कृतज्ञता – १४

प्रश्न : ‘ईश्वरी कृपा’ कृतज्ञतापूर्वक स्वीकारण्याचा मार्ग कोणता?

श्रीमाताजी : सर्वप्रथम तुम्हाला त्याची आवश्यकता जाणवली पाहिजे.

हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे त्या ईश्वरी कृपेविना तुम्ही असाहाय्य आहात याची जाणीव करून देणारी, एक विशिष्ट अशी आंतरिक विनम्रता असणे आवश्यक आहे. खरोखरच, तुम्ही त्याविना अपूर्ण आणि शक्तिहीन असता. सुरुवात करायची तर ही पहिली गोष्ट आहे. ही पहिली अट आहे…

…आणि मग, ज्या परिस्थितीमध्ये तुम्ही सापडलेले असता, त्या परिस्थितीतून केवळ ती ईश्वरी कृपाच तुम्हाला तारू शकते, तीच तुम्हाला उपाय सुचवू शकते आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी लागणारे सामर्थ्यदेखील तीच देऊ शकते, फक्त ईश्वरी ‘कृपा’च हे सारे करू शकते, अशी जाणीव जर तुम्हाला झाली तर, अगदी स्वाभाविकपणे तुमच्यामध्ये एक उत्कट आस निर्माण होते, चेतना खुलेपणात अभिव्यक्त झालेली असते. तुम्ही जर धावा कराल, आस बाळगाल आणि प्रतिसाद मिळावा अशी आशा बाळगाल तर, अगदी स्वाभाविकपणे तुम्ही त्या ईश्वरी ‘कृपे’प्रत खुले होता.

आणि नंतर ईश्वरी ‘कृपा’ तुम्हाला जो प्रतिसाद देते, त्याकडे तुम्ही अगदी बारकाईने लक्ष दिले पाहिजे, ती ‘कृपा’ तुम्हाला तुमच्या त्रासामधून बाहेर काढते, ती तुमच्या समस्येवर उपाय सुचविते किंवा तुमच्या अडचणीमधून बाहेर पडण्यास तुम्हाला साहाय्य करते. पण एकदा का तुमची त्या त्रासापासून सुटका झाली आणि तुम्ही त्या अडचणीमधून बाहेर आलात तर, तुम्हाला त्यातून बाहेर काढणारी ‘ईश्वरी कृपा’च होती, हे तुम्ही विसरता कामा नये; तुम्हीच स्वतःला त्या परिस्थितीतून बाहेर काढले आहे, असे समजता कामा नये. हा खरोखरच, महत्त्वाचा मुद्दा आहे. अडचण दूर झाली की, लगेचच बहुसंख्य लोक असे म्हणतात, “त्या अडचणीतून मी स्वतःला कसे बाहेर काढले, माझे मलाच माहीत.”

तर हे सारे असे असते. आणि नंतर तुम्ही कडीकोयंडा लावून दरवाजा बंद करून टाकता आणि त्यानंतर मग तुम्ही काहीही ग्रहण करू शकत नाही. तुमच्या अशा प्रकारच्या आंतरिक मूर्खपणापासून स्वतःला बाहेर काढण्यासाठी तुम्ही स्वतः काहीच करू शकत नाही, याची तुम्हाला पुन्हा एकदा जाणीव व्हावी म्हणून, पुन्हा एखादा तीव्र झटका, एखादी भयानक अडचण आवश्यक होऊन बसते. कारण आपण शक्तिहीन आहोत याची जाणीव जेव्हा तुमच्यामध्ये वाढू लागते तेव्हाच, तुम्ही थोडेसे खुले आणि लवचीक होऊ लागता. कारण, तुम्ही जे काही करता ते तुमच्या स्वतःच्या कौशल्यावर आणि तुमच्या स्वतःच्या क्षमतांवर अवलंबून आहे असे जोपर्यंत तुम्हाला वाटत असते तोपर्यंत, तुम्ही एकच दरवाजा बंद करता असे नाही, तर खरोखरच तुम्ही एकापाठोपाठ अनेक दरवाजे बंद करत असता, अगदी कडीकोयंडे लावून ते बंद करत असता. तुम्ही जणू काही एखाद्या गढीमध्ये स्वतःला बंद करून घेता आणि मग त्यामध्ये कोणत्याच गोष्टीचा प्रवेश होऊ शकत नाही. ही मोठीच उणीव आहे, व्यक्ती चटकन साऱ्या गोष्टी विसरून जाते. स्वाभाविकपणे ती स्वतःच्याच क्षमतांवर समाधानी राहते.

