विचारशलाका १४

असे पाहा की, जगाच्या सध्याच्या अवस्थेमध्ये परिस्थिती नेहमीच कठीण असते. संपूर्ण जग संघर्ष व कलहाच्या स्थितीत आहे; प्रकट होऊ पाहणाऱ्या सत्य व प्रकाश यांच्या शक्ती आणि (दुसरीकडे) त्यांना विरोध करणाऱ्या अशा सर्व शक्ती की, ज्या बदलू इच्छित नाही, ज्या हटवादी झालेल्या आणि जाण्यास नकार देणाऱ्या भूतकाळातील भागाचे प्रतिनिधित्व करतात, यांच्यामध्ये संघर्ष सुरू आहे. स्वाभाविकपणेच, प्रत्येक व्यक्तीला तशाच प्रकारच्या अडथळ्यांना सामोरे जावे लागते आणि तिला स्वत:ला स्वत:च्या अडचणी जाणवत असतात.

तुमच्याकरता केवळ एकच मार्ग आहे. तो म्हणजे समग्र, संपूर्ण विनाशर्त समर्पण. म्हणजे तुमच्या कृती, तुमची कर्मे, तुमच्या आशा-आकांक्षा यांचे समर्पण तर करायचेच, पण त्याचबरोबर तुमच्या भावभावनांचेसुद्धा समर्पण करायचे, म्हणजे तुम्ही जे काही करता, तुम्ही जे काही आहात ते ते सारे केवळ ‘ईश्वरा’साठीच असले पाहिजे, असे मला म्हणायचे आहे. आणि असे केल्यामुळे, तुमच्या सभोवती असणाऱ्या मानवी प्रतिक्रियांच्या तुम्ही अतीत झाला असल्याचे तुम्हाला जाणवते – केवळ अतीत झाल्याचेच जाणवते असे नव्हे तर, ‘ईश्वरी कृपे’च्या तटबंदीमुळे त्या मानवी प्रतिक्रियांपासून तुमचे संरक्षण होत असल्याचेही तुम्हाला जाणवते.

एकदा का तुमच्यामधील इच्छा नाहीशा झाल्या, आसक्ती उरली नाही, मनुष्यमात्रांकडून – मग ते कोणीही असोत – कोणत्याही प्रकारचे बक्षीस मिळावे ही अपेक्षा तुम्ही सोडून दिलीत आणि ‘ईश्वरा’कडून मिळणारी व कधीही व्यर्थ न जाणारी बक्षिसी हीच एकमेव मिळविण्यासारखी गोष्ट आहे हे तुम्हाला समजले – एकदा का तुम्ही सर्व बाह्य व्यक्ती व वस्तू यांविषयीची आसक्ती सोडून दिलीत की मग ‘ईश्वरा’ची ‘उपस्थिती’, त्याची ‘शक्ती’, तुमच्या सोबत सदैव असणारी त्याची ‘कृपा’ तुम्हाला तुमच्या हृदयात लगेचच जाणवू लागते.

आणि दुसरा काहीच उपाय नाही. प्रत्येकासाठी अगदी निरपवादपणे हाच एकमेव उपाय आहे. जे जे कोणी दु:ख भोगतात त्यांना एकच गोष्ट सांगितली पाहिजे की, दु:ख असणे हे ‘समर्पण’ परिपूर्ण नसल्याचे चिन्ह आहे. त्यानंतर पुढे जेव्हा कधी तुम्हाला तुमच्यामध्ये एखादा ‘आघात’ जाणवतो तेव्हा त्यावेळी मग “छे! किती वाईट आहे हे” किंवा परिस्थिती किती कठीण आहे” असे तुम्ही म्हणत नाही. तर आता तुम्ही म्हणता, “माझेच समर्पण अजून परिपूर्ण झालेले नसेल.” आणि मग तुम्हाला ती ‘ईश्वरी कृपा’ जाणवते, जी तुम्हाला मदत करते, मार्गदर्शन करते आणि तुम्ही प्रगत होऊ लागता. आणि एक दिवस तुम्ही अशा शांतीमध्ये प्रवेश करता जी कशानेही क्षुब्ध होऊ शकणार नाही. सर्व विरोधी शक्तींना, विरोधी क्रियांना, आक्रमणांना, गैरसमजुतींना, दुर्वासनांना तुम्ही अशा स्मितहास्याने उत्तर देता जे ‘ईश्वरी कृपे’वरील पूर्ण विश्वासाने येत असते आणि तोच एक बाहेर पडण्याचा मार्ग आहे, दुसरा मार्गच नाही.

हे जग संघर्ष, दु:खभोग, अडचणी, ताणतणाव यांनी बनलेले आहे. ते अजूनही बदललेले नाही, ते बदलण्यासाठी काही काळ लागेल. पण प्रत्येकामध्ये या सगळ्यातून बाहेर पडण्याची क्षमता असते. तुम्ही जर ‘परमोच्च कृपे’च्या अस्तित्वावर विसंबून राहिलात, तर तोच केवळ एकमेव मार्ग आहे.

– श्रीमाताजी [CWM 15 : 398-399]