कृतज्ञता – २२

व्यक्तीच्या आत्मदानामध्ये एक महान शुद्धी आणि एक उत्कटता असली पाहिजे, ‘तसेच आपल्यासाठी काय हिताचे आहे, काय नाही, हे आपल्यापेक्षा ‘ईश्वरा’ला अधिक चांगले कळते,’ असा ईश्वरी ‘कृपे’च्या परमप्रज्ञेविषयी एक प्रगाढ विश्वास व्यक्तीला असला पाहिजे. आणि मग असे सारे असताना, व्यक्तीने स्वतःची अभीप्सा अर्पण करताना, स्वतः ला पुरेशा उत्कटतेने ईश्वराप्रत झोकून दिले तर त्याचे परिणाम अद्भुत असतात. परंतु त्याकडे कसे पाहायचे हे व्यक्तीला उमगलेच पाहिजे. कारण जेव्हा ते परिणाम घडून येतात म्हणजे जेव्हा त्या गोष्टी प्रत्यक्षात उतरतात तेव्हा बहुतेक लोकांना त्या अगदी स्वाभाविक वाटतात, त्या गोष्टी का आणि कशामुळे घडल्या याकडे त्यांचे लक्षच नसते आणि ते स्वतःशीच म्हणतात, “हो, हे असेच घडायला हवे होते.” आणि मग ते कृतज्ञतेचा आनंद गमावून बसतात. त्यांचे हृदय जर ईश्वरी ‘कृपे’ विषयी धन्यवाद देण्याच्या आणि कृतज्ञतेच्या भावनेने कृतकृत्य होऊ शकले तर, त्यामुळे जणू (कुशल चित्रकाराने) अखेरचा कुंचला फिरवावा तसे काहीसे होते आणि मग प्रत्येक पावलागणिक व्यक्तीला जाणवायला लागते की, ‘गोष्टी जशा असायला हव्यात, जशा घडू शकतात, अगदी तशाच, सर्वोत्तम रीतीने त्या घडत आहेत.’

– श्रीमाताजी
(CWM 07 : 239)

कृतज्ञता – २१

तुमच्यामध्ये भक्तिभाव असतो आणि तरीही तुम्ही तुमचा अहंकारही सांभाळत राहता. आणि नंतर मग हा अहंकारच तुम्हाला भक्तीच्या माध्यमातूनसुद्धा अनेक प्रकारच्या गोष्टी करायला भाग पाडतो, अगदी अत्यंत अहंकारी गोष्टी करायलासुद्धा भाग पाडतो. म्हणजे असे की, तुम्ही फक्त तुमचाच विचार करत राहता, इतरांचा नाही, जगाचा नाही, कार्याचाही नाही किंवा जे करायला हवे त्याचाही नाही तर, तुम्ही फक्त स्वत:च्याच भक्तीचा विचार करत राहता आणि त्यामुळेच तुम्ही प्रचंड अहंकारी बनता. आणि म्हणून, जेव्हा तुम्हाला असे आढळते की, ईश्वर कोणत्याही कारणाने म्हणा पण, तुम्हाला अपेक्षित आहे तेवढ्या उत्साहाने तुमच्या भक्तीला प्रतिसाद देत नाही तेव्हा, तुम्ही निराश होता आणि निराशेतच अडकून राहाता.

म्हणजे, एकतर ईश्वर निष्ठुर आहे असे तुम्हाला वाटू लागते. आपण अशा गोष्टी वाचल्या आहेत. उत्साही भक्तांच्या तर अशा कितीतरी गोष्टी असतात. असे उत्साही भक्त मग ‘ईश्वरा’वर टिका करू लागतात. कारण (त्यांच्यादृष्टीने) ‘ईश्वर’ आता त्यांच्याबाबतीत पूर्वीप्रमाणे जवळचा, प्रेमळ उरलेला नसतो, तो दूर निघून गेलेला असतो. मग असा भक्त (मनाशीच) म्हणू लागतो, “तू मला उद्ध्वस्त करून का गेलास? तू मला असे टाकून का गेलास? तू खूप निष्ठुर आहेस.” त्यांच्यामध्ये प्रत्यक्ष असे म्हणण्याचे धाडस नसते पण ते असा विचार करत असतात; अन्यथा मग ते म्हणतात, ‘मी नक्कीच काहीतरी घोर पातक केले असले पाहिजे आणि म्हणूनच ईश्वराने मला दूर लोटले आहे.” आणि ते निराशेच्या गर्तेमध्ये जाऊन पडतात.

