मन, प्राण, शरीर ह्यांची अनंत भूमंडळे गळून पडतात आणि साधकाचा ऊर्ध्वगामी प्रवास सुरु होतो. मानवी जीवनाचा सर्व पसारा हळूहळू धूसर होत जातो आणि असा साधक मानवी भूमंडळातील एका अंतिम टप्प्यावर येऊन पोहोचलेला असतो. आता पुढे काय ?

विश्व-प्रकृतीचा विचार करता, आजवरची वाटचाल शरीर, प्राण हे टप्पे ओलांडून मनापर्यंत येऊन पोहोचली आहे. मनाच्या पलीकडे जाण्याचे आजवर झालेले प्रयत्न, हे धूमकेतूसारखे चमकून गेलेले आहेत. कालौघात काही संतसत्पुरुषांचे झालेले प्रकटीकरण म्हणजे विश्व-प्रकृतिद्वारे केले गेलेले हे असेच प्रयत्न आहेत. परंतु आता प्रकृतीच निवडक मानवांच्या माध्यमातून, मनाच्या पलीकडच्या टप्प्यावर जाण्याच्या तयारीत आहे. देश, भाषा, प्रांत, धर्म, जात, वंश यांच्या संकुचित सीमा भेदून, मनाच्या पलीकडे जाऊ पाहणारे या पृथ्वीवरील काही मोजके मानव, या पुढील प्रवासासाठी निघण्याच्या तयारीत, एका उच्चतर प्रतलावर एकत्र आले आहेत.

या उच्चतर प्रतलाला अधिष्ठान आहे ते आद्यशक्तीचे, अदितीचे ! तिच्या अधिष्ठानावर स्थित होऊन, श्रीअरविंद नामक विभूती-अवताराने, या मोजक्या मानवांचे प्रतिनिधी बनून, ‘मन ते अतिमानस’ ही वाटचाल, आपल्या समर्थ बाहूंवर पेलली आहे.

मनाच्या अतीत जाण्याचा प्रयत्न करू पाहणारी व्यक्ती ही जणू स्फटिकवत आहे. त्याच्या खालच्या गोलार्धात आहेत, व्यक्तीचे शरीर, प्राण व मन. ते त्या व्यक्तीचे आधार आहेत. ह्या आधाराला आधार आहे तो श्रीअरविंदांचा आणि त्यांनी स्वतःच्या जीवनात जे साध्य करून घेतले, त्या आध्यात्मिक संपदेचा !

‘मन ते अतिमानस’ ह्या वरच्या गोलार्धात वाटचाल करण्यासाठी साधकाला साहाय्यभूत होणार आहे ‘अभीप्सा’ (Aspiration towards Divine). व्यक्तीच्या अंतःकरणातून, किंबहुना तिच्या समग्र अस्तित्वातून ऊर्ध्वमुख होणारी अभीप्सा किरण रूपाने वर वर जात आहे. ‘अतिमानस’रूपी सूर्याकडून येणारा एक प्रकाशकिरण त्या व्यक्तीचे समग्र अस्तित्व भेदून आरपार जात आहे. ऊर्ध्वमुख अभीप्सा आणि अधोमुख अतिमानसरूपी प्रकाशकिरण परस्परांमध्ये मिसळून व्यक्तीचे समग्र अस्तित्व दिव्य प्रकाशाने उजळून निघत आहे. आणि त्या प्रकाशाच्या उजळण्याने आसमंत प्रकाशमान होत आहे.

अशा व्यक्तींचे समुदाय, हे मानवजातीला मनाकडून अतिमानसाकडे घेऊन जाणाऱ्या वाटचालीतील अग्रणी असणार आहेत.

*

या पृथ्वीवर अतिमानसाचे अवतरण झाले असल्याची स्पष्ट अनुभूती श्रीमाताजींना ज्या दिवशी आली तो दिवस म्हणजे दि.२९ फेब्रुवारी १९५६. हा दिवस ‘अतिमानस अवतरण दिन’ म्हणून साजरा केला जातो.

(श्रीमाताजींचे प्रतीक आणि त्यावर श्रीअरविंदांच्या प्रतीकाने तोललेला स्फटिक ही रचना, ऑरोविल येथे मातृमंदिरातील ध्यानमंदिराच्या केंद्रस्थानी आहे.)

अभीप्सा मराठी मासिक