विचारशलाका १५

‘दिव्य अस्तित्व’ तुमच्या अंतरंगातच असते. ते तुमच्या आतच असते, आणि तुम्ही मात्र त्याचा बाहेर शोध घेत राहता; अंतरंगात डोकावून पाहा. ते तुमच्या आतच आहे. तेथे त्या ‘अस्तित्वा’ची उपस्थिती असते. सामर्थ्य मिळण्यासाठी तुम्हाला इतरांकडून प्रशंसा हवी असते – त्यातून ते सामर्थ्य तुम्हाला कधीही मिळणार नाही. सामर्थ्य तुमच्या अंतरंगातच आहे. तुम्हाला जर ते सामर्थ्य हवे असेल तर, तुम्हाला जे सर्वेाच्च उद्दिष्ट – सर्वोच्च प्रकाश, सर्वोच्च ज्ञान, सर्वोच्च प्रेम – आहे असे वाटते, त्यांविषयी तुम्ही अभीप्सा बाळगू शकता. ते तुमच्या अंतरंगातच आहे – अन्यथा तुम्ही कधीच त्याच्याशी संपर्क साधू शकणार नाही. तुम्ही जर अंतरंगात पुरेसे खोलवर गेलात तर नेहमीच सरळ वर जाणाऱ्या प्रज्वलित ज्योतीप्रमाणे तेथे तुम्हाला ‘त्या’चे अस्तित्व सापडेल.

आणि हे करणे खूप अवघड आहे, असे समजू नका. ते अवघड आहे, असे वाटते कारण तुमची दृष्टी कायम बाह्याकडेच वळलेली असते आणि त्यामुळे तुम्हाला ‘त्या’च्या उपस्थितीची जाणीव होत नाही. पण जर आधारासाठी, साहाय्यासाठी तुम्ही बाहेरच्या ऐवजी अंतरंगांत लक्ष केंद्रित केलेत आणि – प्रत्येक क्षणी काय करायला हवे ते जाणण्यासाठी, त्याचा मार्ग जाणण्यासाठी, अंतरंगांमध्ये, सर्वोच्च ज्ञानाकडे – प्रार्थना केलीत; आणि तुम्ही जे काही आहात व तुम्ही जे काही करता, ते सर्व तुम्ही पूर्णत्वप्राप्तीसाठी समर्पित केलेत, तर तुम्हाला तेथेच अंतरंगातच आधार असल्याचे आणि तो तुम्हाला कायमच साहाय्य व मार्गदर्शन करत असल्याचे जाणवेल.

आणि जर कधी अडचण आली तर तिच्याशी दोन हात करण्यापेक्षा; तिला हाताळण्यासाठी – सर्व वाईट इच्छा, सर्व गैरसमजुती आणि सर्व अनिष्ट प्रतिक्रिया यांना हाताळण्यासाठी – तुम्ही त्या अडचणीला सर्वोच्च प्रज्ञेकडे सुपुर्द करा. जर तुम्ही पूर्णपणे समर्पित झालात, तर तो आता तुमच्या काळजीचा विषय उरतच नाही : तो त्या ‘परमेश्वरा’चा विषय बनतो, ‘परमेश्वर’ स्वत:च तो हाती घेतो आणि त्यातून मार्ग कसा काढायचा हे इतर कोणापेक्षाही तोच अधिक चांगल्या रीतीने जाणतो. यातून बाहेर पडण्याचा हाच एकमेव मार्ग आहे, केवळ हाच मार्ग आहे.

– श्रीमाताजी [CWM 15 : 399-400]

श्रीमाताजी