– श्रीमाताजी
(CWM 06 : 322-323)

कृतज्ञता – ३१

आज सायंकाळी आपण श्रीअरविंदांच्या स्मृतींचे चिंतन करू, त्यांनी दाखविलेल्या मार्गाचे ध्यान करू, त्यांच्याप्रत असलेल्या कृतज्ञतेचे ध्यान करू. त्यांनी दाखविलेला मार्ग आपल्यामध्ये जीवित राहावा यासाठी आपण त्या मार्गाचे ध्यान करू. त्यांनी आपल्यासाठी आजवर जे काही केले आणि त्यांच्या सदा प्रकाशमान, सचेतन आणि सक्रिय चेतनेमध्ये – महान साक्षात्कारासाठी ते आजही जे काही करत आहेत – जो साक्षात्कार या पृथ्वीवर केवळ घोषित करण्यासाठीच नव्हे तर, तो प्रत्यक्षात उतरविण्यासाठी ते आले आहेत आणि तो मूर्त रूपात आणण्यासाठी ते आजही कार्यरत आहेत, त्या साऱ्याबद्दल आपण जे ‘कृतज्ञता’पूर्वक देणे लागतो, त्यासाठी आपण ध्यान करू.

– श्रीमाताजी
(CWM 09 : 172)

कृतज्ञता – २९

सर्व अहंकार आणि सर्व अंधकार नाहीसा करण्यासाठी, कृतज्ञतेची शुद्ध, उबदार, मधुर आणि तेजस्वी ज्योत आपल्या हृदयामध्ये कायमच प्रज्वलित असली पाहिजे. साधकाला त्याच्या उद्दिष्टाप्रत घेऊन जाणाऱ्या ‘परमेश्वरी कृपे’ बद्दलच्या कृतज्ञतेची ही ज्योत कायमच प्रज्वलित असली पाहिजे. व्यक्ती जितकी अधिक कृतज्ञ राहील, तिला ईश्वरी कृपेच्या कृतीची जेवढी अधिक जाणीव असेल आणि त्याबद्दल ती जेवढी अधिक कृतज्ञ राहील, तेवढा मार्ग जवळचा होईल.
*
अहंकार हा आपल्याला काय हवे आहे आणि आपल्यापाशी काय नाही, याचा विचार सातत्याने करत असतो. अहंकार सतत याच विचारांनी व्याप्त असतो.

आपल्याला काय प्रदान करण्यात आलेले आहे, याची आत्म्याला जाणीव असते आणि तो अनंत अशा कृतज्ञतेमध्ये निवास करत असतो.

– श्रीमाताजी
(Bulletin 1964 – 08 : 100), (CWM 14 : 257)

कृतज्ञता – ३०

अंधकाराचा काळ वारंवार येत असतो आणि ही गोष्ट सार्वत्रिक असते. अशा वेळी सहसा, कधी आध्यात्मिक रात्री तर कधी पूर्ण प्रकाशाचे दिवस, असे आलटूनपालटून येत असतात, हे जाणून, कोणतीही काळजी न करता केवळ शांत राहणे पुरेसे असते. परंतु तुम्हाला शांतीमध्ये स्थिर राहता यावे यासाठी म्हणून तुम्ही, तुमच्या हृदयामध्ये ‘ईश्वरा’विषयी कृतज्ञता बाळगली पाहिजे. ‘ईश्वर’ तुम्हाला जे साहाय्य करतो त्याबद्दलची ही कृतज्ञता असली पाहिजे. परंतु जर ही कृतज्ञताही झाकोळली गेली तर मात्र अंधकाराचा कालावधी दीर्घकाळ राहण्याची शक्यता असते. असे असले तरी एक वेगवान आणि परिणामकारक उपायदेखील असतो, तो असा की : शुद्धीकरणाची ज्योत तुमच्या हृदयामध्ये कायम प्रज्वलित ठेवली पाहिजे. प्रगतीची आस, उत्कटता, आत्मनिवेदनाची इच्छा ही कायम ज्वलंत असली पाहिजे. जे कोणी प्रामाणिक असतात त्यांच्या हृदयामध्ये ही ज्योत प्रज्वलित होते; मात्र तुम्ही तुमच्या कृतघ्नपणाच्या राखेने ती ज्योत विझू देता कामा नये.