म्हणून श्रद्धेबरोबर एक स्पंदनही असायला हवे…. एक अशी कृतज्ञतेची भावना हवी की, ‘ईश्वर’ अस्तित्वात आहे. ही कृतज्ञतेची अद्भुत भावना, तुम्हाला उत्कट आनंदाने भारून टाकते. तुम्हाला जाणवू लागते की, आपल्याला दिसतो तसा, या विश्वामध्ये दिसणारा भयानकपणाच फक्त अस्तित्वात आहे असे नाही तर, या विश्वामध्ये ‘ईश्वर’ म्हणूनही काहीतरी अस्तित्वात आहे, होय, येथे ‘ईश्वर’ आहे, ईश्वरी अस्तित्व आहे!

जेव्हा कधी, एखादी अगदी छोटीशी गोष्ट, प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे त्या ईश्वरीय अस्तित्वाच्या उदात्त ‘वास्तवा’शी तुमचा संपर्क घडविते तेव्हा, त्या प्रत्येक वेळी, तुमचे हृदय अगदी उत्कट, अगदी अद्भुत आनंदाने, कृतज्ञतेने भरून जाते. बाकी सर्व गोष्टींच्या तुलनेत अशी कृतज्ञता म्हणजे सर्वाधिक आनंददायी गोष्ट असते.

दुसरी कोणतीच गोष्ट तुम्हाला कृतज्ञतेइतका आनंद देऊ शकत नाही. व्यक्ती एखाद्या पक्षाचे गाणे ऐकते, एखादे सुंदरसे फूल पाहते, एखाद्या लहानग्या बालकाकडे पाहते, उदारतेची एखादी कृती पाहते, एखादे चांगलेसे वाक्य वाचते, मावळत्या सूर्याकडे पाहते, असे काहीही असू शकते की, जे अवचितपणे तुमच्या समोर येते आणि मग, हे विश्व ‘ईश्वरा’ची अभिव्यक्ती करत आहे, या विश्वापाठीमागे असे काहीतरी आहे की, जे ‘ईश्वरी’ आहे यासारखी उत्कट, गाढ, तीव्र अशी भावना मनात दाटून येते.

म्हणून कृतज्ञतेविना भक्ती ही अपूर्ण आहे; भक्तीसोबत कृतज्ञतादेखील असायलाच हवी.

– श्रीमाताजी
(CWM 08 : 39-40)

कृतज्ञता – २०

रोज सकाळी तुम्ही जेव्हा झोपून उठता तेव्हा, तुमच्या दिवसाची सुरुवात तुम्ही मानववंशाचे त्राते असणाऱ्या महान समुदायाविषयी कृतज्ञतेने, प्रेमाने आणि स्तुतीने करा. (येथे श्रीमाताजी आध्यात्मिकतेची शिकवण देणाऱ्या संतमंडळींबद्दल सांगत आहेत.) ते सारे एकसारखेच असतात. पूर्णत्वाची अवघड चढण चढता येण्यासाठी मदत करावी या हेतुने ते मार्गदर्शक म्हणून, प्रशिक्षक म्हणून, त्यांच्या बांधवांचे विनम्र आणि अद्भुत सेवक म्हणून, आजवर जन्म घेत आले आहेत, ते आत्ताही आहेत, आणि काळाच्या अंतापर्यंत असणार आहेत. जेव्हा तुम्ही जागे व्हाल तेव्हा तुमचे विचार पूर्ण विश्वासाने आणि कृतज्ञतेने त्यांच्यावर एकाग्र करा. लवकरच या एकाग्रतेचे लाभदायक परिणाम तुमच्या अनुभवास येतील. तुमच्या हाकेला त्यांचे अस्तित्व प्रतिसाद देत आहे असे तुम्हाला जाणवेल, त्यांच्या प्रकाशाने व प्रेमाने तुम्हाला कवळले आहे, त्यांच्या प्रकाशाच्या आणि प्रेमाच्या रंगात तुम्ही न्हाऊन निघाले आहात असे तुम्हाला जाणवेल. आणि मग थोडेसे अधिक चांगल्या रीतीने समजून घेण्यासाठीचे, थोडे अधिक प्रेम करण्यासाठीचे, अधिक सेवा करण्यासाठीचे तुमचे दैनंदिन प्रयत्न अधिक परिणामकारक आणि अधिक सहजसुलभ होतील. तुम्ही इतरांना जी मदत कराल ती अधिक परिणामकारक ठरेल आणि तुमचे हृदय एका अतूट आनंदाने भरून जाईल.

