आध्यात्मिकता ४३
(तिमिर जावो….भाग ०२)
(तुमच्या व्यक्तिमत्त्वामधील) ही काळोखी बाजू ज्याक्षणी तुम्हाला आढळून येते, त्याक्षणी तुम्ही तिचे नीट निरीक्षण केलेत आणि “हा मी आहे,” असे म्हणाला नाहीत, आणि त्याऐवजी जर तुम्ही असे म्हणालात की, “नाही, ही माझी काळी छाया आहे, माझ्यामधून हा अंश बाहेर काढून टाकलाच पाहिजे,” आणि मग त्या काळोख्या भागावर प्रकाश टाकलात, आणि सद्भावनापूर्ण भागाच्या ज्ञानानिशी आणि प्रकाशानिशी, त्या काळोख्या भागाच्या नजरेला नजर भिडवून पाहिलेत, इथे त्याला पटवून देण्याचा प्रयत्न करायचा नाही (कारण तसे करणे अतिशय अवघड असते.) पण तुम्ही त्याला शांत राहायला भाग पाडले पाहिजे…
प्रथमतः त्यापासून स्वतःला दूर केले पाहिजे, मग त्यावर तीव्र प्रकाश टाकून, त्याला अशा रीतीने दूर भिरकावून दिले पाहिजे, की ती गोष्ट पुन्हा परतून माघारी येणार नाही. अशीही काही उदाहरणे आहेत की, त्यांच्यामध्ये परिवर्तन घडविणे शक्य झालेले आहे, पण अशी उदाहरणे अगदीच दुर्मिळ असतात.
अशी काही उदाहरणे आहेत की, जेव्हा त्या काळोख्या अंशावर किंवा त्या काळ्या छायेवर इतका प्रखर प्रकाश टाकण्यात आला की त्या प्रकाशाद्वारे त्या भागाचे परिवर्तन झाले आणि त्याचे त्या व्यक्तीच्या सत्तत्त्वामध्ये (truth) रूपांतर झाले. पण ही गोष्ट अगदीच दुर्मिळ आहे. असे करता येते, पण हे अगदीच दुर्मिळ आहे.
सहसा, असे म्हणणे अधिक चांगले की, “नाही, हा मी नाही, मला हे नको आहे, या स्पंदनाचा आणि माझा काही संबंध नाही, ती गोष्ट माझ्यालेखी अस्तित्वातच नाही, ती गोष्ट माझ्या प्रकृतीच्या विरोधी आहे.” आणि अशा रीतीने, सतत त्यावर जोर देऊन, ती हाकलून लावत, त्यावर प्रहार करतकरत, सरतेशेवटी व्यक्ती स्वतःला त्यापासून विलग करू शकते. (क्रमश:…)
– श्रीमाताजी [CWM 06 : 263]
- पूर्णयोगाचे ध्येय - September 6, 2024
- अनुभवांकडे पाहण्याचा योग्य दृष्टिकोन - September 5, 2024
- समाधी ही प्रगतीची खूण? - September 4, 2024