भारत – एक दर्शन २७

‘धर्माची भारतीय संकल्पना’ ही महाभारताची मुख्य प्रेरणा आहे. अंधकार, भेद व मिथ्यत्व यांच्या शक्ती आणि सत्य, प्रकाश, ऐक्य यांच्या देवदेवता यांच्यामधील संघर्षाची जी ‘वैदिक’ संकल्पना आहे ती संकल्पना येथे आध्यात्मिक, धार्मिक आणि आंतरिक स्तरावरून, बाह्यवर्ती पातळीवर – बौद्धिक, नैतिक आणि प्राणिक पातळीवर आणण्यात आलेली आहे.

येथे कथानकाने एकाच वेळी वैयक्तिक आणि राजकीय संघर्षाचे दुहेरी रूप धारण केलेले आहे. वैयक्तिक पातळीवरील संघर्षाचा विचार करता, येथे एकीकडे भारतीय धर्माचे महत्तर नैतिक आदर्श ज्यांच्यामध्ये मूर्त झालेले आहेत अशी प्रातिनिधिक आणि नमुनेदार व्यक्तिमत्त्वं आहेत आणि दुसऱ्या बाजूला आसुरी अहंकार, स्वार्थमूलक इच्छा आणि धर्माचा दुरूपयोग यांची जणू प्रकट रूपंच असावीत अशी व्यक्तिमत्त्वं आहेत. या वैयक्तिक संघर्षाची परिणती राजकीय युद्धामध्ये होते. धर्माच्या आणि न्यायाच्या नव्या राजवटीच्या प्रस्थापनेने या आंतरराष्ट्रीय महा-संघर्षाची परिसमाप्ती होते, झगडा करणाऱ्या दोन वंशांना संघटित करणाऱ्या धर्मराज्यामध्ये, किंबहुना धर्मसाम्राज्यामध्ये त्याची परिसमाप्ती होते. राजेरजवाडे आणि अमीरउमरावांच्या महत्त्वाकांक्षी उद्दामपणाच्या जागी, न्यायी आणि मानवतावादी साम्राज्याचे प्रभुत्व, स्थिरता आणि शांती यांची प्रस्थापना होते. ‘देव’ आणि ‘असुर’ यांचा जुनाच संघर्ष येथे चित्रित करण्यात आलेला आलेला आहे पण येथे तो मानवी जीवनाच्या परिभाषेमध्ये मांडण्यात आलेला आहे.

– श्रीअरविंद [CWSA 20 : 347-348]

श्रीअरविंद