– श्रीमाताजी
(CWM 14 : 246-247)

कृतज्ञता – २८

कृतज्ञता व्यक्त करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे आपण आपल्यामधील अहंकारावर मात केली पाहिजे आणि या रूपांतरणाच्या दिशेने सातत्यपूर्ण प्रयत्न केले पाहिजेत. ‘इतरजण तरी कुठे रूपांतरित झाले आहेत,’ या सबबीखाली मानवी अहंभाव स्वतःचा परित्याग करण्यास नकार देतो. परंतु ही एक प्रकारे त्याच्यावर असणारी दुरिच्छेची पकड असते, कारण इतर काय करतात किंवा काय करत नाहीत याकडे लक्ष न देता, स्वतःमध्ये रूपांतर घडविणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असते.

हे रूपांतर, अहंकाराचा निरास करणे हा स्थायी शांती आणि आनंद मिळविण्याचा एकमेव मार्ग आहे, हे जर लोकांना समजले तर मग आवश्यक प्रयत्न करण्यास ते संमती देतील. हा ठाम विश्वासच त्यांच्यामध्ये जागृत करण्याची आवश्यकता आहे.

प्रत्येकाला हे वारंवार सांगितले पाहिजे की, तुमच्या अहंकाराचा निरास करा म्हणजे शांती तुमच्यावर सत्ता प्रस्थापित करेल.

‘ईश्वरी’ साहाय्य प्रामाणिक अभीप्सेला नेहमीच प्रतिसाद देते.

– श्रीमाताजी
(CWM 16 : 428)

कृतज्ञता – २७

अहंकारी मनाचा दृष्टिकोन असा असतो की, माझ्या इच्छांची पूर्तता करण्यासाठी साऱ्या जगाचे नुकसान झाले तरी हरकत नाही. असे अहंकारी मन त्याची तत्त्वे साऱ्यांवर लादू पाहत असते.

दिव्य दृष्टीला मात्र, तत्त्व किंवा इच्छावासना, एकसारख्याच भासतात. कारण तिच्या दृष्टीने, इच्छावासना म्हणजे प्राणाचा लहरीपणा असतो तर तत्त्व हा मनाचा लहरीपणा असतो.

– श्रीमाताजी
(CWM 14 : 342)

कृतज्ञता – २६

(एक साधक श्रीमाताजीच्या ‘चार तपस्या आणि चार मुक्ती’ लेखामधील पुढील वचन वाचतो…)

“…अशा व्यक्ती पूर्णतः ईश्वराच्या झालेल्या असतात; त्यांच्या जीवनातील साऱ्या घटना या ईश्वरी इच्छेची अभिव्यक्ती असतात आणि त्या साऱ्या घटना अशा व्यक्ती केवळ शांत शरणागतीने स्वीकारतात असे नाही तर, त्या घटनांचा स्वीकार त्या व्यक्ती कृतज्ञतेने करतात; कारण त्यांच्या बाबतीत जे काही घडते ते त्यांच्या भल्यासाठीच घडते याची अशा व्यक्तींना पूर्ण खात्री असते.”

प्रश्न : वरील उताऱ्यामध्ये उद्धृत केल्याप्रमाणे, शांत शरणागती आणि कृतज्ञ शरणागती यामध्ये फरक काय असतो?

श्रीमाताजी : शांत शरणागती आणि कृतज्ञ शरणागती यामधील फरक तुम्हाला जाणून घ्यायचा आहे का? ठीक आहे… तुम्हाला जेव्हा एखादा आदेश मिळतो तेव्हा तुम्ही त्या आदेशाचे बरेचदा नाखुषीने पालन करता कारण, तुम्ही शरणागती पत्करण्याचा निर्धार केलेला असतो आणि त्यामुळे तुम्ही कोणत्याही खुषीविना किंवा आनंदाविना, अगदी शुष्कपणे आणि वरवर त्या आदेशाचे पालन करता आणि तुम्ही स्वतःला सांगता, ”मला अमुक अमुक करायला सांगण्यात आले आहे आणि त्यामुळे आता मी त्याप्रमाणे करत आहे.” याचा अर्थ असा की, तुम्ही काही समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही आणि तुम्हाला जे काही करायला सांगण्यात आलेले असते, त्याचे स्वखुषीने पालन करण्याचा तुम्ही प्रयत्न करत नाही. ही झाली नाखुषीने पत्करलेली शरणागती. तुम्ही तुमच्या नियतीचा स्वीकार करता आणि तुम्ही तक्रार करत नाही ती त्यामुळेच! कारण तुम्ही तक्रार करायची नाही असा निश्चय केलेला असतो, या निश्चयामुळेच तुम्ही तक्रार करत नाही, अन्यथा तुम्ही तक्रार केलीच असती.