– श्रीमाताजी
(CWM 02 : 115-116)

कृतज्ञता – १९

(धम्मपदातील एका वचनाबद्दल श्रीमाताजी भाष्य करीत आहेत…)

मी तुम्हाला आश्चर्याचा धक्का देणार आहे. तो असा की, हे जग बदलावे म्हणून जर द्वेषभावनेला प्रेमभावनेने प्रत्युत्तर द्यायचे असेल तर, प्रेमाला प्रेमाने प्रतिसाद द्यावा हे अधिक जास्त स्वाभाविक नाही का?

हे जीवन, कृती आणि माणसांची हृदये जशी आहेत तशीच विचारात घेतली तर, ‘ईश्वरी कृपा’ या विश्वावर ‘प्रेमा’चा जो अपरिमित वर्षाव करते त्या प्रेमाला प्रत्युत्तर म्हणून मिळणारा सर्व द्वेष, तिरस्कार तसेच अलिप्तता पाहून आश्चर्यचकित होण्याचा व्यक्तीला नक्कीच अधिकार आहे; कारण या विश्वाला ईश्वरी आनंदाकडे घेऊन जाण्यासाठी म्हणून हे अपरिमित ईश्वरी ‘प्रेम’ प्रत्येक क्षणाला कार्य करत असते आणि तरीसुद्धा त्याला मानवी हृदयामध्ये अत्यल्प प्रतिसाद मिळतो.

परंतु लोकांना दुष्ट, अपंग, ज्यांच्या बाबतीत काहीतरी अघटित घडलेले असते अशांविषयी, अपयशी व्यक्तींविषयी, अपयशाविषयी कणव असते – वास्तविक हे एक प्रकारे त्या दुष्टतेला आणि अपयशाला दिलेले प्रोत्साहनच असते. समस्येच्या या पैलूचा व्यक्तीने थोडा अधिक विचार केला तर कदाचित द्वेषाला प्रेमाने प्रतिसाद देण्याच्या आवश्यकतेवर भर देण्याची गरज कमी भासेल. कारण मानवी हृदयामध्ये ज्या ईश्वरी प्रेमाचा वर्षाव केला जात असतो त्या प्रेमाला, जर त्याने, जे समजून घेऊ शकते आणि जे दाद देऊ शकते अशा प्रेमाच्या उत्स्फूर्त कृतज्ञतेनिशी आणि पूर्ण प्रामाणिकतेनिशी प्रतिसाद दिला तर, विश्वामध्ये गोष्टी त्वरेने बदलू शकतील.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 187)

कृतज्ञता – १८

कोणते तरी संकट आल्याशिवाय लोकांना ‘ईश्वरी कृपे’च्या कार्याची जाणीवच होत नाही; म्हणजे जेव्हा एखादा अपघात घडणार असतो किंवा एखादा अपघात घडलेला असतो आणि त्यातून ते सहीसलामत वाचलेले असतात, तेव्हा लोकांना त्या कृपेची जाणीव होते. पण एखादा प्रवास किंवा तत्सम कोणता प्रसंग, जर विनाअपघात सुरळीत पार पडला, तर ती त्याहूनही अधिक उच्च अपरिमित अशी ‘ईश्वरी कृपा’ आहे, याची त्यांना कधीच जाणीव नसते. म्हणजे खरंतर, काहीही विपरित घडू नये अशा रीतीनेच तेथे सुसंवाद प्रस्थापित झालेला असतो. पण लोकांना मात्र ते अगदी सहजस्वाभाविक असल्यासारखे वाटते.

लोक आजारपणातून जेव्हा पटकन बरे होतात, तेव्हा त्यांच्याठायी कृतज्ञता असते; पण एरवी जेव्हा ते ठणठणीत बरे असतात तेव्हा त्यांना कृतज्ञ असावे असे कधीच वाटत नाही. खरंतर, हीच मोठी आश्चर्याची गोष्ट आहे !

– श्रीमाताजी
(CWM 05 : 406)

कृतज्ञता – १७

(श्रीमाताजी येथे ‘धम्मपदा’तील एका वचनाविषयी विवेचन करत आहेत.)

