साधक : आध्यात्मिक मार्ग अनुसरण्यासाठी एखाद्या व्यक्तीची तयारी झाली आहे का, हे ओळखण्याच्या काही खुणा आहेत का? विशेषेकरून, जेव्हा त्या व्यक्तीला आध्यात्मिक गुरु लाभलेला नसतो तेव्हा?

श्रीमाताजी : हो, सर्वात महत्त्वाची खूण म्हणजे, कोणत्याही परिस्थितीमध्ये जीवाची पूर्ण समता. ही शांत, स्थिर, महान शक्तीची एक प्रकारची भावना असते; आणि हा अगदी निरपवादपणे अटळ असा पाया आहे; हा शांतपणा म्हणजे जडत्वातून आलेला शांतपणा नसतो तर, एकाग्र शक्तीमुळे येणारी ती शांतीची संवेदना असते; ती तुम्हाला कायम स्थिर राहायला मदत करते. परिस्थिती कोणती का असेना, अगदी तुमच्या आयुष्यातील सर्वात भयंकर अशी परिस्थिती असली तरी, त्यावेळी देखील ती तुम्हाला अगदी स्थिर ठेवते. ही पहिली खूण आहे.

दुसरी खूण म्हणजे तुमच्या सामान्य, साधारण अशा चेतनेमध्ये तुम्ही पूर्णत: बंदिवान झालेला आहात; प्रचंड कठीण, काहीतरी गुदमरवून टाकणारे, दुःसह, अशा कशामध्ये तरी तुम्ही बंदिवान झाला आहात असे तुम्हाला वाटते; जणू काही एखादी अभेद्य भिंत तुम्हाला पाडायची आहे, असे तुम्हाला वाटते. आणि त्या यातना असह्य होतात, त्या घुसमटवणाऱ्या असतात. त्या यातना भेदून पलीकडे जाण्याचे आंतरिक प्रयत्न चालू असतात पण त्या भेदणे तुम्हाला जमत शक्य होत नाही. ही सुद्धा सुरुवातीच्या काही खुणांपैकी एक खूण आहे. याचा अर्थ असा की, तुमची आंतरिक चेतना अशा एका बिंदूपाशी येऊन पोहोचलेली असते की, आता तिचा बाह्य साचा हा तिच्यासाठी खूपच तोकडा पडू लागतो. सामान्य जीवन, सामान्य उद्योग, सामान्य नाती, या साऱ्या साऱ्या गोष्टी इतक्या लहान, इतक्या किरकोळ वाटू लागतात की, त्या तोडून टाकण्यासाठी आवश्यक असणारी एक शक्ती तुम्हाला तुमच्या आतूनच जाणवू लागते.

अजून एक खूण आहे, ती अशी की, तुमच्यामध्ये एक आस असते, आणि जेव्हा तुम्ही एकाग्र होता, तेव्हा तुम्हाला वरून काहीतरी खाली अवतरित होत आहे, तुम्हाला काही प्रतिसाद मिळत आहे असे जाणवते. एक प्रकाश, एक शांती, एक शक्ती तुमच्यामध्ये अवतरित होत आहे असे तुम्हाला जाणवते आणि तीही अगदी त्वरित – तुम्हाला त्यासाठी खूप वेळ घालवावा लागत नाही किंवा वाट पाहावी लागत नाही – आतून एक अभीप्सा उदित होते, एक हाक येते आणि लगेचच त्याला प्रतिसाद मिळतो. यावरूनही हे लक्षात येते की, (तुमचे ईश्वराबरोबरचे) ‘नाते’ चांगल्या रीतीने प्रस्थापित झाले आहे.

– श्रीमाताजी
(CWM 04 : 97-98)

श्रीमाताजी