहे, एक अपरिहार्य अशी घडामोड आहे आणि त्याच्या परिणामाविषयी, साध्याविषयी नि:संदिग्ध भाकीत करता येणे शक्य आहे. एकत्रीकरणाची राष्ट्रांसाठी असलेली आवश्यकता पुरेशी स्पष्ट आहे, कारण त्याच्याशिवाय ह्यापुढील काळात छोट्या समूहांचे स्वातंत्र्य कधीच सुरक्षित राहू शकणार नाही आणि अगदी मोठी, शक्तिशाली राष्ट्रदेखील अबाधित राहू शकणार नाहीत. भारत, जर असा विभागलेलाच राहिला तर त्याला त्याच्या सुरक्षिततेची खात्री बाळगता येणार नाही. आणि म्हणूनच सर्वांच्या हितासाठी सुद्धा हे एकीकरण घडून यावयास हवे. केवळ मानवी अल्पमती आणि मूर्ख स्वार्थीपणाच ह्याला आडकाठी करेल. एक आंतरराष्ट्रीय वृत्ती आणि दृष्टिकोन वाढीला लागावयास हवा; आंतरराष्ट्रीय रचना, संस्था वाढीस लागावयास हव्यात, राष्ट्रीयत्व तेव्हा स्वत:च परिपूर्ण झालेले असेल; अगदी दुहेरी नागरिकत्व किंवा बहुराष्ट्रीय नागरिकत्वासारख्या घडामोडीदेखील घडून येतील. या परिवर्तनाच्या प्रक्रियेमध्ये संस्कृतींचा ऐच्छिक संगमदेखील दिसू लागेल आणि राष्ट्रीयत्वाच्या भावनेमधील आक्रमकता नाहीशी झाल्याने, ह्या साऱ्या गोष्टी या एकात्मतेच्या स्वत:च्या विचारसरणीशी अगदी पूर्णत: मिळत्याजुळत्या आहेत, असे आढळून येईल. एकतेची ही नवी वृत्ती संपूर्ण मानवी वंशाचा ताबा घेईल.

(क्रमश:)

– श्रीअरविंद
(CWSA 36 : 476 – 477)

(भारताला स्वातंत्र्य मिळाले त्या दिवशीच्या पूर्वसंध्येला म्हणजे दि. १४ ऑगस्ट १९४७ रोजी, श्रीअरविंदांनी दिलेला पुढील संदेश तिरूचिरापल्लीच्या ‘ऑल इंडिया रेडिओ’ वरून प्रसारित करण्यात आला. त्या भाषणातील हा दुसरा भाग…)

