संन्यासवादी जीवनपद्धती ही आध्यात्मिक पूर्णतेसाठी अगदी अनिवार्यपणे आवश्यकच असते किंवा आध्यात्मिक मार्ग म्हणजे संन्यासवादी मार्गच असतो, असे मी मानत नाही.

एखाद्या कार्यामध्ये किंवा कोणत्याही कर्मामध्ये, किंवा ‘ईश्वरा’ला आपल्याकडून ज्या कर्माची अपेक्षा आहे त्या सर्व प्रकारच्या कर्मांमध्येसुद्धा अहंकार आणि कर्मफलाच्या इच्छेचा त्याग करून, ‘ईश्वरा’प्रत समर्पण करण्याचा, आध्यात्मिक आत्मदान करण्याचा आणि आध्यात्मिक आत्म-प्रभुत्वाचा आणखी एक मार्गदेखील आहे.

तसे नसते तर, भारतामध्ये ‘जनक’ किंवा ‘विदुरा’सारख्या थोर आध्यात्मिक व्यक्ती आढळल्या नसत्या; इतकेच काय ‘श्रीकृष्ण’देखील आढळला नसता; किंवा अगदी असताच तर तो ‘श्रीकृष्ण’ वृंदावन, मथुरा, द्वारका यांचा ‘अधिपती’ झाला नसता; तो राजपुत्र आणि योद्धा किंवा ‘कुरूक्षेत्रा’तील सारथी झाला नसता; तर तो फक्त एक थोर तपस्वीच बनून राहिला असता.

‘महाभारता’मध्ये किंवा अन्यत्र, ‘भारतीय धर्मशास्त्रा’मध्ये आणि ‘भारतीय परंपरे’मध्ये, जीवनाच्या परित्यागावर आधारित आध्यात्मिकतेला आणि कर्मप्रधान आध्यात्मिक जीवनाला एकसारखेच स्थान देण्यात आलेले आहे. जीवनाच्या परित्यागावर भर देणारा संन्यासवादी मार्ग हाच तेवढा ‘भारतीय परंपरे’तून आलेला आहे, आणि ‘सर्वकर्माणि’, सर्व प्रकारच्या कर्मांचा आणि जीवनाचा स्वीकार हा मार्ग ‘युरोपियन किंवा पाश्चात्त्य’ आहे, तो आध्यात्मिक नाही, किंवा तो ‘भारतीय’ नाही असे म्हणता येत नाही.

– श्रीअरविंद [CWSA 29 : 250]

श्रीअरविंद
Latest posts by श्रीअरविंद (see all)