आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (२६)

(ईश्वरावर ‘निरपेक्ष प्रेम’ करता येते ही कल्पना न मानवणाऱ्या कोणा व्यक्तीस श्रीअरविंद येथे ती गोष्ट विविध उदाहरणानिशी समजावून सांगत आहेत.)

‘ईश्वरा’शी ऐक्य साधल्याने ‘आनंद’ प्राप्त होईल, हे आपल्याला माहीत असल्यामुळे, आपण त्या ‘आनंदा’च्या प्राप्तीकरताच ‘ईश्वरा’शी ऐक्य साधण्यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे, हा तुमचा युक्तिवाद खरा नाही, त्यामध्ये काही अर्थ नाही.

एखाद्या पुरुषाचे राणीवर प्रेम असेल आणि त्याला तिचे प्रेम मिळाले तर त्याला त्या प्रेमाबरोबरच सत्ता, पद, वैभव या गोष्टीही प्राप्त होतील, हे त्याला माहीत असू शकते; पण म्हणून काही तो सत्ता, पद, वैभव यासाठी तिच्यावर प्रेम करतो, असे नाही. तो तिच्यावरील प्रेमापोटीच प्रेम करू शकतो; ती राणी नसती तरीही त्याने तिच्यावर तसेच प्रेम केले असते; त्याला तिच्याकडून कोणतीही अपेक्षा नसतानासुद्धा तो तिच्यावर प्रेम करू शकतो, तिची प्रणयाराधना करू शकतो, तिच्यासाठीच तो जगू शकतो किंवा मरूही शकतो कारण ती त्याची प्रेमिका असते, ती ‘ती आहे’ म्हणूनच त्याचे तिच्यावर प्रेम असते. कोणत्याही सुखाची वा फलाची आशा नसतानादेखील एखाद्या पुरुषाने एखाद्या स्त्रीवर प्रेम केले आहे, अशी उदाहरणे आहेत. तिला वार्धक्य आले आणि तिचे सौंदर्य नाहीसे झाले तरीही त्यांचे प्रेम तसेच टिकून राहिले, त्यातील उत्कटता तशीच टिकून राहिली अशी उदाहरणे आहेत.

देश जेव्हा समृद्ध, शक्तिशाली, महान असतो आणि जेव्हा देशाकडे देशभक्तांना देण्यासारखे खूप काही असते तेव्हाच ते देशावर प्रेम करतात असे नाही; तर जेव्हा त्यांचा देश निर्धन होता, तो उतरणीला लागलेला होता, तो दुःखसंकटामध्ये होता, देशाकडे त्यांना देण्यासारखे काहीही नव्हते, आणि असलेच तर त्यांच्या सेवेची परतफेड म्हणून फक्त नुकसान, जखमा, छळवणूक, तुरुंगवास, मृत्यू याच गोष्टी तो देऊ शकत होता तेव्हासुद्धा त्यांचे देशावरील प्रेम अतिशय तीव्र, उत्कट आणि निरपवाद असेच होते. देशाला स्वातंत्र्य मिळालेले आपल्याला कधीच पाहता येणार नाही हे माहीत असूनही ती माणसे या देशासाठी जगली, त्यांनी देशाची सेवा केली आणि देशासाठी प्राणार्पणही केले. आणि हे सारे त्यांनी केले ते देशासाठी केले होते, देश त्यांना काहीतरी देऊ शकेल या अपेक्षेने केले नव्हते. लोकांनी देशासाठीच ‘सत्या’वर प्रेम केले होते आणि त्यांना त्या सत्यामधून देशाबद्दल जे आढळेल किंवा गवसेल, त्यासाठीच प्रेम केले होते; त्यासाठी त्यांनी गरिबी, जाच आणि अगदी मृत्युदेखील स्वीकारला होता. ते सत्य त्यांना गवसले नाही तरी सत्याच्या शोधामध्येच ते नेहमी समाधानी होते, आणि तरीही त्यांनी आपला शोध कधीच थांबविला नव्हता. त्याचा अर्थ काय ?

त्याचा अर्थ असा की, अन्य कोणत्या गोष्टीसाठी नाही, तर माणसं देश, सत्य आणि तत्सम अन्य गोष्टी यांच्यावर त्या गोष्टींवरील प्रेमासाठीच प्रेम करू शकतात; म्हणजे कोणत्या परिस्थितीसाठी नाही किंवा आनुषंगिक गुणवत्तेसाठी किंवा परिणामस्वरूप मिळणाऱ्या मौजमजेसाठीदेखील नाही, तर त्यांच्यामध्ये असणाऱ्या किंवा त्यांच्या दृश्य रूपांमागे वा परिस्थितीच्या पाठीमागे असणाऱ्या अशा कोणत्यातरी निरपवाद गोष्टीसाठी (माणसं, देश, सत्य आणि तत्सम अन्य गोष्टींवर) प्रेम करता येऊ शकते.

‘ईश्वर’ हा एखादा पुरूष किंवा स्त्री, जमिनीचा तुकडा, एखादा वंश, मत, शोध किंवा तत्त्व यांच्यापेक्षा नक्कीच महान आहे. तो सर्वातीत असा ‘पुरुष’ आहे, सर्व आत्म्यांचे तो ‘निजधाम’ आणि ‘देश’ आहे. सर्व सत्यं म्हणजे ज्याची केवळ अपूर्ण रूपं असतात असे ‘दिव्य सत्य’ तो आहे. माणसांनी त्यांच्या निम्नतर अस्तित्वानिशी आणि प्रकृतीनिशी, वर उल्लेख केल्याप्रमाणे किंवा त्याहून अधिक कितीतरी गोष्टी केल्या आहेत. असे जर असेल तर मग, ‘ईश्वरा’वर त्याच्यावर असलेल्या ‘प्रेमासाठीच प्रेम’ केले जाऊ शकत नाही का? त्याच्या शोधासाठी धडपड केली जाऊ शकत नाही का?

जे परम आहे किंवा मनुष्यामधील जे काही पूर्णत्वाकडे झुकणारे आहे त्याचे, आणि त्याचप्रमाणे मनुष्याची ‘ईश्वर’ प्राप्तीसाठीची जी धडपड असते त्याचे स्पष्टीकरण मानसिक तर्कबुद्धीने किंवा प्राणिक प्रेरणेच्या माध्यमातून करता येत नाही; याकडे तुमच्या तर्कबुद्धीचे दुर्लक्ष होत आहे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 11-12) (क्रमश:)

श्रीअरविंद