भारत स्वतंत्र झाला आहे पण त्याला एकात्मता साध्य झालेली नाही; एक भंगलेले, विदीर्ण झालेले स्वातंत्र्य प्राप्त झाले आहे. एकवेळ तर असे वाटून गेले की, भारत पुन्हा एकदा ब्रिटिशांच्या सत्तेपूर्वी जसा विभिन्न राज्याराज्यांमध्ये विभागलेला होता तशाच अराजकतेमध्ये जाऊन पडतो की काय. परंतु सुदैवाने हे विनाशकारी पुनर्पतन टाळता येईल अशी एक दाट शक्यता अलीकडे विकसित झाली आहे. ‘संविधान सभे’च्या समजुतदार, मूलगामी धोरणामुळे उपेक्षित वर्गाच्या समस्या ह्या कोणत्याही मतभेदाविना वा फाटाफूटीविना दूर होतील अशी शक्यता निर्माण झाली आहे. परंतु हिंदु आणि मुस्लीम यांतील जुने सांप्रदायिक भेद हे देशाच्या दृष्टीने एका कायमस्वरूपी राजकीय भेदाभेदाची मूर्तीच बनून, दृढमूल झालेले दिसत आहेत. तोडगा निघालेली ही आत्ताची परिस्थिती हा कायमचाच उपाय आहे, असे काँग्रेस आणि राष्ट्र गृहीत धरून चालणार नाहीत किंवा हा एक तात्पुरता उपाय आहे, ह्या पलीकडे फारसे महत्त्व ते त्याला देणार नाहीत, अशी आशा आहे. कारण असे झाले नाही तर, भारत गंभीररीत्या दुर्बल होईल, कदाचित लुळापांगळाही होईल : अंतर्गत कलहाची शक्यता तर कायमच भेडसावत राहील, किंवा कदाचित एखादे नवे आक्रमण वा परकीय सत्तेचा विजय या धोक्याची शक्यताही संभवते. या देशाची फाळणी नष्ट व्हायलाच पाहिजे. दोन्ही देशांमधील ताणतणाव कमी करून, शांती आणि सद्भाव यांविषयीच्या गरजेबद्दलची चढतीवाढती जाणीव बाळगून, एकत्रित आणि एकदिश होऊन केलेल्या कृतीची वाढती गरज लक्षात घेऊन, किंवा ह्याच हेतूसाठी अस्तित्वात आलेल्या एकात्मतेच्या साधनाद्वारे ही फाळणी नष्ट होईल, अशी आशा बाळगता येईल. कोणत्याही रूपामध्ये, कोणत्याही प्रकारे का असेना अशा रीतीने एकात्मता घडून येऊ शकते – त्याचे नेमके अचूक रूप हे व्यावहारिक असण्याची शक्यता आहे पण ते काही फारसे महत्त्वाचे नाही. कोणत्याही मार्गाने का असेना ही भेदात्मकता, ही फाळणी नाहीशी व्हायलाच पाहिजे आणि ती नाहीशी होईलच. कारण त्याविना भारताचे भवितव्य हे खरोखर दुर्बल आणि निराशाजनक असेल. परंतु ते कदापिही तसे असता कामा नये.

(क्रमश:)

– श्रीअरविंद
(CWSA 36 : 475 – 476)

(भारताला स्वातंत्र्य मिळाले त्या दिवशीच्या पूर्वसंध्येला म्हणजे दि. १४ ऑगस्ट १९४७ रोजी, श्रीअरविंदांनी दिलेला पुढील संदेश तिरूचिरापल्लीच्या ‘ऑल इंडिया रेडिओ’ वरून प्रसारित करण्यात आला. आजपासून आपण ते भाषण क्रमश: प्रकाशित करत आहोत.)

१५ ऑगस्ट हा स्वतंत्र भारताचा जन्मदिवस. हा भारतासाठी जुन्या युगाचा अंत आणि नव्या युगाचा प्रारंभ असणार आहे. ही गोष्ट केवळ आपल्यापुरतीच महत्त्वाची आहे असे नाही, तर ती आशिया आणि अखिल विश्वासाठी देखील महत्त्वाची आहे. मानवतेचे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक भवितव्य निर्धारित करण्यामध्ये ज्या शक्तीचा मोठा वाटा असणार आहे, अशा एका नव्या शक्तीचा, अकथित अशी क्षमता असलेल्या एका नव्या शक्तीचा, राष्ट्रसमूहांमध्ये प्रवेश होत असल्याचे हे द्योतक आहे.

…माझ्या जीवनामध्ये ज्या जागतिक घडामोडी पाहता याव्यात अशी माझी मनीषा होती, (जरी तेव्हा त्या स्वप्नवत वाटत होत्या) त्या मला आजच्या ह्या दिवशी फळाला येताना दिसत आहेत वा त्यांची सुरुवात तरी झाली आहे किंवा त्या त्यांच्या परिपूर्तीच्या मार्गावरती तरी आहेत.

