साधना, योग आणि रूपांतरण – १२
(येथे श्रीअरविंद concentration – एकाग्रता आणि meditation – ध्यान यामधील फरक स्पष्ट करून सांगत आहेत.)
चेतना जेव्हा एका विशिष्ट स्थितीमध्ये (उदा. शांतीच्या) किंवा विशिष्ट स्पंदनावर, विशिष्ट प्रयत्नावर (उदा. अभीप्सा, संकल्प, श्रीमाताजींच्या संपर्कात येणे, श्रीमाताजींच्या नामाचा जप करणे यांवर) केंद्रित केली जाते तेव्हा आपल्या योगाच्या दृष्टीने ती ‘एकाग्रता’ असते. आणि जेव्हा अंतर्मन योग्य ज्ञान मिळविण्यासाठी गोष्टींकडे पाहत असते तेव्हा ते ‘ध्यान’ असते.
*
आपल्या चेतनेचे सर्व धागे एकत्र गोळा करणे आणि ते एका बिंदुवर एककेंद्रित करणे किंवा एखाद्या उद्दिष्टाकडे, उदा. ‘ईश्वरा’कडे, आपल्या चेतनेचे सर्व धागे वळविणे म्हणजे ‘एकाग्रता.’ (एकाग्रतेमध्ये) एखाद्या बिंदुवरच लक्ष केंद्रित न करता, व्यक्तीच्या समग्र अस्तित्वामध्ये एकीकृत केलेली (gathered) अशी स्थितीदेखील असू शकते. ‘ध्याना’मध्ये मात्र अशा रीतीने चेतनेचे एकत्रीकरण करणे अनिवार्य असतेच असे नाही; तुम्ही शांतस्थिर मनाने एखाद्या विषयाचा विचार करत राहू शकता किंवा तुम्ही तुमच्या चेतनेमध्ये कशाचा प्रवेश होत आहे आणि त्याची हाताळणी कशा रीतीने केली जात आहे, याचे निरीक्षण करत राहू शकता.
*
‘ध्यान’ म्हणजे एखाद्या विषयाचा एकाग्रतेने विचार करणे. ज्याला आपण ‘एकाग्रता’ असे म्हणतो, त्या एकाग्रतेमध्ये विचारमालिका नसते तर मन हे एखाद्या वस्तुवर, नामावर, कल्पनेवर, किंवा एखाद्या स्थानी शांतपणे केंद्रित केलेले असते. एकाग्रतेचे आणखीही काही प्रकार असतात. उदा. समग्र चेतना एका विशिष्ट स्थानी म्हणजे भ्रूमध्यामध्ये किंवा हृदयामध्ये एकीकृत करायची इत्यादी. तुम्ही विचारांपासून पूर्णतः सुटका करून घेण्यासाठीदेखील एकाग्रतेचा अवलंब करू शकता आणि संपूर्ण शांतीमध्ये राहू शकता.
– श्रीअरविंद (CWSA 29: 297)
- साधना, योग आणि रूपांतरण – २५५ - February 17, 2025
- साधना, योग आणि रूपांतरण – २५४ - February 16, 2025
- प्राणाचे रूपांतरण – प्रास्ताविक - February 14, 2025