आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (१२)
तुम्ही तुमचे जीवन इतर कोणत्याही गोष्टीसाठी नव्हे तर, ‘दिव्य-सत्य’शोधनाच्या अभीप्सेसाठी आणि त्या ‘सत्या’चे मूर्त स्वरूप बनण्याच्या अभीप्सेसाठी पूर्णतया निष्ठापूर्वक अर्पित करावे, ही या योगाची (पूर्णयोगाची) मागणी आहे. तुमचे जीवन (एकीकडे) ‘ईश्वरा’मध्ये आणि (दुसरीकडे) ज्या गोष्टीचा ‘सत्या’च्या शोधनाशी काहीही संबंध नाही अशा कोणत्यातरी बाह्य ध्येयामध्ये आणि कार्यामध्ये विभागणे या गोष्टीला येथे मान्यता नाही. अशा प्रकारे केलेल्या अगदी छोट्याशा कृतीमुळेदेखील या योगामध्ये यश मिळणे अशक्य होईल.
तुम्ही तुमच्या स्वतःच्या अंतरंगामध्येच प्रवेश केला पाहिजे आणि आध्यात्मिक जीवनाला तुम्ही पूर्णपणे निष्ठापूर्वक वाहून घेतले पाहिजे. या योगामध्ये यश मिळावे असे जर तुम्हाला वाटत असेल तर – मानसिक अग्रक्रमांबाबत असलेला तुमचा हट्टाग्रह तुमच्यामधून निघून गेला पाहिजे; प्राणमय आवडीनिवडी, आसक्ती यांबाबतचा आग्रह बाजूला सारलाच पाहिजे; कुटुंब, मित्रपरिवार, देश यांच्याबद्दल असणारी अहंभावात्मक आसक्ती नाहीशी झालीच पाहिजे. बाहेर पडणारी ऊर्जा असेल किंवा जी कोणती कृती असेल, या सर्व गोष्टी, एकदा का तुम्हाला सत्य गवसले की त्या गवसलेल्या ‘सत्या’मधूनच उगम पावल्या पाहिजेत. त्या गोष्टी कोणत्यातरी कनिष्ठ मानसिक किंवा प्राणिक प्रेरणांमधून उत्पन्न झालेल्या असता कामा नयेत; त्या कोणत्याही वैयक्तिक आवडीनिवडीतून किंवा अहंभावात्मक अग्रक्रमातून नव्हे तर, ‘ईश्वराच्या इच्छे’मधून उगम पावल्या पाहिजेत.
– श्रीअरविंद (CWSA 29 : 15)
- साधना, योग आणि रूपांतरण – १०६ - September 18, 2024
- साधना, योग आणि रूपांतरण – १०५ - September 17, 2024
- साधना, योग आणि रूपांतरण – १०४ - September 16, 2024