मानवी प्रगतीसाठी उपयुक्त असणाऱ्या सर्वच धर्मग्रंथांमध्ये नेहमीच असे सांगितलेले आढळते की, जो तुम्हाला तुमचे दोष दाखवून देतो त्या व्यक्तीविषयी तुम्ही कृतज्ञ असले पाहिजे आणि त्याच्या सहवासाची तुम्ही इच्छा बाळगली पाहिजे. पण येथे धम्मपदामध्ये तीच गोष्ट मोठ्या समर्पकपणे सांगितलेली आहे : एखादा दोष तुम्हाला दाखविण्यात आला तर जणू काही तुम्हाला खजिनाच दाखविण्यात आला आहे, असे समजा. म्हणजेच याचा अर्थ असा की, जेव्हा जेव्हा तुम्हाला तुमच्यामध्ये एखादा दोष, अक्षमता, आकलनक्षमतेचा अभाव, दुर्बलता, अप्रामाणिकपणा, तुम्हाला प्रगतीपासून रोखणारे असे जे जे काही तुमच्यामध्ये सापडेल तेव्हा ते म्हणजे जणू काही अद्भुत खजिनाच लाभल्यासारखे तुम्हाला वाटेल.

“अरे देवा, अजून एक दोष!” असे म्हणत न बसता व त्याविषयी खंत बाळगत न बसता, उलट तुम्हाला जणूकाही एखादी अद्भुत उपलब्धी झाली असल्याप्रमाणे आनंद झाला पाहिजे. कारण आजवर जी गोष्ट तुम्हाला प्रगत होण्यापासून रोखत होती, ती गोष्ट आता तुमच्या पकडीत आलेली असते. आणि एकदा का ती गोष्ट तुमच्या पकडीत आली की, तिला खेचून बाहेर काढा. कारण असे मानले जाते की जो योगसाधना करतो, त्याला ज्या क्षणी अमुक एक गोष्ट करण्यास योग्य नाही असे समजते, त्याच क्षणी ती दूर सारणे, बाद करणे आणि नष्ट करणे ही शक्ती त्याच्या ठायी असते.

दोषाचा शोध लागणे ही एक प्राप्ती असते, उपलब्धी असते. जणू काही नुकत्याच बाहेर घालवून दिलेल्या धूसरतेच्या छोट्या कणाची जागा घेण्यासाठी प्रकाशाचा पूर आत शिरला आहे.

तुम्ही जर योगसाधना करत असाल, तर तुम्ही दुर्बलता, नीचता, इच्छाशक्तीचा अभाव, ज्ञानापाठोपाठ सामर्थ्य न येणे ह्या बाबींचा स्वीकार करता कामा नये. एखादी गोष्ट आपल्यात असता कामा नये याची जाणीव होणे आणि तरीही ती तशीच चालू ठेवणे हे दुर्बलतेचे लक्षण असते; ही दुर्बलता कोणत्याही गंभीर अशा योगसाधनेत स्वीकारली जात नाही; अशा संकल्पशक्तीचा अभाव हा व्यक्तीला अप्रामाणिकतेच्या उंबरठ्यावर आणून सोडतो.

अमुक एक गोष्ट असता कामा नये, हे तुम्हाला ज्या क्षणी कळते, तेव्हा ती गोष्ट आपल्यात राहता कामा नये, हे ठरविणारे तुम्हीच असता. कारण ज्ञान आणि सामर्थ्य ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. म्हणजे असे म्हणता येईल की, तुमच्या अस्तित्वाच्या कोणत्याही भागात तुम्ही तुमच्या प्रगतीच्या मध्यवर्ती संकल्पशक्तीला विरोधी असणाऱ्या, वाईट इच्छेच्या छायेला थारा देता कामा नये; कारण तसे केल्याने ज्या अनिष्टाचा तुम्ही नायनाट केला पाहिजे त्याच अनिष्टासमोर तुमच्या प्रगतीची संकल्पशक्ती पौरुषहीन, दुबळी, धैर्यहीन, सामर्थ्यहीन ठरते…

