आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (१०)

केवळ ‘अतिमानव’ बनण्याच्या कल्पनेने या ‘योगा’कडे (पूर्णयोगाकडे) वळणे ही प्राणिक अहंकाराची एक कृती ठरेल आणि ती या योगाचे मूळ उद्दिष्टच निष्फळ करेल. जे कोणी त्यांच्या सर्व जीवनव्यवहारामध्ये असे उद्दिष्ट ठेवतात त्यांना निरपवादपणे आध्यात्मिक आणि अन्य प्रकारची दुःखं सहन करावी लागतात. प्रथम विभक्तकारी अहंकार (separative ego) दिव्य चेतनेमध्ये विलीन करून, त्याद्वारे दिव्य चेतनेमध्ये प्रवेश करणे आणि दुसरे म्हणजे, मन, प्राण आणि शरीर यांचे रूपांतरण करण्यासाठी अतिमानसिक चेतना या पृथ्वीवर अवतरित करणे हे या ‘योगा’चे ध्येय आहे. (अहंकार दिव्य चेतनेमध्ये विलीन करत असताना, त्या अनुषंगाने, व्यक्तीला स्वतःच्या खऱ्या जीवात्म्याचा (individual self) शोध लागतो; हा जीवात्मा म्हणजे मर्यादित, व्यर्थ आणि स्वार्थी मानवी अहंकार नसतो तर तो ‘ईश्वरा’चा अंश असतो.) बाकी सर्व गोष्टी म्हणजे या दोन ध्येयांचे परिणाम असू शकतात, परंतु त्या या ‘योगा’चे प्राथमिक उद्दिष्ट असू शकत नाहीत.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 21)

श्रीअरविंद
Latest posts by श्रीअरविंद (see all)