…या निमित्ताने, माझ्या बालपणी आणि तरुणपणी, माझ्यामध्ये ज्या ध्येयांची, आदर्शाची रुजवण झाली होती, त्या ध्येयांचा, आदर्शाच्या सार्थकतेचा प्रारंभ झालेला मला दिसत आहे, अशी व्यक्तीश: मी उद्घोषणा करू शकतो; कारण ही ध्येयधोरणं भारताच्या स्वातंत्र्याशी निगडित आहेत. ही ध्येयधोरणं म्हणजे माझ्या दृष्टीने भारताचे भावी कार्य आहे, हे असे कार्य आहे की, जेथे भारताने नेतृत्व स्वीकारणे आवश्यकच आहे. कारण मला नेहमीच असे वाटत आले आहे आणि तसे मी सांगत आलो आहे की, भारताचा उदय होतो आहे तो केवळ त्याचे स्वत:चे भौतिक हेतू म्हणजे त्याचा विस्तार व्हावा; महानता, शक्तिसामर्थ्य, समृद्धी ह्या गोष्टी त्याला साध्य व्हाव्यात म्हणून नाही, अर्थात त्याकडेही भारताने दुर्लक्ष करता कामा नये किंवा इतरांप्रमाणे इतरेजनांवर प्रभुत्व संपादन करावे म्हणूनही भारताचा उदय होत नाहीये तर ‘ईश्वरा’साठी, या जगतासाठी, अखिल मानव-वंशाला साहाय्य करण्यासाठी, त्यांचे नेतृत्व करण्यासाठी भारताचा उदय होतो आहे. ही ध्येयं आणि आदर्श त्यांच्या स्वाभाविक क्रमाने अशी होती :
१) भारताचे स्वातंत्र्य आणि भारताची एकात्मता ज्यातून साध्य होईल अशी क्रांती.
२) आशिया खंडाची मुक्ती आणि त्याचे पुनरुत्थान, मानवी सभ्यतेच्या प्रगतीमध्ये आशिया खंडाने आजवर जी थोर भूमिका निभावली होती त्याकडे त्याचे परतून येणे.
३) मानवजातीसाठी एका नूतन, अधिक महान, अधिक तेजस्वी आणि उदात्त अशा जीवनाचा उदय की, जे जीवन परिपूर्णतया साकारण्यासाठी बाह्यत: ते पृथगात्म अस्तित्व असणाऱ्या लोकसमूहांच्या आंतरराष्ट्रीय एकीकरणावर आधारित असेल; ते समूह त्यांचे त्यांचे राष्ट्रीय जीवन जतन करतील, त्याचे संरक्षणही करतील पण ते जीवन त्या सर्वांना एकत्रितपणे एका नियंत्रित आणि परम एकात्मतेकडे घेऊन जाणारे असेल.
४) भारताकडे असलेले आध्यात्मिक ज्ञान आणि जीवनाच्या आध्यात्मिकीकरणासाठी वापरण्यात येणारी साधने ही भारताची संपूर्ण मानवजातीला देणगी असेल.
५) सरतेशेवटी, उत्क्रांतीची एक नवीन पायरी, जी चेतनेचे उच्चतर पातळीवर उन्नयन करून, त्याद्वारे ती – मानवांनी जेव्हापासून विचार करायला आणि व्यक्तिगत परिपूर्णतेची व एका परिपूर्ण समाजरचनेची स्वप्न पाहायला सुरुवात केली तेव्हापासून मानवजातीला अस्तित्वविषयक ज्या अनेकानेक समस्यांनी गोंधळात टाकले होते, अस्वस्थ केले होते – अशा समस्यांचे निराकरण करायला सुरूवात करेल.

