बालक अगदी लहान असल्यापासूनच जोपासायला हवा असा एक गुण आहे, तो म्हणजे अस्वस्थ करणारी भावना (uneasiness). जेव्हा हातून एखादी चुकीची गोष्ट घडते तेव्हा स्वाभाविकपणे मनात निर्माण होणारी नैतिक असमतोलाची अस्वस्थ करणारी भावना! “अमुक अमुक गोष्टी करायच्या नाहीत” असे सांगितले असते म्हणून नव्हे किंवा शिक्षेला घाबरूनही नव्हे, तर ती अस्वस्थता स्वाभाविकपणे मनात उत्पन्न होते.

उदाहरणार्थ, एखादे बालक खोड्या करून जेव्हा त्याच्या वर्गमित्राला इजा करते तेव्हा, जर ते सहज, स्वाभाविक अशा अवस्थेत असेल तर त्याला अस्वस्थ वाटते. त्याला त्याच्या अस्तित्वाच्या खोल आत कुठेतरी दुःख जाणवते, कारण त्याने जे काही केलेले असते ते त्याच्या आंतरिक सत्याच्या विरूद्ध असते.

…अंतरंगात खोलवर असे काहीतरी असते की, ज्याला पूर्णत्वाची, महानतेची, सत्याची संवेदना असते आणि या सत्याला विरोध करणाऱ्या सर्व प्रकारच्या गतिविधींबाबत एक दु:खदायक संवेदना असते. आणि अवतीभोवतीच्या शोचनीय अशा उदाहरणांमुळे, बाह्य वातावरणामुळे ते बालक बिघडलेले नसेल, म्हणजेच ते त्याच्या सहज स्वाभाविक अवस्थेमध्ये असेल, तर जेव्हा त्याच्याकडून त्याच्या अस्तित्वाच्या सत्याच्या विरोधी असे काही घडते तेव्हा कोणीही काहीही न सांगता देखील, त्या बालकाला एक प्रकारची अस्वस्थता जाणवते. आणि म्हणून त्याच्यामध्ये टिकून असलेल्या या अस्तित्वाच्या सत्यावरच त्याच्या प्रगतीसाठीचे पुढचे सारे प्रयत्न आधारले गेले पाहिजेत.

…..केवळ एकच सच्चा मार्गदर्शक असतो, तो म्हणजे आंतरिक मार्गदर्शक. जर एखाद्या बालकाला अनर्थकारक अशी शिकवण मिळाली तर, अंतरंगातील ती छोटीशी गोष्ट (मार्गदर्शक) नाहीशी करण्याचा ते जोरकस प्रयत्न करते. आणि कधीकधी हा प्रयत्न इतका यशस्वी होतो की, त्यामुळे त्या आंतरिक मार्गदर्शकाबरोबरचा त्याचा सर्व संपर्कच तुटतो. आणि त्याचबरोबर चांगले आणि वाईट यांतील फरक ओळखण्याची शक्तीही ते बालक गमावून बसते. म्हणून मी सांगत असते की, अगदी लहानपणापासूनच मुलांना त्यांच्या अंतरंगी असणाऱ्या अस्तित्वाची जाणीव करून द्यायला हवी.

…लहान मुलाला तात्त्विक स्पष्टीकरण देणे गरजेचे नसते, पण त्याला या आंतरिक स्वस्थतेच्या, समाधानाच्या भावनेचा अनुभव द्यायला हवा. जेव्हा एखादी चुकीची, विरोधी गोष्ट करण्यापासून ती आंतरिक छोटीशी गोष्ट त्याला अडविते, तेव्हा त्याला जो मनस्वी आनंद होतो त्याची जाणीव त्याला करून द्यायला हवी. आणि अशा प्रकारच्या अनुभवावरच सर्व प्रकारचे शिक्षण आधारलेले असले पाहिजे. मुलाची अशी धारणा व्हायला हवी की, जर त्याला हे आंतरिक समाधान मिळाले नाही तर, काहीच टिकू शकणार नाही कारण आंतरिक समाधान हीच एकमेव गोष्ट ‘चिरस्थायी’ असते.

– श्रीमाताजी [CWM 04 : 24-25]

श्रीमाताजी