दुसरा प्रकार म्हणजे अमुक एक आदेश का देण्यात आला आहे ते समजून घेणे, त्याच्या आंतरिक मूल्याचे आकलन करणे, आणि जे करण्यास सांगण्यात आलेले आहे, ते व्यक्तीने स्वतःच्या सामर्थ्यानिशी, ज्ञानानिशी, आनंदाने अभिव्यक्त करण्याची इच्छा बाळगणे; आणि त्याचा परिणाम म्हणून ईश्वर तुमच्या अधिक सन्निध येण्यासाठी आणि तुमचे पूर्ण समाधान करण्यासाठी बांधील असतो. अशा रीतीने तुम्ही आनंदी होता, समाधानी होता आणि मग तुम्ही त्याला सहकार्य करता. त्यामुळे बराच फरक पडतो.

– श्रीमाताजी
(CWM 06 : 63-64)

कृतज्ञता – २५

निराशा आपल्याला कोठेच घेऊन जात नाही. सुरुवातीलाच एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आपण स्वतःलाच एक गोष्ट सांगितली पाहिजे की, आपण प्रगती करत आहोत की नाही, हे जाणण्यासाठी आपण पूर्णतः अक्षम असतो. कारण आपल्याला जेव्हा साचलेपण (stagnation) आल्यासारखे वाटते तेव्हा ती स्थिती बरेचदा दीर्घकाळाची असू शकते, परंतु ती निश्चितच अंतहीन नसते तर ती पुढे झेप घेण्यासाठीची पूर्वतयारी असते. कधी कधी या पूर्वतयारीचा कालावधी काही आठवडे किंवा महिने चालू असल्याचे आपल्या निदर्शनास येते. आणि नंतर दीर्घकाळपर्यंत ज्याची तयारी चालू होती ती गोष्ट एकदम अचानक प्रत्यक्षात उतरलेली दिसून येते आणि मग आपल्याला बराच लक्षणीय बदल झालेला दिसून येतो आणि हा बदल एकाच वेळी अनेक बाबतीत झालेला असतो.

योगातील सर्व गोष्टींप्रमाणेच, प्रगतीसाठी केलेले प्रयत्न हे देखील प्रगतीसाठी केलेल्या प्रयत्नांच्या प्रेमाखातरच केले गेले पाहिजेत. प्रयत्नांचा आनंद, प्रगतीची आस या गोष्टी स्वयमेव पुरेशा असल्या पाहिजेत, त्या त्याच्या परिणामांवर अवलंबून असता कामा नयेत. व्यक्तीने योगामध्ये केलेली प्रत्येक कृती ही, ती कृती करण्याच्या आनंदासाठीच केली पाहिजे, त्यापासून व्यक्तीला ज्या फळाची अपेक्षा असते, त्या फळासाठी ती कृती व्यक्तीने करता कामा नये. खरोखरच, जीवनामध्ये नेहमीच, कोणत्याही गोष्टीचे फळ आपल्या हाती नसते. आपल्याला जर योग्य दृष्टिकोन बाळगण्याची इच्छा असेल तर त्यासाठी आपण काय केले पाहिजे? आपण जे करणे आवश्यकच आहे, तीच गोष्ट आपण अगदी उत्स्फूर्तपणे केली पाहिजे, ती गोष्ट आपल्याला जाणवली पाहिजे, आपण त्या गोष्टीचाच विचार केला पाहिजे, आणि त्याचा काहीतरी परिणाम साध्य करून घेण्याच्या दृष्टीने नव्हे तर, ती गोष्ट मिळविण्यासाठीच धडपड केली पाहिजे. आपण ज्या क्षणी परिणामाचा विचार करायला लागतो त्या क्षणीच सौदेबाजी करायला सुरुवात करतो आणि अशा रीतीने त्या प्रयत्नांमधील सारी प्रामाणिकता हरवून जाते. तुम्ही प्रगतीसाठी प्रयत्न करता कारण तुम्हाला प्रयत्न करण्याची, प्रगती करण्याची एक अनिवार्य अशी निकड आतूनच जाणवते; आणि हे प्रयत्न म्हणजे तुम्ही तुमच्या अंतरंगातील ‘ईश्वरी चेतने’ला, ‘विश्वा’तील ‘ईश्वरी चेतने’ला अर्पण केलेली भेट असते, कृतज्ञता व्यक्त करण्याचा, स्वतःला अर्पण करण्याचा तो तुमचा मार्ग असतो…

