(‘अतिमानस आविष्करण आणि पूर्णत्व-संपादन’ या विषयी श्रीअरविंद लिखित एका उताऱ्याचे वाचन श्रीमाताजींनी केले. त्या उताऱ्यामध्ये मन, प्राण तसेच शरीर या आधाराचे महत्त्व प्रतिपादन करण्यात आले होते. त्याच दृष्टीने ‘श्रीअरविंद आश्रमा’त व्यायाम, योग-आसने, प्राणायामादी शरीर-साधनेला महत्त्व दिलेले आढळते. या पार्श्वभूमीवर पुढील संवाद झालेला आहे.)

साधक : माताजी, प्रगतीसाठी क्रीडा-स्पर्धा आवश्यक आहेत का ?

श्रीमाताजी : नैतिक शिक्षणाच्या दृष्टीने विचार करता, खरंतर, त्या आवश्यक असतात कारण जर एखाद्याने त्या स्पर्धांमध्ये योग्य वृत्तीने सहभाग घेतला तर स्वत:च्या अहंकारावर ताबा मिळविण्याची ती एक उत्तम संधी असते. पण स्वत:च्या दुर्बलता व कनिष्ठ वृत्ती ह्यांच्यावर मात करण्याच्या भूमिकेतून त्याकडे न पाहता, जर का एखादा नुसताच खेळत राहिला तर साहजिकच आहे की, त्याला त्यांपासून कसा व काय फायदा करून घ्यायचा ते माहीत नसेल आणि त्यामुळे त्याला त्याचा काहीच उपयोग होणार नाही. परंतु कोणत्याही हीन प्रकारच्या प्रवृत्तींशिवाय, म्हणजे द्वेषभाव वा महत्त्वाकांक्षा न बाळगता, जर एखादा योग्य वृत्तीने खेळायची इच्छा बाळगेल; एखादा जर, ज्याला ‘खिलाडू वृत्तीने खेळलेला नि:पक्षपाती खेळ’ (fair play) असे म्हटले जाते अशा अभिवृत्तीने (spirit) खेळ खेळेल, म्हणजेच सर्वोत्तम तेच करण्याचा प्रयत्न करणे आणि यशापयशाची चिंता न करणे, अशी अभिवृत्ती राखेल; समजा त्याला यश मिळाले नाही किंवा त्याला अनुकूल अशा गोष्टी घडल्या नाहीत तरी त्यामुळे अस्वस्थ न होता तो जर प्रयत्नांची पराकाष्ठा करू शकेल, तर त्या गोष्टी उपयुक्त ठरतील. याचा परिणाम म्हणून, या अशा स्पर्धांमधून, स्व-नियंत्रण व कर्मफलापासून अलिप्तवृत्ती या गुणांनी व्यक्ती संपन्न होईल. या गोष्टी व्यक्तीचे असामान्य चारित्र्य घडविण्यामध्ये अतिशय साहाय्यकारी ठरतात.

अर्थातच, तुम्ही जर त्या स्पर्धा अगदी सामान्य पद्धतीने, सर्व प्रकारच्या सामान्य व हीन क्रियाप्रतिक्रिया राखत खेळलात, तर त्यांपासून तुम्हाला काहीच लाभ होणार नाही. पण हे तर कोणत्याही कृतीबाबत म्हणता येईल. मग ते खेळात असो किंवा बौद्धिक क्षेत्रात असो, जर कोणी कोणतीही कृती सामान्य पद्धतीने करेल, तर तसे करणे म्हणजे वेळ वाया घालावणेच आहे.

पण जर तुम्ही स्पर्धेमध्ये, वा सामूहिक क्रीडास्पर्धांमध्ये योग्य वृत्तीने खेळलात, योग्य वृत्तीने सहभागी झालात तर, ते एक चांगले शिक्षण आहे कारण ते तुम्हाला विशेष प्रयत्न करायला आणि तुमच्या स्वत:च्या अशा मर्यादा ओलांडण्यास भाग पाडते. ज्या एरवी बहुधा सुप्तच राहिल्या असत्या अशा तुमच्यातील बऱ्याच गोष्टींबाबत, हालचालींबाबत सजग करण्याकरता तुम्हाला मिळालेली ती एक नक्कीच उत्तम संधी असते. पण अर्थातच, तुम्हाला मिळालेली ही एक संधी आहे आणि प्रगतीचे साधन आहे हे तुम्ही कधीही विसरता कामा नये.

जर तुम्ही स्वत:ला नुसतेच मोकळे सोडलेत आणि सामान्य पद्धतीनेच, नुसतेच खेळत राहिलात तर तुम्ही तुमचा वेळ वाया घालविता आहात. पण हे सर्वच बाबतीत खरे आहे; केवळ खेळाबाबत आहे असे नाही, अगदी अभ्यास आणि इतर सर्व बाबतीतसुद्धा तेच खरे आहे. एखादा काय करतो यापेक्षा तो त्या गोष्टी कशा करतो, तो कोणत्या वृत्तीने त्या गोष्टी करतो यावर सारे काही अवलंबून असते.

…कोणतीही महत्त्वाकांक्षा बाळगू नका, कोणतेही ढोंग करू नका, आव आणू नका, प्रत्येक क्षणी तुमच्यातील चरम स्थितीत राहण्याचा प्रयत्न करा. कोणतेही काम करीत असताना अशा स्थितीत राहणे, ही सर्वांगीण जीवनाच्या दृष्टीने आदर्श स्थिती आहे. आणि अशी स्थिती जर एखाद्याला साध्य झाली तर, तो पूर्णत्वाच्या मार्गावर फार पुढे निघून गेला आहे हे निश्चित…. पण अर्थातच हे सारे खरोखर प्रामाणिकपणे करायचे असेल तर, एक प्रकारची आंतरिक परिपक्वता आवश्यक आहे.

– श्रीमाताजी [CWM 09 : 97-98]

श्रीमाताजी