अज्ञानातून घडलेले पाप हे पाप नसते; तो या जगतातील सर्वसाधारण अशा अनिष्टाचा एक भाग असतो; पण तुम्हाला माहीत असूनदेखील तुम्ही जेव्हा पाप करता तेव्हा ते अधिक गंभीर असते. याचा अर्थ असा की, फळामध्ये ज्याप्रमाणे एखादा कृमी दडून बसलेला असतो तसा दुरिच्छेचा एखादा घटक तुमच्यामध्ये दडून बसलेला असतो, त्याला शोधून कोणत्याही परिस्थितीत नष्ट केले पाहिजे, कारण बरेचदा अशा वेळी दाखविलेली दुर्बलता ही पुढे जाऊन कधीच दुरुस्त न होऊ शकणाऱ्या अडचणींचे कारण बनते.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 220-221)

कृतज्ञता – १६

प्राण्यांचे मन अगदी अर्धविकसित असते. अविरत चालणाऱ्या विचारमालिकांमुळे माणसांची जशी छळवणूक होते तशी, प्राण्यांची होत नाही. उदाहरणार्थ, त्यांच्याशी कोणी प्रेमाने वागले तर, त्यांच्यामध्ये अगदी सहजपणे कृतज्ञतेची भावना निर्माण होते.

पण हेच जर माणसांबाबतीत घडले तर, १०० पैकी ९९ वेळा माणसे विचार करायला लागतात. मनाशीच म्हणतात, ”अमुक एक व्यक्ती माझ्याशी चांगली वागली, त्यामध्ये तिचा नक्की काय हेतू असेल बरे?” मानसिक क्रियांपैकी ही एक मोठी दुःखद बाब आहे. मात्र प्राणी यापासून मुक्त असतात आणि म्हणून जेव्हा तुम्ही त्यांच्याशी ममत्वाने वागता तेव्हा, ते अगदी सहजपणे तुमच्याविषयी कृतज्ञ राहतात. त्यांचा विश्वास असतो. त्यांचे प्रेम तशा प्रकारचे असते आणि मग त्याचे रूपांतर अगदी घट्ट अशा जवळिकीमध्ये होते. तुमच्या भोवती भोवती घुटमळत राहण्याची एक अदम्य अशी निकड त्यांना भासू लागते.

त्यात आणखीही काही असते. म्हणजे जर मालक खरोखरच चांगला असेल आणि प्राणी विश्वासू असेल तर, त्यांच्यामध्ये एक प्रकारे प्राणिक आणि आंतरात्मिक शक्तींचे आदानप्रदान होते; हे आदानप्रदान प्राण्यांच्या दृष्टीने खूपच सुंदर, अद्भुत असते; ते त्यांना उत्कट आनंद मिळवून देते. अशा प्रकारे, जेव्हा त्यांना तुमच्या जवळ राहायचे असते आणि जेव्हा तुम्ही त्यांना हृदयाशी कवळून घेता तेव्हा, त्यांना आतूनच ते स्पंदन जाणवते. व्यक्ती त्यांना ती शक्ती देते – प्रेमाचे सामर्थ्य, हळुवारतेचे, सौहार्दाचे, संरक्षणाचे, सारे सारे काही – त्यांना जाणवते आणि त्यांच्यामध्ये त्या व्यक्तीविषयीचा एक खूप गाढ असा अनुबंध निर्माण होतो. इतकेच काय पण त्यामधून, कुत्री, हत्ती आणि घोड्यांसारख्या वरच्या श्रेणीतील प्राण्यांमध्ये तर, अगदी उत्स्फूर्तपणे एक प्रकारची भक्तीची गरज निर्माण होते. (मनाच्या सर्व तार्किकतेनेही किंवा युक्तिवादांनीही ती नाकारता येत नाही.) ती मुळातच अगदी विशुद्ध आणि उत्स्फूर्त अशी भावना असते.

मनुष्यामध्ये मनाचे कार्य सुरू झाले तेव्हा, त्याच्या अगदी प्राथमिक अवस्थेमध्ये, त्याच्या पहिल्यावहिल्या आविष्करणामध्ये, त्याने अनेक गोष्टी बिघडवून टाकल्या, ज्या वास्तविक पूर्वी खूप सुंदर होत्या.

