विचारशलाका १९
नेहमीच असे सांगितले जाते की एखाद्याची प्रकृती बदलणे अशक्य आहे; तत्त्वज्ञानाच्या सर्व पुस्तकांमधून, अगदी योगामध्येसुद्धा तुम्हाला असेच सांगितले जाते की “तुम्ही तुमचा स्वभाव बदलू शकत नाही, कारण तुमच्या जन्माबरोबरच तो आलेला असतो, तुम्ही तसेच आहात.”
पण हे पूर्णपणे चुकीचे आहे. मी खात्रीपूर्वक सांगू शकते की हे खोटे आहे. पण तुमची प्रकृती, तुमचा स्वभाव बदलण्यासाठी अत्यंत अवघड असे काही तुम्हाला करावे लागते. (कारण) तुम्हाला केवळ तुमचीच प्रवृत्ती बदलायची नसते तर, (तुमच्यामध्ये असलेली तुमच्या) पूर्वजांची प्रवृत्तीदेखील तुम्हाला बदलायची असते. तुम्ही त्यांच्यामध्ये बदल घडवून आणू शकत नाही (कारण त्यांचा तसा कोणताही हेतू नसतो), पण तुम्हाला मात्र तुमच्यामधील ती प्रवृत्ती बदलणे आवश्यक असते.
त्यांनी ज्या गोष्टी तुम्हाला दिलेल्या असतात – तुमच्या जन्माबरोबर जणू या सुंदर भेटवस्तू तुम्हाला मिळालेल्या असतात – त्या तुम्हाला बदलायच्या असतात. या गोष्टींचा मूळ, खरा धागा मिळविण्यात जर का तुम्ही यशस्वी झालात आणि तुम्ही जर त्यावर चिकाटीने आणि प्रामाणिकपणे काम केलेत तर, एखाद्या अवचित क्षणी तुम्ही त्यापासून मुक्त झालेले असाल; ते सारे काही तुमच्यापासून गळून पडलेले असेल आणि तुम्ही कोणत्याही ओझ्याविना एका नवीन जीवनाची सुरुवात करण्यास सक्षम झालेले असाल.
तेव्हा तुम्ही कोणी एक नवीनच व्यक्ती झालेले असाल; नवीन स्वभावाने, नवीन प्रकृतीनिशी एक नवीन जीवन जगत असाल.
– श्रीमाताजी [CWM 04 : 262]
- पूर्णयोगाचे ध्येय - September 6, 2024
- अनुभवांकडे पाहण्याचा योग्य दृष्टिकोन - September 5, 2024
- समाधी ही प्रगतीची खूण? - September 4, 2024