(क्रमश:)

– श्रीअरविंद
(CWSA 36 : 474 – 475)

(दिनांक ०५ मार्च १९०८)

भारत हा राष्ट्रांचा गुरु आहे. मानवी जिवाला कितीही गंभीर आजार झाला असेना का, तरी त्याला त्यातून बाहेर काढणारा भारत हा धन्वंतरी आहे. जगाचे जीवन पुन्हा एकदा नवीन साच्यात ओतावे आणि मानवी चैतन्याची शांती त्याला पुन्हा एकदा गवसून द्यावी हे भारताचे नियत कार्य आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 06-07 : 906)

(इ. स. १९१२)

सर्व प्रकारच्या संधी आणि संकटांमधून, काही मोजक्या किंवा अनेकांच्याद्वारे, सातत्याने उच्चतर ज्ञान जतन व्हावे म्हणून ‘ईश्वर’ स्वतःसाठी असा एक खास देश निवडतो आणि सद्यस्थितीत, या ‘चतुर्युगा’मध्ये तो देश ‘भारत’ आहे. जेव्हा कधी तो ‘ईश्वर’ अज्ञानाचे, द्वैताचे, संघर्षाचे, वेदनेचे आणि अश्रुंचे, दुर्बलतेचे, स्वार्थीपणाचे, तामसिक व राजसिक सुखोपभोगांचे, थोडक्यात म्हणजे ‘कालीच्या लीले’चे पूर्ण सौख्य उपभोगण्याची निवड करतो तेव्हा, तो भारतातील ज्ञान मंद करतो, भारताला दुर्बलतेमध्ये आणि अवनतीमध्ये लोटतो; जेणेकरून भारताने स्वतःमध्येच विश्राम करावा आणि त्याच्या लीलेच्या गतिविधींमध्ये हस्तक्षेप करू नये. जेव्हा त्याला स्वतःला या दलदलीतून वर उठण्याची इच्छा होते आणि मानवातील ‘नारायण’ हा पुन्हा एकदा बलवान, प्रज्ञावान आणि आनंदपूर्ण बनावा असे त्याला वाटते; तेव्हा तो भारतामध्ये ज्ञानवर्षाव करतो आणि भारताची अशा रीतीने उन्नती घडवून आणतो की जेणेकरून, भारताने ज्ञान व त्याचा परिणाम म्हणून येणारी बलवत्ता, प्रज्ञा आणि आनंद या गोष्टी अखिल विश्वाला प्रदान कराव्यात. जेव्हा ज्ञानाचे संकोचन झाल्याची प्रवृत्ती आढळून येते, तेव्हा ‘भारता’तील योगी हे या विश्वापासून दूर होत, स्वतःच्या मुक्तीसाठी व आनंदासाठी किंवा काही मोजक्या शिष्यांच्या मुक्तीसाठी योगाभ्यास करतात; पण जेव्हा ज्ञानप्रवृत्ती पुन्हा एकदा प्रसरण पावते तेव्हा त्याबरोबर ‘भारता’चा आत्माही विस्तार पावतो, तेव्हा ते योगी पुनश्च पुढे येतात आणि या जगामध्ये, जगासाठी कार्य करत राहतात. जनक, अजातशत्रू, कार्तवीर्य यांसारखे योगी मग पुन्हा विश्वसिंहासनावर विराजमान होतात आणि राष्ट्रांवर राज्य करू लागतात.

– श्रीअरविंद
(CWSA 13 : 71-72)

(ऑगस्ट १९०९)

शाश्वत धर्माचा प्रसार हे आमचे उद्दिष्ट आहे आणि त्या शाश्वत धर्मावर आधारित वंशधर्माचे आणि युगधर्माचे पालन करणे हे आमचे उद्दिष्ट आहे….