तेव्हा हे उघड आहे की, माणूस जर उच्चतर पातळीवर जाईल आणि त्याच्या बुद्धीचा सुयोग्य उपयोग करेल तर, त्यामुळे गोष्टींना अधिक मूल्य प्राप्त होईल. पण या दोहोंच्या दरम्यान, एक असा प्रांत आहे की, जेथे माणूस त्याच्या बुद्धिमत्तेचा वापर अगदी असभ्य आणि खालच्या पातळीवरून करतो. तो मनाला हिशोबाचे, वर्चस्वाचे, फसवणुकीचे साधन बनवितो आणि त्यामुळे ते मन कुरूप होऊन जाते. मला जीवनात असे काही प्राणी माहीत आहेत की, ज्यांना मी माणसांपेक्षाही अधिक श्रेष्ठ समजत असे. कारण तो घृणास्पद हिशोबीपणा, दुसऱ्यांना फसवायचे आणि स्वतःचा लाभ करून घेण्याची इच्छा त्या प्राण्यांच्या ठिकाणी नसायची. असेही काही प्राणी असतात की, जे माणसाच्या सहवासात आल्यानंतर या साऱ्या गोष्टी शिकतात, पण काही प्राणी असे असतात की, ज्यांच्या ठायी याचा लवलेशही नसतो.

या जगातील चैत्य जाणिवेच्या (psychic consciousness) अनेकविध सुंदर रूपांपैकी, ‘निरपेक्ष, निर्व्याज कृती’ हे एक सर्वोत्तम रूप आहे. (उत्क्रांतीच्या श्रेणीमध्ये प्राणिजगताकडून मनुष्यजगताकडे) तुम्ही मानसिक गतिविधींच्या दिशेने जसजसे वरवर चढू लागता तसतशी ही निरपेक्ष, निर्व्याज कृती दुर्मिळ होऊ लागल्याचे आढळते. कारण बुद्धी आली की त्या बुद्धीच्या बरोबरीने सर्व चलाखी, अक्कलहुशारी, भ्रष्टपणा, देवाणघेवाण यांची सुरुवात होते.

उदाहरणार्थ असे पाहा की, जेव्हा एखादे गुलाबाचे फूल उमलते तेव्हा ते अगदी सहज-स्वाभाविकपणे उमलते. सुंदर असण्याच्या आनंदाने, मधुर सुगंध देण्यासाठी, जीवनाचा आनंद अभिव्यक्त करण्यासाठी ते उमलते; कोणत्याही लाभहानीचा ते विचार करत बसत नाही, त्याला त्यामधून काही मिळवायचे नसते, ते अगदी सहजस्फूर्तपणे, अस्तित्वाच्या आणि जीवनाच्या आनंदाने बहरून येते. आणि आता याच्या जागी, उदाहरण म्हणून मनुष्याचा विचार करू. काही सन्माननीय अपवाद वगळता, ज्या क्षणी मनुष्याचे मन सक्रिय होते त्याच क्षणी मन त्या सौंदर्यापासून आणि हुशारीपासून काही लाभ मिळवू पाहते; त्यापासून काहीतरी मिळावे अशी त्याची अपेक्षा असते, लोकांकडून स्तुती किंवा कौतुक किंवा त्याहीपेक्षा जास्त असा काहीतरी लाभ व्हावा अशी त्याची अपेक्षा असते. परिणामत: चैत्य दृष्टिकोनातून पाहिले असता, गुलाबाचे फूल हे माणसापेक्षा अधिक चांगले असते.

– श्रीमाताजी
(CWM 05 : 239-240)

कृतज्ञता – १५

शारीरिक चेतनेने प्रथम एक गोष्ट समजून घेणे आवश्यक आहे; ती अशी की, आपल्याला जीवनात ज्या अडचणींना सामोरे जावे लागते त्या साऱ्या अडीअडचणी – आपण आपल्याला आवश्यक असणाऱ्या साहाय्यासाठी फक्त आणि फक्त ‘ईश्वरा’वरच विसंबून राहत नाही – या एकाच वास्तवातून उद्भवतात.

वैश्विक ‘प्रकृती’च्या यंत्रणेपासून केवळ ‘ईश्वर’च आपल्याला मुक्त करू शकतो. नव्या वंशाच्या जन्मासाठी आणि विकसनासाठी ही मुक्ती अपरिहार्य आहे. ‘ईश्वरा’ प्रत पूर्ण विश्वासाने आणि कृतज्ञतेने स्वतःचे समग्रतया अर्पण केल्यानेच सर्व अडीअडचणींवर मात केली जाईल.

