भारत – एक दर्शन २८

वास्तविक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक एकता हीच एकमेव चिरस्थायी अशी एकता असते आणि टिकाऊ शरीर व बाह्य संघटन यांपेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात चिकाटीयुक्त मन व आत्मचैतन्य यांमुळेच लोकसमूहाचा आत्मा टिकून राहत असतो. …प्राचीन राष्ट्रं, भारताच्या समकालीन असणारी काही राष्ट्रं आणि भारताच्या उदयानंतर उदयास आलेली अनेक राष्ट्रं आज मृतप्राय झालेली आहेत आणि आता त्यांचे केवळ अवशेष शिल्लक राहिलेले आहेत. ग्रीस आणि इजिप्त ही राष्ट्रं आता केवळ नकाशापुरती शिल्लक राहिली आहेत, ती फक्त नावाने शिल्लक उरली आहेत….

रोमने मध्यसमुद्राच्या आसमंतांत राहणाऱ्या लोकांवर राजकीय आणि निव्वळ बाह्य सांस्कृतिक एकता लादली, पण त्याला त्या लोकांमध्ये जितीजागती आध्यात्मिक आणि सांस्कृतिक एकता निर्माण करता आली नाही. म्हणून पौर्वात्य राष्ट्रं पाश्चिमात्य राष्ट्रांपासून अलग झाली. रोमन लोकांचे आफ्रिकेवर काही काळ राज्य होते, त्या कालखंडाच्या कोणत्याही खाणाखुणा आफ्रिकेने शिल्लक ठेवल्या नाहीत, इतकेच नव्हे तर, आजही स्वतःला लॅटिन म्हणवणारी जी पाश्चिमात्य राष्ट्रं आहेत ती रानटी आक्रमकांचा जोरकस प्रतिकार करू शकली नाहीत; परकीय प्राणतत्त्वाचा संयोग होऊन त्यांचा पुनर्जन्म व्हावा लागला, आणि तेव्हा त्यातून आधुनिक काळामध्ये इटली, स्पेन आणि फ्रान्सचा उगम झाला.

परंतु भारत मात्र आजही जीवित आहे आणि प्राचीन भारताच्या आंतरिक मनाचे, आत्म्याचे आणि चैतन्याचे सातत्य त्याने आजही कायम ठेवले आहे.

भारतावर अनेक आक्रमणं झाली, परकीय सत्ता आल्या. ग्रीक, पार्थियन, हूण यांच्या स्वाऱ्या झाल्या; प्रबळ इस्लामांनी आक्रमण करून आपली सत्ता प्रस्थापित केली, भुईसपाट करणाऱ्या एखाद्या गाडीच्या अवजडपणासारख्या असलेल्या ब्रिटिश ताबेदारीने आणि ब्रिटिश यंत्रणेने भारताला व्यापून टाकले. पाश्चिमात्य राष्ट्रांचेही प्रचंड दडपण भारतावर आले, असे असूनसुद्धा भारताच्या शरीरामधून – वैदिक ऋषींनी भारताचा जो आत्मा घडविला होता – त्या प्राचीन आत्म्याला, कोणीही बाहेर हाकून देऊ शकले नाही किंवा चिरडून टाकू शकले नाही.

भारतावर आलेल्या प्रत्येक आपत्तीच्या वेळी, प्रत्येक हल्ल्यामध्ये, परकीय वर्चस्वाच्या वेळी, प्रत्येक पावलागणिक, भारत प्रतिकार करून टिकून राहण्यात सक्षम ठरला; मग तो प्रतिकार सक्रिय असो अथवा अक्रिय असो. भारताचे जेव्हा चांगले वैभवाचे दिवस होते तेव्हा त्याच्या आध्यात्मिक एकतेमुळे आणि आत्मसात करण्याच्या आणि प्रतिसाद देण्याच्या शक्तीमुळे त्याला टिकून राहता आले, त्यावेळी जे काही सामावून घेण्यासारखे नव्हते ते सारे त्याने हद्दपार केले आणि जे हद्दपार करण्यासारखे नव्हते ते सारे त्याने आत्मसात केले. आणि अगदी त्याच्या अवनतीला आरंभ झाल्यानंतरही, भारत त्याच शक्तीमुळे टिकून राहिला, त्याचे हे सामर्थ्य अवनतीच्या काळात काहीसे कमी झाले परंतु ते नाहीसे करण्यासारखे नव्हते. भारताने तेव्हा माघार घेतली परंतु काही काळासाठी का होईना, पण दक्षिणेमध्ये स्वतःची प्राचीन राजकीय प्रणाली त्याने टिकवून ठेवली. इस्लामचे दडपण आले तेव्हा ते झुगारून देण्यासाठी आणि भारताचा प्राचीन आत्मा आणि त्याची संकल्पना यांचे रक्षण करण्यासाठी राजपूत, शीख आणि मराठा पुढे आले. जिथे सक्रिय प्रतिकार करणे शक्य नव्हते तेथे भारत, अक्रिय विरोध करत राहिला; भारताचे कोडे ज्याला उकलता आले नाही, किंवा भारताशी ज्याला मिळतेजुळते घेता आले नाही अशा प्रत्येक साम्राज्याच्या ह्रासाचा निषेध करत, भारत, नेहमीच आपल्या पुनरुज्जीवनाच्या दिवसाची वाट पाहत राहिला, (पण या सगळ्यामधूनही) तो टिकून राहू शकला. आजही आमच्या डोळ्यांसमोर हीच प्रक्रिया, अशीच घटना घडताना दिसत आहे.

जी सभ्यता (civilisation) हा चमत्कार सिद्धीस नेत आहे त्या सभ्यतेच्या, सर्वोत्तम प्राणशक्तीचे वर्णन कोणत्या शब्दांत करावे? आणि कोणत्याही बाह्य गोष्टींवर नव्हे तर, आत्मचैतन्यावर आणि आंतरिक मनाच्या आधारावर या सभ्यतेचा पाया रचण्याचे आणि आध्यात्मिक व सांस्कृतिक एकतेला, भारतीय जीवनवृक्षाचे केवळ क्षणभंगुर फूल न बनविता, त्याचे मूळ आणि खोड बनविणाऱ्या, नश्वर डोलाऱ्याचे रूप नव्हे तर, शाश्वत आधार बनविणाऱ्या प्रज्ञेचे कौतुक कसे वर्णावे?

– श्रीअरविंद [CWSA 20 : 430-431]

श्रीअरविंद