समजा, तुम्हाला प्रगती करण्याची इच्छा आहे, तुम्ही स्वतःवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहात, उदाहरणार्थ, तुम्हाला तुमच्यातील विशिष्ट दोषांवर मात करायची आहे, कमतरतेवर, उणिवांवर मात करायची आहे पण तुमच्या प्रयत्नांचे तुम्हाला कमीअधिक परिणाम लवकरात लवकर दिसून यावेत अशी तुमची अपेक्षा असेल तर, अशा वेळी तुमच्या प्रयत्नांमधील सर्व प्रामाणिकपणा तुम्ही हरवून बसता, कारण आता तो एक व्यवहार बनलेला असतो. तुम्ही म्हणता, ”मी आता प्रयत्न करणार आहे, पण ते याचसाठी की, त्या प्रयत्नांच्या मोबदल्यात मला अमुक अमुक गोष्ट हवी आहे.” अशा वेळी तुमच्यातील उत्स्फूर्तता, सहजता नाहीशी झालेली असते.

तेव्हा दोन गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. परिणाम काय असायला हवा हे ठरविण्यासाठी आपण अक्षम असतो. आपण जर आपला विश्वास ईश्वरावर ठेवला, आणि आपण जर म्हणालो की, ”मी आता सारे काही प्रदान करू इच्छितो, अगदी सारे काही, मला जे जे देणे शक्य आहे, ते ते सारे प्रयत्न, एकाग्रता या साऱ्या गोष्टी मी देऊ इच्छितो आणि त्याच्या मोबदल्यात मला काय द्यायचे किंवा काही द्यायचे की नाही, हे देखील तो ईश्वरच ठरवेल आणि त्याचे परिणाम काय असतील हे मला माहीत नाहीत.” आपल्यामधील कोणतीही गोष्ट रूपांतरित होण्याआधीच आपल्याला आपण कोणती दिशा पकडणार आहोत, कोणता मार्ग निवडणार आहोत याविषयी काही कल्पना असते का? या रूपांतरानंतर कोणता आकार त्याला प्राप्त होणार आहे, याची थोडीतरी कल्पना आपल्याला असते का ? नाही, अजिबात नसते. त्यावेळी, ती केवळ आपली कल्पना असते आणि सहसा जे परिणाम घडून येणार आहेत त्यांना आपण मोठ्या प्रमाणात मर्यादित करतो, आणि त्यांना आपण अगदी किरकोळ, क्षुद्र, वरवरचे आणि सापेक्ष बनवितो. खरोखरच परिणाम काय असू शकतात, काय असायला हवेत, ते आपल्याला कळत नाहीत. आपल्याला ते नंतर कळतात. जेव्हा तो परिणाम घडून येतो तेव्हा आपण मागे वळून बघतो, आपण म्हणतो, ”अच्छा! म्हणजे माझी वाटचाल या दिशेने चालू होती तर…” पण आपल्याला मात्र ते नंतर, उशिरा समजते. त्याआधी आपल्याला त्याची फक्त धूसर कल्पना असते आणि ती कल्पना आपल्या खऱ्या प्रगतीच्या, खऱ्या रूपांतराच्या तुलनेत काहीशी वरवरची, बालिश असते.

तेव्हा पहिला मुद्दा हा की, आपल्याला एक आस असते पण त्याचे खरे परिणाम काय असायला हवेत हे आपल्याला खऱ्या अर्थाने कळू शकत नाहीत. एका ईश्वरालाच केवळ ते कळू शकतात.

आणि दुसरा मुद्दा असा की, आपण जर ईश्वराला असे सांगितले की, ”मी तुला माझे प्रयत्न अर्पण करत आहे, पण त्या बदल्यात मला माझी प्रगती झालेली हवी आहे, अन्यथा मी तुला काहीही देणार नाही.” तर ही निव्वळ सौदेबाजी झाली.