– श्रीमाताजी
(CWM 16 : 433)

कृतज्ञता – १३

आपल्या अस्तित्वाची प्रत्येक कृती, प्रत्येक क्षण म्हणजे त्या ‘शाश्वता’प्रत सातत्यपूर्वक चाललेले श्रद्धायुक्त आत्मदान असले पाहिजे. आपल्या साऱ्या कृती, मग त्या अगदी महान, असामान्य आणि उदात्त असल्या काय, नाहीतर अगदी किरकोळ, अगदी सर्वसामान्य आणि क्षुल्लक असल्या काय, त्या साऱ्या कृती या ‘आत्मनिवेदित कृती’ (consecrated acts) म्हणून सादर केल्या पाहिजेत. आपल्या व्यक्तिगत प्रकृतीने अशा एकमेव चेतनेमध्ये निवास केला पाहिजे की, जिच्या साऱ्या आंतरिक आणि बाह्य गतिविधी या आपल्या अहंकाराहून श्रेष्ठ आणि आपल्या अतीत असणाऱ्या ‘कोणत्या तरी गोष्टीप्रत’ अर्पित केलेल्या असतील. आपण काय प्रदान करतो किंवा आपण ते कोणाला प्रदान करतो या गोष्टी फारशा महत्त्वाच्या नाहीत, तर त्या गोष्टी आपण सर्व जीवजातामध्ये अंतर्हित असणाऱ्या एकमेव ईश्वरी अस्तित्वालाच अर्पण करत आहोत, ही चेतना आपल्या कृतीमध्ये असली पाहिजे.

– श्रीअरविंद
(CWSA 23 : 111)

कृतज्ञता – १२

(श्रीअरविंद येथे यज्ञबुद्धीने केलेल्या अर्पणाबद्दल सांगत आहेत.) हे अर्पण कोणा व्यक्तींना केलेले असेल, ‘ईश्वरी शक्तीं’ना केलेले असेल, ते ‘विश्वात्मक ईश्वरा’ला केलेले असेल किंवा विश्वातीत असणाऱ्या ‘परमेश्वरा’ला केलेले असेल. त्याचप्रमाणे अर्पण केलेली वस्तू म्हणजे एखादे पान असेल, फुल असेल, पाणी असेल, मुठभर धान्य असेल, अन्नधान्य असेल, किंवा आपल्यापाशी जे जे काही आहे त्या सर्वाचे अर्पण असेल, अगदी सर्वस्वाचे अर्पण असेल. स्वीकारणारे कोणीही असू दे, अर्पण म्हणून दिलेली वस्तू कोणतीही असू दे, अगदी नजीकच्या स्वीकारकर्त्याने जरी ती गोष्ट अव्हेरली किंवा दुर्लक्षित केली तरीही, त्या गोष्टीचे ग्रहण करणारा आणि तिचा स्वीकार करणारा, वस्तुमात्रामध्ये ‘शाश्वत’ रूपाने वसणारा ‘परमेश्वर’च असतो. विश्वाच्या अतीत असणारा जो परमेश्वर, तो येथेसुद्धा आहे, मग तो भले कितीही परिवेष्टित (veiled) का असेना, तो आपल्यामध्ये आहे, या विश्वामध्ये आहे आणि विश्वाच्या घडामोडीमध्येसुद्धा तो आहे. तो येथे सर्वसाक्षी ‘साक्षीदार’ या नात्याने उपस्थित आहे आणि तोच आपल्या सर्व कर्मांचा ‘ग्रहणकर्ता’ आणि आपल्या सर्व कर्मांचा गुप्त ‘स्वामी’ आहे. आपल्या साऱ्या कृती, आपले सारे प्रयत्न, इतकेच काय पण आपली पापं आणि आपले अडखळणे, आपले दुःखकष्ट, आपले संघर्ष या साऱ्या गोष्टी जाणते-अजाणतेपणे, ज्ञात-अज्ञातपणे, प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे, अंतिमतः त्या ‘एका ईश्वरा’कडूनच संचालित होतात. त्याच्या अगणित रूपांद्वारे सारे काही ईश्वराभिमुखच झालेले असते आणि त्या असंख्य रूपांच्या माध्यमातून सारे काही त्या ‘सर्वव्यापी’ असलेल्या एकमेवाद्वितीय परमेश्वरालाच अर्पण होत असते. आपण कोणत्याही रूपाच्या माध्यमातून, कोणत्याही भावाने त्याच्याकडे गेलो तरीही, त्या त्या रूपाच्या माध्यमातून, आणि त्या त्या भावाने तो ईश्वरच आपल्या यज्ञाचा स्वीकार करतो.

– श्रीअरविंद
(CWSA 23 : 110)