साधना, योग आणि रूपांतरण – १६

साधक : ध्यानाला बसणे ही एक अत्यावश्यक साधना नाही का? आणि त्यातून ‘ईश्वरा’शी अधिक उत्कट आणि सघन ऐक्य प्राप्त होत नाही का?

श्रीमाताजी : तसे होऊ शकते. परंतु आपण काही साधनेसाठी साधना करत नाही. तर, आपण जे काही करत असू त्यामध्ये, सदा सर्वकाळ, आपल्या प्रत्येक कृतीमध्ये, प्रत्येक हालचालीमध्ये ‘ईश्वरा’वर एकाग्र असणे ही गोष्ट साध्य करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. इथे (श्रीअरविंद आश्रमात) असे काही जण आहेत की ज्यांना ध्यान करायला सांगण्यात आले आहे. पण असेही काही जण आहेत की ज्यांना ध्यान करण्यास अजिबात सांगण्यात आलेले नाही. परंतु ते प्रगती करत नाहीयेत असा विचार मात्र करता कामा नये. तेही साधनाच करत आहेत पण ती वेगळ्या स्वरूपाची साधना आहे. कर्म करणे, भक्तिभावाने कर्म करणे आणि आंतरिक निवेदन (conscecration) करणे ही देखील एक प्रकारची आध्यात्मिक साधनाच असते. केवळ ध्यानाच्या वेळीच नव्हे तर सर्व परिस्थितीमध्ये, जीवनातील प्रत्येक क्रियाकलापांमध्ये ‘ईश्वरा’शी नित्य तादात्म पावून राहणे हे अंतिम ध्येय आहे.

असे काही जण आहेत की, जे ध्यानाला बसले असताना, त्यांना जी स्थिती अतिशय छान, आनंदी वाटते अशा स्थितीत ते जातात. ते त्यामध्ये आत्मसंतुष्ट होऊन राहतात आणि जगाला विसरतात. पण जर त्यांच्या त्या ध्यानामध्ये कोणी अडथळा आणला तर, ते त्यातून अगदी रागारागाने आणि अस्वस्थ होऊन बाहेर पडतात कारण त्यांच्या ध्यानामध्ये कोणीतरी बाधा आणलेली असते. ही काही आध्यात्मिक प्रगतीची किंवा साधनेची खूण नव्हे. काही जण असेही असतात की, जे ध्यान करणे म्हणजे ‘ईश्वरा’चे ऋण चुकते करणे आहे असे समजतात. आठवड्यातून एकदा चर्चला गेलो की आपले ‘देवा’विषयी जे कर्तव्य होते ते आपण पार पाडले असे समजणाऱ्या माणसांसारखी ही माणसं असतात.

तुम्हाला ध्यानात शिरण्यासाठी जर प्रयत्न करावे लागत असतील तर तुम्ही आध्यात्मिक जीवन जगण्यापासून अजून खूप दूर आहात. परंतु तुम्हाला जर ध्यानातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करावे लागत असतील तर मग मात्र तुमचे ध्यान हे तुम्ही आध्यात्मिक जीवन जगत असल्याचे द्योतक आहे, असे म्हणता येईल.

– श्रीमाताजी (CWM 03 : 20-21)

श्रीमाताजी