उत्स्फूर्त, सहजस्वाभाविकपणे केलेली कृती, मी या व्यतिरिक्त अन्य काहीही करू इच्छित नाही असे म्हणून व्यक्तीने केलेली कृती आणि सदिच्छायुक्त भावनेने अर्पण केलेली कृती ही अशी एकमेव कृती असते की, जिला खरोखर काहीतरी मूल्य असते.

– श्रीमाताजी
(CWM 09 : 316-318)

कृतज्ञता – २४

प्रार्थना ही बरीचशी बाह्य गोष्ट आहे, ती बहुधा कोणत्यातरी एका विशिष्ट बाबीसंबंधी असते आणि ती नेहमीच सूत्रबद्ध असते कारण सूत्रातून प्रार्थना तयार होते. एखादी व्यक्ती जर अभीप्सा बाळगत असेल; आणि जरी ती त्या व्यक्तीला प्रार्थनेसमान भासत असेल तरीही प्रार्थनेपेक्षा ‘अभीप्सा’ सर्वच बाबतीत कितीतरी सरस ठरते. अभीप्सा ही प्रार्थनेपेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात ‘ईश्वरा’च्या जवळ असते कारण अभीप्सा बाळगणारी व्यक्ती तिला, जे काही ईश्वरार्पण करायचे असते ते, व्यक्ती ‘स्व’ला विसरून करत असते.

तसेच ती व्यक्ती जे काही बनू इच्छिते किंवा जे काही करू इच्छिते त्यामध्ये निमग्न होऊन ती गोष्ट ती व्यक्ती करत असते. तुम्ही काहीतरी मागण्यासाठी प्रार्थना करू शकता, तसेच ‘ईश्वरा’ने तुम्हाला जे काही देऊ केले आहे त्याबद्दल त्याचे आभार मानण्यासाठीसुद्धा तुम्ही प्रार्थना करू शकता, आणि अशी प्रार्थना ही अधिक चांगली! अशी प्रार्थना म्हणजे कृतज्ञतापूर्वक केलेली कृती असते, असे तिच्याबाबत म्हणता येईल. ‘ईश्वरा’ने तुमच्याबाबतीत जो कनवाळूपणा दाखविला, त्याने तुमच्यासाठी जे काही केले, त्याबद्दलची कृतज्ञता म्हणून, तसेच तुम्हाला त्या ‘ईश्वरा’मध्ये जे काही आढळून आले त्याची स्तुती करायची तुमची इच्छा आहे म्हणून तुम्ही प्रार्थना करू शकता. या सर्व गोष्टींना प्रार्थनेचे रूप येऊ शकते. ही निश्चितपणे सर्वोच्च प्रार्थना असते कारण ती केवळ स्वत:मध्येच मग्न नसते, ती अहंमन्य अशी प्रार्थना नसते.

– श्रीमाताजी
(CWM 05 : 141)

कृतज्ञता – २३

कधीकधी व्यक्ती अगदी उदारतेने केलेली एखादी कृती पाहते, जगावेगळे असे काहीतरी तिच्या कानावर पडते; उदारता, आत्म्याची थोरवी किंवा एखाद्या धाडसी वीराने केलेली कृती व्यक्ती पाहते, कधीकधी काही विशेष प्रतिभासंपन्न अशा गोष्टी ती पाहते किंवा एखादी गोष्ट अत्यंत असाधारण पद्धतीने, सुंदरतेने केली असल्याचे व्यक्ती पाहते, ते करणाऱ्या व्यक्तीशी तिची गाठभेठ होते; अशा प्रत्येक वेळी व्यक्तीच्या मनामध्ये अचानकपणे एक प्रकारचा उत्साह, एक प्रकारचे कौतुक, एक प्रकारची कृतज्ञता दाटून येते आणि त्यातूनच अभूतपूर्व अशा आनंदाची, एका उबदार, प्रकाशमय, चेतनेच्या एका नव्या स्थितीकडे घेऊन जाणारी द्वारे खुली होतात. हा देखील मार्गदर्शक सूत्र पकडण्याचा एक मार्ग आहे.

*

‘ईश्वरा’प्रत कृतज्ञता व्यक्त करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे आनंदी राहणे.

‘ईश्वरा’ प्रत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, शांतीपूर्वक आनंदी राहण्यासारखा अन्य कोणताही चांगला मार्ग नाही.

– श्रीमाताजी
(CWM 08 : 405), (CWM 14 : 154-155)