….आम्ही आमच्या धर्माच्या मार्गापासून ढळलेलो आहोत, आमच्या ध्येयापासून दूर झालेलो आहोत; प्रमादपूर्णतेचे, घोडचुकांचे, धादांत भ्रमाचे, धार्मिक गोंधळाचे बळी ठरलेले आपण, ‘आर्य’ शिक्षण आणि त्याच्या नियामक नीतीतत्त्वांपासून वंचित ठरलो आहोत. ‘आर्य’ वंशकुळातील असूनसुद्धा, जेत्यांच्या वर्चस्वाने आणि दुःखवेदनांचे बळी ठरल्यामुळे, आपण कनिष्ठतेचा कायदा मान्य केला आहे आणि त्यामुळे त्याच्या पाठोपाठ येणारे दास्यत्वदेखील आपण मान्य केले आहे. आपण तगून राहावे, आपला टिकाव लागावा असे वाटत असेल तर आणि या कायम स्वरूपी नरकवासामधून आपली सुटका व्हावी अशी किंचितशी जरी इच्छा आपल्या मनात असेल तर, राष्ट्राची सेवा करणे हेच आपले प्रथम कर्तव्य आहे. आणि हे करण्याचा एक मार्ग आहे तो म्हणजे आर्य चारित्र्याची पुनर्घडण. त्यातून घडणारे ह्या मातृभूमीचे भावी सुपुत्र हे ज्ञानवंत, सत्यनिष्ठ, मानवतावादी, बंधुभावाने प्रेरित झालेले, धैर्यवान, विनम्र असतील. संपूर्ण राष्ट्राला, विशेषत: या देशातील तरुणांना, पुरेसे शिक्षण, उच्च आदर्श आणि ज्यामधून हे आर्य आदर्श उदयाला येऊ शकतील असा कार्याचा मार्ग प्रदान करणे हे आपल्यासमोरील पहिले उद्दिष्ट असले पाहिजे. आणि असे करण्यामध्ये जोवर आम्ही यशस्वी होत नाही तोपर्यंत शाश्वत धर्माचा प्रचारप्रसार करणे म्हणजे नापीक जमिनीमध्ये बी पेरण्यासारखे आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 09 : 191-192)

(दिनांक : १९ जून १९०९)

आम्ही जे कार्य आमच्या डोळ्यांसमोर ठेवले आहे ते केवळ यांत्रिक नाही तर, नैतिक आणि आध्यात्मिक आहे. सरकार उलथवून लावणे हे आमचे उद्दिष्ट नसून, राष्ट्रनिर्माण हे आमचे उद्दिष्ट आहे. राजकारण हा या कार्याचा एक भाग आहे, पण केवळ अंशभागच! केवळ राजकारण, केवळ सामाजिक प्रश्न, केवळ धर्मशास्त्र, तत्त्वज्ञान, साहित्य वा केवळ विज्ञान यांना आपण स्वत:ला वाहून घेता कामा नये तर, या सर्वांचा समावेश आपण ज्या एका तत्त्वामध्ये करतो, जो आपल्या दृष्टीने सर्वाधिक महत्त्वाचा धर्म आहे, राष्ट्रधर्म आहे, जो आमच्या दृष्टीने वैश्विक देखील आहे, त्याला आपण समर्पित झाले पाहिजे. जीवनाचा एक महत्तर कायदा आहे, मानवी उत्क्रांतीचे एक महान तत्त्व आहे; आध्यात्मिक ज्ञान आणि अनुभूतीचे एक अंग आहे की ज्याचे संरक्षण करणे, ज्याचे जितेजागते उदाहरण बनणे आणि ज्याचा प्रचार करणे, हे ‘भारता’चे आजवरचे नियत कार्य राहिले आहे. हा शाश्वत धर्म आहे. परकीय प्रभावांच्या दडपणाखाली येऊन भारताने केवळ धर्माच्या आराखड्यावरील पकडच मोठ्या प्रमाणात गमावली आहे असे नव्हे तर, त्या परकीय प्रभावांच्या दडपणामुळे भारताने ह्या धर्माचे जिवंत सत्यच गमावले आहे. भारताचा हा धर्म जर आचरणात आणला गेला नाही तर हा धर्म, धर्मच असणार नाही. तो जीवनाच्या कोणत्या तरी एका भागात उपयोगात आणून पुरेसे नाही तर, तो समग्र जीवनात उपयोगात आणला पाहिजे. त्याचा आत्मा आपल्यामध्ये, आपल्या समाजामध्ये, आपल्या राजकारणामध्ये, आपल्या साहित्यामध्ये, आपल्या विज्ञानामध्ये, आपल्या व्यक्तिभूत चारित्र्यामध्ये, आत्मीयतांमध्ये, आपल्या आशाआकांक्षामध्ये प्रविष्ट झाला पाहिजे. या धर्माचे मर्म जाणून घेणे, त्याची सत्य म्हणून अनुभूती घेणे, तो ज्या उच्च भावनांप्रत उन्नत होत आहे त्या भावना अनुभवणे आणि त्या जीवनामध्ये अभिव्यक्त करणे व प्रत्यक्षात उतरविणे म्हणजे आमच्या दृष्टीने ‘कर्मयोग’ होय. आम्ही असे मानतो की, योगसाधनेला मानवी जीवनाचे ध्येय बनविण्यासाठी भारताची उन्नती होत आहे. योगामुळेच भारताला स्वातंत्र्य, एकता आणि महानता प्राप्त करून घेण्यासाठी बळ मिळणार आहे, आणि ते सारे टिकवून ठेवण्यासाठीचे बळदेखील भारताला या योगामुळेच मिळणार आहे. आमच्या नजरेला आध्यात्मिक क्रांती दिसत आहे आणि भौतिक ही केवळ त्याची छाया आणि प्रतिक्रिया आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 08 : 24)

