साधना, योग आणि रूपांतरण – ७६

(कधीकधी) असे होते की साधकांना अवरोहणाचा अनुभव येतो; पण त्यांना हे ‘अवरोहण’ (descent) आहे हे लक्षात येत नाही. कारण त्यांना केवळ त्याच्या परिणामाचीच जाणीव होते. प्रचलित योग आध्यात्मिक मनाच्या पलीकडे जात नाही. अनेकांना मस्तकाच्या शिखरावर ब्रह्माशी ऐक्य झाल्याचे जाणवते, परंतु त्यांना मस्तक-शिखराहूनही वर असलेल्या चेतनेची जाणीव नसते. त्याचप्रमाणे प्रचलित योगामध्ये व्यक्तीला जागृत झालेल्या आंतरिक चेतनेच्या (कुंडलिनीच्या) ब्रह्मरंध्राप्रत होणाऱ्या आरोहणाची जाणीव असते; (येथे प्रकृती ब्रह्म-चेतनेशी युक्त होते.) मात्र व्यक्तीला अवरोहणाचा अनुभव येत नाही.

काही जणांना अशा गोष्टी अनुभवास आल्याही असतील पण, त्यांचे स्वरूप, त्यांचे तत्त्व किंवा समग्र साधनेमधील त्यांचे स्थान त्यांना उमगले होते की नाही, कोण जाणे? मला स्वतःला जोपर्यंत असा अनुभव आला नव्हता तोपर्यंत, मी तरी हे इतर कोणाकडून कधी ऐकले नव्हते. याचे कारण पूर्वीचे योगी जेव्हा आध्यात्मिक मनाच्या अतीत जात असत, तेव्हा ते समाधीमध्ये निघून जात असत; याचा अर्थ असा की, (आध्यात्मिक मनाच्या वर, ब्रह्मरंध्राच्या वर असणाऱ्या) या उच्चतर पातळ्यांविषयी सजग होण्याचा त्यांनी कधी प्रयत्न केला नव्हता. ‘अतिचेतनेमध्ये (Superconscient) निघून जाणे’ हे त्यांचे उद्दिष्ट होते. ‘जाग्रत चेतनेमध्ये (waking consciousness) अतिचेतन उतरविणे’ हे त्यांचे उद्दिष्ट नव्हते, परंतु हे माझ्या योगाचे उद्दिष्ट आहे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 377-378)

श्रीअरविंद