आध्यात्मिकता २९

(पूर्वसूत्र : स्वतःमधील आध्यात्मिक पुरुषाचा (spiritual being) शोध लावणे हे आध्यात्मिक मनुष्याचे मुख्य कर्तव्यकर्म असते आणि त्याच उत्क्रांतीच्या दिशेने जाण्यासाठी इतरांना साहाय्य करणे ही मानववंशासाठी त्याने केलेली खरी सेवा असते, या श्रीअरविंद लिखित वचनावर आधारित पुढील प्रश्न…)

(भाग – ०१)

साधक : माताजी, ज्याच्याकडे फारशी आध्यात्मिक क्षमता नाही अशी व्यक्ती या कार्यामध्ये चांगल्या रीतीने साहाय्य कसे करू शकते ?

श्रीमाताजी : एखाद्याकडे जास्त आध्यात्मिक क्षमता आहे, दुसऱ्या एखाद्याकडे कमी क्षमता आहे, असे म्हणता येईल का नाही, याबाबत सांगता येणार नाही. कारण ते तसे नसते.

आध्यात्मिक जीवन जगण्यासाठी चेतनेचे प्रतिक्रमण (reversal of consciousness) होणे आवश्यक असते. त्याची तुलना मानसिक क्षेत्रामध्ये व्यक्तीच्या अंगी असलेल्या क्षमतांशी, शक्यतांशी करणे अजिबात शक्य नाही. म्हणजे अमुक एका व्यक्तीकडे फारशी मानसिक, प्राणिक किंवा शारीरिक क्षमता नाही, किंवा त्याच्या शक्यता अगदी मर्यादित आहेत असे म्हणता येते. या क्षमता कशा विकसित करायच्या, नवीन क्षमता कशा संपादन करायच्या, (अर्थात हे तसे अवघड आहे पण तरीही) हे सगळे सांगता येऊ शकते. परंतु आध्यात्मिक जीवन जगणे म्हणजे व्यक्तीने आपल्याच अंतरंगातील एका वेगळ्याच विश्वाप्रत खुले व्हायचे असते. म्हणजे चेतनेचे प्रतिक्रमण घडवायचे असते, चेतनेला तिच्या मूळ स्थितीत न्यायचे असते.

सामान्य मानवी चेतनेची हालचाल ही बहिर्मुख असते. माणसं कितीही विकसित असली, अगदी अतिबुद्धिमान असली किंवा खूप यशस्वी असली तरी त्यांचीदेखील चेतना बहिर्मुख असते, साऱ्या ऊर्जा या बहिर्मुख असतात, संपूर्ण चेतना ही बाह्य दिशेनेच पसरलेली असते आणि चेतना थोडीफार अंतर्मुख झालेली असेल तरी ती अंतर्मुखता अगदीच अल्प असते, ती अतिशय दुर्मिळ असते, किंवा अगदीच त्रुटित असते. आणि ती अंतर्मुखतासुद्धा काही विशेष परिस्थितीच्या दडपणाखाली घडून येते, जोरदार धक्का बसला तर घडून येते. चेतनेच्या बहिर्मुखतेचे हे जे स्पंदन असते ते किंचित का होईना पालटावे आणि अंतर्मुख व्हावे नेमक्या याच हेतुने जीवन धक्केचपेटे देत असते.

ज्या ज्या व्यक्ती आध्यात्मिक जीवन जगल्या आहेत त्यांना एकसमानच अनुभव आलेला असतो : त्यांच्या अस्तित्वामधील काहीतरी अगदी अचानक प्रतिक्रमित झाले आहे, म्हणजे, अचानक काहीतरी बदल झाला आहे, काहीजण कधीकधी अचानक पूर्णपणे अंतर्मुख झाले आहेत, तसेच, त्याचवेळी अचानकपणे ऊर्ध्वमुख झाले आहेत, ते अंतरंगातून ऊर्ध्वमुख झाले आहेत. (अर्थात हे ऊर्ध्वमुख होणे म्हणजे बाहेर वर बघणे नसते, ते आंतरिक, सखोल असते, शारीरिकदृष्ट्या उंचीचा जो बोध होतो त्याच्यापेक्षा ही गोष्ट निराळी असते.) अंतरंगामध्ये काहीतरी अक्षरशः उलटेपालटे झालेले असते. हा एक निर्णायक अनुभव असतो – व्यक्तीची जीवनातील जी एक भूमिका असते, जीवनाकडे पाहण्याची जी एक विचारसरणी असते, त्यानुसार व्यक्ती जो एक दृष्टिकोन बाळगत असते, त्यामध्ये अचानकपणे परिवर्तन होते आणि कधीकधी तर हा बदल अतिशय निर्णायक असतो, तो अपरिवर्तनीय असतो.

(क्रमश:…)

– श्रीमाताजी [CWM 09 : 413-414]

श्रीमाताजी