भारत – एक दर्शन २६

महाभारत ही काही केवळ भरतवंशाची कहाणी नाही, किंवा केवळ एका पुरातन घटनेवर आधारलेले आणि पुढे जाऊन राष्ट्रीय परंपरा बनलेले असे महाकाव्य नाही. तर ते विशाल पट असलेले, भारतीय आत्म्याचे, धार्मिक व नैतिक मनाचे आणि सामाजिक व राजकीय आदर्शांचे आणि भारतीय जीवनाचे व संस्कृतीचे महाकाव्य आहे. ‘भारतामध्ये जे जे काही आहे ते ते महाभारतामध्ये आहे’, अशी एक म्हण आहे, आणि त्यामध्ये काही प्रमाणात तथ्यही आहे. महाभारत ही काही कोणा एका व्यक्तीच्या मनाची अभिव्यक्ती किंवा निर्मिती नाही तर, ती राष्ट्राच्या मनाची निर्मिती आहे; महाभारत ही भारताचे स्वतःचे असे एक काव्य आहे की जे सर्व (भारतीय) लोकांनी मिळून लिहिलेले आहे. वास्तविक एखाद्या कमी विस्तृत आणि अधिक मर्यादित हेतुनेच ज्याची निर्मिती करण्यात आलेली असते अशा महाकाव्याला लागू पडणारे काव्यात्मक कलेचे सिद्धान्त महाभारताला लागू करणे सर्वथा व्यर्थ होईल, पण तरीदेखील त्यामध्ये एकूणच रचनेबाबत आणि तपशीलांबाबत मोठ्या प्रमाणात आणि बऱ्यापैकी जाणिवपूर्वकतेने कलेचा वापर केलेला आढळतो.

एखाद्या विशाल अशा राष्ट्रीय मंदिराप्रमाणे महाभारत या महाकाव्याची रचना करण्यात आलेली आहे. या मंदिराच्या एका दालनामधून दुसऱ्या दालनामध्ये जाताना क्रमाक्रमाने त्याची भव्य आणि संकीर्ण कल्पना उलगडत जाते. या मंदिरामध्ये अर्थपूर्ण समूह, मूर्ती आणि शिलालेख यांनी जागोजागी गर्दी केलेली आढळते, या मंदिरातील समूहामधील मूर्ती कोठे दिव्य तर कोठे अर्ध-दिव्य प्रमाणात कोरण्यात आलेल्या आहेत. विकसित झालेली आणि अतिमानवतेप्रत अर्ध-उन्नत झालेली आणि असे असूनसुद्धा जिच्या प्रेरणा, जिच्या कल्पना, जिच्या भावना या अजूनही मानवाशी निष्ठा राखणाऱ्या आहेत, अशी मानवता येथे चितारण्यात आलेली आहे. येथे वास्तवाच्या सुराला आदर्शाच्या स्वरांद्वारे सातत्याने उंचविण्यात आले आहे. येथे इहलोकातील जीवनाचे भरपूर चित्रण करण्यात आलेले आहे तरीही येथील जग, त्याच्या पाठीमागे असणाऱ्या जगतांच्या शक्तींच्या उपस्थितीच्या आणि त्यांच्या सचेत प्रभावाच्या अधीन आहे. आणि काव्यात्मक कथेच्या रुंद पायऱ्यांवरून एक सलग अशी कल्पनेची भलीमोठी लांबलंचक मिरवणूकच जणू येथे समग्रपणे एकीकृत झालेली आहे.

महाकाव्यामध्ये आवश्यक असतो त्याप्रमाणे कथानकाचा प्रवाह हा या महाकाव्याच्या मुख्य स्वारस्याचा विषय आहे आणि ते कथानक संपूर्ण महाकाव्यामध्ये अशा रीतीने पुढे जाते की त्याची गतिमानता एकाच वेळी व्यापक आहे आणि सूक्ष्मही आहे; हे कथानक स्थूलमानाने पाहता व्यापक आणि धाडसी, निडर आहे. तपशीलांच्या बाबतीत ते लक्षवेधी आणि परिणामकारक आहे; ते नेहमीच साधे, जोरकस आणि शैली व गतीचा विचार करता महाकाव्याला साजेसे आहे. तसेच, महाभारत हे विषयद्रव्याबाबत अतिशय स्वारस्यपूर्ण असले, काव्यात्मक कथा सांगण्याची त्याची रीत अतिशय परिणामकारक असली तरीसुद्धा त्यामध्ये आणखीही अधिक असे काही आहे – त्यामध्ये एक अर्थपूर्ण अशी गोष्ट आहे, इतिहास आहे, भारतीय जीवन आणि संस्कृती यासंबंधीच्या मध्यवर्ती कल्पना आणि आदर्श हे संपूर्ण महाभारतात जागोजागी प्रातिनिधिक स्वरूपात आलेले आहेत. (उत्तरार्ध उद्याच्या भागात…)

– श्रीअरविंद [CWSA 20 : 347]

श्रीअरविंद