अमृतवर्षा ०५

 

साधक : आम्हाला सदासर्वकाळ भौतिक परिस्थितीमध्ये अडकवून ठेवणाऱ्या शारीरिक चेतनेमधून आम्ही बाहेर कसे पडावे?

श्रीमाताजी : त्यासाठी अनेक मार्ग आहेत. बौद्धिक, भावनिक, कलात्मक आणि आध्यात्मिक मार्ग आहेत. आणि साधारणपणे, ज्याला जो मार्ग सर्वाधिक सोपा वाटतो तो मार्ग त्याने अवलंबणे कधीही चांगले. कारण सर्वात अवघड असे जे आहे त्यापासून सुरुवात करायची म्हटले तर हाती काहीच लागणार नाही. आणि इथेच आपण श्रीअरविंदांनी ‘The Synthesis of Yoga’ या ग्रंथामध्ये सांगितल्याप्रमाणे ज्ञानमार्ग, भक्तिमार्ग किंवा कर्ममार्ग यांच्यापाशी परत येऊन पोहोचतो. यातील कर्ममार्ग हा प्रामुख्याने तुम्हाला भौतिक जीवनाशी जोडून ठेवतो आणि त्यामध्येच मुक्तीचा शोध घेण्यास प्रवृत्त करतो. कदाचित हा सर्वात परिणामकारक पण सर्वात अवघड असा मार्ग आहे.

बहुतांशी मुमुक्षू लोकांना ध्यानाचा, एकाग्रतेचा मार्ग, या भौतिक जीवनापासून दूर राहण्याचा, भौतिक क्रियाकलापांचा परित्याग करण्याचा मार्ग हा कर्ममार्गापेक्षा निश्चितपणे सोपा वाटतो. पण, ते भौतिक चेतनेला, ती जशी आहे तशीच सोडून देतात, तिच्यामध्ये कोणतेही परिवर्तन घडवून न आणता, तशीच सोडून देतात; या मार्गामध्ये, व्यक्ती जोवर एखाद्या साधु वा संन्याशाप्रमाणे सक्रिय जीवन बाजूला सारत नाही आणि सदासर्वदा ध्यानामध्ये निमग्न राहत नाही तोवर तिला काहीच साध्य होत नाही. म्हणजेच, व्यक्तित्वाचा एक संपूर्ण भाग कधीच रूपांतरित होत नाही, तो तसाच शिल्लक राहतो. रूपांतरण करणे हा त्यांच्याकडे मार्गच नसतो, तर शरीराला नकार देऊन, त्या शरीरातून शक्य तितक्या त्वरेने बाहेर पडणे हाच केवळ एक मार्ग त्यांच्याकडे असतो. पूर्वी योगसाधनेमध्ये हेच अभिप्रेत असे आणि साहजिकच ते अधिक सोपे होते. पण आपल्याला जे हवे आहे ते हे नाही.

आपल्याला शारीरिक, भौतिक चेतनेचे रूपांतरण हवे आहे, त्याला नकार देणे येथे अभिप्रेत नाही. आणि येथेच श्रीअरविंदांनी अगदी थेट आणि अगदी परिपूर्ण असा ‘ईश्वरा’प्रत नेणारा समर्पणाचा मार्ग सुचविलेला आहे. क्रमश: अधिकाधिक समग्र होत जाणारे आणि भौतिक क्रियाकलापांचा व भौतिक चेतनेचादेखील समावेश करून घेणारे समर्पण. आणि व्यक्ती ते करण्यामध्ये यशस्वी झाली तर शरीर किंवा जडभौतिक हे मार्गातील धोंड न ठरता, साहाय्यक बनते.

 

– श्रीमाताजी [CWM 08 : 299-300]

श्रीमाताजी