(इसवी सन : १८९० ते १९०६)

आपल्यामध्ये प्रेमाची, उत्साहाची, ‘भक्ती’ची कमतरता आहे का? नाही, या गोष्टी तर भारतीय प्रकृतीमध्येच रुजलेल्या आहेत, पण ‘शक्ति’च्या अभावामुळे आपण लक्ष केंद्रित करू शकत नाही, त्यांना आपण दिशा देऊ शकत नाही, एवढेच काय पण आपण त्या टिकवून देखील ठेवू शकत नाही. ‘भक्ती’ ही धगधगती ज्वाळा आहे तर, ‘शक्ती’ हे तिचे इंधन आहे. जर इंधनच अपुरे असेल तर अग्नी किती काळ टिकून राहील? एखाद्या व्यक्तीकडे सुदृढ प्रकृती असून, ती व्यक्ती जर ज्ञानप्रदीप्त, शिस्तबद्ध असेल तसेच ‘कर्मा’मुळे तिला महाकाय सामर्थ्य प्रदान करण्यात आलेले असेल; आणि त्यातूनही जर अशी व्यक्ती ईश्वरविषयक प्रेमाने आणि भक्तीने स्वत:ला उन्नत करेल, तर अशी भक्ती टिकून राहील आणि अशा व्यक्तीचा आत्मा हा ‘ईश्वरा’बरोबर सदैव ऐक्य पावलेला असेल. पण दुर्बल प्रकृतीची व्यक्ती परिपूर्ण ‘भक्ती’सारख्या महान गोष्टीचा आवेग झेलू शकण्यास फारच कमकुवत ठरते; तो एक क्षणभरासाठीच उचलला जातो, मग ती ज्वाळा थेट ‘स्वर्गा’लाच जाऊन भिडते आणि ती व्यक्ती पूर्णपणे थकून जाते, पूर्वीपेक्षाही अधिक दुर्बल बनून जाते. ज्याद्वारे सर्व जीवनव्यवहार घडत असतात ते मानवी जडद्रव्य जोपर्यंत, कमजोर आणि अल्प असते तोपर्यंत, त्यातून निर्माण होणाऱ्या आणि उत्साह व भक्ती हाच ज्यांचा प्राण आहे अशी प्रत्येक गोष्ट असफल होणे आणि भाजून निघणे, क्रमप्राप्तच आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 06-07 : 82)