साधना, योग आणि रूपांतरण – १३

साधक : ध्यान (meditation) आणि एकाग्रता (concentration) यांमध्ये काय फरक आहे?

श्रीमाताजी : ध्यान ही फक्त मानसिक कृती असते, त्यामध्ये फक्त मनोमय पुरुषाला स्वारस्य असते. ध्यान करताना तुम्ही एकाग्रही होऊ शकता पण ती एकाग्रता मानसिक असते; तुम्हाला त्यातून शांती लाभू शकते पण ती फक्त मानसिक शांती असते आणि त्यावेळी तुमच्या अस्तित्वाच्या इतर घटकांनी (प्राण व शरीर) तुमच्या ध्यानामध्ये अडथळा उत्पन्न करू नये म्हणून, ते घटक अचल आणि अक्रिय ठेवले जातात. तुम्ही दिवसातील वीस तास ध्यानामध्ये व्यतीत करू शकता आणि तरीदेखील उरलेल्या चार तासांमध्ये तुम्ही अगदी अतिसामान्य व्यक्तीच राहू शकता; कारण ध्यानावस्थेमध्ये फक्त तुमचे मनच व्यस्त असते – तेव्हा तुमच्या उर्वरित अस्तित्वाने म्हणजे तुमच्या प्राणाने आणि शरीराने ध्यानामध्ये काही अडथळा आणू नये म्हणून, त्यांना एका दबावाखाली ठेवले जाते. ध्यानामध्ये अस्तित्वाच्या या (मनाव्यतिरिक्त) घटकांसाठी थेटपणे काहीच केले जात नाही.

या अप्रत्यक्ष कृतीचा निश्चितपणे काही परिणाम होऊ शकतो, पण… मला अशी काही माणसं माहीत आहेत की ज्यांची ध्यान करण्याची क्षमता लक्षणीय होती पण जेव्हा ते ध्यानावस्थेमध्ये नसत तेव्हा ते अगदीच सामान्य असत, एवढेच काय पण कधीकधी ती माणसं दुष्प्रवृत्तीची देखील असत. आणि त्यांच्या ध्यानामध्ये जर का कोणी अडथळा आणला तर ती माणसं संतप्त होत असत. कारण फक्त मनावरच प्रभुत्व संपादन करायला ते शिकलेले होते, अस्तित्वाच्या उरलेल्या घटकांवर प्रभुत्व मिळवायला ते शिकलेले नव्हते.

एकाग्रता ही अधिक सक्रिय स्थिती असते. तुम्ही मानसिक रीतीने एकाग्रता करू शकता; तुम्ही प्राणिक, आंतरात्मिक, शारीरिकरित्या एकाग्र होऊ शकता तसेच तुम्ही सर्वांगीण रीतीने सुद्धा एकाग्रता साधू शकता. एकाग्रता किंवा स्वतःच्या सर्व घटकांना एका बिंदुवर एकत्रित करण्याची क्षमता ही ध्यानापेक्षा अधिक कठीण असते. तुम्ही तुमच्या अस्तित्वाचा किंवा चेतनेचा एखादाच भाग एकत्रित करू शकता किंवा तुम्ही तुमची चेतना समग्रतया एकत्रित करू शकता किंवा तिचे काही अंशभाग एकत्र करू शकता; म्हणजेच एकाग्रता ही आंशिक, संपूर्ण किंवा सर्वांगीण असू शकते आणि त्या प्रत्येक प्रकारामध्ये तिचे परिणाम भिन्न भिन्न असतात.

तुमच्यापाशी जर एकाग्रता करण्याची क्षमता असेल तर, तुमचे ध्यान हे अधिक सहज आणि स्वारस्यपूर्ण होईल. परंतु तुम्ही एकाग्रता न करतादेखील ध्यान करू शकता. बरेचजण ध्यानामध्ये संकल्पनांच्या साखळीचा मागोवा घेत जातात. मात्र हे ‘ध्यान’ असते, याला ‘एकाग्रता’ म्हणता येत नाही.

– श्रीमाताजी (CWM 04 : 07-08)

श्रीमाताजी