आध्यात्मिकता ४८
माणसं बाह्य गोष्टींमध्येच गुंतलेली असतात. म्हणजे असे की, त्यांची चेतना, अधिक गहन सत्य, ईश्वयरी ‘उपस्थिती’ यांच्या शोधासाठी अंतर्मुख होण्याऐवजी, बाह्य गोष्टींकडेच वळलेली असते – म्हणजे व्यक्ती जीवनात ज्या गोष्टी बघते, जाणते, करते त्या गोष्टींकडेच तिची चेतना वळलेली असते. तुम्ही जे काही करत असता त्यामध्ये व्यग्र असता, तुमच्या अवतीभोवती वावरणाऱ्या माणसांमध्ये, तुम्ही ज्या वस्तू वापरता त्या वस्तुंमध्ये, त्याचप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये, म्हणजे झोपणे, खाणे, गप्पा मारणे, थोडेसे काम, थोडीशी मौजमजा यांमध्ये व्यग्र असता आणि मग पुन्हा एकदा तीच सुरुवात होते – परत झोपणे, खाणे इ. इ. आणि पुन्हा तेच चालू राहते. आणि मग, हा काय म्हणाला, तो काय म्हणाला, त्याने काय केले पाहिजे, मी बरी आहे ना, माझी तब्येत चांगली आहे ना, इ. इ. अशा गोष्टींचा व्यक्ती सहसा विचार करत असते.
या साऱ्या गोष्टी मागे सोडून द्यायच्या आणि चेतनेसमोर व चेतनेत फक्त एकच गोष्ट येऊ द्यायची आणि ती महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या अस्तित्वाच्या आणि जीवनाच्या मूळ हेतुचा शोध घेणे, आपण कोण आहोत, आपण का जगतो, या साऱ्याच्या मागे काय आहे याचा शोध घ्यायचा. ही पहिली पायरी असते आणि ती काही इतकी सोपी नसते. प्रत्यक्षात काय आविष्कृत झाले आहे यापेक्षा, त्यामागील कारणामध्ये आणि त्याच्या ध्येयामध्ये असणारे स्वारस्य ही पहिली पायरी असते. म्हणजे, वरकरणी आणि बाह्यवर्ती गोष्टींशी असणाऱ्या पूर्ण तादात्म्यापासून स्वतःची चेतना काढून घेऊन ती आत वळविणे आणि आपल्याला ज्याचा शोध घ्यायचा आहे, जे ‘सत्य’ आपण शोधू पाहत आहोत त्यावर एक प्रकारची आंतरिक एकाग्रता करणे, ही असते पहिली प्रक्रिया.
आणि म्हणून, व्यक्तीने प्रथम स्वत:चा आत्मा आणि त्यावर स्वामित्व असणाऱ्या ईश्वराचा केवळ शोधच घेतला पाहिजे असे नाही तर, व्यक्ती त्याच्याशी तादात्म्य पावली पाहिजे. त्यानंतर मग ती व्यक्ती पुन्हा एकदा बाह्यवर्ती गोष्टींकडे वळण्यास आणि त्यांचे रुपांतर करण्यास आरंभ करू शकते. कारण तेव्हाच त्या गोष्टींना कोणत्या दिशेला वळवायचे आणि त्यांचे रुपांतर कशात करायचे याची व्यक्तीला जाण येते. ही पायरी सोडून एकदम पुढे उडी मारता येत नाही. आपण आधी स्वतःचा आत्मा शोधला पाहिजे, आणि त्याच्याशी एकत्व पावले पाहिजे ही अगदी अपरिहार्य गोष्ट आहे. आणि नंतर मग आपण रूपांतराकडे वळू शकतो.
श्रीअरविंदांनी एके ठिकाणी लिहिले आहे की, “जिथे इतरांच्या योगाची परिसमाप्ती होते तेथे आमच्या योगाचा (पूर्णयोगाचा) प्रारंभ होतो.” सहसा योग हा आत्म्याशी होणाऱ्या सायुज्याप्रत, ईश्वणराशी होणाऱ्या एकत्वाप्रत घेऊन जातो; खरं तर म्हणूनच त्याला ‘योग’ असे म्हणतात. आणि जेव्हा लोकं हे साध्य करतात तेव्हा त्यांच्या दृष्टीने ते मार्गाच्या अखेरीस येऊन पोहोचलेले असतात आणि त्यावरच ते समाधानी असतात. परंतु येथे श्रीअरविंदांनी असे लिहिले आहे की, “जेव्हा इतरांच्या दृष्टीने मार्ग पूर्णत्वाला पोहोचलेला असतो तेव्हा आपला मार्ग सुरू होतो.” तुम्हाला आता ईश्वूराचा शोध लागलेला असतो पण निरुपयोगी झालेल्या देहामधून ईश्वराने तुम्हाला बाहेर काढावे म्हणून वाट पाहत ध्यानाला बसून राहण्याऐवजी, उलट, आता या चेतनेनिशी तुम्ही तुमच्या शरीराकडे, जीवनाकडे वळता आणि रूपांतरणाच्या कार्याला सुरुवात करता, की जे अत्यंत कठीण परिश्रमाचे काम असते. इथेच श्रीअरविंदांनी या कार्याची तुलना, निबिड अरण्यामधून स्वतःचा मार्ग स्वतःच शोधत जाण्याशी केली आहे. कारण अशा प्रकारचे कार्य याआधी इतर कोणीही केलेले नाही, अशावेळी, म्हणजे आजवर ज्या मार्गाने कोणीच वाटचाल केलेली नाही, तो मार्ग प्रत्येकाने स्वतःचा स्वतःच तयार करणे आवश्यक असते.
– श्रीमाताजी [CWM 07 : 349-351]
- पूर्णयोगाचे ध्येय - September 6, 2024
- अनुभवांकडे पाहण्याचा योग्य दृष्टिकोन - September 5, 2024
- समाधी ही प्रगतीची खूण? - September 4, 2024